Wednesday 5 November 2014

नकार ....

       

       
                नकार .. माझ्या आयुष्यात आला तसा तुमच्यापण आयुष्यात आला असेलच .. याच्या येउन जाण्यानंतर आयुष्यात जे वादळ उठते ना कदाचित त्यामुळेच हा शब्द नको नकोसा वाटत असावा ..
              पण खर तर आयुष्यात 'अनुभवा'नंतर जर सर्वात जास्त दुनियादारी शिकवणारा जर कुठला शब्द असेल तर तो हाच आहे .. याच्या आयुष्यात येण्यानंतर इतके बदल होतात कि माणूसच आतून-बाहेरून बदलून जातो .. काही काही जण तर इतके अमुलाग्र बदलून जातात कि नकारापुर्वीचे ते आणि नकारा नंतरचे ते ,हे दोघे अतिशय वेगवेगळे व्यक्ती भासतात .. 
             माझ्यापण आयुष्यात खूप नकार आले , काही प्रेमात आले तर काही मैत्रीत ,काही रोजच्या चालण्या-बोलण्यात आले तर काही परिस्थितीमुळे मिळाले .. काही या समाजाने दिले तर काही रक्ताचं नात असणाऱ्यांनी ,काही मित्रांनी दिले तर काही पूर्णपणे अनोळखी अशा माणसांनी .. पण खर तर मी या सर्वांच आभार मानायला हव .. कारण यांनी दिलेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या नकारांमुळेच वेळोवेळी मी सावरत गेलो आणि पुन्हा नव्याने उभा राहत गेलो .. तशी ताकद असते बर का या नकारांमध्ये ,तुम्हाला बरच काही शिकवून जाण्याची ,जी परिस्थिती तुम्ही इतर वेळेला मान्य करत नाही ती सत्य परिस्थिती मान्य करायला लावण्याची , आपले कोण आणि परके कोण यातला फरक समजावून सांगण्याची आणि जोराचा झटका बसला असला तरीपण पुन्हा एकदा नव्या जोमान कस उभ राहायचं हे शिकवण्याची अद्भुत ताकद या नकारामध्ये असते .. 
           म्हणूनच आयुष्यात आलेल्या नकाराना हसत हसत स्वीकारा कारण तुमच्यात काहीतरी बदल घडवण्यासाठीच ते नकार तुमच्या आयुष्यात येत असतात .. आणि ते तुम्हाला बदलवतात कारण पुढे जाऊन आयुष्यात येणाऱ्या होकारांसाठी ते तुम्हाला तयार करत असतात .. 
           असाच अर्थाचं 'जेम्स ली बर्क' या अमेरिकन लेखकाचं या 'नकारा' बद्दलच अतिशय छान वाक्य मला आवडत .. तो म्हणतो कि ' स्वतःचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त होण्याकरिता ,तुम्हाला मिळालेल्या नकारा इतक चांगल दुसर काहीही नसत ' .....
   

                                                                                                                                 - सुधीर
                                                                                                                                   

Sunday 21 September 2014

आनंदाचा हा हिवाळा ...


थंड हवेची आली ती झुळूक  
आणि अंगावर  शहारा देऊन गेली 
तो हिवाळा आला नजदीक 
त्याची ही जणू चाहूल देऊन गेली … 

आज कुणीतरी मला म्हटलं कि मला हिवाळा खूप आवडतो .. त्याच क्षणी जाणवलं कि अरे हिवाळा तर आता जवळ आला .. मला मनापासून आवडणारा हिवाळा , पण का आवडतो मला हा हिवाळा ,हिवाळ्यातली ती थंड हवेची झुळूक का हवीहवीशी वाटते ते मात्र माहित नव्हत .. तेव्हा लगेच उठून खिडकीमध्ये जाऊन थांबलो ,आणि काही क्षणातच एक थंड हवेची झुळूक अंगाला स्पर्शून गेली .. आणि नकळत अंगावर एक शहारा येउन गेला ,आयुष्यात कोणाच्यातरी आगमनाची चाहूल देऊन गेला  .. 
..
हिवाळा .. हवाहवासा वाटणारा हा हिवाळा .. पावसाळ्यातले थेंब ते उन्हाळ्यातला तो कोरडेपणा ,या दोन्ही विरुद्ध टोकांच्या मध्ये येतो हा दिलासा देणारा ,मायेची उब घेऊन येणारा हिवाळा .. रस्त्यावरची गरमा-गरम भजी असू द्या किंवा रत्यावर उभ राहून गरमा-गरम भाजलेलं कणीस खाण असू द्या वा घरी आईच्या हातचा गरमा-गरम पराठा असू द्या ,या सर्वांची मजा हा हिवाळा देतो .. 
..
बाल्कनी मध्ये जाऊन हातामध्ये गरमा-गरम कॉफी घेऊन थांबलो असताना ,समोर दिसते ते मोकळे साफ निरभ्र आकाश ,ज्यात मधेच एखादा पांढरा ढग येउन माझ्याकडे पाहून निघून जातो ,जणू तो पण या हिवाळ्यातल्या थंडीने गारठून जाऊन पांढरा पडला असावा अस वाटत .. त्या मोकळ्या आकाशाकडे पाहताना मधूनच अंगाला स्पर्शून जाते एक थंड-थंड हवेची झुळूक .. आणि तिचा स्पर्श होताच अंगावर उभे राहतात शहारे ,जे त्या गरमा-गरम कॉफी ची मजा आणखीनच वाढवून जातात ... 
..
दुपारची असो वा रात्रीची असो ,हिवाळ्यातल्या झोपेची तर गोष्टच न्यारी .. थंडी वाजतेय म्हणून अजून थोडा वेळ म्हणत म्हणत खूप वेळ अंथरुणातून बाहेर न पडण्याचा यापेक्षा चांगला बहाणा तर कुठे सापडणारच नाही .. आणि अंथरुणाच्या आतल वातावरण तर विचारूच नका .. जणू बाहेरच्या हिवाळ्यामध्ये आपण आपलच एक उबदार अस जग तयार करतो अंथरुणात ,ज्यात असते थोडी गरम ,थोडी हवीहवीशी वाटणारी ऊब .. लाडक्या उशीवर डोक ठेऊन ,डोळे झाकून ,बाहेरच्या जगाची सर्व चिंता विसरून मस्तपणे झोप घ्यायला लावणारा असा हा माझा आवडता हिवाळा .. 
..
जे प्रेमात असतात त्यांच्यासाठी तर हा हिवाळा म्हणजे जणू सुखाचे दार .. गुलाबी थंडी मध्ये प्रेयसी सोबत हातात हात घालून फिरण्याचा आनंद ,हा त्यांनाच विचारावा .. आणि जर ती दूर कुठेतरी असेल तर अंगावर येणारी प्रत्येक थंड हवेची झुळूक तिची आठवण आणून ती जवळच कुठेतरी आहे असा भास आणतेच आणते .. थंडी वाजतेय म्हणून स्वेटर ची होणारी देवाण-घेवाण असो वा हाताचे दोन्ही तळवे घासून गरम झालेले ते तळवे तिच्या गालावर ठेवून तिला तात्पुरता का होईना ,उबदार प्रेमाचा असा स्पर्श जाणवून देणे ,हे सर्व माझ्या लाडक्या हिवाळ्यामुळेच तर घडते .. 
..
कडाक्याची थंडी पडलेली असताना सुद्धा ,मजा म्हणून मुद्दाम थंडगार असे कोल्ड्रिंक्स पिणे किंवा कुठे मिळाला तर रंगबेरंगी बर्फाचा गोळा खाणे ,यातली मजा मी काय सांगू तुम्हाला .. या साहसाचा आणखीन एक फायदा होतो ,तो असा कि थंडगार कोल्ड्रिंक पिउन जेव्हा नंतर सर्दी होते ,डोक थोडस दुखायला लागत तेव्हा "आई ,मला बर वाटत नाहीये ग " अस म्हणत आईच्या हातून लाड करवून घ्यायची ती नामी संधी हातून न गमावलेलीच बरी .. मग काय ,जागेवर बसून गरमा-गरम पदार्थांवर ताव मारायचा आणि काही दिवस 'लेकरू आजारी आहे' म्हणून आई करते ते सर्व लाड करून घेत राहायचं .. 
..
कदाचित म्हणूनच मला आणि तुम्हालापण हा हिवाळा इतका आवडतो ,इतका हवाहवासा वाटतो .. तेव्हा या येणाऱ्या हिवाळ्यात ,सर्व चिंता सर्व काही विसरून बस त्या थंड हवेच्या लहरींच स्वागत करा आणि मस्त साजरा करा आनंदाचा हा हिवाळा …. 

                                                                                                   - सुधीर  
                                                                                                     

Sunday 7 September 2014

पाऊलखुणा ..



