Sunday 22 May 2016

ते उत्तर ..

                 
                 
डोळ्यात आलेलं थोडस पाणी ,नजर समोर कशावरती तरी स्थिरावलेली ,थोडासा गंभीर असा चेहरा घेऊन मी त्या पुलाच्या कठड्यावर हात टेकवून ऊभा होतो .. 
                  संध्याकाळची वेळ असल्यामुळे पुलावर तशी गर्दी होती .. अनेक जोडपे ,काही आजी आजोबांसोबत आलेली लहान मुले ,कुठे मुलांचे घोळके तर कुठे गप्पा मारणाऱ्या मैत्रिणींचा ग्रुप .. तिथे असा सर्व गर्दीचा किलबिलाट असूनसुद्धा मला कोणाचाच आवाज ऐकू येत नव्हता ,फक्त जाणवत होता तो कानाला स्पर्शून जाणाऱ्या त्या वाऱ्याचा आवाज .. थंडगार वाहणारी हवा माझ्या चेहऱ्याला येउन धडकत होती ,आणि माझे पाणावलेले उघडे डोळे हे जणू त्या वाऱ्यासोबत लढत होते ,आणि वारंवार जखमी होत होते ;त्या जखमेच्या वेदनेची जाणीव होऊन ते पुन्हा पाणावले जात होते .. 
                डोळ्यात एकच प्रश्न होता "माझ्याच सोबत असं का झालं ? मी असं काय केल होत कि माझ्यासोबत हे घडावं ,का माझ्यासोबतच का ? ".. 
                 हा प्रश्न सुरुवातीला मी वरती आकाशाकडे पाहून त्या देवाला विचारला ,नंतर डोळे झाकून स्वतःला विचारला तरी नाही मिळाल काही उत्तर ..मग त्या वाहणाऱ्या वाऱ्याला ,त्या पुलाखालून संथपणे वाहणाऱ्या नदीला सुद्धा विचाराला मी हा प्रश्न .. कोणीतरी उत्तर देईल ,कुठूनतरी मला उत्तर मिळेल म्हणून माझे डोळे हा प्रश्न विचारतच राहिले पण उत्तर नाही मिळाल कुठूनच .. 
                   तेवढ्यात तिथे मला एक लहानस बाळ त्याच्या आजोबांसोबत आलेलं दिसलं .. पुलावर येताच ,आजोबांनी त्याला खाली सोडलं आणि त्याच्या पायात आवाज करणारे छोटेशे बूट घालून दिले .. लगेच ते बाळ त्याच्या इवल्याशा पावलांनी चालायला लागल .. नुकतच चालायला शिकलेलं ते बाळ हळू-हळू एकेक पाऊल पुढ टाकत चालत होत ,आणि प्रत्येक पावलागणिक तोंडातले ते मोजूनमापून असेलेले दोन-तीन दात दाखवायचं आणि खूप गोड हसायचं .. प्रत्येक पाऊल पुढ टाकताच अगदी जग जिंकून घेतल्याचा आनंद दिसायचा त्याच्या चेहऱ्यावर .. थोड चालल्यावर त्याने पाऊल टाकायचा वेग वाढवला तसं ते बाळ तोल जाऊन धपकन खाली पडल .. त्याच्या मागून चालणाऱ्या त्याच्या आजोबांनी त्याला लगेच उचलल आणि कडेवर घेतलं .. ते गोड बाळ एवढस तोंड करून रडायला लागल ,तेव्हा आजोबांनी त्याचे थोडेसे लाड केले आणि त्याला शांत केल .. 
                शांत होताच त्या आजोबांनी त्या बाळाला परत कडेवरून खाली उतरवल आणि जमिनीवर उभ केल .. लगेच पुन्हा हसत-हसत ते बाळ त्याच्या त्या इवल्याशा पावलांनी हळू-हळू चालायला लागलं ,आणि हसायला लागल ..     
              तेव्हा मला जाणवलं कि ,आपल्या आयुष्याचं सुद्धा असच असत नाही का ,चालता-चालता अचानक ठेच लागते ,थोडस रक्तही येत आणि त्याच्या सोबत थोडीशी वेदना थोडस दुखःही येत ; तरीपण थोडासा वेळ घेऊन आपणच स्वतःला सावरायचं असतं आणि पुन्हा हसत-हसत पुढच्या प्रवासाला चालायला लागायचं असतं .. 
           त्या लहान बाळाने नाही विचारलं कोणालाच की तोच का पडला म्हणून .. तो पडला , त्याला लागलं म्हणून तो थोडस रडला आणि रडून झाल्यावर पुन्हा झाल ते विसरून तो मस्तपैकी पुन्हा चालायला लागला .. ते खाली पडण ,ते रडण तेव्हाच मागे सोडून तो पुढच्या रस्त्याकडे पाहत हसत-खेळत निघाला .. 
                 तेव्हा मला कळालं कि ,हा आयुष्याचा प्रवास असाच चालू ठेवायचा असतो .. काही वाईट अस घडल ,कोणीतरी मनाला दुखावलं ,खुप त्रास होईल अस काही जरी घडल तरीसुद्धा 'माझ्यासोबतच अस का झाल' हे न विचारता ,आहे ते सत्य स्वीकारून बसं पुढे चालत राहायचं ,बस पुढे चालत राहायचं 
                    हेच आहे खर आणि हेच आहे एकमेव उत्तर ....... 



