Showing posts with label असंच सुचलेलं ... Show all posts
Showing posts with label असंच सुचलेलं ... Show all posts

Thursday, 6 December 2018

हि पाऊलवाट ..



हि पाऊलवाट .. 
तुझ्या आणि माझ्या आयुष्याची हि पाऊलवाट .. 
अनेक वळणावळणांमधून ,कधी वेड्यावाकड्या तर कधी सरळ अशा या वाटेवर सुरु असलेला आपला हा आत्तापर्यंतचा स्वतंत्र असा हा प्रवास ,हि आपली पाऊलवाट ,आता यापुढे एक होईल .. 
आत्तापर्यंत या वाटेवर चालताना उमटत जाणाऱ्या माझ्या एकाकी अशा या पाऊलखुणांना ,यापुढे कायमची साथ मिळेल ती तुझ्या उमटणाऱ्या पाऊलखुणांची ..
आत्तापर्यंतचा हा आपला प्रवास ,हि आपली पाऊलवाट वेगळी अशी होती .. 
तुझा प्रवास तुझ्या वाटेवरती आणि माझा प्रवास माझ्या वाटेवरती सुरु होता ..
या वाटेवर चालताना ,
कधी सुखाच्या शीतल थंडगार अशा सावलीतून चालावं लागलं तर कधी चालता चालता भेटला तो दुःखाचा गडद असा भयाण अंधार .. 
कधी अक्षरशः अस्तित्व हादरवून टाकणार असं एखाद भयानक वळण लागलं तर कधी या मनाला आनंदाच्या चिंब पावसात भिजवून टाकणारं असं वातावरण दिसलं .. 
असंख्य झाडांनी ,असंख्य फुलांनी या प्रवासात आपली साथ दिली ,काही त्या-त्या वेळेला साथ देऊन नंतर वेगळ्या वाटेने निघून गेले तर काही वाटसरू अजुनसुद्धा आपल्यासोबत या वाटेवरचे वाटसरू बनून साथ देत आहेत .. 
या वाटेवर लागणाऱ्या प्रत्येक वळणावर ,तुला आणि मला घ्यावा लागला तो एक निर्णय ,तो हा कि पुढे नेमकं कोणत्या दिशेने जायचं .. 
निर्णय घेताना कधी-कधी पाऊल डगमगल सुद्धा ,कारण प्रत्येक वळण आयुष्याला कुठेतरी घेऊन जाणारं होत हे माहीत होत ,आणि मग भीतीसुद्धा वाटायची ,चुकीचा निर्णय घेऊन चुकीच्या वळणाने गेलो तर ... 
ते निर्णय कधी कधी बरोबर निघाले तर कधी ते साफ चुकलेसुद्धा .. 
पण खरं तर ,बरोबर असो वा चूक ,पण आपण घेतलेल्या त्याच वळणांमुळे ,त्याच निर्णयांमुळे कदाचित आपली हि वेगळी-वेगळी चालणारी पाऊलवाट ,पुढे जाऊन एका सुंदर अशा क्षणी ,एका नकळत अशा वळणावर येऊन एक झाली .. 
आणि म्हणूनच त्या प्रत्येक झाडाला ,प्रत्येक फुलाला ,प्रत्येक उजेडाला आणि प्रत्येक अंधाराला ,प्रत्येक पावसाला आणि अशा त्या प्रत्येक छोट्या-मोठ्या अशा वळणांना ,ज्यांनी आपली हि पाऊलवाट एक करायला ,आपल्याला एक व्हायला कळत-नकळत मदतच केली ,त्या सर्वांना मनापासून धन्यवाद .. 
आणि या पाऊलवाटेवर आपल्या पुढच्या प्रवासासाठी तुला-मला खूप प्रेमळ अशा शुभेच्छा ..



                                                                       - सुधीर 

Sunday, 8 July 2018

नातं ..



