Thursday 8 December 2016

एका प्रेमाची गोष्ट ..


ती "आज तू एवढा शांत शांत का आहेस ? काही झालंय का ?"
तो "तुला एक सांगू का ?"
ती "सांग ना ,त्यात विचारायचं काय "
तो "मला आजकाल भीती वाटते खूप तुझ्यासोबत बोलायची ."
     "कारण ,जेव्हा तुझ्याशी बोलतो ना तेव्हा असं कधीच होत नाही कि माझ्या मनात काहीतरी वेगळे विचार सुरु आहेत ,आणि फक्त माझे ओठ हालत आहेत ,किंवा काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलत असतो असं सुद्धा नाही .. खरं तर तुझ्याशी बोलताना मी नसतोच बोलत ,बोलत असत ते माझं मन .. आणि हे मन इतक्या आवेगानं ,इतक्या इच्छाशक्तीनं सर्व मनातले शब्द ,सर्व भावना बाहेर पाठवत असत कि या ओठांनाही शक्य होत नाही त्यांना थांबवणं ."
    "आणि मी या आधी कोणासमोरही जेव्हा जेव्हा माझं मन असं मोकळं तेव्हा तेव्हा समोरच्या व्यक्तीने या मनाची किंमत नाही केली .. म्हणून भीती वाटते तुझ्यासमोर मन मोकळं करायची ."
त्याच हे बोलणं ऐकून ती फक्त हलकंसं गालातल्या गालात हसली .काही क्षण ते दोघेही काहीच न बोलता फक्त समोरचा तो मावळणारा सूर्य पाहत उभे राहिले .. काही वेळाने तिने त्याचा हात हातात घेतला ,आणि पुन्हा ती त्या सूर्याकडे ,त्याच्या बदलत जाणाऱ्या मावळतीच्या रंगाकडे पाहत तशीच उभी राहिली ..
त्याला जाणवलं कि तिने त्याचा हात खूप घट्ट पकडून ठेवला आहे .. तिला काय म्हणायचंय हे त्याला समजलं .. आणि याच निःशब्द शांततेत ,समोर क्षणाक्षणाला मावळत जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने एक प्रेमाची ,एका विश्वासाची गोष्ट कदाचित सुरु झाली .... 



                                                                                              - सुधीर


Sunday 25 September 2016

तेव्हा आणि तिथूनच ...



                   हो ,जेव्हा कोणीतरी एकदम जवळच असं दूर जातं ,तेव्हा मनाला त्रास तर होतोच .. पण खरं तर यांच्यानंतरच इतके दिवस समोर असूनही दिसत नसलेलं असं ते सत्य आपल्याला दिसायला लागत .. सत्य स्वतःबद्दलच .. आणि तिथूनच खरी सुरुवात होते शोधाची .. शोध सुरु होतो स्वतःचा .. म्हणूनच असं म्हणता येईल की ,गवसल्यानंतर कोणीतरी हरवलं जरी तरी त्या हरवण्यातूनसुद्धा काहीतरी गवसतंच ,नाही का  ...  
जेव्हा आयुष्यातून कुणीतरी 
एकदम जवळचं हरवत ना ,
तेव्हा आणि तिथूनच 
स्वतःचा खरा शोध सुरु होतो ... 

                                                                                                                                 - सुधीर

Sunday 18 September 2016

कधीच नाही ...


नाही .. 
मी नाही विचारलं तिला .. कारण इच्छाच झाली नाही विचारायची .. 
मी नाही विचारलं तिला तिचं पूर्ण नाव .. कारण पूर्ण नाव म्हटलं कि आडनाव सुद्धा त्यात आलंच .. आणि मला खरंच नाही जाणून घ्यायचं तीच आडनावं .. 
कारण आडनाव म्हटलं कि त्यात लपून-छपून 'जात' सुद्धा येतेच ,आणि या जातींच्या भेदभावानेच मला आत्तापर्यँत खूपदा दुखावलं आहे .. 
मी अगदी जीवापाड प्रेम केलं अशा लोकांना सुद्धा दूर केलं आहे या जातींनी  .. 
आणि म्हणूनच , यापुढेही कधीच विचारणार नाही मी तिला तीच पूर्ण नाव .. कधीच नाही ... 
               
                                                                   
                                                                                           - सुधीर  


Tuesday 13 September 2016

सोप्प होत ...


सोप्प होत तुझं उत्तर 
बस ,माझा प्रश्नच जरा अवघड होता 
तरीपण 
बदलावं तुझं उत्तर यासाठी 
      माझा जीव का अडकला होता ...... 
           
                                                                                                                             - सुधीर


Saturday 3 September 2016

कोणी आणि कोणीतरी ...

