Friday 29 December 2017

योगायोग ..



योगायोग .. 
बऱ्याच वेळा घडून येतात हे आपल्यासोबत .. 
हे तस अचानकचं घडतात पण जेव्हा जेव्हा घडतात तेव्हा तेव्हा मनाला आनंद मात्र नक्कीच मिळवून देतात . 
नीट आठवून बघा ,तुमच्या आयुष्यात ज्या ज्या महत्वाच्या व्यक्ती आल्या ,त्यांचं तुम्हाला भेटणं हे कुठल्यातरी योगायोगामुळेच शक्य झालं होत ..  
कदाचित तुम्हाला मिळालेलं प्रेम ,अथवा भेटलेले खूप जवळचे मित्र आणि त्यांच्यासोबतची आयुष्यभराची जडलेली मैत्री अथवा नकळतच सापडलेली तुमची आवड,तो तुमचा स्वतःचा असा छंद . हे सर्व त्या त्या वेळेला घडलेल्या त्या त्या योगायोगांमुळेच शक्य झालं होतं .. आता आपण जेव्हा ते योगायोगाचे क्षण आठवतो तेव्हा मनात हा विचार नक्कीच येतो कि तेव्हा ते तस घडलं म्हणूनच कदाचित आज माझं आयुष्य हे असं आहे .. 
खरं तर म्हणायला म्हणतो आपण या गोष्टींना 'योगायोग' म्हणजेच अचानकपणे अनाहूतपणे घडणाऱ्या अशा गोष्टी. आपल्याला असं वाटत कि अरे हे अचानकपणे कस काय घडलं ..  
पण खरंच हे योगायोग ,या गोष्टी एकदम अचानकपणे घडलेल्या असतात का ?
पश्चिमेकडे एक वाक्य प्रसिद्ध आहे कि दूर कुठेतरी ,योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी ,एक इवलंसं असं फुलपाखरू जेव्हा त्याचे पंख फडफडवतो तेव्हा त्या इवल्याशा पंखानी त्या हवेच्या एकदम थोडस हलकंसं असं हलण्याने एक घटनांची अशी साखळी तयार होते जी दूर कुठेतरी येणाऱ्या एखाद्या मोठ्या वादळाची सुरुवात ठरते ..
मग आपल्या आयुष्यात येणारे किंवा घडणारे ते अनाहूत असे योगायोग ,ते घडून यायला म्हणून घटनांची एक साखळी खूप आधीच सुरु झालेली असते का ?
का या गोष्टी खरंच अचानक अनाहूतपणे एकदम घडून येतात ?
या प्रश्नाचं उत्तर भेटणं तस अवघड आहे .. ते उत्तर त्या वर बसलेल्यालाच माहित असेल कदाचित ,पण तो बोलत नाही हि एक वेगळीच समस्या ..
पण एक नक्की ,मनाला माहित नसत कि पुढे काय होणारे आणि अशा वेळी जेव्हा अनाहूतपणे एखादा योगायोग घडून येतो कि तो मनाला एक वेगळाच आनंद मिळवून देतो . 
मग नकोच याबद्दल जास्त विचार करायला . 
सध्या तरी फक्त हे योगायोग आणि त्याच्या अनुषंगाने घडणाऱ्या या आयुष्यातल्या गोष्टी ,यांना मनापासून जगूया ..... 




                                                                                                    - सुधीर 

Sunday 1 October 2017

शोधता तुला ..