                                                                                                          - सुधीर 



Saturday 7 May 2016

हे खोट-खोट रुसण ..


रुसण  .. 
खोट-खोट ,जाणून बुजून ती माझ्यावर किंवा मी तिच्यावर रुसलो कि मला खूप आवडत .. कारण या रुसण्यापेक्षा जास्त गंमत रुसलेल्याला मनवण्यात असते ,आणि ते करताना जो खेळ आमच्यात चालतो ना त्यातली मजा ,त्यातलं प्रेमच निराळ असत ..
प्रत्येक वेळी ती माझ्यावर रुसली कि मग मला तिला मनवण्यासाठी काहीतरी करावच लागत ,एक वेगळी शक्कल लढवावी लागते .. मग ते काहीतरी जोक ऐकवून किंवा काहीतरी माकडचाळे करून तिला हसवायचा प्रयत्न करणे असो किंवा तिच्या मागे मागे फिरत सॉरी म्हणण असो किंवा तिच्या आवडीची एखादी गोष्ट आणून देण असो किंवा अशा अनेक गोष्टी .. 
पण यावेळेस मीच तिच्यावर रुसलोय .. खर सांगायचं तर एक वेगळीच अनामिक भीती मनात येत आहे ,कि मी खोट-खोट तिच्यावर रुसलोय खर पण ती मला मनवायला येईल का ?
का माझ मलाच हे माझ रुसण मनातल्या मनात दडवून टाकावं लागेल ?
खरच ,तिने याव आणि तिच्या खऱ्याखुऱ्या मनवण्याने माझ्या या खोट्या खोट्या रूसण्यावर पांघरूण टाकावं अस वाटत आहे .. 
तसं म्हणायला म्हणून 
खोट-खोट रुसलोय मी खरा 
पण रुसलेल्या मला 
मनवायला ती येईल का .... 
हसत हसत का होईना 
पण 'सॉरी रे' अस 
एकदातरी ती म्हणेल का .... 
माझा हा असा 
रुसलेला फुगलेला चेहरा पाहून 
गालातल्या गालात 
एकदातरी ती हसेल का ….  
तसं खोट-खोट रुसलोय मी खरा 
पण रुसलेल्या मला 
मनवायला ती येईल का .... 
रुसलेल्या मला 
मनवायला ती येईल का .... 

पण ती नाही आली ,आणि ती येणार तरी कशी .. ती त्या तिकडे आकाशात आणि मी इकडे जमिनीवर आहे ,आणि खरंच हे खूप जास्त अंतर आहे आमच्यामध्ये .. कितीही चाललो तरी हे अंतर नाही संपवू शकत मी .. 
आत्ता इथे खिडकीतून त्या आकाशातल्या चांदण्यांकडे पाहत ,मी फक्त वाट पाहू शकतो कि कधीतरी मनवायला येशील तू ,हे जगण्या-मरण्याचे बंध तोडून कधीतरी येशील .. खोट-खोट रुसलेल्या मला मनवायला ….  


                                                                                            - सुधीर