पाऊलखुणा ..
जेव्हापासून ही पावले टाकायला सुरुवात केली अगदी तेव्हापासून ते आत्तापर्यंतच्या जीवनाच्या या प्रवासात मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मला दिसतात ,कित्येक पाऊलखुणा .. या जीवनाच्या वाटेवर माझ्या पावलांच्या शेजारी दिसणाऱ्या या पाऊलखुणा .आत्तापर्यंत आयुष्यात आलेल्या ,आयुष्यात राहिलेल्या व मध्येच आयुष्यातून निघून गेलेल्या अशा अनेक पावलांच्या त्या पाऊलखुणा .यातली प्रत्येक पाऊलखुण वेगळी आहे आणि प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे .
            काही पाऊलखुणा ह्या सुरुवातीपासून ते अजूनही माझ्या पावलांच्या शेजारी दिसतात ,तर काही पाऊलखुणा या सुरुवातीला तर सोबत होत्या पण काळाच्या ओघात त्या नाहीशा झाल्या .मधूनच काही पाऊलखुणा माझ्या पावलांसोबत जोडल्या गेल्या ,पण अगदी फार कमी वेळेसाठी .काही अंतर कापताच त्यासुद्धा दिसेनाशा झाल्या .कित्येक वळणांवर अशा अनेक पाऊलखुणा सोबतीला आल्या व कित्येक वळणांवर त्या दूर निघुनपण गेल्या .काही पाऊलखुणांच्या सोबतीने भरकटलो तर काही पाऊलखुणांच्या सोबतीने सावरलो .काही पाऊलखुणा मधूनच एका ठिकाणावर साथ द्यायला आल्या आणि त्या आजही माझ्या पावलांना साथ देत आहेत व नुसती साथ नाही तर कधी कधी त्या स्वतः माझ्या चुकलेल्या पावलांना योग्य तो रस्ता पण दाखवतात .

                                       पाऊलखुणा मिटल्या जरी
                                       मिटल्या नाहीत आठवणी
                                       वाटेवरती वळणावरती
                                       भेट होईल कुठेतरी          …।

 या सर्व पाऊलखुणांकडे मागे वळून पाहताना दिसत कि ,या पाऊलखुणात ती एक पाऊलखुण नाहीये जी मला पुढे कायम सोबत देईल .आणि कायम साथ देतील असं वाटणाऱ्या पाऊलखुणा मधेच एका वळणावर अशा गायब झाल्या कि माझ्या पावलांना त्या या वाटेवर एकाकी सोडून गेल्या .
या दूर झालेल्या पाऊलखुणा विसरायचं म्हटलं तरी शक्य होत नाही .आणि खरच ,नुसत विसरायचं म्हटलं तरी शक्य असत का हो अशा पाऊलखुणांना विसरणं .शोकांतिका अशी आहे कि त्यांना न विसरता ,ही पावलं पुढच जात नाहीत .थोड्या अंतरावर जाताच हि पावलं मागे वळून पाहतात ,त्या जुन्या ओळखीच्या पाऊलखुणा कुठे दिसतात का ते पाहायला .
तेव्हा अस म्हणायला हरकत नाही कि ,आयुष्यात जुन्या पाऊलखुणांना विसरायचं असेल तर ते तेव्हाच शक्य होईल जेव्हा सोबतीला या पावलांना नव्या पावलांची साथ मिळेल .

                                     मिटल्या जरी त्या जुन्या खुणा
                                     साथ मिळेल नव्या खुणांची
                                     साथीने त्या नव्या पावलांच्या
                                     वाट सारून जाईल आयुष्याची   …।

आज हि पावले चालतायेत ,मध्येच साथ सुटलेल्या त्या जुन्या पाऊलखुणा पुढच्या वाटेवर कुठल्यातरी वळणावर कधीतरी भेटतील या इच्छेने आणि चालता चालता या वाटेवर कायमची साथ देतील अशा नव्या पावलांची एक ना एक दिवस साथ मिळेल अशा आशेने  ...… 

                                                                                                      - सुधीर 
                                                                                                     

Friday 29 August 2014

चेहरा ..

             
                 चेहरा .. या चेहऱ्यांची आणखी एक फार मोठी  गम्मत असते .जन्मल्या जन्मल्या आपण आईचा चेहरा पाहतो आणि गंमत म्हणजे नंतर ते बाळ काही महिने तरी फक्त त्याचा आईचाच चेहरा ओळखते ,आणि अनोळखी चेहरे दिसताच ते रडू लागते .म्हणजे जन्मापासूनच आपण अगदी नकळतपणे चेहऱ्यांचे ओळखीचे आणि अनोळखी असे आपल्या मनात प्रकार पाडत असतो .
            आपण रोजच्या आयुष्यात जगताना ,आजूबाजूला आपण ओळखीचे चेहरे दिसतात का ते पहायचा प्रयत्न करत असतो .मग ते शाळा ,कॉलेज असो व रस्त्यावर सिग्नलला थांबलेलो असताना असो वा कुठेतरी प्रवासाला जात असू ,आपण पाहत असतो कि कुठे एखादा ओळखीचा चेहरा दिसतोय का ते .    
            पण हे ओळखीचे चेहरे खरच ओळखीचे असतात का ? अनेकदा अस होत कि हे ओळखीचे चेहरे सुद्धा अनोळखी वाटू लागतात आणि काही काही अनोळखी चेहरे का कुणास ठाऊक पण ओळखीचे वाटू लागतात .कित्येकदा असे प्रसंग घडतात कि आपल्याला गरज असते तेव्हा आपण आपल्याला ओळखीचे वाटतात अशा चेहेऱ्याकडे आशेने पाहतो ,कारण आपल्याला विश्वास असतो कि हि माणसे मला नक्की समजून घेतील ,मला मदत करतील .परंतु होते वेगळेच , ओळखीचे हे चेहरे साथ सोडून देतात आणि अनोळखी सारखे वागतात आणि तेव्हा कुठूनतरी एखादा अनोळखी चेहरा येतो आणि तोच आपल्याला मदतीचा हात पुढे करतो .आणि त्याच अनोळखी चेहऱ्यासोबत पुढे आपले संबंध दृढ होतात आणि यातूनच मैत्री ,प्रेम निर्माण होते .
           तरीसुद्धा हे मन अनोळखी चेहऱ्यांवर सहजासहजी विश्वास ठेवायला तयार होत नाही .जेव्हा कधी ओळखीचा आणि अनोळखी चेहरा यात निवडायची वेळ येते तेव्हा आपण नक्की ओळखीच्या चेहऱ्याचीच निवड करतो .कारण आपण अनोळखी चेहऱ्यांना आपलस करायला भीत असतो .भलेही त्यांचा आणि आपला संबंध काही क्षणांपुरता असो तरीसुद्धा आपण त्या चेहर्यांकडे अविश्वासानेच पाहतो .म्हणून तर प्रवासात भेटणार प्रत्येक माणूस चोर वाटतो ,रस्त्यावर भेटणारा प्रत्येक भिकारी हा दारुडा वाटतो ,मदत मागणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला फसवीच वाटते आणि मैत्रीचा हात पुढे करणारी प्रत्येक व्यक्ती हि वाईट दृष्टीची वाटते .
         म्हणून माझ्या मते ,जगण्याची खरी मजा असते ती या अनोळखी वाटणाऱ्या चेहऱ्यांवर कधी कधी विश्वास टाकून पाहण्यात .एखाद्या अनोळखी चेहरऱ्याला आपणहून मदतीचा हात देण्यात .मग पहा ,त्या अनोळखी चेहऱ्यांचे आयुष्य ,त्यांच्या समस्या या अनोळखी न राहता तुम्हाला त्या नक्की ओळखीच्या वाटू लागतील ,आणि जाणवेल कि अरेच्चा आपल आयुष्य सुद्धा यांच्यासारखाच आहे .
      तेव्हाच खर तर प्रेमाची भावना  निर्माण होऊ शकते .प्रेम या जगाबद्दल ,प्रेम या समाजाबद्दल कारण अनोळखी चेहऱ्यांना आपलस करण्याच्या या स्वभावालाच तर प्रेम म्हणतात नाही का .. 
                                                                                         
                                                                                                            - सुधीर
                                                                                                                           

Tuesday 15 July 2014

मोरपीस ....