एकाच वेळी तू आयुष्यात येशील याची वाटसुद्धा पाहणं ,आणि त्याच वेळी या जगातल्या चेहऱ्यांच्या गर्दीमध्ये तुला शोधणं  हे सोप्प नाहीय .. 
शोधता शोधता तुला 
माझा मीच कसा हरवलो .. 
कधी या वाटेवर 
तर कधी त्या वळणावर 
मी एकटाच घुटमळलो .. 
प्रत्येक क्षणाला का असं सारखं जाणवत कि तू आहेस कुठेतरी ,माझ्या आयुष्यात नसूनही तू आहेस आणि तुझं ते असणं जाणवतं मला आणि माझ्या मनाला क्षणाक्षणाला .. 
आहेस तू कुठेतरी 
हे माझं मन जाणत .. 
कदाचित 
या मनाला माझ्या 
तुझं हे असं जाणवतं .. 
माहित नाही कधी भेट होईल आपली ,पण एवढं नक्की माहित आहे कि भेट होईल कधीतरी कुठेतरी .. कुठल्यातरी वळणावर वा आयुष्याच्या या वाटेवर नक्की भेटशील तू मला .. आणि माझ्या पावलांसोबत जोडली जातील तुझी पाउलें ..  
भेटतील कधीतरी कुठेतरी 
आपल्या पावलांची वाट 
होईल पुढचा रस्ताही एक 
आणि सरेल हि आयुष्याची वाट .. 



                                                                            - सुधीर 

Saturday 19 August 2017

माझ्यातला 'मी' ..


माझ्यातला 'मी' .. 
सर्वांना बाहेरून सहसा न दिसणारा पण सतत बाहेर यायची धडपड करणारा तो माझ्यातला 'मी' .. 
माझ्यातला 'मी'  जो बाकीच्या जगापेक्षा आहे वेगळा ,आणि याच वेगळेपणामुळे तो मला खऱ्या अर्थाने 'मी' बनवतो ,मला मीपण देतो .. 
हा माझ्यातला 'मी'च आहे ज्यामुळे तुम्ही सर्व 'इतर' होता आणि मी होतो तुम्हा इतरांपेक्षा असा वेगळा .. 
माझ्यातला असा हा 'मी' अजूनही आहे माझ्या सोबत ,आयुष्यातला प्रत्येक क्षण जगताना तो मला भेटत असतो ,त्याचे अन माझ्या मनाचे संवाद हे तर सतत सुरूच असतात .. 
तो 'मी' माझ्याबरोबरच कधी हसतो तर कधी माझ्यावरच रुसतो ,काही आवडलं कि हट्ट करतो आणि काही नाही मिळालं कि हिरमुसून गुपचूप बसतो .. काही चांगलं झालं तर माझ्यासोबत आनंदी होणारा ,आणि काही दुःख झालं तर मन भरून आणून रडणारा सुद्धा तोच आहे ,माझ्यातला 'मी'  ..
माझ्याशी मनातल्या मनात भांडण करणारा तोच आहे ,आणि वेळोवेळो माझ्या मनाची समजूत काढणारा सुद्धा तोच आहे ,माझ्यातला 'मी' ..  
असा हा माझ्यातला 'मी' आहे अजूनही माझ्याच जवळ  .. 
पण तुमच्यातला तो 'मी' आहे का तुमच्याजवळ .. एकदा विचार करा ..  
मी हे काय करतोय ,कसं जगतोय ,खरच असच जगायचं आहे मला कि इच्छा नसताना समाजाच्या भीतीने असं जगावं लागतंय ,हा असा विचार जर दिवसातून एक क्षण जरी येत असेल तुमच्या मनात तर हरवला आहे तुमच्यातला तुमचा 'मी' .. 
जगाला दाखवायला म्हणून मला हे आवडत ,मला ते आवडत असं खोटं सांगताना मनातून खरच काय काय आवडत हे जर तुम्हाला लपवावं लागत असेल तर हरवला आहे तुमच्यातला तुमचा  'मी' .. 
आयुष्यातल्या सुंदर क्षणांना मनामध्ये आणि डोळ्यामध्ये न साठवता ते क्षण फक्त एखाद्या फोटोमध्ये साठवून तुम्हाला खोटा खोटा आनंद भेटत असेल तर हरवला आहे तुमच्यातला तो तुमचा 'मी' .. 
लोक काय म्हणतील या भीतीने तुमच्यातल्या खऱ्या 'मी'ला जर मनात कोंडून ठेवावं लागत असेल तुम्हाला तर हरवला आहे तुमच्यातला तो तुमचा 'मी' .. 
मग विचार करा ,खरचं आहे का तुमच्यातला 'मी' तुमच्या जवळ .. 
नसेल जवळ तर शोधा त्याला ,आहे तो कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात दडून बसलेला .. 
त्याला सोबतीला घेऊन आयुष्य आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण जगून तरी बघा .. कदाचित एक वेगळंच आयुष्य ,एक वेगळंच जग येईल तुमच्या वाट्याला .. 
कदाचित गवसेल तुम्हाला तुमच्यातला खरा 'मी' आणि गवसेल त्या 'मी'मध्ये दडलेलं तुमचं मीपण .. 
एकदा विचार करून बघा ...  
                                                माझ्यातला तो 'मी' अन 
                                                'मी' मधलं ते माझंपण ... 
                                                शेवटी आयुष्य म्हणजे हेच आहे 
                                                माझं अस्तित्व शोधण्याची 
                                                माझं मीपण गवसण्याची 
                                                चाललेली अविरत अशी वणवण ... 