कोणी आणि कोणीतरी यांच्यातलं संभाषण फार मजेशीर होतं  .. 
कोणी कोणालातरी म्हणाले कि आजकाल कोणीही कोणालाच काहीही बोलायच्या किंवा सांगायच्या फंदात पडू नये .. कारण कोणाच्या कोणत्या बोलण्याचा कोण काय कसा आणि कोणता अर्थ काढेल हे कोणालाच सांगता येत नाही .. 
तेव्हा उत्तरादाखल ते कोणीतरीसुद्धा हेच म्हणाले कि कोणी कोणाच्याही बोलण्याचा काय आणि कोणता तो योग्य असा अर्थ काढेल हे कौशल्य कोणाकोणालाच जमत ,तेव्हा कोणाच्यातरी बोलण्याचा योग्य असा अर्थ काढू शकेल ,असे कोणीतरी भेटत नाही तोपर्यंत कोणीही कोणाचेही नाही असेच समजावे आणि म्हणूनच कोणीही कोणासही काहीही न बोललेले बरे ... 

                                                                                  - सुधीर


Friday 26 August 2016

हसणं ..

कधी गालातल्या गालात 
तर कधी मोकळेपणानं 
असं तुझं ते गोड हसणं
आणि ते हसणं पाहून 
माझ्या मनाचं सारखं सारखं फसण ...


असं हे हसणं .. आणि माझं त्या हसण्यात फसण .. 
पण खरच कमाल असते ना या हसण्याची .. नातं निर्माण करायची आणि तेवढ्याच ताकदीने ते नष्ट करायची जादू या 'हसणं' नावाच्या गोष्टी मध्ये असते .. दोघांच्या हसण्याची लय जुळली कि तिथे जुळतो मैत्रीचा एक धागा दुसऱ्या धाग्याला .. आणि जेव्हा कोणाचंतरी गोड असं ते हसणं अगदी मनापासून आवडायला लागत ना तेव्हा सुरुवात होते एका नाजूक अशा प्रेमाच्या नात्याला .. तर दुसरीकडे जेव्हा कोणी कोणावर तरी हसतं तेव्हा मात्र ग्रहण लागत त्या नात्याला .. म्हणजेच काय तर कोणीतरी कोणावर हसलं म्हणून नाती तुटतात सुध्दा ,आणि कोणालातरी कोणाचतरी हसणं आवडलं म्हणून नाती जुळतात सुद्धा ..

सर्वांचं हसणं तसं पहायला गेलं तर असत वेगळं .. कुणाचं हसणं असतं एकदम गोडं ,तर कुणी एकदम मोकळेपणानं हसतं .. कोणाचं हसणं असत थोडं लाजरं ,अगदी गुपचूप .. तर कोणी हसत अगदी बिनदास्त ,सगळ्या जगाला ऐकू जावं अशा आवाजात .. कोणी कोणी हसताना अक्षरशः सर्व दात दाखवतात ,तर काहीजण फक्त समोरच्याला दातांच्या मुख दर्शनाचा लाभ देतात .. कोणी हसताना सर्व अंग गदागदा हलवून हसत तर कोणी हसताना गालावर एक छान अशी खळी पाडून शोभतं .. हसण्याच्या अशा वेगवेगळ्या तऱ्हा .. तरी एक गोष्ट मात्र नक्की .. हसणं हे नेहमी सुंदरच असत ,फक्त ते मनापासून असायला हवं .. 
                     माझ्या मते तर या जगातली कोणतीही व्यक्ती जेव्हा अगदी मनमोकळेपणानं ,अगदी मनापासून हसते ना त्या वेळेला ,त्या क्षणी ती जगातली सर्वात सुंदर व्यक्ती दिसत असते .. मग ते अजूनही दात न आलेल्या लहानशा इवल्याशा बाळाचं हसणं असो किंवा वय आणि दात दोन्ही निघून गेलेल्या जख्खडं म्हाताऱ्याचं हसणं असो .. 

पण या हसण्याला आपण भीतीच आवरण घालून आजकाल खोटं खोटं हसत आहोत .. कोणीतरी माझ्याकडे पाहून हसेल या भीतीने आपण खरं तर मोकळेपणानं हसण्याच्या या गंमतीपासून दूर जातोय .. माहित नसलेल्या भविष्याची चिंता ,सोबतच्या लोकांचं चुकीचं वागणं ,यशापयश मिळवताना आलेली प्रतिकूल परिस्थिती या असल्या गोष्टी कुठेतरी तुमचं ते हक्काचं हसणं तुमच्यापासून हिरावून घेतायेत ,किंबहुना तुम्ही त्या हिरावून घेऊ देताय .. तेव्हा सर्व भीती सर्व चिंता सोडून फक्त मनमोकळं हसा ,अगदी मनापासून हसा .. मनापासून हसणाऱ्यांना पावलोपावली आनंद देणाऱ्या गोष्टी दिसतील ,पण जर या हसण्यालाच जर भिऊन राहिलो तर मात्र पावलोपावली फक्त चिंताच दिसेल .. पुढचा क्षण ना तुम्हाला माहित ना मला ,आणि ज्याला माहित आहे तो देव ,तो तर वरती बसून तुमच्या या वागण्याकडे पाहून स्वतःच हसत असेल ..

