Tuesday 25 February 2014

स्वातंत्र्यवीर सावरकर

               
                    आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आणि आजच त्याचं चरित्र वाचायला माझ्या हाती पडल हे माझ भाग्यच .. त्यानिमित्त मला पु.ल.देशपांडे याचं एक भाषण वाचायला मिळालं .. १९८३ च्या याच दिवशी पु.ल अंदमान च्या सेल्युलर तुरुंगाला भेट द्यायला गेले होते ,ते सावरकरांवर एक लघुपट बनवत होते व त्यानिमित्त ते तुरुंग पाहायला गेले होते .हेच ते तुरुंग जिथे सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यावर १४ वर्षे ठेवले होते ..
             तुरुंगाच्या कारागृहाच्या तिसर्या मजल्यावर पु.ल सावरकरांच्या कोठडीपर्यंत आले आणि ती पाहताच पु.ल नां गहिवरून आले . ते म्हणाले ,"तात्यांना इथे ठेवले होते ?". त्यांचा गळा भरून आला ,त्यांना पुढे काहीच बोलवेना . सतत हसणारे आणि दुसर्यांना हसवणारे पु.ल ,यांचे हे वेगळेच रूप होते . हळू-हळू पु.ल कोठडीत शिरले ,१३*७ ची ती खोली पाहून पु.ल चा गळा भरून आला . तिथे त्या काळोखात ,भिंतीवर असलेल्या सावरकरांच्या तैलचित्राला पु.ल नी पुष्पहार अर्पण केला . काही क्षण काहीच न बोलता पु.ल त्या तैलचित्राकडे पाहत राहिले . मग काही वेळात कारागृहाच्या मैदानात पु.ल नी हे भाषण दिले जे वाचून माझ्या पण डोळ्यात पाणी आल .. या भाषणाची PDF ची लिंक मी या लेखाच्या शेवटी दिली आहे ,तरी ती उघडून वाचावी ,म्हणजे आपणास पण कळेल कि या आपल्या भारत देशात अगदी दोन-तीन च महान लोकांचा उदो-उदो करून बाकीच्यांना सर्रास अडगळीत टाकले जाते ते फक्त घाणेरड्या राजकारणापायी ,आणि त्याला आपली साथ मिळते .. 
               आधुनिक काळात सावरकर असो वा नेताजी सुभाष चन्द्र बोस असो व शहीद भगतसिंग ,अशा अनेक महात्म्यांना राजसत्तांनी जाणून-बुजून अडगळीत टाकले आणि आपणही त्यांना विसरून गेलो .ज्यांनी आपल अख्ख आयुष्य या भारतमातेच्या चरणी अर्पण केल त्यांना याच भारताचे नागरिक कसे काय विसरू शकतो ,एवढे का आपण निष्काळजी झालोत ? इतिहासाबद्दलच एक वाक्य आपण नाही लक्षात ठेवत कि जी माणस त्यांचा इतिहास विसरतात त्यांची कधीच प्रगती होत नाही . अहिंसा ,धर्मनिरपेक्षता हि तत्वे पाळायलाच हवीत पण त्याचबरोबर अन्यायाचा प्रतिकार ,स्वधर्म आणि संस्कृतीचा अभिमान हा पण असायलाच हवा नाहीतर आपली अवस्था त्या पहारेकरी सारखी होईल जो एका संपूर्ण गावाच रक्षण करण्यात रात्र घालवायचा पण चोरट्यांनी त्याचच घर लुटून नेल .
                  देशासाठी सर्वाधिक काळ कुणी कारावास भोगला असेल तर तो विक्रम सावरकरांच्या नावावर जातो .जेव्हा त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि त्यांना अंदमानच्या त्या तुरुंगातल्या कोठडीमध्ये आणले गेले तेव्हा आपल अख्ख आयुष्य या १३*७ च्या कोठडीत जाणार याच विचाराने काय अवस्था झाली असेल त्यांची . तरीपण हार न मानता ,न खचता सावरकर त्या कोठडीत १४ वर्षे राहिले ,कशासाठी ?  तर फक्त देशासाठी . आज आपल्याला साधे २४ तास एकटे राहावे लागले तर काय अवस्था होते आपल्या मनाची ,तर विचार करा १४ वर्ष कशी काढली असतील सावरकरांनी .आणि नुसती ती वर्ष काढली नाहीत तर त्यात पण त्यांनी खचून न जाता ,आता माझ कस होणार ?या असल्या नकारात्मक विचारांच्या आहारी न जाता जिद्दीने स्वतःचे विचार त्यांच्या लिखाणातून ,त्यांच्या कवितांमधून मांडत राहिले .. 
               आपल आयुष्य सुद्धा एका कोठडीत घालवायला तयार असणारे ते वीर सावरकर पाहता आणि आज त्यांना आणि त्यांच्या विचारांना विसरत चालणारी तरुण पिढी पाहता ,अस वाटत कि सावरकर मुक्त जगाच्या प्रकाशातून कोठडीच्या अंधारात जाउनपण खर्या अर्थाने प्रकाशात गेले ,आणि आपण मुक्त जगाच्या प्रकाशात असूनही अजूनपण अंधारातच वावरत आहोत .. पु.ल च्या त्या भाषणाची हि लिंक ,यावर क्लिक केल्यास ते भाषण वाचायला मिळेल आणि मला खात्री आहे कि हे भाषण नक्कीच प्रेरणादायी वाटेल आणि आपण नक्की काय विसरत चाललो आहोत याची पण प्रचीती येईल वाचणार्यांना … 
http://www.savarkar.org/files/u1/PL_Deshpande_on_Savarkar.pdf
                 

                                                                                                                   - सुधीर 

Monday 24 February 2014

पहिला पाऊस …

पहिला पाऊस … आत्ता नुकताच या वर्षातला पहिला-वहिला पाउस पडला .पाउस तर अगदीच थोडा पडला पण या पहिल्या पावसाचा तो सुगंध मनात मात्र  दरवळत राहील .लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ,न चुकता सर्वांनाच हा सुगंध येताच पटकन जाऊन ती ओली-ओली माती खावीशी वाटण्याची ही भावना अदभूत आहे .
                         