नातं .. 
मग ते नातं कुठलंही असो .. 
ते हळुवारपणे खुलण्यातच खरी मजा असते ..
पण आजकाल सर्वांनाच घाई झाली आहे .. सर्व गोष्टींची घाई .. 
नातं पटकन तयार व्हावं आणि या पटकन तयार झालेल्या नात्याची वीण मात्र आयुष्यभर टिकावी अशीच अपेक्षा करतात अन इथेच फसतात हि मंडळी ..  
जस प्रत्येक कळी तिच्या कलेकलेने खुलते ,जस प्रत्येक झाड त्याच्या कलेकलेने वाढत ,तसंच या नात्यानासुद्धा कलेकलेने खुलू द्यायचं असत ..
मग असंच खुलता खुलता पुढे जाऊन त्या नात्यात एक घट्ट आणि कधीच न तुटणार बंध तयार होतो , जो कायम राहतो, चिरकाल टिकतो .. 
त्यासाठी पाहिलं ते नातं जुळेल .. मग ते त्याच्या कलेने खुलायला लागेल .. आणि मग त्या नात्याची सुंदर अशी कळी खुलेल .. 
पण त्या नात्याला असं खुलण्यासाठी योग्य वेळ नाही दिला तर ते नातं चिरकाल टिकेलच याची शाश्वती नाही  .. 
म्हणून सावकाशपणे जुळू द्या या नात्यांना .. 
हळुवार असं खुलू द्या या कळीला ..
त्यानंतरच खरं हि कळी जोमाने खुलेल .. 
अन आयुष्यात आनंदाचा , प्रेमाचं सुगंध पसरेल .. 



                                                                                         - सुधीर 

Sunday, 10 June 2018

व्यक्त-अव्यक्त ..

                 

               
कधी कधी मला कुतुहूल वाटतं की नेमकं कोण कोणाला व्यक्त करतंय इथे .. मी या शब्दांना व्यक्त करतोय कि हे शब्द मला व्यक्त करत आहेत ..
  खरं तर मन आणि शब्द यांचं नातं व्यक्त-अव्यक्त असं असत .. जेव्हा एक अव्यक्त असतो तेव्हा दुसरा त्याला आपोआप व्यक्त करतो .. जणू काही दोन खूप जवळचे मित्र ,ज्यात एक रागावून रुसून बसला तर लगेच दुसरा त्याला बोलत करायचा प्रयत्न करतो  .. मन आणि शब्दांचं असंच तर आहे अगदी .. मनाविरुद्ध काही घडलं कि हे मन मग स्वतःशीच रुसून बसतं , तेव्हा मग या शब्दांनीच या मनाची मनातल्या मनात समजूत काढावी लागते .. आणि जेव्हा कधी हे शब्दच रुसून बसतात तेव्हा हे मनच स्वतःला आतल्या आत व्यक्त करत राहत .. तेव्हा ओठांवर शब्द जरी येत नसले तरी मनातल्या मनात मात्र विचारांचा अन शब्दांचा भडीमार सुरु असतो ..
  म्हणूनच कधी वाटत कि माझं मनच अव्यक्त आहे आणि हे शब्द त्या मनाला व्यक्त करतात , तर कधी वाटत कि हे शब्दच अव्यक्त आहेत ज्यांना व्यक्त करायचं काम या मनात सतत सुरु असत ..
असा हा खेळ मनाचा आणि या शब्दांचा ..
व्यक्त-अव्यक्त असा हा खेळ ..


                                                                                  - सुधीर     

Friday, 29 December 2017

योगायोग ..



योगायोग .. 
बऱ्याच वेळा घडून येतात हे आपल्यासोबत .. 
हे तस अचानकचं घडतात पण जेव्हा जेव्हा घडतात तेव्हा तेव्हा मनाला आनंद मात्र नक्कीच मिळवून देतात . 
नीट आठवून बघा ,तुमच्या आयुष्यात ज्या ज्या महत्वाच्या व्यक्ती आल्या ,त्यांचं तुम्हाला भेटणं हे कुठल्यातरी योगायोगामुळेच शक्य झालं होत ..  
कदाचित तुम्हाला मिळालेलं प्रेम ,अथवा भेटलेले खूप जवळचे मित्र आणि त्यांच्यासोबतची आयुष्यभराची जडलेली मैत्री अथवा नकळतच सापडलेली तुमची आवड,तो तुमचा स्वतःचा असा छंद . हे सर्व त्या त्या वेळेला घडलेल्या त्या त्या योगायोगांमुळेच शक्य झालं होतं .. आता आपण जेव्हा ते योगायोगाचे क्षण आठवतो तेव्हा मनात हा विचार नक्कीच येतो कि तेव्हा ते तस घडलं म्हणूनच कदाचित आज माझं आयुष्य हे असं आहे .. 
खरं तर म्हणायला म्हणतो आपण या गोष्टींना 'योगायोग' म्हणजेच अचानकपणे अनाहूतपणे घडणाऱ्या अशा गोष्टी. आपल्याला असं वाटत कि अरे हे अचानकपणे कस काय घडलं ..  
पण खरंच हे योगायोग ,या गोष्टी एकदम अचानकपणे घडलेल्या असतात का ?
पश्चिमेकडे एक वाक्य प्रसिद्ध आहे कि दूर कुठेतरी ,योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी ,एक इवलंसं असं फुलपाखरू जेव्हा त्याचे पंख फडफडवतो तेव्हा त्या इवल्याशा पंखानी त्या हवेच्या एकदम थोडस हलकंसं असं हलण्याने एक घटनांची अशी साखळी तयार होते जी दूर कुठेतरी येणाऱ्या एखाद्या मोठ्या वादळाची सुरुवात ठरते ..
मग आपल्या आयुष्यात येणारे किंवा घडणारे ते अनाहूत असे योगायोग ,ते घडून यायला म्हणून घटनांची एक साखळी खूप आधीच सुरु झालेली असते का ?
का या गोष्टी खरंच अचानक अनाहूतपणे एकदम घडून येतात ?
या प्रश्नाचं उत्तर भेटणं तस अवघड आहे .. ते उत्तर त्या वर बसलेल्यालाच माहित असेल कदाचित ,पण तो बोलत नाही हि एक वेगळीच समस्या ..
पण एक नक्की ,मनाला माहित नसत कि पुढे काय होणारे आणि अशा वेळी जेव्हा अनाहूतपणे एखादा योगायोग घडून येतो कि तो मनाला एक वेगळाच आनंद मिळवून देतो . 
मग नकोच याबद्दल जास्त विचार करायला . 
सध्या तरी फक्त हे योगायोग आणि त्याच्या अनुषंगाने घडणाऱ्या या आयुष्यातल्या गोष्टी ,यांना मनापासून जगूया ..... 




