Tuesday 10 March 2020

उच्च हे स्त्रीत्व ..


काल 9 मार्च होता .. 
म्हणजेच जागतिक महिला दिन .. 
काल दिवसभर सर्व वयातील सर्व स्तरातील स्त्रियांना वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता .. 
नेटवरून उधारीवर घेतलेले फोटो, काही छान अशा कविता पोस्ट करून वेगवेगळ्या माध्यमातून आपण कसे स्त्रीचा सन्मान करतो हे दाखवायची चढाओढ लागली होती .. वर्तमानपत्रांमध्ये ' स्त्री ' बद्दल भरपूर असे लेख वाचायला भेटले, वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली काम करणाऱ्या स्त्रियांचा सन्मान व त्यांच्या कहाण्या टीव्ही वर पाहायला भेटला... पण हे सर्व काल बघत असताना माझ्या मनात एक साधा प्रश्न आला .. 
खरच किती लोक , खासकरून किती पुरुष , मनात सुप्त पुरुषी अहंकार न आणता , आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्री ला योग्य तो सन्मान आणि वागणूक देतात ???? 
मुळातच,  आम्ही पुरुष उच्च आणि स्त्री ही पुरुषापेक्षा कमी, अशी समजूत असणाऱ्या पुरुषांची संख्या काढली तर थक्क होणारी आकडेवारी समोर येईल ..
किंबहुना , स्त्रियांमध्ये सुद्धा , आम्ही पुरुषांपेक्षा कमीच असतो अशी भावना असते, आणि ही भावना असते म्हणण्यापेक्षा या पुरुषप्रधान संस्कृती मध्ये ही भावना लहान वयापासून त्या मुलींमध्ये भरवली जाते , व नंतर ती त्या स्त्री मध्ये तशीच राहते आयुष्यभर ..
मग आपण का म्हणून शुभेच्छा देतोय स्त्रियांना ..
  1. एकांतामध्ये पत्नीला सन्मान आदर न देता , तिला मनात येतील त्या आई बापावरून शिव्या देणाऱ्या
  2. सासरी गेल्यावर माझे पाय तिकडच्या लोकांनी धुतले पाहिजेत असं म्हणून स्वतःला जावई अर्थात पुरुष म्हणून उच्च समजणाऱ्या जावयाला ,
  3. स्वतः घराबाहेर शंभर ठिकाणी तोंड मारून झाल्यावर सुद्धा पत्नीकडे घरी संशयाने बघणाऱ्या त्या माणसाला,
  4. मला मुलगी नकोय म्हणून स्वतःच्याच हाताने स्वतःच्या 1-2 महिन्यांच्या लेकीचा जीव घेणाऱ्या त्या त्या प्रत्येक पुरुषाला ,
  5. आणि त्याच्या या नकली पुरुषार्थ गाजवण्यात त्याला साथ देणाऱ्या त्या प्रत्येक स्त्रीला मला हेच म्हणायचे आहे की , का साजरा करायचा हा महिला दिंन ..
खर तर हे अख्खं आयुष्यच , एका आई च्या रूपातून एका स्त्री ने आपल्याला दिलं आहे , आणि आपल्याला अख्खं आयुष्य देणाऱ्या त्या स्त्री ला आपण काय देतो तर फक्त एका दिवसाचं कौतुक , एका दिवसाचं सन्मान , तो सुद्धा मनापासून न देता फक्त वरवरचा आणि खोटा खोटा ....
जर आयुष्यात उच्च अस काही करायचं असेल , तर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सन्मानाने वागवा.. मग बघा , तिच्याकडून एवढं प्रेम भेटेल की कशाचीच कमी नाही भासणार ..
प्रत्येक स्त्री , मग ती मुलगी असो वा पत्नी असो वा आई असो वा मैत्रीण असो , ती जन्मतः स्वतंत्र असते .. तिच्या स्वातंत्र्याचा सन्मान करा .. 


आणि हो, स्त्री पुरुष समान आहे अस मी मुळीच मानत नाही .. स्त्री ही पुरुषापेक्षा काकणभर वरतीच असते , हेच सत्य आहे .....


              - सुधीर