         
           आज एका निवांत क्षणी माझ्या टेबलवर असणाऱ्या त्या मोरपिसाकडे लक्ष गेल .. जेव्हापासून श्रीकृष्णचरित्र वाचलंय तेव्हापासून या मोरपिसाच मला कायम कुतुहूल वाटत .. त्या मोरपीसाकडे पाहिलं कि त्याच्या त्या रंगबेरंगी रंगात हरवल्यासारख होत ,त्याचा तो बाहेरून आतमध्ये गडद होत जाणारा रंग ,कधी कधी कुतुहूल जागवतो ..
            आज त्या मोरपीसाकडे पाहताना अचानक एक विचार मनात चमकून गेला आणि एक क्षण अस वाटल कि या मोरपिसाच रहस्य हे तर नाही ना ? कृष्णाने आयुष्यभर ,अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते मोरपीस जवळ ठेवले ते कदाचित या रहस्यामुळेच तर नाही ना ?? कदाचित हा माझा अंदाज बरोबर नसेल किंवा फक्त कल्पनाविलास असेलही ,पण माझ्या 'ज्ञानाचा शोध आणि अज्ञाताची ओढ' या जीवनवाक्याला अनुसरून आयुष्याबद्दल जी उत्तर शोधायचा मी प्रयत्न करतो त्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे ..
            मोरपिसाची सर्वात आकर्षून घेणारी गोष्ट म्हणजे त्याचा रंग .. बाहेरून आत जाऊ तसा तसा अधिकाधिक गडद आणि केंद्रित होत जाणारा तो रंग .. हे मानवी मनाचं ,मानवी स्वभावाचं च तर प्रतिक आहे ,नाही का .. मानवी मन मानवी स्वभाव हा सुद्धा या मोरपीसासारखाच तर असतो ,मनाच्या जितक आत मध्ये जाल तितक अधिक काळोख ,तितकी अधिक अनिश्चितता .. म्हणून तर म्हणतात कि कोणाच्याही मनाला समजून घेण अशक्य आहे ,मग ती व्यक्ती कितीपण जवळची असो .. 
               जशी मनाची गोष्ट तशीच स्वभावाची सुद्धा ,दुरून एखाद्या व्यक्तीचा वाटणारा स्वभाव आणि तीच व्यक्ती अगदी जवळून आयुष्यात पाहायला मिळाली तेव्हा त्या व्यक्तीचा समजून येणारा खरा स्वभाव ,हा त्या मोरपिसासारखाच भासतो ,बाहेरून आत जाव तसा अधिकाधिक गडद होत जाणारा .. लग्न होऊन अगदी शेवटपर्यंत एकत्र राहणाऱ्या पती-पत्नीला सुद्धा एकमेकांच मन ,एकेमेकांचा खरा स्वभाव संपूर्ण समजलेला असतं अस काही नाही .. 
             प्रत्येकाचा स्वभाव ,प्रत्येकाचं मन सर्वसाधारणपणे सारखच भासत ,पण त्या मनाच्या केंद्रस्थानी जाव तसा काळोख वाढत जातो आणि त्या मनाच्या केंद्रात ,त्या काळोखात काय काय विचार ,काय दडलेलं असत ते कधी कधी त्या व्यक्तीला सुद्धा माहित नसत .. कृष्णचरित्र वाचताना एक गोष्ट आढळली ती म्हणजे आपल्या पूर्ण आयुष्यात कृष्ण जो काही वागला बोलला ,ते त्याच वागण बोलन अस होत जणू काही तो समोरच्या व्यक्तीच्या मनाला पूर्णपणे जाणत होता ,त्याला जणू माहित होत कि समोरच्या व्यक्तीच्या मनाचा बाहेरून आत बदलत जाणारा रंग कोणता आहे .. आणि म्हणूनच त्याच्या या कौशल्याचं प्रतिक म्हणून त्यानं हे मोरपीस कायम जवळ ,त्याच्या शिरपेचात बाळगले असावे … 
      शेवटी या मोरपिसाबद्दल खर उत्तर मिळण तर अशक्यच आहे ,तरी माझ्या परीने ,आयुष्याबद्दलच्या ज्ञानाच्या शोध घेत घेत अज्ञाताच्या ओढीने आयुष्याशी सांगड घालत मला मिळालेलं हे उत्तर ..   
        
                                                                                                                         - सुधीर
                                                                                                                       

Monday 30 June 2014

ही पंढरीची वारी .....

           

       खर पाहायचं तर मी वारकरी संप्रदायाला मानतो त्याचं कारण कुठल कर्मकांड नाहीये तर आजच्या समाजात प्रबोधन करण्याची या संप्रदायात असलेली शक्ती .. ज्ञानोबा तुकोबा असो व गोरा कुंभार व बहिणाबाई ,या संतांचे विचार नीट अभ्यासले आणि ते सर्वांपर्यंत पोहोचवले तर आपल्याला समाजात आणि व्यक्तिगत आयुष्यात भेडसावणाऱ्या सर्व समस्यांची उत्तरे मिळून जातील .. याच संप्रदायाला समजून घेण्यासाठी ,जवळून पाहण्यासाठी या वर्षी मी माझी पहिली-वहिली वारी केली .. खर तर कित्येक वर्षांपासून मी माळकरी होतो ,आता खऱ्या अर्थाने वारकरी पण झालो ..
                   जास्त दिवस शक्य नसल्याने दोन दिवसच जमलं दिंडीसोबत जायला ,पण या दोन दिवसांचा अनुभव सुद्धा अत्यंत विलक्षण होता .. वारीला जाण्याचा माझा उद्देश कुठला देव-देव करणे नसून , मला पाहायचं होता हा दरवर्षी भरणारा अनोखा सोहळा ,जगायचं होत थोड वेगळ आयुष्य ,घ्यायचा होता आयुष्यातला एक अगदी वेगळा अनुभव ..
                आम्ही दोघ मित्र गेलो वारीला आणि वारीला गेल्यानंतर पहिली गोष्ट जी मला प्रकर्षाने जाणवली ते म्हणजे किती अनोखा सोहळा आहे हा .. म्हणजे जिथ आजकाल आपल शेजारी कोण हे माहित नसलेला समाज वाढत आहे तिथ हि एकमेकांना न ओळखणारी वारकरी मंडळी थोड्या-थोडक्या नव्हे तर लाखोंच्या संख्येने एकत्र येतात .. आणि नुसती एकत्र येत नाहीत तर या १८ दिवसात ती एकमेकांना जीव लावतात ,एकमेकांची काळजी घेतात .. माझ्यासाठी हा अनुभव अगदी नवीन होता ,अस वाटल कि खरच माणसांच्या जगात आलोय मी जिथे माणुसकी ठासून ठासून भरली आहे ..
                  मला तर एका आजीबाई नी त्यांचा नातूच मानलं .. माझ नाव घ्यायला त्यांना अवघड वाटायचं तर त्यांनी माझ नाव सुदामन ठेवल .. मी निघून येताना त्या मला म्हणाल्या कि ' हा घे माझ्या मुलाचा नंबर ,आणि कधीपण कॉल कर आणि म्हण कि तुमचा नातू बोलतोय ,मी समजून घेईन तू आहेस म्हणून ' .. खरच अद्भुत आहे या वारकरी मंडळींची माया .. आम्हा दोघांची ही पहिलीच वारी असल्याने दिंडी मधल्या सर्व वारकऱ्याच लक्ष आमच्यावरच असायचं ,आम्हाला नवीन-नवीन भजन ऐकवून दाखवत ,रस्त्याने चालताना ती भजने आवर्जून म्हणायला लावत ,वारकर्यांचा तो भगवा झेंडा आमच्या हाती देऊन आम्हालाच दिंडीच्या पुढे चालायला लावत .. नि हातात टाळ घेऊन आम्हाला भजन म्हणायला लावून ते फार कौतुकाने पाहायचे ,कारण टी-शर्ट जीन्स मधल्या मुलांना अस भजन म्हणताना पाहण्याचा योग त्यांनासुद्धा क्वचितच मिळाला असेल .. दिंडीच्या विणेकरी बाबांनी माझ्या हात वीणा दिली ,मला ती वाजवता नाही आली पण त्यावर थोडेफार आवाज मात्र काढता आले .. असो ..
               आज जिथे आपले सख्खे आपल्याला आपल मानत नाहीत तिथ या दोन दिवसात या अनेक अनोळखी माणसांनी आपल मानलं आणि आपल्या माणसांसारखी माया लावली .. आणि निघून येताना सर्वजण ,अगदी सर्वजण न विसरता आवर्जून म्हणाले कि पुढल्या वर्षी तुम्ही यायचं आणि पूर्ण १८ दिवस आमच्यासोबत चालायचं .. अस वाटल कि हा त्यांचा निरोप नाहीये तर पुढच्या वर्षीसाठीचं हक्काचं बोलावणचं होत .. एवढ्या हक्काने आजपर्यंत आई-बाबा सोडून कुणीसुद्धा बोलावलं नव्हत .. आणि म्हणूनच आम्हाला तिथून निरोप घेण खरच अवघड झाल होत ..
              .. आणि खरच या वारी ला जाऊन ज्या गोष्टी शिकायला मिळतात ,ज्या गोष्टी पाहायला अनुभवायला मिळतात त्या दुसरीकडे कुठेही मिळण शक्य नाही ..
                  पुढच्या वर्षी आणि यापुढील प्रत्येक वर्षी माझा प्रयत्न नक्की असेल की जमेल तेवढे दिवस हि आनंदाची वारी करण्याचा ,हा जगावेगळा अनुभव जगुन ,अजूनही आपण माणुसकी असलेल्या माणसांच्या दुनियेत राहतो हि जाणीव जगण्याचा .. म्हणून एक वाक्य अगदी खरय ,
                                       ही पंढरीची वारी
                                       जणू आनंदाची वारी ….

                                                                                                                             - सुधीर
                                                                                                                                 9561346672

Wednesday 18 June 2014

का लिहितो मी ….

                   
                   
                         लिहिण ,एका शब्दापासून सुरु झालेला हा प्रवास कधी या शब्दांच्या जगात मला ओढून घेऊन गेला हे मला कळलेही नाही .. ब्लॉग लिहायला सुरुवात केल्यापासून वाचणार्यांचा मिळणारा प्रतिसाद उत्तम आहे ,पण याचा अर्थ असा होत नाही कि मी जे लिहितो ते सर्व आणि सर्वांनाच पटत ,आणि ते नैसर्गिकच आहे.. असो .. मला अनेकजण विचारतात कि तुला ब्लॉग लिहायची काय गरज ? तेव्हा माझ उत्तर अगदी साधं असत कि वाचणाऱ्यापैकी एकाला जरी त्याला जगण्यात पडणाऱ्या अनेक प्रश्नांपैकी एका जरी प्रश्नाचं उत्तर मिळायला या माझ्या लिखाणाची मदत झाली तरी खूप आहे ..
                       आजकाल लोकांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन फार विचित्र झालेला आहे .. आपल घर ,आपल कुटुंब ,आपला पैसा यापलीकडे कोणी कोणाचा विचार करायला तयारच नाही .. याबातीत शिवाजी महाराजांवर व्याख्यान देत समाजजागृतिचा प्रयत्न करणारे नितीन पायगुडे पाटील याचं वाक्य मला फार आवडत .. ते म्हणतात आजकालच्या तरूणांच आयुष्य फक्त ३ गोष्टींवर फिरत राहत ,'माझी गाडी ,माझी माडी आणि माझ्याच बायकोची गोल गोल साडी ' .. आणि हे खर आहे ,आजकालचे तरुण-तरुणी पाहता ,समाजात सुधारणा कशी होईल याबद्दल कुणी फेसबुक च्या कमेंटच्या पलीकडे जाऊन प्रयत्न करताना दिसत नाही .. देखावा करणाऱ्यांची संख्या खूप वाढलीये ,आणि खरी काळजी करणाऱ्यांची संख्या कमी झालीय …. 
                      स्वतः चा फोटो सेल्फी या गोंडस नावाखाली सगळ्यांना दाखवणारे खूप आहेत ,पण स्वतःच 'स्व' अर्थात 'सेल्फ' ओळखून ते जगासमोर मांडणारे फार कमी आहेत .. फेसबुक वर दुसऱ्यांच्या फोटो ला धडाधड लाइक करणारे तर खूप आहेत पण त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात असणाऱ्या ,जी साक्षात जिवंत हाडामासाची बनलेली माणसे असतात , त्यांना व त्यांच्यासोबतच्या असणाऱ्या नात्यांना मनापासून लाईक करणारे फार कमी आहेत .. या बाबतीत एक वाक्य मला सांगावस वाटत ,कि आजच्या जगात जिथे जग आणि जगण याचा विचार करणाऱ्या माणसांची कमी आहे ,तिथे जे कोणी असा विचार करत असतील ,त्यांनी शांत न राहता त्यांचे विचार मांडणे फार गरजेचे आहे ,कारण समाजाची नैतिक मुल्ये वाढवण हि काळाची व समाजाची गरज होऊन बसली आहे …
                      मला हा हि प्रश्न विचारला एकाने कि तू फक्त जगण ,नाती किंवा मानवी भावना याबद्दल का लिहितोस ,समाजात घडणाऱ्या चुकीच्या घटनांबद्दल का नाही लिहित ? माझ अस मत आहे कि आपण समाजातली प्रश्ने तेव्हाच सोडवू शकू जेव्हा आपल्याला मनात पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास मिळतील ,आपण समाजाचं मन तेव्हाच ओळखू शकू जेव्हा आपण आपल्या मनाला ओळखू शकू ,समाजासोबत आपल नात तेव्हाच घट्ट होईल जेव्हा आपल्या घराच्या माणसांसोबत आपली नाती घट्ट होतील  .. शेवटी कवी दत्त हलसगीकर यांच्या कवितेतल्या काही ओळी सांगाव्याशा वाटतात .. ते म्हणतात 
      ज्यांची बाग फुलुनी आली 
                           त्यांनी दोन फुले द्यावीत 
    ज्यांचे सूर जुळुनी आले 
                                 त्यांनी दोन गाणी द्यावीत … 
          आभाळी एवढी उंची ज्यांची 
                       त्यांनी थोडं खाली यावे 
         मातीत यांची जन्म मळले
                                     त्यांना खांद्यावरती घ्यावे  …. 


                                                  - सुधीर
                                                              9561346672

Sunday 8 June 2014

कधीतरी .. कुठेतरी ..

               
                        मला रोज प्रेम होत .. हे वाक्य वाचून तुम्हाला वाटेल कि बिघडलेला मुलगा दिसतोय हा .. पण हे खर आहे .. मला रोज प्रेम होत तिच्यावर ,जी अजूनही माझ्या आयुष्यात आली नाही .. मला ना तिचं नाव माहित्येय ना तिचं गाव ,ना ती कशी दिसते हे माहित्ये न ती कशी बोलते हे माहित्येय .. माहित आहे फक्त एकच गोष्ट ,कि that is my love and someday I'll definitely meet her at some point .....
             काही नशीबवान लोकांना हे प्रेम आयुष्यात फार लवकर आणि सहजरीत्या मिळत तर माझ्यासारख्या काहींना हे प्रेम फक्त स्वप्नांमध्ये आणि कवितांमध्ये मिळत .. ज्यांना मिळालं आहे त्याचं खर तर नशीब म्हणायचं आणि ज्यांना अजूनही मिळालं नाही त्यांचही नशीब म्हणायचं .. कारण ज्यांना अजूनही प्रेम मिळाल नाही त्या लोकांना हे न मिळालेलं प्रेम शिकवत आयुष्यात आशावादी व्हायला .... 
                   मी या आशावादी अशा लोकांपैकीच एक आहे .. आज ना उद्या ,इथे नाही तर तिथे ,आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर ,जे माझ असेल ते प्रेम मला भेटेल असा विश्वास या हृदयाला कायम वाटत असतो .. म्हणूनच तर माझ्यावर प्रेम करणारी 'ती' कशी असेल याची स्वप्न पाहण ,'ती' आल्यानंतर आयुष्य कस असेल याची कल्पना करणे ,हे आमच्यासारख्यांच कल्पनाविश्व होऊन बसतं .... 
              येणाऱ्या पावसाची प्रत्येक सर ,जाणवणारी वाऱ्याची प्रत्येक झुळूक , डोळ्यांना दिसणारं प्रत्येक सुंदर दृश्य , ऐकू येणार प्रत्येक मधुर संगीत , ओठावर अलगदरीत्या येणार प्रत्येक गाणं आणि मनाला आनंद देतानाच ओठांवर हलकंच हसू आणणारा प्रत्येक क्षण हे सर्व जणू त्या भविष्यातल्या प्रेमाच्या आशेला आणखी पल्लवित करत असतं .. संथ सुटलेल्या वाऱ्याची झुळूक लागताच एखाद्या झाडाचं पान जस हळूच इकडे-तिकडे डुलत असत ,तसंच रोजच्या या जगण्यात एक जरी निवांत क्षण मिळाला कि हे हृद्य त्या क्षणात त्या पानाप्रमाणे प्रेमाच्या स्वप्नांमध्ये डुलू लागतं .... 
              कुणीतरी भेटेल जिच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास टाकू ,कुणीतरी भेटेल जिच्यावर मनसोक्त प्रेम करू ,कुणीतरी येईल जी मनातल्या प्रत्येक भावना न सांगता ओळखेल ,कुणीतरी असेल जी आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपला हात हातात घेऊन म्हणेल कि 'चल पुढे ,मी आहेच कि तुझ्यासोबत ' .. कळत-नकळतपणे या सर्व आशा ,सर्व स्वप्न , ही आयुष्य हसत-खेळत जगण्याची प्रेरणा बनून जातात .. शिकवून जातात एक जगण्याची अनोखी पद्धत , भविष्याकडे डोळे लावून आनंदी आयुष्य जगण्याची पद्धत   , आयुष्यात न आलेल्या व्यक्तीवर सुद्धा मनापासून प्रेम करण्याची पद्धत , नकळतपणे येणाऱ्या सर्व नकारात्मक विचारांना दूर करून मनात कायम आशेची पणती तेवत ठेवण्याची पद्धत .. आणि सर्वात महत्वाचं या जगण्यावर ,या आयुष्यावर प्रेम करण्याची पद्धत ..… 
                 म्हणून अस म्हणन वावग ठरणार नाही ,कि आयुष्यात प्रेम मिळो वा न मिळो , प्रेम मिळेल आणि प्रेम होईल ही प्रेमाची स्वप्न उराशी घेऊन जगण ,यात एक वेगळीच मजा आहे .. ती मजा एकदा घेऊन तरी बघा .. या स्वप्नामध्ये एकदा हरवून तरी बघा ….

