आज कुणाची तरी आठवण येत होती ,एक अस नात जे जगासाठी तर केव्हाच संपल पण मनासाठी ते कायम अस्तित्वात असणारे ,कारण माणस जगाच्या कुठल्याही कानाकोपर्यात असली तरी मनाच्या कोपऱ्यात ती कायम असतात . नाती संपतात ,कारण माणस दुरावतात ,मग ती शरीराने असो व मनाने पण या संपलेल्या नात्यांची एक अजब गम्मत आहे ,एखाद नात कितीही चांगल असल तरी प्रत्येकाची नात्यांचा निरोप घेण्याची पद्धत वेगळीच असते .
माझी अशी अनेक नाती मला आठवतायेत जी मी न सांगता बंद केलीत .माझी नात्यांची निरोप घेण्याची पद्धत वरवर पाहता शांत आहे . पटेनास झालं कि मी हळूहळू कासवासारख अलगद पाय ओढून घेतो त्या नात्यातून . इतक अलगद कि ,मी त्या माणसाच्या आयुष्यातून निघून गेलो हे त्यालाही कळत नाही . त्यानंतर भले मी त्या माणसाशी नीट बोलत असेन ,पण मी त्या नात्यातून निघून गेलेला असतो . पण काही काही नाती अशी असतात ,ती अशा तऱ्हेने संपतात कि व्यवस्थित निरोप घ्यायची पण उसंत मिळत नाही . आणि जेव्हा निरोप व्यवस्थित घेता येत नाही तेव्हा हि गोष्ट कायम मनाला बोचत राहते .मग मन सारख त्या शेवटच्या क्षणांमध्ये अडकून राहते आणि लागून राहते मनाला ती एक हुरहूर ,न घेतलेल्या निरोपाची ,संपूनही न संपलेल्या नात्याची . अस म्हणतात कि जाताना "जातो मी" अस म्हणू नये तर नेहमी "येतो मी" अस म्हणावं ,पण मी आजही वाट पाहतोय त्या क्षणांची जेव्हा मला संधी मिळेल त्या अर्धवट निरोपांना पूर्ण करायची ,त्या क्षणांना पूर्ण करायची ज्या क्षणी "येतो मी" असं मला म्हणायचं होत पण ते म्हणता नाही आल .तेव्हा एक वाक्य मला आठवत नेहमी
There is 'good' in every goodbye ,so always make your goodbyes a good one " ....
- सुधीर
- सुधीर
No comments:
Post a Comment