Monday 30 June 2014

ही पंढरीची वारी .....

           

       खर पाहायचं तर मी वारकरी संप्रदायाला मानतो त्याचं कारण कुठल कर्मकांड नाहीये तर आजच्या समाजात प्रबोधन करण्याची या संप्रदायात असलेली शक्ती .. ज्ञानोबा तुकोबा असो व गोरा कुंभार व बहिणाबाई ,या संतांचे विचार नीट अभ्यासले आणि ते सर्वांपर्यंत पोहोचवले तर आपल्याला समाजात आणि व्यक्तिगत आयुष्यात भेडसावणाऱ्या सर्व समस्यांची उत्तरे मिळून जातील .. याच संप्रदायाला समजून घेण्यासाठी ,जवळून पाहण्यासाठी या वर्षी मी माझी पहिली-वहिली वारी केली .. खर तर कित्येक वर्षांपासून मी माळकरी होतो ,आता खऱ्या अर्थाने वारकरी पण झालो ..
                   जास्त दिवस शक्य नसल्याने दोन दिवसच जमलं दिंडीसोबत जायला ,पण या दोन दिवसांचा अनुभव सुद्धा अत्यंत विलक्षण होता .. वारीला जाण्याचा माझा उद्देश कुठला देव-देव करणे नसून , मला पाहायचं होता हा दरवर्षी भरणारा अनोखा सोहळा ,जगायचं होत थोड वेगळ आयुष्य ,घ्यायचा होता आयुष्यातला एक अगदी वेगळा अनुभव ..
                आम्ही दोघ मित्र गेलो वारीला आणि वारीला गेल्यानंतर पहिली गोष्ट जी मला प्रकर्षाने जाणवली ते म्हणजे किती अनोखा सोहळा आहे हा .. म्हणजे जिथ आजकाल आपल शेजारी कोण हे माहित नसलेला समाज वाढत आहे तिथ हि एकमेकांना न ओळखणारी वारकरी मंडळी थोड्या-थोडक्या नव्हे तर लाखोंच्या संख्येने एकत्र येतात .. आणि नुसती एकत्र येत नाहीत तर या १८ दिवसात ती एकमेकांना जीव लावतात ,एकमेकांची काळजी घेतात .. माझ्यासाठी हा अनुभव अगदी नवीन होता ,अस वाटल कि खरच माणसांच्या जगात आलोय मी जिथे माणुसकी ठासून ठासून भरली आहे ..
                  मला तर एका आजीबाई नी त्यांचा नातूच मानलं .. माझ नाव घ्यायला त्यांना अवघड वाटायचं तर त्यांनी माझ नाव सुदामन ठेवल .. मी निघून येताना त्या मला म्हणाल्या कि ' हा घे माझ्या मुलाचा नंबर ,आणि कधीपण कॉल कर आणि म्हण कि तुमचा नातू बोलतोय ,मी समजून घेईन तू आहेस म्हणून ' .. खरच अद्भुत आहे या वारकरी मंडळींची माया .. आम्हा दोघांची ही पहिलीच वारी असल्याने दिंडी मधल्या सर्व वारकऱ्याच लक्ष आमच्यावरच असायचं ,आम्हाला नवीन-नवीन भजन ऐकवून दाखवत ,रस्त्याने चालताना ती भजने आवर्जून म्हणायला लावत ,वारकर्यांचा तो भगवा झेंडा आमच्या हाती देऊन आम्हालाच दिंडीच्या पुढे चालायला लावत .. नि हातात टाळ घेऊन आम्हाला भजन म्हणायला लावून ते फार कौतुकाने पाहायचे ,कारण टी-शर्ट जीन्स मधल्या मुलांना अस भजन म्हणताना पाहण्याचा योग त्यांनासुद्धा क्वचितच मिळाला असेल .. दिंडीच्या विणेकरी बाबांनी माझ्या हात वीणा दिली ,मला ती वाजवता नाही आली पण त्यावर थोडेफार आवाज मात्र काढता आले .. असो ..
               आज जिथे आपले सख्खे आपल्याला आपल मानत नाहीत तिथ या दोन दिवसात या अनेक अनोळखी माणसांनी आपल मानलं आणि आपल्या माणसांसारखी माया लावली .. आणि निघून येताना सर्वजण ,अगदी सर्वजण न विसरता आवर्जून म्हणाले कि पुढल्या वर्षी तुम्ही यायचं आणि पूर्ण १८ दिवस आमच्यासोबत चालायचं .. अस वाटल कि हा त्यांचा निरोप नाहीये तर पुढच्या वर्षीसाठीचं हक्काचं बोलावणचं होत .. एवढ्या हक्काने आजपर्यंत आई-बाबा सोडून कुणीसुद्धा बोलावलं नव्हत .. आणि म्हणूनच आम्हाला तिथून निरोप घेण खरच अवघड झाल होत ..
              .. आणि खरच या वारी ला जाऊन ज्या गोष्टी शिकायला मिळतात ,ज्या गोष्टी पाहायला अनुभवायला मिळतात त्या दुसरीकडे कुठेही मिळण शक्य नाही ..
                  पुढच्या वर्षी आणि यापुढील प्रत्येक वर्षी माझा प्रयत्न नक्की असेल की जमेल तेवढे दिवस हि आनंदाची वारी करण्याचा ,हा जगावेगळा अनुभव जगुन ,अजूनही आपण माणुसकी असलेल्या माणसांच्या दुनियेत राहतो हि जाणीव जगण्याचा .. म्हणून एक वाक्य अगदी खरय ,
                                       ही पंढरीची वारी
                                       जणू आनंदाची वारी ….

