Tuesday 11 February 2014

रागाचा राग का आवळता ?

             
                   मला जवळपास सर्वजण म्हणतात ,तुला राग आलेला कधी पाहिलं नाही ,किंवा तुला कधी राग येतो का ? तेव्हा म्हटलं याविषयी पण लिहावं थोडस .माणूस म्हटलं कि भावना आल्याच आल्या मग त्या भावनेच्या प्रवाहात वाहून जाणं हि आलच .पण या प्रवाहात वाहून जाता जाता आपण कधी त्या भावना एकमेकांत मिसळतो ते आपल्यालाच कळत नाही .
               माझा एक मित्र आहे जो त्याच्या खास मैत्रिणीवर नेहमी रागवायचा ,नेहमी तिच्याशी चीड-चीड करून बोलायचा .मी एकदा त्याला विचारलं कि ,"का रे बाबा एवढ का चिडतोस तिच्यावर ?" .तेव्हा त्याने अस्वस्थ होऊन बरीच कारण सांगितली ,असच माझी एक मैत्रीण नेहमी म्हणायची कि तिचे घरचे तिला सारख रागावतात ,कारण ती अभ्यास करत नसे म्हणून … 
         आपल्या आसपास हे नेहमी घडत असत ,पण माणस का रागाला जातात .वास्तविक राग हि भावना आहे अस मी नाही मानत .जस जिभेच्या चवी म्हणजे गोड,आंबट ,कडू ,तुरट या एवढ्याच पण आपण नकळत 'तिखट' हि पण एक चवच बनवून टाकली पण खर तर तिखट लागत कारण त्या खाण्याने आपल्या जिभेच्या काही पेशींना इजा पोहोचते आणि म्हणून आपला मेंदू त्या इजेची जाणीव करून देत असतो .तसच राग येतो म्हणजे आपल्याला कुठलीतरी भावना व्यक्त करायची असते ,पण आपण ती व्यक्त न करता त्याला रागाच्या माध्यमातून व्यक्त करतो … 
         माझ्या त्या मित्राला त्या मैत्रिणीची काळजी वाटायची पण तिने स्वतःची काळजी घेण्यात निष्काळजीपणा केला कि हा तिच्यावर रागवायचा ,चीड-चीड करायचा .पण याला तिच्याविषयी जी काळजी वाटायची ती तो तिला कधीच बोलून दाखवायचा नाही ,फक्त रागाच्या माध्यमातून ती भावना व्यक्त करायचा .बहुतेक पालकांचंही तसच असत ,मुलांविषयी वाटणारी काळजी ,प्रेम ,माया हे ते प्रत्येकवेळी शब्दातून व्यक्त नाही करू शकत म्हणून ते रागाच्या माध्यमातून दाखवतात .… 
                  आपणही तेच करतो ,जेव्हा कुणीतरी आपल्याला दुखावतो तेव्हा आपण त्याला 'मी दुखवलोय 'हे न सांगता चीड-चीड करतो ,कुणीतरी चुकीच वागत तेव्हा आपण त्याची चूक शांतपणे त्याच्या लक्षात आणून न देत त्याच्यावर रागावतो .असच प्रेम ,राग,अस्वस्थता ,दुखं ,काळजी ,अहंकार या भावना व्यवस्थित व्यक्त करता न आल्याने ,त्याला रागाच आवरण चढवून आपण नाती बिघडवतो .तुम्ही जेव्हा रागाला जाता तेव्हा तुम्ही अपेक्षा करता कि समोरच्याने तुमच्या मनातल समजून घ्यावं ,तुमच्या भावना समजून घ्याव्या ,पण सर्वांनाच ते जमत अस नाही आणि मग त्यातून नको ते भांडण ,गैरसमज उद्भवतात आणि नाती बिघडतात .
                म्हणून रागीट स्वभाव कमी करण्याचा सर्वात सोप्पा उपाय म्हणजे आपल्या भावना प्रामणिकपणे व्यक्त करणे ,कारण ज्यांच्यावर आपण हक्काने रागावतो त्याना त्याच हक्काने आपल्या मनातल्या भावना सांगितल्या तर पहा नाती कशी फुलतील ते .….

                                                                                                         - सुधीर 

No comments:

Post a Comment