                                                                                                                             - सुधीर
                                                                                                                                

Monday 2 June 2014

ब्रेक घेऊन तरी बघा …

                 
               नुकतच एका परीक्षेच्या निमित्ताने एक प्रयोग करून पहिला .. परीक्षेच्या तयारीमध्ये मन गुंतवायचच आहे तर १-२ महिने जर बाकीच्या सर्व गोष्टींपासून ब्रेक घेऊन पाहू असा विचार मनात आला .. आणि खरच या काळात हा एकटेपणा जगण्याची एक नवीन बाजू शिकवून गेला .. 
                स्वतःच्या अंगा-खांद्यावर वाढलेले पाने जेव्हा पिकतात ,हिरव्याची पिवळी होतात तेव्हा त्या झाडावरून ती हळू-हळू गळू लागतात आणि तेव्हा ते झाड सुद्धा त्यांच्या जाण्याने दुखी न होता ,येणाऱ्या नव्या पालव्या ,नव्या पानांच्या स्वागताच्या तयारीला लागते .. आपल्या हि आयुष्यात असाच काहीतरी असत .. अनेक माणस येतात आणि अनेक जातात आपल्या आयुष्यातून ,काही काही तर अगदी डोळ्यादेखत निघून जातात दूर .. पण म्हणून का निराश व्ह्यायचं ? तर अजिबात नाही .. 
                  यासाठी एक सोप्पा पण अवघड उपाय म्हणजे एक मस्त ब्रेक घ्या या सर्वापासून ..  कुठल्यातरी कामात ,कुठल्यातरी गोष्टीत मन पूर्णपणे गुंतवून टाका .. पूर्ण वेळ काम शक्य नाही म्हणून अधून-मधून काहीतरी मनोरंजन किंवा टाइमपास साठी काहीतरी जवळ राहू द्या .. संगीत किंवा गाणे हे सर्वात उत्तम .. पण यातही रडक्या गाण्यांपासून सावध राहा आणि त्या प्रत्येक गोष्टीपासून सावध राहा जी तुम्हाला भूतकाळातल्या आठवणींशी जोडते … 
                   नवीन पुस्तके वाचा ,एखादा नवीन छंद जोपासा ,नवीन अनोळखी माणसांशी बोलून पहा ,आणि अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी करून पहा ज्या करायची मनात इच्छा तर होती पण काही कारणास्तव कधी जमलच नव्हत .. सुरुवातील याचा त्रास होईल ,एकटेपणा अधून-मधून सारख डोक वर काढेल ,आठवणी सारख्या सारख्या मनात कूस बदलतील ,तरी न हारता ,दुखी व्हायच नाही हे मनाशी पक्क ठरवून पुढे जात राहा .. 
             आणि काही दिवसातच तुम्हाला हे जाणवायला लागेल ,कि अरे आपल्या आयुष्यात आपण उगाच नको त्या गोष्टींपासून स्वतःला दुखी करून घेत होतो .. या काळात जगण्याची पद्दत थोडीशी बदलल्याने ,तुमच्यातला एक नवा 'मी' तुम्हाला हळू हळू जाणवायला लागेल ,एका नव्या स्वत्वाची ओळख व्हायला लागेल .. एखादी नवीन गोष्ट केल्यावर जेव्हा आपल्याला जाणवत ना कि 'अरेच्चा मला हेपण जमते' ,तेव्हा मनाला जो आनंद मिळतो आणि आपला स्वतःबद्दलचा जो आत्मविश्वास वाढतो ,तो क्षण शब्दात नाही सांगता येणार .. तो फक्त अनुभवायचा चं क्षण आहे .. 
              म्हणून एक छोटा किंवा मोठा ब्रेक घेऊन तरी बघा ,स्वतःला नव्याने शोधून तरी बघा ,आत दडलेला एक नवीन 'मी' शोधून तरी बघा …

                                                                                                       - सुधीर
                                                                                                           

Wednesday 30 April 2014

जय हा महाराष्ट्र माझा …


आज सर्व म्हणतायेत ,जय जय महाराष्ट्र माझा
पण खरच आहे का ,जय हा महाराष्ट्र माझा …

इथे लावल्या जातात
हिंदी इंग्रजीतून पाट्या
आणि मराठीचं नाव घेताच
कपाळाला मात्र पडतात आट्या
तरीही म्हणायचं का ,जय हा महाराष्ट्र माझा …

इथे खुलेआम होते
दलित तरुणाची क्रूरहत्या
का विसरली हि माणसे
माणुसकीचा च पत्ता
तरीही म्हणायचं का ,जय हा महाराष्ट्र माझा …

शक्तिमिल मध्येच होतो
नारीशक्तीवर बलात्कार
जिजाऊ सावित्रींच्या या राज्यात
का ऐकू येतो स्त्रियांचा चित्कार
तरीही म्हणायचं का ,जय हा महाराष्ट्र माझा …

इथे उंचच उंच बांधतात
पुतळे महापुरुषांची
का शिवबा आंबेडकर उरले
फक्त हार चढवण्यासाठी
तरीही म्हणायचं का ,जय हा महाराष्ट्र माझा …

इथला भूमिपुत्र आहे जो
तो गरीब बळीराजा
पाऊस पडो वा दुष्काळ
का नशिबी त्याच्या फक्त आत्महत्या
तरीही का म्हणायचं ,जय हा महाराष्ट्र माझा …

इथे पणाला लावतात
मराठी अस्मिता स्वतःची
अन तरीही सर्व म्हणतात
माय मराठी आमुची
तरीही का म्हणायचं ,जय हा महाराष्ट्र माझा …

इथे आहे शिवबांचा वारसा
फुल्यांनी दाखवला शिक्षणाचा आरसा
चला पुन्हा महाराष्ट्र घडवूया
माय मराठीला वाढवूया
कारण मला म्हणायचय ,जय हा महाराष्ट्र माझा …

आता तरी वागूया ,आता तरी बोलूया
मराठीसाठी जगूया ,मराठीसाठी लढूया
आणि मग सर्वजण
अभिमानाने म्हणूया ,जय जय हा महाराष्ट्र माझा ….

                                                                                                                - सुधीर
                                                                                                                    9561346672
   

Monday 21 April 2014

आज आमच्या इथे पाऊस पडला ...

आज आमच्या इथे पाऊस पडला .. पण हा पाऊस मला जर वेगळाच भासला ..
उष्णतेच्या झऱ्यातून आणि गरम वाऱ्यातून वाट काढत एक काळाकुट्ट ढग आला ..
त्या काळ्याच्या आगमनाची वार्ता देण्यासाठी पांढऱ्याशुभ्र विजासुद्धा आनंदात नाचू लागल्या .. आणि आजच्या जातीभेद ,धर्मभेद आणि रंगभेदाच्या या जमान्यात निसर्गातली हि गोष्ट मला आल्हाददायी वाटून गेली .. 
त्या विजांचा नाच संपताच टिप-टिप अशा आवाजांचा खेळ सुरु झाला आणि पाहता-पाहता आकाशातून ओल्याशार थेंबांचा मारा सुरु झाला ..  
उन्हाने होरापलेल्या जमिनीला आणि समस्यांनी वैतागलेल्या मानवाला सुखाचे काही क्षण देत यावेत म्हणू ते थेंब माखो मैलांचा प्रवास करून खाली उतरले ..
त्या थेम्बानाही हे माहित असत कि ,खाली उतरताच त्याचं आयुष्य संपणार आहे .. तरीपण तहानलेल्या जीवांना शांती देण्यासाठी ,त्रासलेल्या जीवांना सुखाचे क्षण देण्यासाठी ते इवल्याश्या थेंबानी त्याचं आयुष्य खर्ची घालवले .. 
थेंबांचा हा खेळ संपतो न संपतो तोच गार वाऱ्याच्या लाटा येउन थडकू लागल्या .. जणू काही ते थेंबच त्या वाऱ्याला सांगून गेले कि माझ काम मी केलंय ,आता यापुढे तू या जगाला सुखाच्या लहरी दे .. जणू एका पिढीने दुसर्या पिढीला त्याचं जीवनकार्य पुढे चालवण्याचा संदेश दिला  .... 
आणि सरतेशेवटी राहीला तो ओल्याशार मातीतून येणारा तो गंध-सुगंध .. लाखो थेंबांच्या बालीदाना नंतर पावन झालेली ती जमीन जणू त्या थेंबांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुगंधी फुले वाहू लागली अस वाटल मला  .... 
आज आमच्या इथे पाऊस पडला.. आणि जाता जाता एवढंच सांगून गेला कि तुझ आयुष्य पण असच दुसऱ्यांच्या सुखासाठी खर्ची घाल ,मग पहा ,जिथे तुझ अस्तित्व संपेल त्या जागीसुद्धा भविष्यात सुगंधच येईल … 
मग तुमच्या इथे असा पाउस पडला का ??
                                                                                                           
                                                                                                                   - सुधीर
                                                                                                                       9561346672

Saturday 19 April 2014

मना अवकाशु ......

