Tuesday 11 March 2014

आली लहर ,केला कहर

       
            Fools rush in there where angels fear to tread .. या इंग्रजी म्हणीचा अर्थ असा कि जिथे देवदूत सुद्धा जायला मागेपुढे पाहतात तिथे मूर्ख बेधडक जातात .. हि म्हण वाचताच मनात आल ,कि त्या मूर्खाना तिथे पुढे गेल्यावर काय मिळत असेल ,आनंद कि दुख .. अगदी हेच लागू होते ,आपण मागचा-पुढचा विचार करून घेतलेले निर्णय आणि अगदी बेधडक ,कुठलाच विचार न करता घेतालेले निर्णय यांना ..
           आज मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्याचा विचार करतो तेव्हा मला स्पष्ट दिसतंय कि ज्या घटना ,जे क्षण मला मनापासून आनंद देतात ,जे आठवलं कि ओठावर नकळतच हसू येत ,त्या सर्व घटना ,ते सर्व क्षण मला मिळाले कारण मी तेव्हा कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता घेतलेल्या काही निर्णयांमुळे .. जेव्हा जेव्हा शंभरदा विचार करून निर्णय घेतला तेव्हा त्यानंतर घडलेल्या घटना चांगल्या ,फायद्याच्या होत्या यात काही वाद नाही ,पण त्यात ती मजा नसायची जी बेधडक ,कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता घेतलेल्या निर्णयानंतर घडलेल्या घटनांमध्ये होती … 
          आयुष्यात प्रवास तर खूप केला ,पण अचानक एका सकाळी कुणाचीतरी आठवण आली आणि भेटावस वाटल तेव्हा क्षणाचीही उसंत न घेता ,कसलीही तयारी न करता ,बाईक घेऊन केलेला तो ६ तासांचा प्रवास ,त्याची मजाच निराळी .. फळे तर रोजच खातो पण रस्त्याने जाता-जाता चिंचेच झाड दिसलं तेव्हा दगड मारून पाडलेल्या चिंचा खाण्यातली गंमतच निराळी .. रिक्षाने अनेकदा फिरलो पण रात्रीच्या १२ नंतर सिनेमा पाहून मित्रांसोबत हॉस्टेल वर परत जाताना असाच मनात आल म्हणून ३ चाकी छोट्या रिक्षामध्ये १३ जणांनी कोंबून-कोंबून केलेला त्या १५ km च्या रिक्षा-राईड ची मजांच  निराळी .. सिनेमे तर खूप वेळा पहिले पण असच मनात आल म्हणून एके दिवशी सलग लागोपाठ ३ सिनेमांचे शो पहिल्याची आठवण कधीच न विसरता येण्यासारखी .. 
            अशा अजून अनेक घटना आठवतात ,ज्यांचा आत्ता विचार करतो तेव्हा वाटत कि किती बालिश आणि मूर्ख होतो मी तेव्हा त्या गोष्टी करताना .. पण या अशाच गोष्टी आज मनाला आनंद देतात आणि वाटत कि बर झाल तेव्हा त्या गोष्टी केल्या ते .. पण बेधडक घेतलेल्या निर्णयांमुळे काही काही त्रास देणाऱ्या आठवणी सुद्धा मिळाल्या .. मिळालेला नकार असो वा जिवलग मित्रापासून निर्माण झालेला दुरावा ,दूर गेलेले माणसे असो वा आपल्याच माणसांनी न दिलेली साथ .. या गोष्टीपण अशाच काही बालीशपणाच्या निर्णयांमुळे मिळाल्या हे जरी खरे असले तरी याचमुळे मला आठवणींचा असा खजाना मिळाला जो मला वेळोवेळी एकांतात साथ देतो .. आणि खर म्हणायचं तर अशा वेळी जे कुणी आपल्यासोबत होते ,त्या माणसांना आपण आयुष्यभर विसरत नाही कारण या सुंदर आठवणींचे ते पण भागीदार असतात .. जेव्हा जेव्हा मागचा-पुढचा विचार न करता बेधडक वागलो त्या नंतरच्या गोष्टी आठवून मनाला आनंद मिळतोच ,थोडा त्रास ही होतो यात पण मला मिळते ती 'अनुभव' नावाची हि शिदोरी जी आयुष्यभर पुरते .
          निर्णय घेताना आपल्याला वाटत राहते कि आपण योग्य ,शहाणपणाने निर्णय घेत आहोत ,आणि म्हणूनच आपण तोलून-मापून निर्णय घेत राहतो ,आणि हे योग्यच आहे .. तरीपण कधी-कधी बालिशपणे ,कुठलाच विचार न करतापण निर्णय घेऊन तरी पहा ,आयुष्य कसे मजेशीर होते ते ..शहाणपण हे आयुष्यासाठी पूरक असतेच ,पण त्यावर मूर्खपणाच,बालीशपणाचं थोड-थोड मीठही टाकल तरच त्याला चव येते ..
           तेव्हा हा शहाणपणाचा मुखवटा काढा आणि तुमच्या मनाचंही कधी कधी  ऐका .. ते म्हणतात ना  "आली लहर ,केला कहर " अगदी तसच ….

                                                                                                             - सुधीर 

2 comments: