Saturday, 18 February 2017

तो दिवस ...


दिवस .. 
खरंच आयुष्यात चांगले दिवस किती आणि वाईट जाणारे दिवस किती येतात हे मी सांगायची गरज नाही .. 
आपण सर्वजण हे दिवस अनुभवत असतोच ..  
पण कधी कधी ना काही काही दिवस हे खरंच खूप वाईट जातात .. 
एखादी भयाण काळीकुट्ट अंधाराची रात्र असावी आणि त्यात भर म्हणून एकदम भयानक असं स्वप्न पडावं असे काही दिवस सर्वांच्या आयुष्यात नक्कीच येतात आणि नंतर काही काळाने निघून सुद्धा जातात .. 
पण 
या वाईट जाणाऱ्या दिवसांमध्ये तो एक चांगला गेलेला दिवस सुद्धा असतो .. 
खरं तर काहीतरी मनासारखं घडलेला ,किंवा काहीतरी अनपेक्षित असं घडून या मनाला अतिशय आनंद देऊन गेलेला तो दिवस असतो .. 
त्या दिवसाला मनाच्या एका कप्यात एकदम जपून ठेवा ,त्याची काळजी घ्या .. 
कितीही निराशेचे मळभ साचले या मनावर तरी त्या दिवसाच्या आठवणींना झाकून जाऊ देऊ नका .. 
कारण या संघर्षाच्या दिवसांमध्ये आणि भयाण स्वप्नांच्या रात्रीत ,तो दिवस ,त्या दिवसाच्या त्या चांगल्या आठवणी ,ते आनंदाचे क्षण याचाच खूप मोठा आधार मिळत असतो या मनाला .. 
तेव्हा नक्की जपून ठेवा त्या आठवणी , तो दिवस ... 


                                                                                                     - सुधीर

Sunday, 8 January 2017

जाणिवेचा एकटेपणा ...


गच्चीवर कठड्याला हात टेकवून दोघे निवांत उभे होते .. 
पण ती आज कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती .. 
हे जाणवताच त्याने विचारलं "काय झालं ? कसला विचार करत आहेस ?" .. 
ती "मला ना आज खूप एकटं-एकटं वाटत आहे ,का कुणास ठाऊक पण सर्व आपली अशी माणसं जवळ असून सुद्धा मला त्यांच्यात असल्यासारखं वाटत नाहीये .. एक वेगळाच एकांतपणा जाणवतोय मनात ,असं वाटत कि कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन नुसतं बसावं ,तासनतास फक्त बसून राहावं " .. 
तो "मला सुद्धा कधी कधी असंच वाटत .. किंबहुना मला तर वाटत की आपल्यालाच नाही तर सर्वांनाच कधी ना कधी हे असं नक्कीच वाटत असणार ,गर्दीमध्ये असूनसुद्धा हा एकटेपणा नक्कीच जाणवत असणार " .. 
ती "बाकीच्यांचं नाही माहित पण मला नाही आवडत रे हा नसलेला पण तरीही जाणवणारा एकटेपणा .. कधी भविष्यात मी खरंच एकटी पडली तर मग काय करू .. आत्ता फक्त जाणवणारा हा एकटेपणा एक दिवस खरंच माझ्या वाट्याला आला तर कस करू ?मला तर काळजीच वाटते " .. 
तिचं हे बोलणं ऐकताना तो काहीच नाही बोलता फक्त समोर दूरवर पसरलेल्या क्षितिजाकडे पाहत होता  .. 
शेवटी न राहवून तिने त्याला विचारलं "तू काय करतोस रे असं एकटं एकटं वाटायला लागल्यावर ?? "
त्याने तिच्याकडं पाहिलं तर तिचा चेहरा एकदम चिंतातुर झाला होता .. 
तेव्हा तो गालातल्या गालात थोडंसं हसला आणि म्हणाला 
"एक काम कर .. ते समोर पसरलेलं क्षितिज पहा ,अगदी जिथपर्यंत तुझी आणि माझी नजर पोहोचते तिथपर्यंत पसरलेल ते क्षितिज .. एकाच वेळेला आभासी पण तरीही तितकच खरं आणि शाश्वत .. आणि असं उदाहरण दुसरं नाही सापडणार ,जे एकाच वेळी आभासी पण आहे आणि तितकंच खरं सुद्धा .. आभासी ,कधीही हाताला न येणारं .. जेवढं त्याच्या मागे जाशील तेवढं ते आणखीन पुढे पुढे सरकत जाणारं " .. 
"पण असं आभासी असूनसुद्धा ते शाश्वत असत आपल्या आयुष्यात .. तुझ्या-माझ्या आधीसुद्धा त्याच अस्तित्व होत ,आज आपण आहोत आणि तोसुद्धा आहेच आपल्यासोबत ,आणि आपल्यानंतरही त्याच अस्तित्व असेलच .. म्हणून कधीही एकटं-एकटं वाटलं ना कि मी या क्षितिजाकडे पाहतो .. तो असतो कायम इथे ,नेहमी माझ्या सोबत .. मी कुठेही गेलो तरी हा तिथे असतोच , मला कधीही एकटा पडू देत नाही हा .. आता इथे गच्चीवर सुद्धा आहे तो ,कधी एकट्याने प्रवास करताना खिडकीतून बाहेर पहिलं की हमखास दिसतोच तो ,कधी कधी निराशेने भरलेल्या एकट्या अशा काळोखाच्या रात्री खिडकीमध्ये येऊन पहिलं तरीसुद्धा तो असतोच तिथे ,जेव्हा जेव्हा एकटं-एकटं वाटलं तेव्हा तेव्हा तो सोबत होता आणि यापुढे सुद्धा असेलच " .. 
त्याच बोलणं ऐकण्यात हरवलेली ती नकळत त्या समोर दिसणाऱ्या क्षितिजाकडे पाहण्यात कधी गुंग झाली तिलासुद्धा नाही कळालं .. 