                            आज पहिला तो पाऊस
                            गारवा देऊन गेला ,
                            गारव्यात त्या अनोखी
                            एक आठवण देऊन गेला  …..

पहिल्या पावसाच्या सुगंधात का कुणास ठाऊक पण मनातल्या कोपर्यात दडलेल्या ,किंबहुना आपल्याला परिस्थितीपायी दडवाव्या लागलेल्या त्या खास आठवणी नकळत उफाळून येतात आणि सुरु करतात बाहेरच्या पावसासोबत ,मनात आठवणींच्या पावसाचा खेळ …. 
                         
                            थेंबांच्या त्या गारव्यात
                            एक आठवण देऊन गेला ,
                            आज न भिजताच
                            मला हा चिंब भिजवून गेला  ……

आयुष्यात पहिल्या येणाऱ्या गोष्टंच ,त्या पहिल्या क्षणांचे मोल हे ते क्षण निघून गेल्यावरच कळत ,जस पाहिलं प्रेम .काय जादू असते त्या पहिल्या प्रेमात ,त्या क्षणांमध्ये कि आजपण त्या आठवणी ,मन व्यापून टाकतात .कितीही दाबून टाकल्या तरी या पहिल्या पावसाच्या सुगंधात त्या हळूच डोक वर काढतात .मग सुरु होतो थेंबांचा तो अनोखा खेळ ,बाहेर रप-रप पडणारे पावसाचे ओले-ओले थेंब आणि इथे मनात रिप-रिप पडणारे आणि चिंब भिजवून टाकणारे ,आठवणींचे ते थेंब … 

                           बाहेरचा तो पाऊस
                           हे शरीर भिजवून गेला
                           पण ,
                           आठवणींचा आतला पाऊस
                           डोळे पण भिजवून गेला …...

आठवणी चांगल्या असो वा वाईट ,पण त्या आठवणीच असतात ,कितीही आवडल्या तरीही त्या जुन्याच असतात .काही क्षणांसाठी आल्या तरी त्या सोडून पुढच आयुष्य जगावच लागत .थेंब छोटा असो वा मोठा ,तो अंगावर पडल्यावर भिजावच लागत .पाउस तर थांबला थोड्याच वेळात ,पण या आठवणी नाही थांबत ,कितीपण गरम भजे खाल्ले तरी ,आठवणींचा हा गारवा नाही थांबत ..... 
                       
                            काही क्षण का होईना
                            तिची साथ देऊन गेला
                            आणि ,
                            आजचा हा पहिला पाउस
                            अनोखा गारवा देऊन गेला ……


                     
                                                                                                                 - सुधीर

                       
                           

Sunday 16 February 2014

न घेतलेला निरोप

       
              आज कुणाची तरी आठवण येत होती ,एक अस नात जे जगासाठी तर केव्हाच संपल पण मनासाठी ते कायम अस्तित्वात असणारे ,कारण माणस जगाच्या कुठल्याही कानाकोपर्यात असली तरी मनाच्या कोपऱ्यात ती कायम असतात . नाती संपतात ,कारण माणस दुरावतात ,मग ती शरीराने असो व मनाने पण या संपलेल्या नात्यांची एक अजब गम्मत आहे ,एखाद नात कितीही चांगल असल तरी प्रत्येकाची नात्यांचा निरोप घेण्याची पद्धत वेगळीच असते .
         माझी अशी अनेक नाती मला आठवतायेत जी मी न सांगता बंद केलीत .माझी नात्यांची निरोप घेण्याची पद्धत वरवर पाहता शांत आहे . पटेनास झालं कि मी हळूहळू कासवासारख अलगद पाय ओढून घेतो त्या नात्यातून . इतक अलगद कि ,मी त्या माणसाच्या आयुष्यातून निघून गेलो हे त्यालाही कळत नाही . त्यानंतर भले मी त्या माणसाशी नीट बोलत असेन ,पण मी त्या नात्यातून निघून गेलेला असतो . पण काही काही नाती अशी असतात ,ती अशा तऱ्हेने संपतात कि व्यवस्थित निरोप घ्यायची पण उसंत मिळत नाही .              आणि जेव्हा निरोप व्यवस्थित घेता येत नाही तेव्हा हि गोष्ट कायम मनाला बोचत राहते .मग मन सारख त्या शेवटच्या क्षणांमध्ये अडकून राहते आणि लागून राहते मनाला ती एक हुरहूर ,न घेतलेल्या निरोपाची ,संपूनही न संपलेल्या नात्याची . अस म्हणतात कि जाताना "जातो मी" अस म्हणू नये तर नेहमी "येतो मी" अस म्हणावं ,पण मी आजही वाट पाहतोय त्या क्षणांची जेव्हा मला संधी मिळेल त्या अर्धवट निरोपांना पूर्ण करायची ,त्या क्षणांना पूर्ण करायची ज्या क्षणी "येतो मी" असं मला म्हणायचं होत पण ते म्हणता नाही आल .तेव्हा एक वाक्य मला आठवत नेहमी 
         There is 'good' in every goodbye ,so always make your goodbyes a good one " ....