                                                                                                                             - सुधीर
                                                                                                                                 9561346672

Wednesday 18 June 2014

का लिहितो मी ….

                   
                   
                         लिहिण ,एका शब्दापासून सुरु झालेला हा प्रवास कधी या शब्दांच्या जगात मला ओढून घेऊन गेला हे मला कळलेही नाही .. ब्लॉग लिहायला सुरुवात केल्यापासून वाचणार्यांचा मिळणारा प्रतिसाद उत्तम आहे ,पण याचा अर्थ असा होत नाही कि मी जे लिहितो ते सर्व आणि सर्वांनाच पटत ,आणि ते नैसर्गिकच आहे.. असो .. मला अनेकजण विचारतात कि तुला ब्लॉग लिहायची काय गरज ? तेव्हा माझ उत्तर अगदी साधं असत कि वाचणाऱ्यापैकी एकाला जरी त्याला जगण्यात पडणाऱ्या अनेक प्रश्नांपैकी एका जरी प्रश्नाचं उत्तर मिळायला या माझ्या लिखाणाची मदत झाली तरी खूप आहे ..
                       आजकाल लोकांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन फार विचित्र झालेला आहे .. आपल घर ,आपल कुटुंब ,आपला पैसा यापलीकडे कोणी कोणाचा विचार करायला तयारच नाही .. याबातीत शिवाजी महाराजांवर व्याख्यान देत समाजजागृतिचा प्रयत्न करणारे नितीन पायगुडे पाटील याचं वाक्य मला फार आवडत .. ते म्हणतात आजकालच्या तरूणांच आयुष्य फक्त ३ गोष्टींवर फिरत राहत ,'माझी गाडी ,माझी माडी आणि माझ्याच बायकोची गोल गोल साडी ' .. आणि हे खर आहे ,आजकालचे तरुण-तरुणी पाहता ,समाजात सुधारणा कशी होईल याबद्दल कुणी फेसबुक च्या कमेंटच्या पलीकडे जाऊन प्रयत्न करताना दिसत नाही .. देखावा करणाऱ्यांची संख्या खूप वाढलीये ,आणि खरी काळजी करणाऱ्यांची संख्या कमी झालीय …. 
                      स्वतः चा फोटो सेल्फी या गोंडस नावाखाली सगळ्यांना दाखवणारे खूप आहेत ,पण स्वतःच 'स्व' अर्थात 'सेल्फ' ओळखून ते जगासमोर मांडणारे फार कमी आहेत .. फेसबुक वर दुसऱ्यांच्या फोटो ला धडाधड लाइक करणारे तर खूप आहेत पण त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात असणाऱ्या ,जी साक्षात जिवंत हाडामासाची बनलेली माणसे असतात , त्यांना व त्यांच्यासोबतच्या असणाऱ्या नात्यांना मनापासून लाईक करणारे फार कमी आहेत .. या बाबतीत एक वाक्य मला सांगावस वाटत ,कि आजच्या जगात जिथे जग आणि जगण याचा विचार करणाऱ्या माणसांची कमी आहे ,तिथे जे कोणी असा विचार करत असतील ,त्यांनी शांत न राहता त्यांचे विचार मांडणे फार गरजेचे आहे ,कारण समाजाची नैतिक मुल्ये वाढवण हि काळाची व समाजाची गरज होऊन बसली आहे …
                      मला हा हि प्रश्न विचारला एकाने कि तू फक्त जगण ,नाती किंवा मानवी भावना याबद्दल का लिहितोस ,समाजात घडणाऱ्या चुकीच्या घटनांबद्दल का नाही लिहित ? माझ अस मत आहे कि आपण समाजातली प्रश्ने तेव्हाच सोडवू शकू जेव्हा आपल्याला मनात पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास मिळतील ,आपण समाजाचं मन तेव्हाच ओळखू शकू जेव्हा आपण आपल्या मनाला ओळखू शकू ,समाजासोबत आपल नात तेव्हाच घट्ट होईल जेव्हा आपल्या घराच्या माणसांसोबत आपली नाती घट्ट होतील  .. शेवटी कवी दत्त हलसगीकर यांच्या कवितेतल्या काही ओळी सांगाव्याशा वाटतात .. ते म्हणतात 
      ज्यांची बाग फुलुनी आली 
                           त्यांनी दोन फुले द्यावीत 
    ज्यांचे सूर जुळुनी आले 
                                 त्यांनी दोन गाणी द्यावीत … 
          आभाळी एवढी उंची ज्यांची 
                       त्यांनी थोडं खाली यावे 
         मातीत यांची जन्म मळले
                                     त्यांना खांद्यावरती घ्यावे  …. 