                                                                                                   - सुधीर


Thursday, 8 December 2016

एका प्रेमाची गोष्ट ..


ती "आज तू एवढा शांत शांत का आहेस ? काही झालंय का ?"
तो "तुला एक सांगू का ?"
ती "सांग ना ,त्यात विचारायचं काय "
तो "मला आजकाल भीती वाटते खूप तुझ्यासोबत बोलायची ."
     "कारण ,जेव्हा तुझ्याशी बोलतो ना तेव्हा असं कधीच होत नाही कि माझ्या मनात काहीतरी वेगळे विचार सुरु आहेत ,आणि फक्त माझे ओठ हालत आहेत ,किंवा काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलत असतो असं सुद्धा नाही .. खरं तर तुझ्याशी बोलताना मी नसतोच बोलत ,बोलत असत ते माझं मन .. आणि हे मन इतक्या आवेगानं ,इतक्या इच्छाशक्तीनं सर्व मनातले शब्द ,सर्व भावना बाहेर पाठवत असत कि या ओठांनाही शक्य होत नाही त्यांना थांबवणं ."
    "आणि मी या आधी कोणासमोरही जेव्हा जेव्हा माझं मन असं मोकळं तेव्हा तेव्हा समोरच्या व्यक्तीने या मनाची किंमत नाही केली .. म्हणून भीती वाटते तुझ्यासमोर मन मोकळं करायची ."
त्याच हे बोलणं ऐकून ती फक्त हलकंसं गालातल्या गालात हसली .काही क्षण ते दोघेही काहीच न बोलता फक्त समोरचा तो मावळणारा सूर्य पाहत उभे राहिले .. काही वेळाने तिने त्याचा हात हातात घेतला ,आणि पुन्हा ती त्या सूर्याकडे ,त्याच्या बदलत जाणाऱ्या मावळतीच्या रंगाकडे पाहत तशीच उभी राहिली ..
त्याला जाणवलं कि तिने त्याचा हात खूप घट्ट पकडून ठेवला आहे .. तिला काय म्हणायचंय हे त्याला समजलं .. आणि याच निःशब्द शांततेत ,समोर क्षणाक्षणाला मावळत जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने एक प्रेमाची ,एका विश्वासाची गोष्ट कदाचित सुरु झाली ....                                                                                               - सुधीर


Sunday, 25 September 2016

तेव्हा आणि तिथूनच ...                   हो ,जेव्हा कोणीतरी एकदम जवळच असं दूर जातं ,तेव्हा मनाला त्रास तर होतोच .. पण खरं तर यांच्यानंतरच इतके दिवस समोर असूनही दिसत नसलेलं असं ते सत्य आपल्याला दिसायला लागत .. सत्य स्वतःबद्दलच .. आणि तिथूनच खरी सुरुवात होते शोधाची .. शोध सुरु होतो स्वतःचा .. म्हणूनच असं म्हणता येईल की ,गवसल्यानंतर कोणीतरी हरवलं जरी तरी त्या हरवण्यातूनसुद्धा काहीतरी गवसतंच ,नाही का  ...  
जेव्हा आयुष्यातून कुणीतरी 
एकदम जवळचं हरवत ना ,
तेव्हा आणि तिथूनच 
स्वतःचा खरा शोध सुरु होतो ... 

                                                                                                                                 - सुधीर

Sunday, 18 September 2016

कधीच नाही ...


नाही .. 
मी नाही विचारलं तिला .. कारण इच्छाच झाली नाही विचारायची .. 
मी नाही विचारलं तिला तिचं पूर्ण नाव .. कारण पूर्ण नाव म्हटलं कि आडनाव सुद्धा त्यात आलंच .. आणि मला खरंच नाही जाणून घ्यायचं तीच आडनावं .. 
कारण आडनाव म्हटलं कि त्यात लपून-छपून 'जात' सुद्धा येतेच ,आणि या जातींच्या भेदभावानेच मला आत्तापर्यँत खूपदा दुखावलं आहे .. 
मी अगदी जीवापाड प्रेम केलं अशा लोकांना सुद्धा दूर केलं आहे या जातींनी  .. 
आणि म्हणूनच , यापुढेही कधीच विचारणार नाही मी तिला तीच पूर्ण नाव .. कधीच नाही ... 
               
                                                                   
                                                                                           - सुधीर