                                                                                                                                                                                                             - सुधीर 
                                                                                       




Wednesday 19 July 2017

माझ्या मनाचा सागर ...


आज दूर अशा एका किनाऱ्यावर बसून मी पाहतोय माझ्या मनाच्या त्या सागराला .. 
तो माझ्या मनाचा सागर ,तो माझ्या मनाचा समुद्र खूप उद्विग्न आहे ,आणि खवळलेलासुद्धा आहे .. 
वादळापाठोपाठ दुसरे वादळ ,अशी कित्येक वादळे त्याने सहन केलीत ,आणि अजूनही तो अशीच वादळे सहन करतोय .. 
पण खरं तर वरून दिसायला तो कितीही खवळलेला दिसत असला ,तरी आतमध्ये एकदम खोलवर तो मात्र कमालीचा शांत आहे .. 
स्वतःच्या खोलीच्या ,स्वतःच्या अंतःकरणाच्या आणि स्वतःच्या शोधात तो मग्न आहे .. 
असा हा माझ्या मनाचा सागर  .. कोणालाही न दिसणारा ,आणि सहसा कोणालाही न समजणारा ... 


                                                                                        - सुधीर 

Wednesday 21 June 2017

तिचा देव ..


ती " आज आपण पूजेला गेलो होतो ,पण काय रे तुझं पूजेत लक्षच नव्हतं अजिबात .. "
थोडासा खट्याळ चेहरा करून तो " पूजा , कोण पूजा .. "
थोडस रागावून ती म्हणाली "हेच धंदे करा तुम्ही ,म्हणजे ऐकेल देव तुझं गाऱ्हाणं चांगलच ."
     तो "पण देव गाऱ्हाणे ऐकवायला थोडीच असतो .. मला सांग आपल्या आयुष्यात जे काही घडत ते त्या देवाच्याच इच्छेने ,मग त्याच्याच इच्छेने घडणाऱ्या गोष्टींबद्दल त्याच्याचकडे गाऱ्हाणे करायचं हे जरा विरोधाभास नाही का वाटत तुला .. आणि तसही देव तर आपल्या आतच आहे मग बाहेर कोणाकडे अन कशाला गाऱ्हाणे करायचं .."
     ती " मग तूच सांग ना ,देव काय आहे ,का आणि कोणाला मानतो देव आपण ,जर देव आपल्या आतच आहे तर मग बाहेर काय शोधतो आपण .."
      तो " सोप्प्या शब्दात सांगू का देव कोण आहे .. देव म्हणजेच मी आणि मी म्हणजेच देव ,देव म्हणजेच तू आणि तू म्हणजेच देव .. "
ती थोडं आश्चर्याने बघत काहीच न कळाल्याचे भाव घेऊन त्याच्याकडे बघत राहिली .. 
      तो " हे बघ ,देव तुझ्या माझ्या आतच आहे .. त्या आतल्या देवाला शोध ,तो आतला आवाज म्हणजेच तुझ्यातल्या त्या देवाचा आवाज आहे .. खरं तर लोक बाहेर शोधतात देवाला ,पण विचार केला तर किती जणांना देव भेटतो सांग बर  . ज्या लोकांना देव सापडला ,ते विवेकानंद किंवा ज्ञानेश्वर अथवा तुकाराम हे सर्व लोक ,यांनी आधी स्वतःला शोधलं ,स्वतःच्या आतला त्या आवाजाला ऐकलं .. म्हणजेच असं कि आधी त्यांनी स्वतःच्या आतला देव शोधला आणि मग या समाजाला दाखवून द्यायचा प्रयत्न केला कि देव काय आहे .. " 
ती "पटतंय तुझं म्हणणं मला .. पण काय रे मंदिरात सुद्धा कधी कधीच जाणारा तू , मग देवाबद्दल एवढा विचार तू कसा काय केला ?"
     तो " कारण तुझं हृदय आणि त्यात बसलेला तुझा देव .. तुझ्या या हृदयाचं आणि त्या देवाचं नातं एवढं घट्ट आहे कि तुम्हा दोघांना वेगळं करण शक्यच नाही .. म्हणूनच खर तर तुझ्या हृदयापर्यंत पोहोचायच असेल तर मला त्या देवापर्यंत पोहोचावं लागेल आधी ... "
हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं ते हलकस हसणं ,कदाचित त्यालासुद्धा त्याच्या देवाची एक झलक दाखवून गेलं असेल  ..  


