Thursday, 6 December 2018

हि पाऊलवाट ..हि पाऊलवाट .. 
तुझ्या आणि माझ्या आयुष्याची हि पाऊलवाट .. 
अनेक वळणावळणांमधून ,कधी वेड्यावाकड्या तर कधी सरळ अशा या वाटेवर सुरु असलेला आपला हा आत्तापर्यंतचा स्वतंत्र असा हा प्रवास ,हि आपली पाऊलवाट ,आता यापुढे एक होईल .. 
आत्तापर्यंत या वाटेवर चालताना उमटत जाणाऱ्या माझ्या एकाकी अशा या पाऊलखुणांना ,यापुढे कायमची साथ मिळेल ती तुझ्या उमटणाऱ्या पाऊलखुणांची ..
आत्तापर्यंतचा हा आपला प्रवास ,हि आपली पाऊलवाट वेगळी अशी होती .. 
तुझा प्रवास तुझ्या वाटेवरती आणि माझा प्रवास माझ्या वाटेवरती सुरु होता ..
या वाटेवर चालताना ,
कधी सुखाच्या शीतल थंडगार अशा सावलीतून चालावं लागलं तर कधी चालता चालता भेटला तो दुःखाचा गडद असा भयाण अंधार .. 
कधी अक्षरशः अस्तित्व हादरवून टाकणार असं एखाद भयानक वळण लागलं तर कधी या मनाला आनंदाच्या चिंब पावसात भिजवून टाकणारं असं वातावरण दिसलं .. 
असंख्य झाडांनी ,असंख्य फुलांनी या प्रवासात आपली साथ दिली ,काही त्या-त्या वेळेला साथ देऊन नंतर वेगळ्या वाटेने निघून गेले तर काही वाटसरू अजुनसुद्धा आपल्यासोबत या वाटेवरचे वाटसरू बनून साथ देत आहेत .. 
या वाटेवर लागणाऱ्या प्रत्येक वळणावर ,तुला आणि मला घ्यावा लागला तो एक निर्णय ,तो हा कि पुढे नेमकं कोणत्या दिशेने जायचं .. 
निर्णय घेताना कधी-कधी पाऊल डगमगल सुद्धा ,कारण प्रत्येक वळण आयुष्याला कुठेतरी घेऊन जाणारं होत हे माहीत होत ,आणि मग भीतीसुद्धा वाटायची ,चुकीचा निर्णय घेऊन चुकीच्या वळणाने गेलो तर ... 
ते निर्णय कधी कधी बरोबर निघाले तर कधी ते साफ चुकलेसुद्धा .. 
पण खरं तर ,बरोबर असो वा चूक ,पण आपण घेतलेल्या त्याच वळणांमुळे ,त्याच निर्णयांमुळे कदाचित आपली हि वेगळी-वेगळी चालणारी पाऊलवाट ,पुढे जाऊन एका सुंदर अशा क्षणी ,एका नकळत अशा वळणावर येऊन एक झाली .. 
आणि म्हणूनच त्या प्रत्येक झाडाला ,प्रत्येक फुलाला ,प्रत्येक उजेडाला आणि प्रत्येक अंधाराला ,प्रत्येक पावसाला आणि अशा त्या प्रत्येक छोट्या-मोठ्या अशा वळणांना ,ज्यांनी आपली हि पाऊलवाट एक करायला ,आपल्याला एक व्हायला कळत-नकळत मदतच केली ,त्या सर्वांना मनापासून धन्यवाद .. 
आणि या पाऊलवाटेवर आपल्या पुढच्या प्रवासासाठी तुला-मला खूप प्रेमळ अशा शुभेच्छा ..                                                                       - सुधीर 

No comments:

Post a Comment