           तेव्हा सर्व चिंता ,सर्व काळजी सोडून द्या आणि बस मनापासून .मनमोकळं हसा .. मग पहा आयुष्य किती सुंदर दिसू लागत ते .. आणि मग तुमचंही मन समोरच्याच्या हसण्यात कसं फसू लागत ते ..
                             

                                                                                   - सुधीर 




  

Thursday 30 June 2016

गप्पा ...

गप्पा ..
रंगलेल्या गप्पा ..
येता-जाता मारलेल्या गप्पा नाही तर मी बोलत आहे रंगात आलेल्या गप्पांबद्दल ..
या गप्पा ठरवून कधीच सुरू होत नाहीत .. 
बस कोणीतरी असं भेटत ज्यांच्यासोबत मनमोकळेपणाने बोलता येत ,आणि बस सुरू होतात त्या गप्पा 
कधी आठवणी निघतात ,कधी चेष्टा मस्करी होते .. 
कधी सुख-दुःख सुद्धा वाटली जातात तर कधी एकदम फालतू बिनकामाच्या विषयावर सुद्धा बराच वेळ रंगतात या गप्पा ..  
या गप्पा मारता मारता ,एखाद्या विषयावर बोलता-बोलता हा गप्पांचा ,हा बोलण्याचा ओघ कधी कुठे कसा जातो हे कळतसुद्धा नाही ..
गप्पा जिथून सुरू होतात तो विषय ,आणि गप्पा संपतानाचा विषय यात काडिमात्रचाही संबंध नसतो ..
बराच वेळ सुरू राहतात त्या गप्पा ,ते बोलणं .. आणि जेव्हा ते बोलणं संपतं तेव्हा मग मीच विचारात पडतो की गप्पांची सुरुवात नेमकी झाली कुठल्या विषयापासून होती ??
अशा या गप्पाटप्पा ,किंवा गप्पांच्या मैफिली म्हणा ,यांची कहानीच निराळी ...  


                                                                                                - सुधीर 

Wednesday 1 June 2016

मोकळा श्वास ..


कोण होती ती .. 
वरती आकाशाकडे पाहत ,दोन्ही हात वरती करून डोळे झाकून ती तिथे उभी होती .. 
मावळतीचा सूर्य आकाशातून लाल जांभूस रंगाची किरणे फेकत होता आणि ती त्या रंगांना तिच्या चेहऱ्यावर सामावून घेत होती .. 
वाहणारा वारा तिच्या केसांना इकडे-तिकडे उडवत होता पण तिला त्याची काहीच चिंता नव्हती वा कशाच भान होत तिला . ती बस गुंग होती वरती आकाशाकडे पाहण्यात आणि तो क्षण जगण्यात .. 
खरंच कोण होती ती .. 
तीच नाव ,तीच अस्तित्व या जगासाठी काहीतरी वेगळ असेलसुद्धा ,पण त्या क्षणी त्या तिथे होती ती फक्त एक मोकळा असा श्वास .. 
स्वतःचं अस्तित्व विसरून त्या क्षणी ती झाली होती फक्त एक मोकळा श्वास . सर्व चिंता ,सर्व काही विसरून त्या हवेशी ,त्या वाऱ्याशी आणि उधळणाऱ्या त्या रंगांशी एकरूप झालेला असा एक मोकळा श्वास .. 
रंगांची सुरु असलेली ती उधळण पाहता-पाहता चेहऱ्यावर छान अस हसू आणणारी ती होती जणू एका स्वच्छंद मुक्तीची आस .. 
त्या क्षणी ती होती फक्त एक मोकळा श्वास ..



                                                                                                         - सुधीर                                            


Sunday 22 May 2016

ते उत्तर ..