                                                                                                             - सुधीर 

Thursday 13 February 2014

सॉक्रेटीस आणि गीता

               

               सॉक्रेटीस आणि गीता यांचा तसा काही संबंध नाही ,पण जर तो आला असता तर पाश्चात्य तत्वज्ञानच बदलून गेले असते .सॉक्रेटीसला पाश्चात्य तत्वज्ञानाचा जनक म्हणतात .सॉक्रेटीसने त्याच्या आयुष्यात कुठलेच तत्वज्ञान सांगितले नाही पण त्याने तत्कालीन तत्वज्ञानाला आव्हान जरूर दिले आणि पाश्चात्य लोकांना विचार करण्यास भाग पाडले .
                सॉक्रेटीसची पद्धत अशी होती कि तो "धर्म काय आहे ?" किंवा "न्याय काय आहे ?" असे प्रश्न विचारात असे ,आणि त्यावर जी उत्तर मिळतील त्या उत्तरांना सर्व बाजूंनी पडताळून तो त्यातूनपण प्रश्न उभा करत असे .म्हणजे त्याला कुणी धर्म म्हणजे काय याविषयी सांगितले कि "धर्म म्हणजे दान करणे ." तर तो लगेच विचारत असे कि "माझ्याकडे काहीच नसताना दान करणे धर्म कस असू शकत ,आणि जर हेच धर्म आहे तर  ते सर्व जणांना लागू व्हायला पाहिजे ,परिस्थितीनुसार धर्म बदलत नसतो ,मग धर्म म्हणजे नक्की काय ?" अशाच पद्धतीने तो लोकांना त्यांच्या धारणा व समजुती पुन्हा एकदा पडताळून पाहायला लावत असे .त्याच हे सर्व तत्वज्ञान गुरु शिष्य यांच्यात चालणाऱ्या संवादाच्या रूपाने सापडते जे त्याचा शिष्य 'प्लेटो' ने नंतर लिहून ठेवले आहे .    
              पण सॉक्रेटीसला त्याचा या धर्म ,न्याय ,वास्तव म्हणजे काय ,ईश्वर म्हणजे कोण या प्रश्नांची उत्तरे नाही मिळाली .त्याने लोकांना अंतर्मुख करायला जरूर लावले पण त्याच प्रश्नांची उत्तरे द्यायला त्याला पण नाही जमले .म्हणून माझ्या मनात हा विचार आला कि सॉक्रेटीसचा काळ हा साधारणपणे ई .स .पुर्व ४००-५०० दरम्यानचा ,म्हणजेच भगवतगीता श्रीकृष्णाने सांगितली त्यांनतर १००० वर्षानंतरचा .म्हणजेच सॉक्रेटीसला पडणाऱ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे खर तर गीतेत आहेत ,धर्म म्हणजे काय ,न्याय म्हणजे काय ,ईश्वर म्हणजे कोण या सर्व प्रश्नांची उत्तरे गीतेत दिली आहेत .आणि नुसती उत्तरे नाही तर त्या उत्तरांना जगण्यात कस वापरायच हे पण गीतेत सांगितलं आहे . 
              यातून आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे ,गीतेचं महात्म्य .ज्या काळात कृष्णाने गीता सांगितली तो काळ असा होता जेव्हा जगात कुठेही ठोस अस तत्वज्ञान अस्तित्वात नव्हते ,म्हणूनच भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला तत्वज्ञानाच्या रूपाने गीतेने पहिला-वहिला डोस पाजला असे म्हणायला हरकत नाही .म्हणूनच अस वाटत कि जर सॉक्रेटीसला गीता वाचायला मिळाली असती तर त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळाली असती आणि आज स्वतःला विकसित म्हणून घेणाऱ्या पाश्चिमात्य देशाचं तत्वज्ञान आणि विचारसरणी वेगळीच असती .…

                                                                                                          - सुधीर 

Tuesday 11 February 2014

रागाचा राग का आवळता ?