                                                                                            - सुधीर





Sunday 7 May 2017

मन आणि मनाचा गोंधळ ....


ती त्याच्याकडे पाहत म्हणाली 
"तुला कसं जमत रे हे . कसं काय एवढा शांत असतोस तू . नेहमी एवढा शांत ,एवढा स्थिर कसा काय राहू शकतोस तू . तुझ्याकडे पाहिलं , तुझ्याशी बोललं कि असं वाटत हो माझ्या सर्व प्रश्नांची उत्तर मला नक्कीच मिळतील . तुझ्यासोबत नुसतं बोललं तरी एक वेगळीच शांतता जाणवते मनाला . मला तर ना तू एखाद्या शांत झऱ्यासारखा वाटतोस . एक शांत थंड पाण्याचा झरा , अजिबात आवाज न करणारा तरीपण स्वतःचाच एक वेगळा असा आवाज असणारा ,वरून दिसायला खूप शांत तितकाच आतून खूप खोल सुद्धा .. "
थोडस वैतागलेली ,पण शांत रहायचा प्रयत्न करणारी ती .. तिच्याकडे कौतुकाने पाहत होता तो .. 
ती पुढे म्हणाली 
"कधी कधी ना खूप कंटाळा येतो या सतत मनात येणाऱ्या विचारांचा ,माझं मन शांत राहतंच नाही कधी .. सतत प्रत्येक क्षणी मनात कुठलातरी विचार सुरूच असतो ,आणि त्या उमटणाऱ्या प्रत्येक विचारात एकतर मी गुंतून तरी जाते किंवा हा विचार का आला याचाच विचार करत बसते .. कधी भूतकाळात तर कधी भविष्यात ,हे मन सतत इकडून तिकडे हेलकावे खात असत .. कधी आयुष्याच्या समस्यांचा पाढा तर कधी लोकांच्या चुकीच्या वागण्याचा त्रागा सुरु असतो या मनात .. कधी होणार हे मन शांत माझं ,कधी थांबणार हे विचार काहीच समजत नाही .."
तिची उद्विग्नता पाहून तो म्हणाला 
"अग थांब ,थोडं थांब ,एवढा त्रास करून नको घेऊ स्वतःला . एक काम कर ,एक क्षण मोकळा श्वास घे आता आणि मी काय सांगतो ते शांतपणे ऎक .. 
तिला समजलं कि आता तिच्या या प्रश्नच उत्तर तिला मिळणार ,म्हणून तिच्या गालावर हलकस हसू आलं आणि तिने खरच एक मोकळा श्वास घेतला आणि त्याच्याकडं पाहून म्हणाली " सांग आता .. "
तो म्हणाला 
"का अडवतेस या विचारांना ,का येणाऱ्या प्रत्येक विचारामध्ये एवढं गुंततेस तू ? "
"मी जरी तुला झऱ्यासारखा वाटत असलो तरी तू मात्र समुद्र आहेस ,एक अथांग अशा मनाचा समुद .. फक्त तुला त्याची जाणीव नाही अजून .. आतमध्ये कितीही मोठं ,कितीही भयंकर असं वादळ उठलं तरी कमालीचा शांत राहायची क्षमता असते समुद्रामध्ये .. कारण त्याला त्याच्या खोलपणाचा अंदाज असतो .. म्हणूनच तो उठणाऱ्या सर्व वादळांना तटस्थपणे सामावून घेत असतो स्वतःमध्ये .. तो त्या वादळांमध्ये गुंतून न जाता त्यांना हवं तस मुक्त खेळू देतो आणि म्हणूनच तो बाहेरून एवढा शांत स्थिर राहू शकतो .. "
     "तुझं मन सुद्धा खूप खोल आहे .अगदी त्या समुद्रासारखं .. बस मनात येणाऱ्या विचारांना अडवण्याचा प्रयत्न नकोस करू .. तू स्वतः मनात उमटणाऱ्या विचारांमध्ये न गुंतत त्यांच्याकडे तटस्थ नजरेतून पहा .. चांगला काही विचार आला तर त्याच कौतुक कर ,वाईट काही असं आल मनात तर त्याला रागाव ,त्याच्यासोबत हसायचं सुद्धा ,खेळायचं सुद्धा आणि कधी कधी रडायचं सुद्धा ,पण थोडाच वेळ .. पुन्हा बाहेर यायचं आणि व्हायचं .. त्या विचारांना तुझ्या मनामध्ये जसं खेळायचं तस इकडून-तिकडून खेळू दे .. त्यांना जस वहायचं तस वाहू दे .. अगदी मुक्त संचार करू दे त्या विचारांना .. "
     " मग बघ ,खेळून खेळून थकलेलं एखाद लहान बाळ जस थकून जाऊन शांतपणे झोपत अगदी तसंच तुझ्या मनातले विचार सुद्धा स्थिर होऊन ,शेवटी शांत होईल तुझं मन  .."  