                 
                 
डोळ्यात आलेलं थोडस पाणी ,नजर समोर कशावरती तरी स्थिरावलेली ,थोडासा गंभीर असा चेहरा घेऊन मी त्या पुलाच्या कठड्यावर हात टेकवून ऊभा होतो .. 
                  संध्याकाळची वेळ असल्यामुळे पुलावर तशी गर्दी होती .. अनेक जोडपे ,काही आजी आजोबांसोबत आलेली लहान मुले ,कुठे मुलांचे घोळके तर कुठे गप्पा मारणाऱ्या मैत्रिणींचा ग्रुप .. तिथे असा सर्व गर्दीचा किलबिलाट असूनसुद्धा मला कोणाचाच आवाज ऐकू येत नव्हता ,फक्त जाणवत होता तो कानाला स्पर्शून जाणाऱ्या त्या वाऱ्याचा आवाज .. थंडगार वाहणारी हवा माझ्या चेहऱ्याला येउन धडकत होती ,आणि माझे पाणावलेले उघडे डोळे हे जणू त्या वाऱ्यासोबत लढत होते ,आणि वारंवार जखमी होत होते ;त्या जखमेच्या वेदनेची जाणीव होऊन ते पुन्हा पाणावले जात होते .. 
                डोळ्यात एकच प्रश्न होता "माझ्याच सोबत असं का झालं ? मी असं काय केल होत कि माझ्यासोबत हे घडावं ,का माझ्यासोबतच का ? ".. 
                 हा प्रश्न सुरुवातीला मी वरती आकाशाकडे पाहून त्या देवाला विचारला ,नंतर डोळे झाकून स्वतःला विचारला तरी नाही मिळाल काही उत्तर ..मग त्या वाहणाऱ्या वाऱ्याला ,त्या पुलाखालून संथपणे वाहणाऱ्या नदीला सुद्धा विचाराला मी हा प्रश्न .. कोणीतरी उत्तर देईल ,कुठूनतरी मला उत्तर मिळेल म्हणून माझे डोळे हा प्रश्न विचारतच राहिले पण उत्तर नाही मिळाल कुठूनच .. 
                   तेवढ्यात तिथे मला एक लहानस बाळ त्याच्या आजोबांसोबत आलेलं दिसलं .. पुलावर येताच ,आजोबांनी त्याला खाली सोडलं आणि त्याच्या पायात आवाज करणारे छोटेशे बूट घालून दिले .. लगेच ते बाळ त्याच्या इवल्याशा पावलांनी चालायला लागल .. नुकतच चालायला शिकलेलं ते बाळ हळू-हळू एकेक पाऊल पुढ टाकत चालत होत ,आणि प्रत्येक पावलागणिक तोंडातले ते मोजूनमापून असेलेले दोन-तीन दात दाखवायचं आणि खूप गोड हसायचं .. प्रत्येक पाऊल पुढ टाकताच अगदी जग जिंकून घेतल्याचा आनंद दिसायचा त्याच्या चेहऱ्यावर .. थोड चालल्यावर त्याने पाऊल टाकायचा वेग वाढवला तसं ते बाळ तोल जाऊन धपकन खाली पडल .. त्याच्या मागून चालणाऱ्या त्याच्या आजोबांनी त्याला लगेच उचलल आणि कडेवर घेतलं .. ते गोड बाळ एवढस तोंड करून रडायला लागल ,तेव्हा आजोबांनी त्याचे थोडेसे लाड केले आणि त्याला शांत केल .. 
                शांत होताच त्या आजोबांनी त्या बाळाला परत कडेवरून खाली उतरवल आणि जमिनीवर उभ केल .. लगेच पुन्हा हसत-हसत ते बाळ त्याच्या त्या इवल्याशा पावलांनी हळू-हळू चालायला लागलं ,आणि हसायला लागल ..     
              तेव्हा मला जाणवलं कि ,आपल्या आयुष्याचं सुद्धा असच असत नाही का ,चालता-चालता अचानक ठेच लागते ,थोडस रक्तही येत आणि त्याच्या सोबत थोडीशी वेदना थोडस दुखःही येत ; तरीपण थोडासा वेळ घेऊन आपणच स्वतःला सावरायचं असतं आणि पुन्हा हसत-हसत पुढच्या प्रवासाला चालायला लागायचं असतं .. 
           त्या लहान बाळाने नाही विचारलं कोणालाच की तोच का पडला म्हणून .. तो पडला , त्याला लागलं म्हणून तो थोडस रडला आणि रडून झाल्यावर पुन्हा झाल ते विसरून तो मस्तपैकी पुन्हा चालायला लागला .. ते खाली पडण ,ते रडण तेव्हाच मागे सोडून तो पुढच्या रस्त्याकडे पाहत हसत-खेळत निघाला .. 
                 तेव्हा मला कळालं कि ,हा आयुष्याचा प्रवास असाच चालू ठेवायचा असतो .. काही वाईट अस घडल ,कोणीतरी मनाला दुखावलं ,खुप त्रास होईल अस काही जरी घडल तरीसुद्धा 'माझ्यासोबतच अस का झाल' हे न विचारता ,आहे ते सत्य स्वीकारून बसं पुढे चालत राहायचं ,बस पुढे चालत राहायचं 
                    हेच आहे खर आणि हेच आहे एकमेव उत्तर ....... 



