Saturday 8 February 2014

काय आहे सौंदर्य ?

                     
                  सुफी संप्रदायात एक संत स्त्री होऊन गेली ,तिचे नाव होत राबिया .अशा संत स्त्रिया अगदी बोटाच्या हातावर मोजण्या इतक्याच आहेत .राबिया आपल्या झोपडीत रहायची ,सकाळी प्रार्थना करायची .तिच्या शेजारच्या झोपडीत एक मुस्लिम फकीर पण राहायचा ,त्याच नाव होत हसन .एके दिवशी पहाटे पहाटे हसन उठला ,सूर्याची कोवळी कोवळी किरणे पृथ्वीला कुरवाळीत होती ,वाऱ्याची शीतल झुळूक मन प्रसन्न करीत होती , हसनने निसर्गाचे हे प्रसन्न रूप पाहिलं आणि रबियाला हाक मारली .
                  तो म्हणाला,"राबिया ,तुझ ध्यान थोडा वेळ बंद कर आणि बाहेर येउन पहा ,किती सुंदर पहाट जन्माला घातलीय ईश्वराने ,हे सौंदर्य पाहायला बाहेर ये ."
                      राबिया हसली आणि म्हणाली ,"असा किती वेळ बाहेर बसशील हसन ? आत ये ,ज्या ईश्वराने या पहाटेला जन्माला घातलं तो ईश्वर माझ्यासमोर उभा आहे .ही पहाट तर सुंदर आहेच ,पण ज्यान तिला जन्म दिला त्याला पहा ,तो ईश्वर बघ किती रमणीय आहे ,सुंदर आहे ."
                 माणूस जन्म घेतल्यापासून बाह्य सौंदर्याकडेच लक्ष देतो ,पण आंतरिक सौंदर्य पाहणारेही असतातच ,त्यातलीच हि राबिया व तिची कथा .या कथेतून माणसाची दोन प्रतीक दिसतात ,एक जण बाह्य सौंदर्यावर मोहित होतो तर दुसरा आंतरिक सौंदर्यावर जीव टाकतो .संथ ,शांत तलावात दिसणाऱ्या चंद्राच्या प्रतिबिम्बाकडे पाहून एखादा प्रसन्न होतो तर दुसरा शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहून प्रसन्न होतो
                 कमनीय बांधा ,कमलनयन ,आजानबाहू अशी शारीरिक सौंदर्याची लक्षण असणारे राम ,कृष्ण ,बुद्धासारखे महात्मे आजही परिचित आहेत ते त्यांच्या आंतरिक सौंदर्यामुळे .माणूस बाह्य सौंदर्य पाहतो ,पण शरीराच्या आत मनात डोकावून पाहण्याचे प्रयत्न तो सहसा तो करत नाही .कारण सत्याला सामोरे जाण्याचे धाडस त्याच्यात नसत .आज प्रेम-विवाहानंतर काही महिन्यातच घटस्फोट घेण्याच प्रमाण वाढलेलं आहे हे याच्यामुळेच .
                   समाजात अपंग असतील तर त्यांच्याकडे पण एक तर सहानभूतीने पाहतात किंवा ते कुणीतरी महापापी असल्याच्या दृष्टीने पाहतात ,आणि हेच लोक मात्र गणपती च्या पाया पडतात ,त्याला पूजतात ,मला त्यांना विचारव वाटत कि का हो ,हत्तीच तोंड असलेला ,दातांचे सुळे बाहेर आलेला आणि उंदीर सोबती असलेला गणपती तुम्हाला चालतो ,त्याच्या पाया पडता ,त्याच्या मंदिरात हजारो रुपये दान करता पण तोच एखादा हात किंवा पाय नसलेला अथवा बुद्धीने थोडा कमजोर असलेला माणूस गणपतीच्याच मंदिराबाहेर भिक मागत असेल तर मात्र तुम्ही त्याच्याकडे हीन आणि तुच्छतेच्या नजरेने पाहता आणि उपकार केल्यासारखे १-२ रुपये त्याला देऊन निघून जाता ,कसली आहे हि प्रवृत्ती  …  
                   काळ्या रंगावरून पण तेच ,कृष्ण असो व राम हे पण रंगाने काळेच होते तरीपण ते मनाने इतके सौंदर्यवान होते म्हणून तर त्यांचा काळा रंग यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आड नाही आला कधी .पण हीच प्रवृत्ती आज कुठेतरी हरवत चालली आहे ,रंगाने काळे सावळे असणारे पण स्वतःकडे कमीपणाच्या नजरेने पाहतात आणि रंगाने गोरे असणारे तर रंगाच्या अहंकारातच बुडून गेलेले असतात .म्हणून सर्वांच्या मनातली सौंदर्याची असलेली व्याख्या कुठेतरी बदलण्याची गरज आहे ….

                                                                                                    - सुधीर 

No comments:

Post a Comment