Saturday 19 August 2017

माझ्यातला 'मी' ..


माझ्यातला 'मी' .. 
सर्वांना बाहेरून सहसा न दिसणारा पण सतत बाहेर यायची धडपड करणारा तो माझ्यातला 'मी' .. 
माझ्यातला 'मी'  जो बाकीच्या जगापेक्षा आहे वेगळा ,आणि याच वेगळेपणामुळे तो मला खऱ्या अर्थाने 'मी' बनवतो ,मला मीपण देतो .. 
हा माझ्यातला 'मी'च आहे ज्यामुळे तुम्ही सर्व 'इतर' होता आणि मी होतो तुम्हा इतरांपेक्षा असा वेगळा .. 
माझ्यातला असा हा 'मी' अजूनही आहे माझ्या सोबत ,आयुष्यातला प्रत्येक क्षण जगताना तो मला भेटत असतो ,त्याचे अन माझ्या मनाचे संवाद हे तर सतत सुरूच असतात .. 
तो 'मी' माझ्याबरोबरच कधी हसतो तर कधी माझ्यावरच रुसतो ,काही आवडलं कि हट्ट करतो आणि काही नाही मिळालं कि हिरमुसून गुपचूप बसतो .. काही चांगलं झालं तर माझ्यासोबत आनंदी होणारा ,आणि काही दुःख झालं तर मन भरून आणून रडणारा सुद्धा तोच आहे ,माझ्यातला 'मी'  ..
माझ्याशी मनातल्या मनात भांडण करणारा तोच आहे ,आणि वेळोवेळो माझ्या मनाची समजूत काढणारा सुद्धा तोच आहे ,माझ्यातला 'मी' ..  
असा हा माझ्यातला 'मी' आहे अजूनही माझ्याच जवळ  .. 
पण तुमच्यातला तो 'मी' आहे का तुमच्याजवळ .. एकदा विचार करा ..  
मी हे काय करतोय ,कसं जगतोय ,खरच असच जगायचं आहे मला कि इच्छा नसताना समाजाच्या भीतीने असं जगावं लागतंय ,हा असा विचार जर दिवसातून एक क्षण जरी येत असेल तुमच्या मनात तर हरवला आहे तुमच्यातला तुमचा 'मी' .. 
जगाला दाखवायला म्हणून मला हे आवडत ,मला ते आवडत असं खोटं सांगताना मनातून खरच काय काय आवडत हे जर तुम्हाला लपवावं लागत असेल तर हरवला आहे तुमच्यातला तुमचा  'मी' .. 
आयुष्यातल्या सुंदर क्षणांना मनामध्ये आणि डोळ्यामध्ये न साठवता ते क्षण फक्त एखाद्या फोटोमध्ये साठवून तुम्हाला खोटा खोटा आनंद भेटत असेल तर हरवला आहे तुमच्यातला तो तुमचा 'मी' .. 
लोक काय म्हणतील या भीतीने तुमच्यातल्या खऱ्या 'मी'ला जर मनात कोंडून ठेवावं लागत असेल तुम्हाला तर हरवला आहे तुमच्यातला तो तुमचा 'मी' .. 
मग विचार करा ,खरचं आहे का तुमच्यातला 'मी' तुमच्या जवळ .. 
नसेल जवळ तर शोधा त्याला ,आहे तो कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात दडून बसलेला .. 
त्याला सोबतीला घेऊन आयुष्य आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण जगून तरी बघा .. कदाचित एक वेगळंच आयुष्य ,एक वेगळंच जग येईल तुमच्या वाट्याला .. 
कदाचित गवसेल तुम्हाला तुमच्यातला खरा 'मी' आणि गवसेल त्या 'मी'मध्ये दडलेलं तुमचं मीपण .. 
एकदा विचार करून बघा ...  
                                                माझ्यातला तो 'मी' अन 
                                                'मी' मधलं ते माझंपण ... 
                                                शेवटी आयुष्य म्हणजे हेच आहे 
                                                माझं अस्तित्व शोधण्याची 
                                                माझं मीपण गवसण्याची 
                                                चाललेली अविरत अशी वणवण ... 


                                                                                                                                                                                                             - सुधीर