                                                                                                          - सुधीर 



Saturday 7 May 2016

हे खोट-खोट रुसण ..


रुसण  .. 
खोट-खोट ,जाणून बुजून ती माझ्यावर किंवा मी तिच्यावर रुसलो कि मला खूप आवडत .. कारण या रुसण्यापेक्षा जास्त गंमत रुसलेल्याला मनवण्यात असते ,आणि ते करताना जो खेळ आमच्यात चालतो ना त्यातली मजा ,त्यातलं प्रेमच निराळ असत ..
प्रत्येक वेळी ती माझ्यावर रुसली कि मग मला तिला मनवण्यासाठी काहीतरी करावच लागत ,एक वेगळी शक्कल लढवावी लागते .. मग ते काहीतरी जोक ऐकवून किंवा काहीतरी माकडचाळे करून तिला हसवायचा प्रयत्न करणे असो किंवा तिच्या मागे मागे फिरत सॉरी म्हणण असो किंवा तिच्या आवडीची एखादी गोष्ट आणून देण असो किंवा अशा अनेक गोष्टी .. 
पण यावेळेस मीच तिच्यावर रुसलोय .. खर सांगायचं तर एक वेगळीच अनामिक भीती मनात येत आहे ,कि मी खोट-खोट तिच्यावर रुसलोय खर पण ती मला मनवायला येईल का ?
का माझ मलाच हे माझ रुसण मनातल्या मनात दडवून टाकावं लागेल ?
खरच ,तिने याव आणि तिच्या खऱ्याखुऱ्या मनवण्याने माझ्या या खोट्या खोट्या रूसण्यावर पांघरूण टाकावं अस वाटत आहे .. 
तसं म्हणायला म्हणून 
खोट-खोट रुसलोय मी खरा 
पण रुसलेल्या मला 
मनवायला ती येईल का .... 
हसत हसत का होईना 
पण 'सॉरी रे' अस 
एकदातरी ती म्हणेल का .... 
माझा हा असा 
रुसलेला फुगलेला चेहरा पाहून 
गालातल्या गालात 
एकदातरी ती हसेल का ….  
तसं खोट-खोट रुसलोय मी खरा 
पण रुसलेल्या मला 
मनवायला ती येईल का .... 
रुसलेल्या मला 
मनवायला ती येईल का .... 

पण ती नाही आली ,आणि ती येणार तरी कशी .. ती त्या तिकडे आकाशात आणि मी इकडे जमिनीवर आहे ,आणि खरंच हे खूप जास्त अंतर आहे आमच्यामध्ये .. कितीही चाललो तरी हे अंतर नाही संपवू शकत मी .. 
आत्ता इथे खिडकीतून त्या आकाशातल्या चांदण्यांकडे पाहत ,मी फक्त वाट पाहू शकतो कि कधीतरी मनवायला येशील तू ,हे जगण्या-मरण्याचे बंध तोडून कधीतरी येशील .. खोट-खोट रुसलेल्या मला मनवायला ….  


                                                                                            - सुधीर 

  

