थंड हवेची आली ती झुळूक
आणि अंगावर शहारा देऊन गेली
तो हिवाळा आला नजदीक
त्याची ही जणू चाहूल देऊन गेली …
आज कुणीतरी मला म्हटलं कि मला हिवाळा खूप आवडतो .. त्याच क्षणी जाणवलं कि अरे हिवाळा तर आता जवळ आला .. मला मनापासून आवडणारा हिवाळा , पण का आवडतो मला हा हिवाळा ,हिवाळ्यातली ती थंड हवेची झुळूक का हवीहवीशी वाटते ते मात्र माहित नव्हत .. तेव्हा लगेच उठून खिडकीमध्ये जाऊन थांबलो ,आणि काही क्षणातच एक थंड हवेची झुळूक अंगाला स्पर्शून गेली .. आणि नकळत अंगावर एक शहारा येउन गेला ,आयुष्यात कोणाच्यातरी आगमनाची चाहूल देऊन गेला ..
..
- सुधीर
हिवाळा .. हवाहवासा वाटणारा हा हिवाळा .. पावसाळ्यातले थेंब ते उन्हाळ्यातला तो कोरडेपणा ,या दोन्ही विरुद्ध टोकांच्या मध्ये येतो हा दिलासा देणारा ,मायेची उब घेऊन येणारा हिवाळा .. रस्त्यावरची गरमा-गरम भजी असू द्या किंवा रत्यावर उभ राहून गरमा-गरम भाजलेलं कणीस खाण असू द्या वा घरी आईच्या हातचा गरमा-गरम पराठा असू द्या ,या सर्वांची मजा हा हिवाळा देतो ..
..
बाल्कनी मध्ये जाऊन हातामध्ये गरमा-गरम कॉफी घेऊन थांबलो असताना ,समोर दिसते ते मोकळे साफ निरभ्र आकाश ,ज्यात मधेच एखादा पांढरा ढग येउन माझ्याकडे पाहून निघून जातो ,जणू तो पण या हिवाळ्यातल्या थंडीने गारठून जाऊन पांढरा पडला असावा अस वाटत .. त्या मोकळ्या आकाशाकडे पाहताना मधूनच अंगाला स्पर्शून जाते एक थंड-थंड हवेची झुळूक .. आणि तिचा स्पर्श होताच अंगावर उभे राहतात शहारे ,जे त्या गरमा-गरम कॉफी ची मजा आणखीनच वाढवून जातात ...
..
दुपारची असो वा रात्रीची असो ,हिवाळ्यातल्या झोपेची तर गोष्टच न्यारी .. थंडी वाजतेय म्हणून अजून थोडा वेळ म्हणत म्हणत खूप वेळ अंथरुणातून बाहेर न पडण्याचा यापेक्षा चांगला बहाणा तर कुठे सापडणारच नाही .. आणि अंथरुणाच्या आतल वातावरण तर विचारूच नका .. जणू बाहेरच्या हिवाळ्यामध्ये आपण आपलच एक उबदार अस जग तयार करतो अंथरुणात ,ज्यात असते थोडी गरम ,थोडी हवीहवीशी वाटणारी ऊब .. लाडक्या उशीवर डोक ठेऊन ,डोळे झाकून ,बाहेरच्या जगाची सर्व चिंता विसरून मस्तपणे झोप घ्यायला लावणारा असा हा माझा आवडता हिवाळा ..
..
जे प्रेमात असतात त्यांच्यासाठी तर हा हिवाळा म्हणजे जणू सुखाचे दार .. गुलाबी थंडी मध्ये प्रेयसी सोबत हातात हात घालून फिरण्याचा आनंद ,हा त्यांनाच विचारावा .. आणि जर ती दूर कुठेतरी असेल तर अंगावर येणारी प्रत्येक थंड हवेची झुळूक तिची आठवण आणून ती जवळच कुठेतरी आहे असा भास आणतेच आणते .. थंडी वाजतेय म्हणून स्वेटर ची होणारी देवाण-घेवाण असो वा हाताचे दोन्ही तळवे घासून गरम झालेले ते तळवे तिच्या गालावर ठेवून तिला तात्पुरता का होईना ,उबदार प्रेमाचा असा स्पर्श जाणवून देणे ,हे सर्व माझ्या लाडक्या हिवाळ्यामुळेच तर घडते ..
..
कडाक्याची थंडी पडलेली असताना सुद्धा ,मजा म्हणून मुद्दाम थंडगार असे कोल्ड्रिंक्स पिणे किंवा कुठे मिळाला तर रंगबेरंगी बर्फाचा गोळा खाणे ,यातली मजा मी काय सांगू तुम्हाला .. या साहसाचा आणखीन एक फायदा होतो ,तो असा कि थंडगार कोल्ड्रिंक पिउन जेव्हा नंतर सर्दी होते ,डोक थोडस दुखायला लागत तेव्हा "आई ,मला बर वाटत नाहीये ग " अस म्हणत आईच्या हातून लाड करवून घ्यायची ती नामी संधी हातून न गमावलेलीच बरी .. मग काय ,जागेवर बसून गरमा-गरम पदार्थांवर ताव मारायचा आणि काही दिवस 'लेकरू आजारी आहे' म्हणून आई करते ते सर्व लाड करून घेत राहायचं ..
..
कदाचित म्हणूनच मला आणि तुम्हालापण हा हिवाळा इतका आवडतो ,इतका हवाहवासा वाटतो .. तेव्हा या येणाऱ्या हिवाळ्यात ,सर्व चिंता सर्व काही विसरून बस त्या थंड हवेच्या लहरींच स्वागत करा आणि मस्त साजरा करा आनंदाचा हा हिवाळा ….
- सुधीर
आपल्या ब्लॉग वरील वाचकसंख्या वाढविण्याकरिता आपला ब्लॉग 'मराठी ब्लॉग लिस्ट' या साईटवर जोडा.
ReplyDeleteलिंक- http://marathibloglist.blogspot.in/
मस्त वर्णन....माझा पण तसा आवड़ताच रुतु आणि ह्याच थंडीत मिळणारी थोड़ी थोड़ी करत जानारी साखरझोप...सार्यांची अनुभति वाचायला मिळाली तुझ्या ह्या पोस्ट मधून
ReplyDelete