             
                    ज्ञानेश्वरांच्या एका श्लोकात एक ओळ आहे  " मना अवकाशु ।" .. याचा अर्थ आपल मन आकाशाप्रमाणे मोकळ राहू द्या जेणेकरून त्यात येणारा प्रत्येक विचार ,प्रत्येक आवाज मुक्तपणे मोकळेपणे ,मनसोक्त फिरू शकेल ..
            पण आपल मन खरच कधी मोकळ असत का हो ? मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला कधी मोकळेपणाने आपल्या मनात वाऱ्यासारखं फिरू दॆतच नाही आपण ..  त्या विचाराला अडथळा आणतो तो आपल्याच काही पूर्वग्रहाचा ,आपणच घालून घेतलेल्या काही समजुतींचा .. जस डेरेदार झाडाच्या पाना-फुलातून ,फांद्यातून वारा मनसोक्त हिंडतो ,कधी इकडून तर कधी तिकडून ,अगदी निवांतपणे त्याचा संचार चालू असतो , अगदी तसाच आपल्या मनातल्या विचारांना मुक्तपणे संचार करू दिला तर … 
           जेव्हा आपल्याशी कोणी काही बोलत असत तेव्हा आपण त्याच बोलन ऐकताना सुद्धा मनात काहीतरी पूर्वग्रह ठेउनच ऐकत असतो आणि त्याच पद्धतीने आपण त्याचाशी बोलतो पण .. म्हणूनच एखाद्याच्या तळमळीने विचारलेल्या "कसा आहेस ?" या प्रश्नालासुद्धा  "ठीक आहे " यासारखी साधी उत्तरे देतो आपण .. जेव्हा कुणी आपल्याशी बोलू लागत तेव्हा आपण मनातल्या मनात विचार करू लागतो ,कि ती व्यक्ती कोण आहे ,ती आपल्याला आवडते कि नाही आवडत ,त्याने आत्तापर्यंत काय काय केले आणि तो तुमच्याशी कसा कसा वागला ,यासारख्या विचारांमध्येचं आपण त्याच बोलण ऐकत राहतो ..  अशाने त्याचा आवाज ,त्याला जे बोलायचं आहे ते ,त्याचे विचार आपल्या मनात मुक्तपणे फिरतच नाहीत ..
          अनेक घरांमध्ये हे होत ,कि आई-वडील मुलाला काहीतरी सांगत असतात समजावून आणि तो मुलगा मात्र त्याचा गेम मध्ये अथवा टीव्ही मध्ये मग्न असतो .. तेव्हा त्यांचा आवाज याच्या कानापर्यंत पोहोचत असतो ,कदाचित त्याच्या मनापर्यंत सुद्धा पोहोचत असतो पण " ह्याचं नेहमीचच आहे सांगण " असा पूर्वग्रह मनात ठेवल्याने तो आवाज मनात त्याच्या कानात मुक्तपणे फिरत नाही आणि आई-वडिलांना जे मुलाला म्हणायचय ते त्याला कधी समजतच नाही ... 
          अस तुमच्याही बाबतीत होत असेल ,जेव्हा कुणीपण तुमच्याशी बोलत तेव्हा तुम्ही तुमच मन मोकळ ठेऊन किती जणांच ऐकता ? एकदा ऐकून पहा ,त्या आवाजाला तुमच्या मनापर्यंत पोहचू द्या , कारण येणारा प्रत्येक आवाज ,त्यामागची भावना ,त्यामागचा विचार हा वेगळा असतो ,त्याला मनसोक्त तुमच्या मनात फिरू द्या .. प्रत्येक विचारांची वेगळी बाजू तुम्हाला दिसून येईल , प्रत्येक गोष्ठीची ,प्रत्येक व्यक्तीची वेगळी बाजू तुम्हाला दिसून येईल ... आणि कदाचित एक वेगळचं जग तुम्हाला दिसू लागेल ... 
         
                                                                                                                      - सुधीर
                                                                                                                       

                   

Thursday 3 April 2014

एक चंद्र आणि एक कळी .....

                 
                   कळी उमलण्याचे स्वप्न पाहत वेडा चंद्र रात्रभर जागा होता ,
                   कळी उमलणारच असा त्याचा विश्वास होता ..
                   सकाळ झाली ,काळी उमलली ,
                   पण तिला पाहायला चंद्र कुठे होता ?? …

                या ओळींचा आणि आपल्या आयुष्याचा खूप खोल संबंध आहे ,आता तुम्ही म्हणाल कि कस ? .. आपण एकतर त्या कळीसारखे असतो किंवा त्या वेड्या चंद्रासारखे .. 
           जे त्या कळीसारखे असतात त्यांच्या आयुष्यात त्यांच्यावर प्रेम करणारा ,त्यांची काळजी करणारा ,आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना साथ द्यायला तयार असेल असा एखादा तरी चंद्र त्यांच्या आयुष्यात असतो ,पण त्या चंद्राची किंमत ,अथवा त्या वेड्या चंद्राच्या प्रेमाची किंमत जशी या कळीला कळत नाही ,तसच आपल होत .. आयुष्यातल्या त्या चंद्रासारख्या माणसांना आपण गृहीत धरून चालतो ,ते आपल्या आयुष्यात आहेतच ,आणि नेहमी आपल्यासोबत राहणारच आहेत ,आपली काळजी करणारच आहेत ,आपल्यावर जीवापाड प्रेम करणारच आहेत अस आपण गृहीत धरून चालतो .. पण एक सकाळ अशी येतेच जेव्हा आयुष्याची कळी तर उमललेली असते पण ती पाहायला तो वेडा चंद्रच नसतो ..तसच काहीजण आई-वडिलांना गृहीत धरतात ,काहीजण मित्रांना गृहीत धरतात ,काहीजण प्रेमाला गृहीत धरतात तर काहीजण प्रेम करणाऱ्याला गृहीत धरून पुढे चालत राहतात आणि एका वळणावर जेव्हा ते मागे वळून पाहतात तेव्हा हे सर्वजण कुठल्यातरी मागच्याच वळणावर आपल्यापासून दूर निघून गेलेले असतात ,इतके दूर कि पाहिजे तरी आपण त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही .. अशी त्या कळीची कहाणी … 
                आता त्या चंद्राच्या नजरेतून पाहिलं तर ,तसा वेडा चंद्र आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये कुठेतरी असतोच .. काहीजण प्रेमासाठी वेडे असतात ,काहीजण पैशासाठी ,काहीजण सत्तेसाठी तर काही जण पैसा आणि सत्तेसाठी .. आणि या वेडापायी ते अनेक स्वप्न पाहतात ,आणि ती स्वप्न पूर्ण व्हायची वाट पाहतात ,पण सर्वांचीच स्वप्न पूर्ण होत नाहीत ,शेवटी सकाळ झाली कि चंद्राला जावं लागतच ,आणि ती स्वप्नरुपी कळी येते सूर्याच्या वाट्याला .. तरीपण त्या चंद्राची ती जिद्द ,ते प्रेमरूपी वेडेपण हे निराळच असत , जस आई-वडील त्यांच्या मुलांसाठी वेडे होऊन आयुष्यभर कष्ट करतात ,त्यांच्यावर प्रेम करतात आणि मोठ झाल्यावर तीच मुल त्यांना सोडून निघून जातात .. एखादा प्रियकर त्याच्या प्रेयसी वर जीवापाड प्रेम करतो पण जेव्हा आयुष्यभर साथ देण्याची वेळ येते तेव्हा तीच त्याला सोडून निघून जाते .. असे अनेक उदाहरण देत येतील या चंद्रासाठी .. 
                 कुठेतरी आपल्या सर्वांच्या मनात हा चंद्र किंवा हि कळी असतेच .. शेवटी आयुष्य जगायला मिळत त्या कळीला ,स्वप्न पूर्ण होत त्या कळीचे परंतु त्या चंद्राच्या बलिदानाचा आणि प्रेमाचा थाटच काही और असतो ,त्यातली मजाच काही और असते आणि शेवटी आपल्या लक्षात राहतो तो वेडा चंद्र आणि त्याच वेड प्रेम .. तेव्हा तुम्ही ठरवा ,तुम्हाला चंद्र व्हायचय का कळी !!….
                                                             
                                                                                                                       - सुधीर 
                                                                                                                           9561346672

Monday 31 March 2014

तूच तू ...

                                 
                                       
         असाच एक मुलगा ,एका मुलीवर जीवापाड प्रेम करणारा ,त्या मुलीन त्याच अख्ख जग व्यापून टाकलेलं असत .. त्याला फक्त जिकडे तिकडे तीच ती दिसत असते ,जणू काही तिच्याशिवाय या जगात दुसर कोणीच नाही अशी काही अवस्था होते त्या मुलाची .. त्याला दिसते फक्त तीच ती .. पण मग यालाच म्हणतात ना 'प्रेम ',स्वतःच अस्तित्व विसरून ,फक्त तिचा विचार करणे ,आणि स्वतःला विसरून फक्त तिचा होऊन जाणे … 
एके दिवशी ती विचारते कि तुला माझी किती आठवण येते ,तेव्हा तो म्हणतो तू माझ्या डोळ्यासमोरून जायला तर पाहिजे ,तू तर मला दिसतेस ,सगळीकडे आणि सगळ्यामध्ये … 

मनात तू ध्यानात तू 
नकळत पडणाऱ्या स्वप्नात तू 
ध्यास तू विश्वास तू 
आनंदी मनाचा निःश्वास तू … 

पानात तू फुलात तू 
पहिल्या पावसाचा सुवास तू 
रागात तू प्रेमात तू 
नुकत्याच फुललेल्या कळीत तू … 

चहात तू पाण्यात तू 
नारळाच्या गोड गोड शहाळ्यात तू 
दिवस तू रात्रीही तू 
चमकणाऱ्या हजारो चांदण्यात तू … 

इकडे तू तिकडे तू 
दिसणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यात तू 
श्वासात तू आवाजात तू 
भिरभिरत्या नजरेच्या शोधात तू …. 