Monday 18 April 2016

स्वप्न ..माझ स्वप्न


स्वप्न ..
               पाहतात तस सर्वच जण .. तसच मी पण एक स्वप्न पाहिलंय आणि आज मी त्या स्वप्नाच्या वाटेवरून जात आहे ..  मला चांगलंच माहित आहे हि वाट अजिबात सोपी नाहीये ..  आणि खर सांगायचं तर ही वाट कधी सोपी नसतेच , कारण सोपी असते ती दुसऱ्यांनी आपल्याविषयी पाहिलेल्या स्वप्नांची वाट ..
            आपला परिवार ,नातेवाईक आणि हा समाज यांनी आपल्यासाठी अतिशय सोप्प्या अशा स्वप्नांची वाट आधीच ठरवून ठेवलेली असते .. तू हे कर ,मग ते कर आणि हे ते करून झाल कि तुझ आयुष्य सुरळीत अस सुरू राहील ,अगदी साध-सरळ अस आयुष्य जगशील तू ,अशी चौकट नकळत आपल्याला लहानपणीच आखुन दिलेली असते सर्वांनी ..
           पण जेव्हा हि चौकट मोडून आपण जेव्हा आपल्या स्वप्नांची वाट निवडतो तेव्हा आणि तिथूनच खरा संघर्ष सुरु होतो .. संघर्ष या समाजासोबत आणि त्याच वेळी स्वतःसोबत सुद्धा .. जग झोपेत असताना स्वप्न पाहत ,पण आपण स्वप्नवेडी माणस जागेपणी सुद्धा ते स्वप्न डोळ्यात घेऊन फिरत असतो  .. आणि खरंच या स्वतःच्या स्वप्नांच्या वाटेवर चालायची मजाच काही निराळी असते ,ती धुंदच काही वेगळी असते ..
                 ही माझ्या स्वप्नाची वाट अजिबात सोपी नाही आणि छोटीशी तर मुळीच नाही हे सर्व समजत असतानासुद्धा मी ते स्वप्न पाहिलं आणि ही वाट निवडली .. कारण कितीही खडतर रस्ता असला ,कितीही संघर्षाची वळणं असली या वाटेवर तरी ही माझ्या स्वप्नाची वाट आहे ,माझ्या .. आणि जे माझ स्वतःचं आहे ते मी इतक्या सहजासहजी मी कसा सोडून देईन बर ..
                 या वाटेवर संघर्ष जरी अटळ असला ,तरी आता थांबायचं नाही एवढ खर .. चालताना कधी कोमल अशा फुलांच्या पाकळ्या तर कधी कधी स्पर्श होताक्षणी पायात खोल रुततील असे काटेसुद्धा येतील , कधी येईल मनाला सुखावणारा ,मनाला ओलाचिंब करून टाकणारा हलकासा पाऊस तर कधी येईल एका क्षणात होत्याच नव्हत करून टाकणार ते भयानक वादळ ..  
            बऱ्याच वेळा अस वाटेल की आता नाही चालवत पुढे ,हे पाय थकतील ,हे बाहू थकतील तेव्हा काही वेळ विश्रांतीसाठी थांबून पुन्हा उठून चालायचंच आहे ,कारण हे शरीर कायमच थकून जाण्याआधी मला पूर्ण करायचं आहे एक वचन ,स्वतःच स्वतःला दिलेलं ते वचन ..
                म्हणूनच या संघर्षाला ,या प्रतिकूल परिस्थितीला मी एवढच सांगेन की ,
                हे माझ स्वप्न आहे ,हि माझी वाट आहे ,हा माझा प्रवास आहे आणि हे माझ जगण आहे .. 
                शेवटी आठवतात त्या रोबेर्ट फ़्रोस्ट च्या कवितेतल्या या काही ओळी ,

The Woods are Lovely
Dark and Deep ,
But I have promises to Keep
And Miles to Go
Before I sleep ,
And Miles to Go
Before I sleep ..
                        

             
                                                                                                         -  सुधीर

Monday 11 April 2016

हा प्रवास ,हे आयुष्य ..


हा प्रवास ,हे आयुष्य ..
                कुठेतरी आपण प्रत्येक जण आपल्या पाठीवरती ,या मनावरती काही ना काही ओझ घेऊन रोज जगत असतो आणि हा 'जीवन' नावाचा खडतर प्रवास करत असतो ..  तरीपण खुपदा वाटत की हा आयुष्याचा प्रवास आपण सहज एकटे पूर्ण करु शकतो ,आपल्याला कोणाचीच  गरज नाही .. पण खरच अस होत का ,एकट्याने हा प्रवास पूर्ण होतो का आणि झाला तरी तो आनंद देणारा प्रवास असतो का ..  या आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकाला कोणातरी एका साथीदाराची गरज भासतेच ..  
            या मनावरच्या ओझ्यांबद्दल बोलायचं झाल तर काहींना भूतकाळातल्या दुःखाच ओझ ,काहीना दुरावलेल्या माणसांच्या आठवणींच ओझ ,काहीना भूतकाळात केलेल्या चुकांच ओझ ,काहीना जबाबदारीच ओझ ,काहींना तुटलेल्या स्वप्नाचं ओझ तर काहीना भविष्यातलं स्वप्न पूर्ण करायचं ओझ ,काहीना इतरांच्या अपेक्षांचं ओझ तर काहीना स्वतःच निर्माण केलेल्या अपेक्षांचं ओझ ... 
               पण या ओझ्यांची गंमत अशी असते कि आपण जर एकटेच हे ओझ वाहत निघालो ना तर या ओझ्याचं ओझ जड वाटत ,पण कुणी साथीदार,कुणी सोबती जर या प्रवासात सोबतीला मिळाला तर हे ओझ हळू-हळू जाणवेणास होत आणि बघता-बघता हा खडतर वाटणारा प्रवास सोप्पा होऊन जातो .. 
                प्रत्येकालाच असा साथीदार मिळेल अस नाही .. काही नशीबवान लोकांना खूप सहज मिळून जातो तर काहीना बरीच वाट पहावी लागते असा साथीदार आयुष्यात येण्यासाठी .. त्याच्या फक्त आयुष्यात असण्यानेच हे मन ,या मनावरच सर्व ओझ आपोआप हलक-हलक वाटायला लागत .. तर असा साथीदार ज्यांच्या आयुष्यात आलेला असतो ते खरच नशीबवान असतात ...
                आणि अजूनही ज्यांच्या आयुष्यात अस कोणीतरी आल नसेल तर विश्वास ठेवा की कुठल्यातरी वळणावर नकळतपणे कुठूनतरी एक रस्ता तुमच्या आयुष्याच्या रस्त्याला नक्की येउन मिळेल जिथे तुम्हाला तो साथीदार ,ती साउली नक्की भेटेल हे नक्की .. आणि तोपर्यंत एकच गोष्ट करायची ,ती हि कि हा आपला प्रवास असाच चालू ठेवायचा  ..
            Just keep moving forward And One day you will find this life very very beautiful .. But to reach there ,you must keep moving forward .…. 