                                                                                - सुधीर 





Saturday 18 February 2017

तो दिवस ...


दिवस .. 
खरंच आयुष्यात चांगले दिवस किती आणि वाईट जाणारे दिवस किती येतात हे मी सांगायची गरज नाही .. 
आपण सर्वजण हे दिवस अनुभवत असतोच ..  
पण कधी कधी ना काही काही दिवस हे खरंच खूप वाईट जातात .. 
एखादी भयाण काळीकुट्ट अंधाराची रात्र असावी आणि त्यात भर म्हणून एकदम भयानक असं स्वप्न पडावं असे काही दिवस सर्वांच्या आयुष्यात नक्कीच येतात आणि नंतर काही काळाने निघून सुद्धा जातात .. 
पण 
या वाईट जाणाऱ्या दिवसांमध्ये तो एक चांगला गेलेला दिवस सुद्धा असतो .. 
खरं तर काहीतरी मनासारखं घडलेला ,किंवा काहीतरी अनपेक्षित असं घडून या मनाला अतिशय आनंद देऊन गेलेला तो दिवस असतो .. 
त्या दिवसाला मनाच्या एका कप्यात एकदम जपून ठेवा ,त्याची काळजी घ्या .. 
कितीही निराशेचे मळभ साचले या मनावर तरी त्या दिवसाच्या आठवणींना झाकून जाऊ देऊ नका .. 
कारण या संघर्षाच्या दिवसांमध्ये आणि भयाण स्वप्नांच्या रात्रीत ,तो दिवस ,त्या दिवसाच्या त्या चांगल्या आठवणी ,ते आनंदाचे क्षण याचाच खूप मोठा आधार मिळत असतो या मनाला .. 
तेव्हा नक्की जपून ठेवा त्या आठवणी , तो दिवस ... 


                                                                                                     - सुधीर

Sunday 8 January 2017

जाणिवेचा एकटेपणा ...