वाऱ्यात तू झऱ्यात तू 
बागेतल्या सुंदर पाखरात तू 
माझ्यात तू माझी तू 
सगळीकडे फक्त तूच तू … 


                                                                                                                        - सुधीर
                                                                                                                         9561346672

Saturday 29 March 2014

सवय ..

               
                    सवय .. जिथे जीवन आल तिथ भावना आल्याच आणि जिथ भावना आल्या तिथं सवयी या आल्याच , आणि जिथ माणूस आहे तिथ तर सवयी या हमखास आल्याच .. आणि जिथे कुठे एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र राहतात ,मग ते घर असो वा हॉस्टेल असो ,तिथे एकेमेकांच्या सवयी सांभाळून न घेता आल्यानेच भांडणे ,वादविवाद होतात ..
             कुणाला उठल्या उठल्या चहा घ्यायची सवय ,तर कुणाला रोज-रोज आंघोळ न करायची सवय ,कुणाला पालथ झोपायची सवय तर कुणाला झोपताना गाणे ऐकायची सवय ,कुणाला बाथरूम मध्ये गाणे म्हणायची सवय तर कुणाला जेवताना टीव्ही पहायची सवय ,कुणाला भरपूर बोलायची सवय तर कुणाला शांत बसायची सवय ,कुणाला बसून अभ्यास करायची सवय तर कुणाला बाहेरच खायची सवय ,कुणाला कोड्यात बोलायची सवय तर कुणाला काहीपण फालतू बडबड करायची सवय .. अशा कित्येक सवयींच्या कित्येक मुलांसोबत राहायचा प्रसंग आला हॉस्टेल वर ,तेव्हा अस वाटायचं कि कसल्या या सवयी पोरांना ,ही पोर असल्या सवयी बदलत का नाहीत ?पण आत्ता विचार केल्यावर दिसते त्यातली मजा ..
                आपल्याला सवय लागते म्हणजे आपल्या काही ना काही भावना त्या सवयीमागे जडलेल्या असतात ,काहीतरी भूतकाळ ,कुठलीतरी व्यक्ती किंवा एखादी आठवण त्या सवयीमागे दडलेली असते .. माझा एक मित्र आहे त्याला एखाधी साधी गोष्ट पण फिरवून फिरवून सांगायची सवय आहे ,पण त्याच्या याच सवयीमुळे त्याचं बोलण मजेशीर होऊन तो अनोळखी व्यक्तींसोबत सुद्धा मिसळून जातो लगेच ,मग त्याच्या या सवयीला नावं ठेवण्यात काहीच अर्थ नाही ..
                   म्हणून एकत्र राहत असताना एकमेकांच्या सवयींकडे वेगळ्या दृष्टीने पहायची गरज आहे .. एकत्र राहण्याची खरी मजा आहे ती एकमेकांच्या सवयी समजून घेऊन त्यातली मजा लुटण्याची ,म्हणजे आपण जे एकत्र राहताना एकमेकांना सांभाळून घ्यावं लागतं अस म्हणतो ते खर पाहायला गेल तर एकमेकांच्या सवयींना सांभाळून घ्यायच असत .. एखाद्याला एखादी सवय आहे ,तर त्यातल्या चुका काढण्यापेक्षा त्या सवयी कडे मजेच्या नजरेने पाहिलं तर खरच ते एकत्र राहाण मजेशीर बनून जात हाच माझा अनुभव आहे आणि दुसर्यांच्या सवयींमधल उणदुण काढत बसलं कि होतात वादविवाद  ..
                  म्हणून सोबत राहणाऱ्यांच्या सवयींची मजा घ्या ,त्या सवयींकडे खेळकर नजरेने पाहिलं तर दिसून येईल त्या व्यक्तीच व्यक्तिमत्व ,या सवयीतूनच समोरच्याच मन पण जाणून घेत येईल आणि मन समजल्यावर माणूस समजायला किती वेळ लागतो ,नाही का … 
               
                                                                                                                       - सुधीर 
                                                                                                                        9561346672

Tuesday 25 March 2014

शब्द ...

             
               परवाचं एक गाणं सहज कानावर पडलं , एक नवीन मराठी चित्रपट येतोय "पोस्टकार्ड" त्या मधल आणि ते गाणं आहे "शब्दां"वर .. तसं नेहमी शब्दांनी गाणी तयार होतात  ,पण या शब्दांवरच यावेळेला गाणं लिहिल्यामुळे ते शब्दही खुश झाले असतील ..
              शब्द .. या जगात एखादी नवी गोष्ट निर्माण करू शकणारा निसर्ग आहे आणि त्यानंतर सजीव ,पण अजून एक जण आहे जो रोज नवनवीन काहीतरी निर्माण करत असतो ,तो म्हणजे शब्द .. या शब्दाची एक गोष्ट मला खूप खास वाटते ,कि हे शब्द अगदी क्षणात ,क्षणाचाही विलंब न लावता एखाद नवीन नात तयार करू शकतात आणि क्षणातच असलेल जुन नात तोडू पण शकतात .
              शाळा वा कॉलेज मध्ये भेटलेल्या कुणा एका अनोळखी मुलासोबत बोललेल तेच थोडे शब्द ,ज्यांनी निर्माण केल आयुष्यभराच न तुटणार मैत्रीच ते नात .. कुठल्यातरी वळणावर कुणालातरी केलेल्या मदतीमुळे त्यांच्याकडून मिळालेले ते आशीर्वादाचे शब्द ,हे स्वतःविषयी अभिमान निर्माण करून गेले .. तर कधी वाढदिवसादिवशी अचानक आलेल्या एखाद्या जुन्या मित्राच्या कॉल येतो आणि जेव्हा तो म्हणतो कि "कसा आहेस मित्र ,बर वाटल तुझाशी इतक्या दिवसांनी बोलून" तेव्हा मनामध्ये जो आनंद निर्माण झाला तो निराळाच होता .. समोरासमोर भेटलो नसतानासुद्धा फक्त फोनवरच्या बोलण्यान दूर कुठेतरी राहणार कुणीतरी आपलसं होऊन जात ,ती पण या शब्दांचीच कमाल नाही का .. 
               माझ्यासाठी हा शब्द म्हणजे एक सखा आहे ,जेव्हा कोणी नसत सोबत तेव्हा याच शब्दांची सोबत मिळते ,आणि मग याच्या सोबतीने लिहितो बरच काही मनातल .. कधी कधी वाटत कि हे शब्द नसते तर माझ्या आयुष्यात इतकी नाती तयारच झाली नसती ,ना मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देता आली असती … तेव्हा माझा कधीही साथ न सोडणारा सखा झाल्याबद्दल या शब्दांचे शतशः आभार ..
                        शब्दा शब्दा तुझी कमाल कसली
                        तुझ्यात सामावली नाती सगळी ,
                        तुझ्यामुळे हसलो तुझ्यामुळे रडलो
                        पण शेवटी तुझ्याच प्रेमात मी पडलो …
                     
                     
                                                                                                                           - सुधीर
                                                                                                                           

Saturday 22 March 2014

भेटशील कधी सांग मला ..

                           "तो" .. खर प्रेम आयुष्यात येण्याची वाट पाहत असलेला .. खर प्रेम करणारी "ती" आयुष्यात एक ना एक दिवस येणार यावर पक्का विश्वास असलेला "तो" .. आणि विश्वास ठेवा ,त्याच्यासाठी जगातला सर्वात मोठा इंतजार जर कुठला असेल तर तो हाच आहे , "ती" आयुष्यात येण्याची वाट पाहणे .. 
आणि या वाटेवरचा पहिला मुक्काम लागतो तो स्वप्नांचा .. स्वप्न ज्यात तो तिला पाहतो , भेटतो आणि अनुभवतो तिचं असण ..
         
           स्वप्नी येतेस तू
           भेटशील कधी सांग मला ..
           आणि भेटशील जेव्हा
           ओळखू तुला कसा ते सांग मला …

अस म्हणतात कि स्वप्नांमध्ये आपल्याला फक्त आपण पाहिलेले चेहरेच दिसतात ,त्याने तर तिला पहिलेच नाही .. तरीपण मनापासून तिची वाट पाहणाऱ्या "त्या"ला "ती" स्वप्नात न दिसूनही दिसते .. चेहरा दिसत नसला तरी "ती"च हसण दिसू लागत त्याला .. 
       
          पहिल्या वहिल्या भेटीत
          हसशील कशी ते सांग मला ..
          आणि तुझ्या त्या हसण्याने
          भूलवशील कधी ते सांग मला …

आणि मग ते स्वप्न बनून जाते "ती"च्या सौन्दर्याच वर्णन ,तिच्या डोळ्यात पहिल्यांदा पाहून अक्षरश त्याला लाज वाटते इतक प्रेम असत त्या डोळ्यांमध्ये .. आणि तिच्या ओठांकडे हा पाहतो तेव्हा कधी एकदा "ती" त्या ओठांनी त्याच नाव घेऊन बोलावते अस होत त्याला ,कारण कुणीतरी हक्कानं बोलावणारं आणि हाक मारणारं असावं हेच तर त्याला हव आहे .. 