             
                   मला जवळपास सर्वजण म्हणतात ,तुला राग आलेला कधी पाहिलं नाही ,किंवा तुला कधी राग येतो का ? तेव्हा म्हटलं याविषयी पण लिहावं थोडस .माणूस म्हटलं कि भावना आल्याच आल्या मग त्या भावनेच्या प्रवाहात वाहून जाणं हि आलच .पण या प्रवाहात वाहून जाता जाता आपण कधी त्या भावना एकमेकांत मिसळतो ते आपल्यालाच कळत नाही .
               माझा एक मित्र आहे जो त्याच्या खास मैत्रिणीवर नेहमी रागवायचा ,नेहमी तिच्याशी चीड-चीड करून बोलायचा .मी एकदा त्याला विचारलं कि ,"का रे बाबा एवढ का चिडतोस तिच्यावर ?" .तेव्हा त्याने अस्वस्थ होऊन बरीच कारण सांगितली ,असच माझी एक मैत्रीण नेहमी म्हणायची कि तिचे घरचे तिला सारख रागावतात ,कारण ती अभ्यास करत नसे म्हणून … 
         आपल्या आसपास हे नेहमी घडत असत ,पण माणस का रागाला जातात .वास्तविक राग हि भावना आहे अस मी नाही मानत .जस जिभेच्या चवी म्हणजे गोड,आंबट ,कडू ,तुरट या एवढ्याच पण आपण नकळत 'तिखट' हि पण एक चवच बनवून टाकली पण खर तर तिखट लागत कारण त्या खाण्याने आपल्या जिभेच्या काही पेशींना इजा पोहोचते आणि म्हणून आपला मेंदू त्या इजेची जाणीव करून देत असतो .तसच राग येतो म्हणजे आपल्याला कुठलीतरी भावना व्यक्त करायची असते ,पण आपण ती व्यक्त न करता त्याला रागाच्या माध्यमातून व्यक्त करतो … 
         माझ्या त्या मित्राला त्या मैत्रिणीची काळजी वाटायची पण तिने स्वतःची काळजी घेण्यात निष्काळजीपणा केला कि हा तिच्यावर रागवायचा ,चीड-चीड करायचा .पण याला तिच्याविषयी जी काळजी वाटायची ती तो तिला कधीच बोलून दाखवायचा नाही ,फक्त रागाच्या माध्यमातून ती भावना व्यक्त करायचा .बहुतेक पालकांचंही तसच असत ,मुलांविषयी वाटणारी काळजी ,प्रेम ,माया हे ते प्रत्येकवेळी शब्दातून व्यक्त नाही करू शकत म्हणून ते रागाच्या माध्यमातून दाखवतात .… 
                  आपणही तेच करतो ,जेव्हा कुणीतरी आपल्याला दुखावतो तेव्हा आपण त्याला 'मी दुखवलोय 'हे न सांगता चीड-चीड करतो ,कुणीतरी चुकीच वागत तेव्हा आपण त्याची चूक शांतपणे त्याच्या लक्षात आणून न देत त्याच्यावर रागावतो .असच प्रेम ,राग,अस्वस्थता ,दुखं ,काळजी ,अहंकार या भावना व्यवस्थित व्यक्त करता न आल्याने ,त्याला रागाच आवरण चढवून आपण नाती बिघडवतो .तुम्ही जेव्हा रागाला जाता तेव्हा तुम्ही अपेक्षा करता कि समोरच्याने तुमच्या मनातल समजून घ्यावं ,तुमच्या भावना समजून घ्याव्या ,पण सर्वांनाच ते जमत अस नाही आणि मग त्यातून नको ते भांडण ,गैरसमज उद्भवतात आणि नाती बिघडतात .
                म्हणून रागीट स्वभाव कमी करण्याचा सर्वात सोप्पा उपाय म्हणजे आपल्या भावना प्रामणिकपणे व्यक्त करणे ,कारण ज्यांच्यावर आपण हक्काने रागावतो त्याना त्याच हक्काने आपल्या मनातल्या भावना सांगितल्या तर पहा नाती कशी फुलतील ते .….

                                                                                                         - सुधीर 

Monday 10 February 2014

माणसाचा Brand ..

           
             मागे काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या गणपती विसर्जनसाठी गर्दीचे व्यवस्थापन साठी स्वयंसेवक म्हणून मी आणि माझ्या काही मित्रांनी नावे दिली .पण त्यासाठी बूट सक्तीचे होते .एका मुलाकडे ते नव्हते तेव्हा मी त्याला म्हणालो कि माझ्याकडे एक शिल्लक जोडी आहे बुटांची ,ती तुला देऊ शकतो मी .त्यावर त्याचा पहिला प्रश्न होता मला कि ,"कुठल्या कंपनी चे आहेत ते बूट" .मी म्हणालो '"अरे साधे ३०० रुपयाचे आहेत ते ,काय पायात तर घालायचेत ". त्यावर त्यान दिलेलं उत्तर ऐकून मला हसावं कि रडावं ते कळेना . तो म्हणाला कि "मला फक्त ब्र्यान्डेड बूटच लागतात ,मी तसले साधे बूट घालत नाही " आणि हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर अभिमानाची जी झलक होती ती पाहून मला तर अजून जास्त हसू आल .
             असाच सर्व वस्तू ब्ब्रांडेड वापरायची सवय असलेल्या माझ्या एका मित्राला मी नेहमी म्हणायचो "वस्तू ब्रांडेड वापरण्यापेक्षा तू माणूस ब्रांडेड हो " पण त्याने कधी ब्रांड चा नाद नाही सोडला .आजकाल सगळीकडेच हीच परिस्थिती पाहायला मिळते ,सध्या तरुणांमध्ये ब्रांड संस्कृती वाढत चालली आहे .कॉलेज असो वा कट्टा ,मुला-मुलींमध्ये हि विचारसरणी वाढत चालली आहे आणि यामुळे कुठेतरी विचार करणे ,कार्यसंस्कृती याचा अभाव जाणवतोय सगळीकडे .अमुक-तमुक ब्रांडेड वस्तू चांगल्या ,बाकीच्या नाही हे विचार आणि याहीपेक्षा बेकार विचार म्हणजे जे ब्रांडेड वस्तू वापरत नाहीत ते लोक म्हणजे खालचे अथवा कमी दर्जाचे असतात हि विचारसरणी फोफावत आहे .त्यामुळे या तरुणांना छोट्या-छोट्या गोष्टी पण ब्रांडेड हव्या असतात .एक वेळ कपडे किंवा गाड्या या चांगल्या कंपनीच्या असाव्यात हे समजन्यासारखे आहे कारण या वस्तू तितक्याच गरजेच्या असतात म्हणून त्यांची क्वालिटी चांगली असणे गरज असते पण बूट ,चपला यांना पण ब्रांड लागतो का ? काही काही जण तर घरात वापरायच्या स्लीपर सुद्धा ब्रांडेड घेतात …
            या मुलांना हे समजत का नाही कि तुम्ही वस्तू कुठल्या कंपनी च्या वापरता यावरून तुमच व्यक्तिमत्व किंवा तुमची प्रतिमा नसते तयार होत आणि अशा गोष्टींवरून स्वतःला कमीपणा किंवा मोठेपणा आणणारे नकळत स्वतःलाच कमीपणा आणतात .तरुणांमध्ये हि ब्रांड संस्कृती वाढण्याच कारण म्हणजे दुसर्यांच्या मनामध्ये स्वतःची तथाकथित प्रतिमा चांगली करण्यासाठीची धडपड .मी ब्रांडेड वस्तू वापरतो म्हणजे मी कुल ,यंगिस्तानचा यंग आहे ,हाय-फाय राहतो हे दाखवण्याच्या चढा-ओढीत हि मुल भरकटत आहेत …
           यामागे एक मानसिक अवस्था असते ,दुसर्यांनी आपल कौतुक कराव ,आपल्याला चांगल म्हणावं असं सगळ्याला वाटत आणि हा मानवी स्वभावच आहे .यासाठी अनेकजण वेगवेगळे मार्ग अवलंबतात पण हा ब्रांडेड वस्तूंचा मार्ग सर्वात सोपा आणि तेवढाच खोटा आहे .स्वतःच्या कर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा ,खुशमस्कर्या मित्र-मैत्रिणींच्या घोळक्याच्या तोंडून स्वतःच कौतुक ऐकण्यातच धन्यता मानणारे हे तरुण उद्याच्या भारतच कसलं भविष्य घडवणार ,तेच काळात नाही …
          कृष्ण राम यासारख्या महापुरुषांनी कर्तुत्व केलच कि ,मला नाही वाटत रामाच धनुष्य किंवा कृष्णाची बासुरी ब्रांडेड असेल .स्वतःच्या कर्तुत्वावर मोठे होणार्या या महापुरुषांचा आदर्श घेणे गरजेचे बनले आहे .म्हणून शेवटी एकच म्हणावस वाटत कि "वस्तू ब्रांडेड वापरण्यापेक्षा तूम्ही माणूस ब्रांडेड व्हा ,शेवटी आयुष्यात तेच महत्वाच आहे "…