                                                  - सुधीर
                                                              9561346672

Sunday 8 June 2014

कधीतरी .. कुठेतरी ..

               
                        मला रोज प्रेम होत .. हे वाक्य वाचून तुम्हाला वाटेल कि बिघडलेला मुलगा दिसतोय हा .. पण हे खर आहे .. मला रोज प्रेम होत तिच्यावर ,जी अजूनही माझ्या आयुष्यात आली नाही .. मला ना तिचं नाव माहित्येय ना तिचं गाव ,ना ती कशी दिसते हे माहित्ये न ती कशी बोलते हे माहित्येय .. माहित आहे फक्त एकच गोष्ट ,कि that is my love and someday I'll definitely meet her at some point .....
             काही नशीबवान लोकांना हे प्रेम आयुष्यात फार लवकर आणि सहजरीत्या मिळत तर माझ्यासारख्या काहींना हे प्रेम फक्त स्वप्नांमध्ये आणि कवितांमध्ये मिळत .. ज्यांना मिळालं आहे त्याचं खर तर नशीब म्हणायचं आणि ज्यांना अजूनही मिळालं नाही त्यांचही नशीब म्हणायचं .. कारण ज्यांना अजूनही प्रेम मिळाल नाही त्या लोकांना हे न मिळालेलं प्रेम शिकवत आयुष्यात आशावादी व्हायला .... 
                   मी या आशावादी अशा लोकांपैकीच एक आहे .. आज ना उद्या ,इथे नाही तर तिथे ,आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर ,जे माझ असेल ते प्रेम मला भेटेल असा विश्वास या हृदयाला कायम वाटत असतो .. म्हणूनच तर माझ्यावर प्रेम करणारी 'ती' कशी असेल याची स्वप्न पाहण ,'ती' आल्यानंतर आयुष्य कस असेल याची कल्पना करणे ,हे आमच्यासारख्यांच कल्पनाविश्व होऊन बसतं .... 
              येणाऱ्या पावसाची प्रत्येक सर ,जाणवणारी वाऱ्याची प्रत्येक झुळूक , डोळ्यांना दिसणारं प्रत्येक सुंदर दृश्य , ऐकू येणार प्रत्येक मधुर संगीत , ओठावर अलगदरीत्या येणार प्रत्येक गाणं आणि मनाला आनंद देतानाच ओठांवर हलकंच हसू आणणारा प्रत्येक क्षण हे सर्व जणू त्या भविष्यातल्या प्रेमाच्या आशेला आणखी पल्लवित करत असतं .. संथ सुटलेल्या वाऱ्याची झुळूक लागताच एखाद्या झाडाचं पान जस हळूच इकडे-तिकडे डुलत असत ,तसंच रोजच्या या जगण्यात एक जरी निवांत क्षण मिळाला कि हे हृद्य त्या क्षणात त्या पानाप्रमाणे प्रेमाच्या स्वप्नांमध्ये डुलू लागतं .... 
              कुणीतरी भेटेल जिच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास टाकू ,कुणीतरी भेटेल जिच्यावर मनसोक्त प्रेम करू ,कुणीतरी येईल जी मनातल्या प्रत्येक भावना न सांगता ओळखेल ,कुणीतरी असेल जी आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपला हात हातात घेऊन म्हणेल कि 'चल पुढे ,मी आहेच कि तुझ्यासोबत ' .. कळत-नकळतपणे या सर्व आशा ,सर्व स्वप्न , ही आयुष्य हसत-खेळत जगण्याची प्रेरणा बनून जातात .. शिकवून जातात एक जगण्याची अनोखी पद्धत , भविष्याकडे डोळे लावून आनंदी आयुष्य जगण्याची पद्धत   , आयुष्यात न आलेल्या व्यक्तीवर सुद्धा मनापासून प्रेम करण्याची पद्धत , नकळतपणे येणाऱ्या सर्व नकारात्मक विचारांना दूर करून मनात कायम आशेची पणती तेवत ठेवण्याची पद्धत .. आणि सर्वात महत्वाचं या जगण्यावर ,या आयुष्यावर प्रेम करण्याची पद्धत ..… 
                 म्हणून अस म्हणन वावग ठरणार नाही ,कि आयुष्यात प्रेम मिळो वा न मिळो , प्रेम मिळेल आणि प्रेम होईल ही प्रेमाची स्वप्न उराशी घेऊन जगण ,यात एक वेगळीच मजा आहे .. ती मजा एकदा घेऊन तरी बघा .. या स्वप्नामध्ये एकदा हरवून तरी बघा ….