                                                                                                       - सुधीर 

Monday 21 March 2016

गुंतण ..


गुंतण .. 

गुंतण्याचा हा खेळ ..
      कधी कधी मला प्रश्न पडतो की हे आयुष्य आपल्यासोबत खेळत की आपण आपल्या या आयुष्यासोबत खेळतो .. या आयुष्याच्या खेळातली मजा म्हणजे समजून उमजून मांडलेला खेळ असो किंवा नकळतपणे मांडला गेलेला खेळ असो ,हे मन त्या खेळात गुंतत जातंच .. आणि सांगायची गोष्ट म्हणजे या मनाला या खेळात गुंतण तर खूप चांगल जमत पण त्यातून बाहेर पडण नाही जमत या मनाला .. 
        हे जे गुंतण असत ना ते अगदी नकळत होत बर ,अगदी छोट्याशा चोरपावलांनी कधी ,कस ,कोणीतरी या मनात येत हे कळतसुद्धा नाही .. आपण भविष्याबद्दल बांधलेले सर्व अंदाज एका क्षणात चुकीचे ठरवून ,आपल्या आयुष्याच्या कहानीला एक वेगळीच कलाटणी मिळते त्या व्यक्तीच्या येण्याने .. अस नसत की आपल्या आयुष्यात त्याआधी कोणी नसत ,असतात बरेच लोक असतात ,पण त्याचं 'असण' जरी असलं तरी कुठेतरी काहीतरी अधुर-अधुर अस जाणवत असत नेहमी ,सर्व असूनसुद्धा काहीतरी नसल्याची जाणीव सारखी होत असते या मनाला .. आणि मग त्या व्यक्तीच्या येण्याने हे सर्व क्षणात बदलून जात ,आपल जगच वेगळ होऊन जात .. आणि तिथून सुरु होतो मनाचा गुंतण्याचा हा असा खेळ ..
         माझसुद्धा मन अनेकदा गुंतलं आहे या खेळात ,आणि त्याच गुंतण अजूनसुद्धा चालूच आहे .. बसं या खेळात गुंतल्यावर मात्र त्यातून बाहेर कस पडायचं या प्रश्नाचं उत्तर अजूनही नाही सापडलं या मनाला .. म्हणून तर या खेळात गुंतण तर खूप चांगल जमत या मनाला पण त्यातून बाहेर पडण नाही जमत या मनाला .. असा हा गुंतण्याचा खेळ मनाचा  ….  
'सर सुखाची श्रावणी' या मराठी गाण्यातल्या या काही ओळी सारख अगदी ...  
                                                   सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला 
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला 
खेळ हा तर कालचा पण आज का वाटे नवा 
कालचा हा खेळ वाटे नवा ………


                                                                                           - सुधीर 

Sunday 17 January 2016

ते पुस्तक ....

      

  