                                                                                                       - सुधीर 

Saturday 8 February 2014

काय आहे सौंदर्य ?

                     
                  सुफी संप्रदायात एक संत स्त्री होऊन गेली ,तिचे नाव होत राबिया .अशा संत स्त्रिया अगदी बोटाच्या हातावर मोजण्या इतक्याच आहेत .राबिया आपल्या झोपडीत रहायची ,सकाळी प्रार्थना करायची .तिच्या शेजारच्या झोपडीत एक मुस्लिम फकीर पण राहायचा ,त्याच नाव होत हसन .एके दिवशी पहाटे पहाटे हसन उठला ,सूर्याची कोवळी कोवळी किरणे पृथ्वीला कुरवाळीत होती ,वाऱ्याची शीतल झुळूक मन प्रसन्न करीत होती , हसनने निसर्गाचे हे प्रसन्न रूप पाहिलं आणि रबियाला हाक मारली .
                  तो म्हणाला,"राबिया ,तुझ ध्यान थोडा वेळ बंद कर आणि बाहेर येउन पहा ,किती सुंदर पहाट जन्माला घातलीय ईश्वराने ,हे सौंदर्य पाहायला बाहेर ये ."
                      राबिया हसली आणि म्हणाली ,"असा किती वेळ बाहेर बसशील हसन ? आत ये ,ज्या ईश्वराने या पहाटेला जन्माला घातलं तो ईश्वर माझ्यासमोर उभा आहे .ही पहाट तर सुंदर आहेच ,पण ज्यान तिला जन्म दिला त्याला पहा ,तो ईश्वर बघ किती रमणीय आहे ,सुंदर आहे ."
                 माणूस जन्म घेतल्यापासून बाह्य सौंदर्याकडेच लक्ष देतो ,पण आंतरिक सौंदर्य पाहणारेही असतातच ,त्यातलीच हि राबिया व तिची कथा .या कथेतून माणसाची दोन प्रतीक दिसतात ,एक जण बाह्य सौंदर्यावर मोहित होतो तर दुसरा आंतरिक सौंदर्यावर जीव टाकतो .संथ ,शांत तलावात दिसणाऱ्या चंद्राच्या प्रतिबिम्बाकडे पाहून एखादा प्रसन्न होतो तर दुसरा शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहून प्रसन्न होतो
                 कमनीय बांधा ,कमलनयन ,आजानबाहू अशी शारीरिक सौंदर्याची लक्षण असणारे राम ,कृष्ण ,बुद्धासारखे महात्मे आजही परिचित आहेत ते त्यांच्या आंतरिक सौंदर्यामुळे .माणूस बाह्य सौंदर्य पाहतो ,पण शरीराच्या आत मनात डोकावून पाहण्याचे प्रयत्न तो सहसा तो करत नाही .कारण सत्याला सामोरे जाण्याचे धाडस त्याच्यात नसत .आज प्रेम-विवाहानंतर काही महिन्यातच घटस्फोट घेण्याच प्रमाण वाढलेलं आहे हे याच्यामुळेच .
                   समाजात अपंग असतील तर त्यांच्याकडे पण एक तर सहानभूतीने पाहतात किंवा ते कुणीतरी महापापी असल्याच्या दृष्टीने पाहतात ,आणि हेच लोक मात्र गणपती च्या पाया पडतात ,त्याला पूजतात ,मला त्यांना विचारव वाटत कि का हो ,हत्तीच तोंड असलेला ,दातांचे सुळे बाहेर आलेला आणि उंदीर सोबती असलेला गणपती तुम्हाला चालतो ,त्याच्या पाया पडता ,त्याच्या मंदिरात हजारो रुपये दान करता पण तोच एखादा हात किंवा पाय नसलेला अथवा बुद्धीने थोडा कमजोर असलेला माणूस गणपतीच्याच मंदिराबाहेर भिक मागत असेल तर मात्र तुम्ही त्याच्याकडे हीन आणि तुच्छतेच्या नजरेने पाहता आणि उपकार केल्यासारखे १-२ रुपये त्याला देऊन निघून जाता ,कसली आहे हि प्रवृत्ती  …  
                   काळ्या रंगावरून पण तेच ,कृष्ण असो व राम हे पण रंगाने काळेच होते तरीपण ते मनाने इतके सौंदर्यवान होते म्हणून तर त्यांचा काळा रंग यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आड नाही आला कधी .पण हीच प्रवृत्ती आज कुठेतरी हरवत चालली आहे ,रंगाने काळे सावळे असणारे पण स्वतःकडे कमीपणाच्या नजरेने पाहतात आणि रंगाने गोरे असणारे तर रंगाच्या अहंकारातच बुडून गेलेले असतात .म्हणून सर्वांच्या मनातली सौंदर्याची असलेली व्याख्या कुठेतरी बदलण्याची गरज आहे ….