                                                                                                                             - सुधीर
                                                                                                                                

Monday 2 June 2014

ब्रेक घेऊन तरी बघा …

                 
               नुकतच एका परीक्षेच्या निमित्ताने एक प्रयोग करून पहिला .. परीक्षेच्या तयारीमध्ये मन गुंतवायचच आहे तर १-२ महिने जर बाकीच्या सर्व गोष्टींपासून ब्रेक घेऊन पाहू असा विचार मनात आला .. आणि खरच या काळात हा एकटेपणा जगण्याची एक नवीन बाजू शिकवून गेला .. 
                स्वतःच्या अंगा-खांद्यावर वाढलेले पाने जेव्हा पिकतात ,हिरव्याची पिवळी होतात तेव्हा त्या झाडावरून ती हळू-हळू गळू लागतात आणि तेव्हा ते झाड सुद्धा त्यांच्या जाण्याने दुखी न होता ,येणाऱ्या नव्या पालव्या ,नव्या पानांच्या स्वागताच्या तयारीला लागते .. आपल्या हि आयुष्यात असाच काहीतरी असत .. अनेक माणस येतात आणि अनेक जातात आपल्या आयुष्यातून ,काही काही तर अगदी डोळ्यादेखत निघून जातात दूर .. पण म्हणून का निराश व्ह्यायचं ? तर अजिबात नाही .. 
                  यासाठी एक सोप्पा पण अवघड उपाय म्हणजे एक मस्त ब्रेक घ्या या सर्वापासून ..  कुठल्यातरी कामात ,कुठल्यातरी गोष्टीत मन पूर्णपणे गुंतवून टाका .. पूर्ण वेळ काम शक्य नाही म्हणून अधून-मधून काहीतरी मनोरंजन किंवा टाइमपास साठी काहीतरी जवळ राहू द्या .. संगीत किंवा गाणे हे सर्वात उत्तम .. पण यातही रडक्या गाण्यांपासून सावध राहा आणि त्या प्रत्येक गोष्टीपासून सावध राहा जी तुम्हाला भूतकाळातल्या आठवणींशी जोडते … 
                   नवीन पुस्तके वाचा ,एखादा नवीन छंद जोपासा ,नवीन अनोळखी माणसांशी बोलून पहा ,आणि अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी करून पहा ज्या करायची मनात इच्छा तर होती पण काही कारणास्तव कधी जमलच नव्हत .. सुरुवातील याचा त्रास होईल ,एकटेपणा अधून-मधून सारख डोक वर काढेल ,आठवणी सारख्या सारख्या मनात कूस बदलतील ,तरी न हारता ,दुखी व्हायच नाही हे मनाशी पक्क ठरवून पुढे जात राहा .. 
             आणि काही दिवसातच तुम्हाला हे जाणवायला लागेल ,कि अरे आपल्या आयुष्यात आपण उगाच नको त्या गोष्टींपासून स्वतःला दुखी करून घेत होतो .. या काळात जगण्याची पद्दत थोडीशी बदलल्याने ,तुमच्यातला एक नवा 'मी' तुम्हाला हळू हळू जाणवायला लागेल ,एका नव्या स्वत्वाची ओळख व्हायला लागेल .. एखादी नवीन गोष्ट केल्यावर जेव्हा आपल्याला जाणवत ना कि 'अरेच्चा मला हेपण जमते' ,तेव्हा मनाला जो आनंद मिळतो आणि आपला स्वतःबद्दलचा जो आत्मविश्वास वाढतो ,तो क्षण शब्दात नाही सांगता येणार .. तो फक्त अनुभवायचा चं क्षण आहे .. 
              म्हणून एक छोटा किंवा मोठा ब्रेक घेऊन तरी बघा ,स्वतःला नव्याने शोधून तरी बघा ,आत दडलेला एक नवीन 'मी' शोधून तरी बघा …

                                                                                                       - सुधीर