बऱ्याच दिवसांपासून काहीतरी चुकल्यासारखं वाटत होत .. 
                      माझा स्वतःला समजून घ्यायचा ,स्वतःला जाणून घ्यायचा शोध तर सुरूच आहे ,आणि या शोधामध्ये ,या प्रवासात मला साथ देत आहेत माझ्या आयुष्यात येत असलेली हि पुस्तके .. खरतर सध्या ,मनातल्या प्रश्नांची उत्तर शोधण आणि शक्य तेवढ हे आयुष्य ,हे जगण समजून घेण याच उद्देशाने मी पुस्तक वाचत असतो .. काही पुस्तक या कसोटीवर खरी उतरतात तर काही नाही उतरत .. 
          म्हणूनच हा प्रवास ,हा स्वतःला समजून घ्यायचा प्रवास ;नकळतपणे अशा पुस्तकांच्याच शोधाचा प्रवास बनत चालला आहे .. जरी 'युगंधर' ने या पुस्तक वाचनाच्या प्रवासाची सुरुवात झाली असली तरी "Johnathan Livingston Seagull" या पुस्तकाने इंग्रजी पुस्तकांचा दरवाजा उघडला माझ्यासाठी ,आणि मग मात्र अनेक पुस्तक आली आयुष्यात .. काही मराठी तर काही इंग्रजी .. मागे काही दिवसांपूर्वी वाचलेल्या पाउलो कोएलो च्या "Like the Flowing River " या पुस्तकाने तर मला अक्षरश मोहून टाकल ,पण ते पुस्तक वाचून झाल्यावर मात्र पुढंच आवडेल अस पुस्तक लवकर नाहीच आलं आयुष्यात .. बरेच दिवस गेले ,मी त्याची येण्याची वाट पाहत होतो .. वेगवेगळी पुस्तक घेतली हातात ,नेटवर शोधली आणि अनेक दुकानं पण धुंडाळली ,पण आवडेल अस पुस्तक नाही आलं माझ्यासमोर .. 
                   तेव्हा एक विचार आला मनात  ,जस योग्य वेळेला योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात येते तसच योग्य वेळेला योग्य पुस्तक आपल्या आयुष्यात येत नसेल ना  .. पण त्यासाठी या पुस्तकांचा पण शोध घ्यावा लागतो बर का ,इकडे तिकडे नजर फिरवावी लागते .. मग जाऊन कधी कोणत्या क्षणी कोणत पुस्तक समोर येईल आणि ते वाचून तुमच आयुष्य बदलून जाईल हे सांगता येत नाही .. 
                      अशा शोधात असतांनाच व.पु.काळे यांच 'आपण सारे अर्जुन 'हे पुस्तक मिळाल ,ज्याने मला स्वतःमध्ये अडकवून ठेवल .. वाचताना नकळत मी माझ्याच मनातच हरवत गेलो .. हे पुस्तक म्हणजे या प्रवासातला महत्वाचा टप्पा ठरणार यात शंका नाही .. 
        आणि हे वाचून झाल्यावर पुन्हा शोध सुरु होईल ,पुन्हा नजर इकडे तिकडे फिरेल ,शोधात त्या पुढच्या पुस्तकाच्या ..   


                                                                                          - सुधीर (9561346672)

Sunday 10 January 2016

शोध ....



शोध ..
तसा हा शब्द दिसायला फार छोटा आणि सोपा आहे ,तरी या शब्दात आपल अख्खं आयुष्य सामावलेलं असत .. 
          आपल्या आयुष्यात आपण नेहमी कशाचा ना कशाचा शोध घेतच असतो .. मग ते कळत किंवा नकळत घेत असो ,पण आपल मन हा 'शोध' घेत असतच .. काही जणांना जाणवत कि ते काय शोधत आहेत आणि ते त्या शोधाच्या मार्गावर प्रवासाला निघतात सुद्धा ,पण बरेच जण आपण काय शोधत आहोत हेच न कळल्याने ,त्या 'शोधा'च्या शोधातच पूर्ण आयुष्य घालवतात .. 
          एक व्यक्ती एकच गोष्ट शोधत असतो असही नाही बर का ,तर एकाच व्यक्तीच्या आयुष्यात अनेक शोध सुद्धा असू शकतात .. कधी सुखाचा शोध तर कधी प्रेमाचा शोध ,कधी कुणाच्या आधाराचा शोध तर कधी मायेच्या दोन शब्दांचा शोध .. कधी यशाचा शोध तर कधी त्या यशाकडे नेणाऱ्या मार्गाचा शोध .. चालता चालता थकलो तर विसाव्याचा शोध तर कधी तात्पुरत्या विसाव्यापेक्षा कायमच्या त्या आसऱ्याचा शोध .. कधी स्वतःमध्ये डोकावून स्वतःचा शोध ,तर कधी आकाशाकडे पाहत त्या परमेश्वराचा शोध .. 
        या अशा अनेक शोधांमुळे या जगण्याला काही उद्देश मिळतो ,एवढच नव्हे तर याच शोधामुळे आपल्या आयुष्यात निर्माण होतात नवनवीन नाती ,आपल्या या शोधाच्या प्रवासात येउन जुळतात नवीन माणसे .. प्रेमाच्या शोधामुळे मिळतात मित्र मैत्रिणी ,यशाच्या शोधत मिळतात गुरु आणि मित्र ,विसाव्याच्या शोधत मिळतो आपल्याला आपला परिवार ,तर आसऱ्याच्या शोधत आपल्याला गवसतात आयुष्यभर साथ देईल अशी माणस .. 
       हा शोध आत्तापर्यंत चालूच होता ,आजही चालूच आहे आणि यापुढेही चालूच राहील .. माझ्या आयुष्यातला हा शोध ...     

                                                                           - सुधीर