                                                                                                    - सुधीर 

Friday 7 February 2014

हिंदुत्त्व

       
               हिंदुत्त्व … हे  नेमक आहे तरी काय ?शिवाजी महाराज ,स्वातंत्र्यवीर सावरकर ,स्वामी विवेकानंद वा आणखी बरेच या सर्वांना अभिप्रेत असलेला हिंदुत्त्व म्हणजे नेमक काय आहे ,हे समजून घ्यायलाच पाहिजे . हिंदुत्त्व म्हणजे एक जगण्याची पद्दत आहे ,एक समृद्ध आणि अतिशय जुन्या काळापासून चालत आलेली आणि पिढ्यानपिढ्या सुधारत गेलेली जीवन-पद्धती आहे .
         आज जर मी म्हणालो कि मी हिंदुत्त्ववादी आहे तर १०० जणांपैकी ९९ जण तरी मला कट्टर हिन्दु धर्माचे समर्थक समजतील ,काही म्हणतील मला दुसरा धर्म आवडत नसणार तर काहींना वाटेल मी अमुक एका  पक्षाचा कार्यकर्ता दिसतोय .यात त्यांचा दोष नाहीये ,कारण हिंदुत्व म्हणजे काय हे समजून घ्यायचा प्रयत्न फार कमी जणांनी केलाय .त्यामुळे मला एक गोष्ट इथे ठासून सांगावीशी वाटते कि हिंदुत्व म्हणजे धर्माने हिंदू असणे नव्हे .हिंदुत्त्व चा संबंध फक्त हिंदू धर्माशी नाहीये ,कारण जीवन सर्वच धर्माचे लोक जगतात आणि हिंदुत्त्व नावाची जगण्याची पद्धत स्विकारायचा सर्वांनाच समान हक्क आहे . 
            श्रीरामांनी असो व श्रीकृष्णांनी ,तसेच आधुनिक काळात शिवाजी महाराज असो वा स्वामी विवेकानंद ,या सर्वांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हिंदुत्त्व जागून दाखवले ,आणि आज काळाच्या ओघात आपण तेच विसरत आहोत .वडिलांच्या एका शब्दाखातर १-२ नव्हे तर १४ वर्षांसाठी रामान वनवास हसत-हसत स्विकारण वा जिजाऊनी घालून दिलेल्या संस्कारांच्या वाटेवर आयुष्यभर शिवाजी महाराजांनी चालण ,हे आहे हिंदुत्त्व ,पण आज किती मुल आई-वडिलांचं ऐकतात ,त्यांना आयुष्यभर जीवापाड संभाळण तर सोडा हो ,त्या दोन जीवांना म्हातारपणी साध घरातही ठेवावं वाटत नाही मुलांना ,हेच का याचं हिंदुत्त्व .
          द्रौपदी च्या वस्त्रहरणाच्या वेळी तिच्या मदतीला धावून जाणारा कृष्ण वा ताब्यात सापडलेली शत्रूची सुंदर अशी स्त्री सन्मानाने परत पाठवणारे शिवाजी महाराज ,हे खरे हिंदुत्त्वाचे वाटेकरी ,आजचे मुलगी दिसली नाही कि तिच्याविषयी असभ्य भाषेत बोलणार आणि स्त्री ला फक्त खेळण्याचे वस्तू समजणारे कसे असू शकतात हिंदुत्त्ववादी .श्रीकृष्णाच्या ८ पत्नींपैकी एक चक्क आदिवासी कन्या होती ,जाम्बवती तीच नाव .म्हणजे हिंदुत्वाचा संस्थापक म्हणावा तो कृष्ण स्वतः जाती-धर्म न पाहता या नात्याला आपलस करतो ,हे नाही का खर हिंदुत्त्व .आज मी या धर्माचा तो या जातीचा ,असल्या वायफळ कारणांनी भांडणार्या तरुणांमध्ये कसलं आलय हिंदुत्त्व .
            आपल अख्ख आयुष्य समाजसेवेसाठी आणि तरुणांमध्ये हिंदू धर्माविषयी आदर आणि प्रेरणा उत्पन्न व्हावी म्हणून जन्मभर भटकंती करणारे ते विवेकानंद ,त्यांच हे समाजासाठीच त्याग हेच तर आहे हिंदुत्त्व ,आपल्या समाजासाठी आपल्या लोकांच्या उद्धारासाठी प्रयत्न करणे म्हणजे हिंदुत्त्व .काळ्या पाण्याची शिक्षेला पण न भीता सामोरे जाणारे सावरकर ,त्यांच्या या धैर्यात आहे खर हिंदुत्त्व ,"ने मजसी परत मातृभूमीला ,सागरा प्राण तळमळला " अशी आर्त हाक देणाऱ्या सावरकरांच्या मातृभूमीच्या ओढीत आहे खर हिंदुत्त्व .पण आज पाहायला मिळत ते भारत सोडून पैशांसाठी विदेशात जाणार्या तरूणांच हिंदुत्त्व ,पैशासाठी प्रसंगी देशालाही विकायला काढनाऱ्या तरूणांच हिंदुत्त्व ,देशात काय चालली याकडे लक्ष न देता स्वतःमध्येच हरवलेल्या तरूणांच हिंदुत्त्व .. 
           आज हिंदुत्त्वाचा झेंडा गेऊन फिरणारे अनेक दिसतात पण हे हिंदुत्त्व जागून दाखवणारे फार कमी .हिंदुत्त्व जगण्यासाठी गरज आहे ती आपली संस्कृती आपले संस्कार व आपला इतिहास समजून घ्यायची .गरज आहे कि पूर्ण जगाला दाखवून द्यायची कि पुरातन काळापासून हा भारत देश ज्या संस्कृतीच्या जोरावर सर्वात श्रेष्ठ म्हणून जगला तीच संस्कृती आजपण आपल्या रक्तामध्ये अस्तित्वात आहे ,आणि त्यालाच हिंदुत्त्व म्हणतात …. 