                                                                                                    - सुधीर 

Saturday, 18 February 2017

तो दिवस ...


दिवस .. 
खरंच आयुष्यात चांगले दिवस किती आणि वाईट जाणारे दिवस किती येतात हे मी सांगायची गरज नाही .. 
आपण सर्वजण हे दिवस अनुभवत असतोच ..  
पण कधी कधी ना काही काही दिवस हे खरंच खूप वाईट जातात .. 
एखादी भयाण काळीकुट्ट अंधाराची रात्र असावी आणि त्यात भर म्हणून एकदम भयानक असं स्वप्न पडावं असे काही दिवस सर्वांच्या आयुष्यात नक्कीच येतात आणि नंतर काही काळाने निघून सुद्धा जातात .. 
पण 
या वाईट जाणाऱ्या दिवसांमध्ये तो एक चांगला गेलेला दिवस सुद्धा असतो .. 
खरं तर काहीतरी मनासारखं घडलेला ,किंवा काहीतरी अनपेक्षित असं घडून या मनाला अतिशय आनंद देऊन गेलेला तो दिवस असतो .. 
त्या दिवसाला मनाच्या एका कप्यात एकदम जपून ठेवा ,त्याची काळजी घ्या .. 
कितीही निराशेचे मळभ साचले या मनावर तरी त्या दिवसाच्या आठवणींना झाकून जाऊ देऊ नका .. 
कारण या संघर्षाच्या दिवसांमध्ये आणि भयाण स्वप्नांच्या रात्रीत ,तो दिवस ,त्या दिवसाच्या त्या चांगल्या आठवणी ,ते आनंदाचे क्षण याचाच खूप मोठा आधार मिळत असतो या मनाला .. 
तेव्हा नक्की जपून ठेवा त्या आठवणी , तो दिवस ... 


                                                                                                     - सुधीर

Tuesday, 13 September 2016

सोप्प होत ...


सोप्प होत तुझं उत्तर 
बस ,माझा प्रश्नच जरा अवघड होता 
तरीपण 
बदलावं तुझं उत्तर यासाठी 
      माझा जीव का अडकला होता ...... 
           
                                                                                                                             - सुधीर


Saturday, 3 September 2016

कोणी आणि कोणीतरी ...

कोणी आणि कोणीतरी यांच्यातलं संभाषण फार मजेशीर होतं  .. 
कोणी कोणालातरी म्हणाले कि आजकाल कोणीही कोणालाच काहीही बोलायच्या किंवा सांगायच्या फंदात पडू नये .. कारण कोणाच्या कोणत्या बोलण्याचा कोण काय कसा आणि कोणता अर्थ काढेल हे कोणालाच सांगता येत नाही .. 
तेव्हा उत्तरादाखल ते कोणीतरीसुद्धा हेच म्हणाले कि कोणी कोणाच्याही बोलण्याचा काय आणि कोणता तो योग्य असा अर्थ काढेल हे कौशल्य कोणाकोणालाच जमत ,तेव्हा कोणाच्यातरी बोलण्याचा योग्य असा अर्थ काढू शकेल ,असे कोणीतरी भेटत नाही तोपर्यंत कोणीही कोणाचेही नाही असेच समजावे आणि म्हणूनच कोणीही कोणासही काहीही न बोललेले बरे ... 

                                                                                  - सुधीर