        पाणीदार नयनांच्या नजरेने
        लाजवशील कधी सांग मला ..
        नाजूक ओठांच्या कळीने
        बोलावशील कधी सांग  मला  …


तिचा स्पर्श अनुभवायला आतुर आहे तो ,तिचा आवाज ऐकायला उत्सुक आहे तो आणि खर सांगायचं तर स्वप्नात ती आल्यामुळे ,जमिनीवर असूनही स्वर्गात आहे तो .. 

     कोमल अशा हातांच्या स्पर्शाने
     सुखावशील कधी सांग मला ..
     नाजूक अशा तुझ्या आवाजाने
     रिझवशील कधी ते सांग मला ...

तिच्या प्रेमात आकंठ बुडायला तयार आहे ,कुणीच केल नसेल एवढ प्रेम तिच्यावर करायला तयार आहे ,तिच्या मिठीमध्ये स्वतःला पूर्णपणे हरवून द्यायला तयार आहे .. फक्त "ती" भेटू दे ,प्रेम काय असत ते तिला दाखवायला "तो" तयार आहे ..  

     मखमली अशा तुझ्या मिठीत
     घेशील कधी सांग मला ..
     प्रेमाच्या तुझ्या रिमझिम पावसात
     भिजवशील कधी ते सांग मला …

पण स्वप्न सकाळ झाली कि तुटतच ,पण तो नाही तुटत ,कारण त्याला विश्वास आहे तिच्या येण्यावर ,म्हणुनतर स्वप्नातून जागा झाल्यावरसुद्धा तो तिची वाट पहायचं सोडत नाही .. आणि ती भेटल्यावर तिला ओळखू कसं ,याच उत्तर त्याला अजूनही मिळत नाही … 

      बस झाले आता स्वप्नात येणे
      आता भेटशील कधी सांग मला ..
      आणि भेटशील जेव्हा
      ओळखू तुला कसा ते सांग मला …

                                                                                                                      - सुधीर 

Friday 21 March 2014

आयुष्य ..

आयुष्य .. 
कधी समजणारं ,
कधी उमजणारं
कधी  नुकत्याच उमललेल्या  
फुलाच्या पाकळीसारखं आनंद देणारं ,
तर कधी क्षणातच न समजलेल 
न उलगडणार कोड बनून जाणारं हे आयुष्य .. 
आयुष्य हे एक कोडच असत ,
मनाला पडणाऱ्या अनेक प्रश्नाचं 
ते एक जाळच असत .. 
का होत ,कशासाठी होत 
या प्रश्नांना काहीच उत्तर नसत .. 
पण घडणार्या प्रत्येक घटनेत ,
काहीतरी रहस्य असत .. 
कधी वाटत मिळवीत सर्व प्रश्नांची उत्तर झटक्यात ,
पण हे सहजासहजी लाभणार भाग्य नसत .. 
आयुष्य संपत जात तरीपण 
ते शेवटपर्यंत एक कोडंच असत …  
उत्तरं मिळो अथवा न मिळो
आपण थांबायचं नसतं 
आयुष्य हे जगायचच असत .. 
आयुष्य 
कधी समजणारं तर 
कधी न उलगडणारं कोडंच असत ….  

                                                                                                                  - सुधीर 

Sunday 16 March 2014

आईच असते ...

आजच्या दिवशी काहीतरी छान लिहावं वाटत होत आणि मनात पाहिलं आली ती हि मी मागे कॉलेज मध्ये असताना लिहिलेली कविता .. हि कविता मी लिहिली माझ्या आयुष्यातल्या सर्वात अशा खास माणसासाठी .. माझ पाहिलं प्रेम तीच .. जगाने मला नेहमी नाकारलं असल तरी प्रत्येक वेळी ,प्रत्येक बाबतीत मला होकार देणारी तीच .. माझी आई ..

जीवनात मिळो कोणीही कधी
पण आई म्हणजे आईच असते ,
नाही तिला जगात तोड
अशी ती बेजोड मायेची ऊब असते ..…

मला एक जादूची छडी दिलीय देवाने जन्मापासून ,ती म्हणजे माझ्या आईचा मायेचा हात .. कधी अस्वस्थ झालो ,कधी संघर्ष करताना दमछाक झाली ,कधी वेगळ्या वाटेनी जायची भीती वाटली तेव्हा तेव्हा आईचा फक्त  डोक्यावरून हात फिरवण च काफी असायचं आणि आजही आहे .. 

वाटली भीती कधी कशाची
जवळ घेऊन बसणारी आईच असते ,
झोपेलेलो असताना गुपचूप येउन
डोक्यावरून हात फिरवणारी आईच असते ..…

लहानपणापासून खुपदा खेळताना ,मग तो मैदानावरचा खेळ असो वा हा आयुष्याचा निष्ठुर खेळ असो ,जखमी अनेकदा झालो , तेव्हा घरी आल्यावर मायेचा मलम लावणारी माझी आई आणि ती आहे म्हणुनच जखमांना भिउन थांबू वाटत नाही ,बस बेधडक पुढे जाव वाटत आणि आयुष्याचा प्रत्येक खेळ जिंकावस वाटत ..

खेळताना जर लागले कधी
मायेचा मलम लावणारी आईच असते ,
म्हणूनच नाही लागत कुठला वैद्य फकीर
जेव्हा माझ्या जवळ माझी आई असते ..…

कधी चुकीच वागलो तर आईपण खूप रागावते ,डोळ्यात पाणी येईपर्यंत रागावते .पण त्याच रात्री जेवताना जवळ घेऊन प्रेमान घास हि आईच भरवते ,मायेच्या भाषेत समजूत आईच काढते .कित्येकदा तिच्या मनासारखं नाही वागत मी ,तरीपण माझ सर्व काही वागण तिच्या हृदयात सामावून घेणारी माझी आई ..

कितीही रागावली असेल कधी
प्रेमाचा घास भरवणारी आईच असते ,
हजार नखरे माझे सहन करून ते
हृदयात सामावून घेणारी आईच असते ….

घरात वडिलांच्या रागावण्यापासून ते भावंडांच्या भांडणापर्यंत ,मध्ये पडून मला वाचवणारी आणि प्रेमाखातर माझी बाजू घेणारी माझी आईच असते .इथे एक कमाल दिसून येते ,मला रागावणारे वडिलपण माझ्या चांगल्यासाठीच रागावतात आणि माझी आईपण चांगल्या भावनेनेच माझी बाजू घेते ,हा आई-वडिलांचा अजब खेळ माझ्या तर समजण्यापलीकडचा आहे .. 

कितीही रागावले पप्पा जरी
माझी बाजू घेणारी आईच असते ,
पप्पांचही प्रेम असत माझ्यावर तरी
त्यांना मला रागावू न देणारी आईच असते ….

मात्र  'अभ्यास' या बाबतीत ,आई म्हणजे माझे वडीलच होऊन जाते ,नाही केला तर रागावून बसवते ,आणि केला तर ती मनातून तर खूप खुश होते ,पण ते चेहऱ्यावर न दाखवता ,'अजून कर' अस म्हणून यशाने हुरळून न जाण्याचा आयुष्यातला एक अद्भुत पाठ आईच शिकवून जाते  .. 

अभ्यास नाही केला कधी
रागावून बसवणारी आईच असते ,
तर कधी मनातल कौतुक लपवून
माझे दुसरे वडील होणारी आईच असते …

शाळेनंतरचा खुप काळ मी परगावी शिकण्यात घालवला आणि तेव्हा खर कळली आईच्या हाताच्या त्या जेवणाची किंमत ,आई जवळ असण्याची किंमत .परंतु माझ्या दूर राहण्याने त्या माउलीच्या मनाची काय अवस्था होत असेल ,हा विचार करूनच कसतरी वाटत .. 

दूर जाता मी घरापासून
खूप रडणारी आईच असते ,
परत येता कधी घरी
मिठीत घेणारी आईच असते ….

बाहेरगावी असताना जेव्हा कधी आईचा फोन यायचा तेव्हा पाहिलं प्रश्न ती विचारायची 'जेवलास का ?'
,अर्थात तिलापण हे माहित असायचं कि मी जेवाणारच आहे ,स्वतःची एवढी काळजी तर प्रत्येकजण घेतोच ,तरीपण ती रोज हा प्रश्न विचारायची कारण त्यामागे दडलय तीच ते प्रेम ,जे ती शब्दात नाही सांगू शकत ,म्हणून ती अशा प्रश्नांमधून ते दाखवते .. 

प्रेम करणारे तर अनेक असतात
खर प्रेम करणारी आईच असते ,
प्रेम दाखवणारे तर खूप बोलतात
पण शब्दाविना प्रेम करणारी आईच असते ….

म्हणूनच ,
विचारू नका मला कि
आई म्हणजे काय असते ,
सर्व प्रश्नांना एकाच उत्तर कि
आई म्हणजे आईच असते ……

                                                                                                          - सुधीर