Sunday 16 March 2014

आईच असते ...

आजच्या दिवशी काहीतरी छान लिहावं वाटत होत आणि मनात पाहिलं आली ती हि मी मागे कॉलेज मध्ये असताना लिहिलेली कविता .. हि कविता मी लिहिली माझ्या आयुष्यातल्या सर्वात अशा खास माणसासाठी .. माझ पाहिलं प्रेम तीच .. जगाने मला नेहमी नाकारलं असल तरी प्रत्येक वेळी ,प्रत्येक बाबतीत मला होकार देणारी तीच .. माझी आई ..

जीवनात मिळो कोणीही कधी
पण आई म्हणजे आईच असते ,
नाही तिला जगात तोड
अशी ती बेजोड मायेची ऊब असते ..…

मला एक जादूची छडी दिलीय देवाने जन्मापासून ,ती म्हणजे माझ्या आईचा मायेचा हात .. कधी अस्वस्थ झालो ,कधी संघर्ष करताना दमछाक झाली ,कधी वेगळ्या वाटेनी जायची भीती वाटली तेव्हा तेव्हा आईचा फक्त  डोक्यावरून हात फिरवण च काफी असायचं आणि आजही आहे .. 

वाटली भीती कधी कशाची
जवळ घेऊन बसणारी आईच असते ,
झोपेलेलो असताना गुपचूप येउन
डोक्यावरून हात फिरवणारी आईच असते ..…

लहानपणापासून खुपदा खेळताना ,मग तो मैदानावरचा खेळ असो वा हा आयुष्याचा निष्ठुर खेळ असो ,जखमी अनेकदा झालो , तेव्हा घरी आल्यावर मायेचा मलम लावणारी माझी आई आणि ती आहे म्हणुनच जखमांना भिउन थांबू वाटत नाही ,बस बेधडक पुढे जाव वाटत आणि आयुष्याचा प्रत्येक खेळ जिंकावस वाटत ..

खेळताना जर लागले कधी
मायेचा मलम लावणारी आईच असते ,
म्हणूनच नाही लागत कुठला वैद्य फकीर
जेव्हा माझ्या जवळ माझी आई असते ..…

कधी चुकीच वागलो तर आईपण खूप रागावते ,डोळ्यात पाणी येईपर्यंत रागावते .पण त्याच रात्री जेवताना जवळ घेऊन प्रेमान घास हि आईच भरवते ,मायेच्या भाषेत समजूत आईच काढते .कित्येकदा तिच्या मनासारखं नाही वागत मी ,तरीपण माझ सर्व काही वागण तिच्या हृदयात सामावून घेणारी माझी आई ..

कितीही रागावली असेल कधी
प्रेमाचा घास भरवणारी आईच असते ,
हजार नखरे माझे सहन करून ते
हृदयात सामावून घेणारी आईच असते ….

घरात वडिलांच्या रागावण्यापासून ते भावंडांच्या भांडणापर्यंत ,मध्ये पडून मला वाचवणारी आणि प्रेमाखातर माझी बाजू घेणारी माझी आईच असते .इथे एक कमाल दिसून येते ,मला रागावणारे वडिलपण माझ्या चांगल्यासाठीच रागावतात आणि माझी आईपण चांगल्या भावनेनेच माझी बाजू घेते ,हा आई-वडिलांचा अजब खेळ माझ्या तर समजण्यापलीकडचा आहे .. 

कितीही रागावले पप्पा जरी
माझी बाजू घेणारी आईच असते ,
पप्पांचही प्रेम असत माझ्यावर तरी
त्यांना मला रागावू न देणारी आईच असते ….

मात्र  'अभ्यास' या बाबतीत ,आई म्हणजे माझे वडीलच होऊन जाते ,नाही केला तर रागावून बसवते ,आणि केला तर ती मनातून तर खूप खुश होते ,पण ते चेहऱ्यावर न दाखवता ,'अजून कर' अस म्हणून यशाने हुरळून न जाण्याचा आयुष्यातला एक अद्भुत पाठ आईच शिकवून जाते  .. 

अभ्यास नाही केला कधी
रागावून बसवणारी आईच असते ,
तर कधी मनातल कौतुक लपवून
माझे दुसरे वडील होणारी आईच असते …

शाळेनंतरचा खुप काळ मी परगावी शिकण्यात घालवला आणि तेव्हा खर कळली आईच्या हाताच्या त्या जेवणाची किंमत ,आई जवळ असण्याची किंमत .परंतु माझ्या दूर राहण्याने त्या माउलीच्या मनाची काय अवस्था होत असेल ,हा विचार करूनच कसतरी वाटत .. 

दूर जाता मी घरापासून
खूप रडणारी आईच असते ,
परत येता कधी घरी
मिठीत घेणारी आईच असते ….

बाहेरगावी असताना जेव्हा कधी आईचा फोन यायचा तेव्हा पाहिलं प्रश्न ती विचारायची 'जेवलास का ?'
,अर्थात तिलापण हे माहित असायचं कि मी जेवाणारच आहे ,स्वतःची एवढी काळजी तर प्रत्येकजण घेतोच ,तरीपण ती रोज हा प्रश्न विचारायची कारण त्यामागे दडलय तीच ते प्रेम ,जे ती शब्दात नाही सांगू शकत ,म्हणून ती अशा प्रश्नांमधून ते दाखवते .. 

प्रेम करणारे तर अनेक असतात
खर प्रेम करणारी आईच असते ,
प्रेम दाखवणारे तर खूप बोलतात
पण शब्दाविना प्रेम करणारी आईच असते ….

म्हणूनच ,
विचारू नका मला कि
आई म्हणजे काय असते ,
सर्व प्रश्नांना एकाच उत्तर कि
आई म्हणजे आईच असते ……

                                                                                                          - सुधीर 

No comments:

Post a Comment