                                                                                                         - सुधीर 

Monday 3 February 2014

वैकुंठगमन :सत्य कि असत्य

.
             "when you have eliminated the impossible ,whatever remains ,however improbable ,must be truth "                                                                                                                                                                              हे शेरलॉक होम्स या प्रसिद्ध पात्राचे जनक सर आर्थर कोनन डोयाल याचं एक प्रसिद्ध वाक्य आहे . याचा अर्थ असा कि जेव्हा एखाद्या घटनेतून तुम्ही अशक्य अस सर्व वगळून टाकता तेव्हा जे काही उरत ते कितीही विचित्र असल तरी तेच सत्य असत . आज मी इतिहासातल्या एका घटनेकडे या नजरेने पाहणार आहे . ई.स. १५७७ ते इ.स १६५० या काळात महाराष्ट्राने संत तुकारामांच्या रूपाने एक वैचारिक झंझावात पहिला ज्याने त्याकाळच्या तात्कालिन धर्मसभेला पण हादरवून टाकले होते . आज मी बोलणारे त्या महान संत व माझ्यासारख्या भागवत धर्माची पताका हाती  घेऊन चालणाऱ्या असंख्य वैष्णवांच्या लाडक्या "तुकाराम" यांच्या मृत्यूबद्दल .. 
                        त्यांच्या मृत्यूबद्दल महाराष्ट्रात दोन विचार प्रवाह आहेत . एक असा कि तुकारामांना नेण्यासाठी वैकुंठातून विमान आले व त्यांना सदेह सोबत घेऊन गेले म्हणजेच तुकारामांचे वैकुंठगमन झाले ,तर दुसरा विचार असा आहे कि त्या काळच्या कट्टर धर्मियांनी तुकाराम महाराजांची हत्या केली व त्यांचे वैकुंठगमन झाले अशा वावड्या उठवल्या . आज आपण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करू तेव्हा कुठल्याही विचार करणाऱ्या माणसाला हा दुसरा विचार पटेल .. 
                     आजचा काळ हा कायदा-सुव्यवस्थेचा काळ आहे असे म्हणतात ,कारण आपल्याकडे न्यायप्रणाली कायदे अस्तित्वात आहेत ,तरीपण या काळात सुद्धा एखाद्या देशाच्या राष्ट्रपतीला सुद्धा सुरक्षा पुरवावी लागते कारण देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेला व्यक्ती सुद्धा पूर्णपणे सुरक्षित आहे असे नाही . आज आपल्याकडे विचारस्वातंत्र्य ,बोलण्याचे स्वातंत्र्य ,जाहीरपणे मत मांडण्याचे स्वातंत्र्य असून सुद्धा जाहीरपणे आपले विचार मांडणारा सुरक्षित नसतो . याचेच उदाहरण म्हणजे नरेंद्र दाभोलकर .आजच्या कायदा-सुव्यवस्थेच्या काळात ,गुन्हेगारांना शिक्षा देणारी न्यायप्रणाली अस्तित्वात असण्याच्या काळात सुद्धा दाभोलकरांची हत्या होऊ शकते ,तेव्हा मोगलाई मध्ये प्रस्थापित धर्मसभेवर आसूड ओढनारे तुकाराम त्या काळात किती सुरक्षित असतील . तुकाराम महाराजांचा अंत झाल्यावर त्या काळाच्या ब्राह्मणांनीच अशी अफवा उठवली असणार कि तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाले आणि त्या काळच्या भोळ्या लोकांनी त्यावर विश्वास ठेवला . तुकारामांना सदेह तथाकथित विमानातून जाताना कुणीही पाहिलं नव्हत ,म्हणूनच अंत झाल्यानंतर त्यांचा देह सुद्धा कुणाला पाहता आला नाही याची चोख व्यवस्था केली असणार त्या कट्टर धर्मियांनी ..
                          तुकाराम महाराज असो वा  ज्ञानेश्वर असो ,त्यांनी नेहमी सत्याचीच आस धरली म्हणून त्यांचे अनुयायी या नात्याने समस्त महाराष्ट्राने पण तुकराम महाराजांचे वैकुंठगमन झाले या भोळ्या समजुतीला मागे सारून सत्य कितीही नावडते असले तरीही ते स्वीकारले पाहिजे . आणि आपल्या इतिहासात अशा अनेक घटना आहेत ज्यांकडे आपण डोळसपणे पाहण्याची गरज आहे कारण सत्याचा रस्ता हा कितीही नावडता असला तरी तोच ईश्वराचा रस्ता असतो आणि असत्याचा रस्ता कितीही छान आवडता असला तरी तो ईश्वरपासून दूर नेणारा असतो हेच अंतिम सत्य ..…  