गच्चीवर कठड्याला हात टेकवून दोघे निवांत उभे होते .. 
पण ती आज कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती .. 
हे जाणवताच त्याने विचारलं "काय झालं ? कसला विचार करत आहेस ?" .. 
ती "मला ना आज खूप एकटं-एकटं वाटत आहे ,का कुणास ठाऊक पण सर्व आपली अशी माणसं जवळ असून सुद्धा मला त्यांच्यात असल्यासारखं वाटत नाहीये .. एक वेगळाच एकांतपणा जाणवतोय मनात ,असं वाटत कि कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन नुसतं बसावं ,तासनतास फक्त बसून राहावं " .. 
तो "मला सुद्धा कधी कधी असंच वाटत .. किंबहुना मला तर वाटत की आपल्यालाच नाही तर सर्वांनाच कधी ना कधी हे असं नक्कीच वाटत असणार ,गर्दीमध्ये असूनसुद्धा हा एकटेपणा नक्कीच जाणवत असणार " .. 
ती "बाकीच्यांचं नाही माहित पण मला नाही आवडत रे हा नसलेला पण तरीही जाणवणारा एकटेपणा .. कधी भविष्यात मी खरंच एकटी पडली तर मग काय करू .. आत्ता फक्त जाणवणारा हा एकटेपणा एक दिवस खरंच माझ्या वाट्याला आला तर कस करू ?मला तर काळजीच वाटते " .. 
तिचं हे बोलणं ऐकताना तो काहीच नाही बोलता फक्त समोर दूरवर पसरलेल्या क्षितिजाकडे पाहत होता  .. 
शेवटी न राहवून तिने त्याला विचारलं "तू काय करतोस रे असं एकटं एकटं वाटायला लागल्यावर ?? "
त्याने तिच्याकडं पाहिलं तर तिचा चेहरा एकदम चिंतातुर झाला होता .. 
तेव्हा तो गालातल्या गालात थोडंसं हसला आणि म्हणाला 
"एक काम कर .. ते समोर पसरलेलं क्षितिज पहा ,अगदी जिथपर्यंत तुझी आणि माझी नजर पोहोचते तिथपर्यंत पसरलेल ते क्षितिज .. एकाच वेळेला आभासी पण तरीही तितकच खरं आणि शाश्वत .. आणि असं उदाहरण दुसरं नाही सापडणार ,जे एकाच वेळी आभासी पण आहे आणि तितकंच खरं सुद्धा .. आभासी ,कधीही हाताला न येणारं .. जेवढं त्याच्या मागे जाशील तेवढं ते आणखीन पुढे पुढे सरकत जाणारं " .. 
"पण असं आभासी असूनसुद्धा ते शाश्वत असत आपल्या आयुष्यात .. तुझ्या-माझ्या आधीसुद्धा त्याच अस्तित्व होत ,आज आपण आहोत आणि तोसुद्धा आहेच आपल्यासोबत ,आणि आपल्यानंतरही त्याच अस्तित्व असेलच .. म्हणून कधीही एकटं-एकटं वाटलं ना कि मी या क्षितिजाकडे पाहतो .. तो असतो कायम इथे ,नेहमी माझ्या सोबत .. मी कुठेही गेलो तरी हा तिथे असतोच , मला कधीही एकटा पडू देत नाही हा .. आता इथे गच्चीवर सुद्धा आहे तो ,कधी एकट्याने प्रवास करताना खिडकीतून बाहेर पहिलं की हमखास दिसतोच तो ,कधी कधी निराशेने भरलेल्या एकट्या अशा काळोखाच्या रात्री खिडकीमध्ये येऊन पहिलं तरीसुद्धा तो असतोच तिथे ,जेव्हा जेव्हा एकटं-एकटं वाटलं तेव्हा तेव्हा तो सोबत होता आणि यापुढे सुद्धा असेलच " .. 
त्याच बोलणं ऐकण्यात हरवलेली ती नकळत त्या समोर दिसणाऱ्या क्षितिजाकडे पाहण्यात कधी गुंग झाली तिलासुद्धा नाही कळालं .. 

                                                                                                   - सुधीर