                                                                                                       - सुधीर 

Sunday 2 February 2014

मोठा गैरसमज

          "श्रीमानयोगी" वाचून झाली ,एका मित्राला मी दिली वाचायला तर तो म्हणाला कि "अरे त्या पुस्तकात नुसत इमोशनल दाखवलय ,शिवाजी महाराजांचा पराक्रम कमी आणि त्याचं आयुष्यातलं बाकीचच जास्त दाखवलय ." तेव्हा खरच मला कीव आली त्याच्या आणि त्याच्यासारख्या विचार करणाऱ्या मुलांची ,आणि हा खूप महत्वाचा विषय आहे .. कारण आज थोर महात्म्यांच्या नावाखाली चाललेला जो धिंगाणा आहे त्यामागे हेच तर मूळ आहे ..
               रणजीत देसाई यांची 'श्रीमानयोगी' असो किंवा 'स्वामी' ,अथवा शिवाजी सावंत यांची 'युगंधर' असो वा 'मृत्युंजय' किंवा ना.स.इनामदार यांची 'राऊ' ,या सर्व पुस्तकांमध्ये एक समान धागा हा आहे कि यात त्या त्या नायकांच मनोविश्व उलगडण्याचा अतिशय छान प्रयत्न केला गेलाय .. युगंधर मध्ये कृष्ण हि व्यक्तिरेखा नुसती देव किवा अवतारी पुरुष म्हणून नाही वावरत तर कृष्ण हा एक सामान्य माणूस म्हणून वावरतो ,त्याचा आयुष्यात प्रत्येक घडणाऱ्या घटनेत त्याच्या मनाची होणारी होणारी घालमेल ,आनंद ,दुख ,कधी-कधी मनाची होणारी अस्वस्थता हे सर्व दाखवलय ,हेच श्रीमानयोगी मध्ये शिवाजी महाराजांबद्दल आणि स्वामी मध्ये पेशवा माधवरावाबदल दाखवलं गेलय .. श्रीमानयोगी मध्ये तर शिवाजी महाराज नुसते पराक्रमी इतिहासपुरुष एवढेच मर्यादित न ठेवता ,महाराज एक माणूस म्हणू कसा विचार करत असतील ,त्यांनाही आयुष्यात सुख-दुख ,आनंद-निराशा आलेच कि तरी पण त्यांनी या सर्वांवर मात करत ध्येयाकडे त्यांची वाटचाल कशी चालू ठेवली आणि स्वीकारलेल्या तत्वांवर आयुष्यभर कसे जगले हे सर्व अतिशय छान पद्धतीने मांडले आहे ,आज शिवाजि महाराजांच्या लढाया बद्दल सर्व माहिती कुठूनही मिळेल पण एक माणूस म्हणू ते कसे होते हे फार कमी ठिकाणी वाचायला मिळेल म्हणून इतिहासाकडे फक्त इतिहास म्हणून न पाहता त्याकडे मानवी दृष्टीकोनातून पाहणारी पुस्तके जरूर वाचायाल हवीत ..  
        श्रीमानयोगी व स्वामी यासारखी पुस्तके जी फक्त घडलेल्या घटनांकडे इतिहास म्हणून न पाहता ,त्या घटनांना असनाऱ्या मानवी कांगोरयाकडे पण पाहतात ,तीच पुस्तके काळाची गरज बनली आहेत ..मला खरच वाटत कि आपला इतिहास हा तर सर्व तरुणांपर्यंत पोहोचन गरजेच आहेच ,पण नुसता इतिहास पोहचून उपयोग नाही तर इतिहासात दडलेले विचार ,मानवी मनांचे संघर्ष हे पण पोहोचन तितकच गरजेच आहे .. तरच शिवाजी महाराज असो वा कुठलाही थोर व्यक्ती ,त्यांच्या नावाने उदो-उदो करण्यातच आनंद वाटून घेणारे तरुण त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालयला लागतील ..अशा वेळेला श्रीमानयोगी व स्वामी यासारखी पुस्तके जी फक्त घडलेल्या घटनांकडे इतिहास म्हणून न पाहता ,त्या घटनांना असनाऱ्या मानवी कांगोरयाकडे पण पाहतात ,तीच पुस्तके काळाची गरज बनली आहेत ..

                                                                                                         - सुधीर