Sunday 7 May 2017

मन आणि मनाचा गोंधळ ....


ती त्याच्याकडे पाहत म्हणाली 
"तुला कसं जमत रे हे . कसं काय एवढा शांत असतोस तू . नेहमी एवढा शांत ,एवढा स्थिर कसा काय राहू शकतोस तू . तुझ्याकडे पाहिलं , तुझ्याशी बोललं कि असं वाटत हो माझ्या सर्व प्रश्नांची उत्तर मला नक्कीच मिळतील . तुझ्यासोबत नुसतं बोललं तरी एक वेगळीच शांतता जाणवते मनाला . मला तर ना तू एखाद्या शांत झऱ्यासारखा वाटतोस . एक शांत थंड पाण्याचा झरा , अजिबात आवाज न करणारा तरीपण स्वतःचाच एक वेगळा असा आवाज असणारा ,वरून दिसायला खूप शांत तितकाच आतून खूप खोल सुद्धा .. "
थोडस वैतागलेली ,पण शांत रहायचा प्रयत्न करणारी ती .. तिच्याकडे कौतुकाने पाहत होता तो .. 
ती पुढे म्हणाली 
"कधी कधी ना खूप कंटाळा येतो या सतत मनात येणाऱ्या विचारांचा ,माझं मन शांत राहतंच नाही कधी .. सतत प्रत्येक क्षणी मनात कुठलातरी विचार सुरूच असतो ,आणि त्या उमटणाऱ्या प्रत्येक विचारात एकतर मी गुंतून तरी जाते किंवा हा विचार का आला याचाच विचार करत बसते .. कधी भूतकाळात तर कधी भविष्यात ,हे मन सतत इकडून तिकडे हेलकावे खात असत .. कधी आयुष्याच्या समस्यांचा पाढा तर कधी लोकांच्या चुकीच्या वागण्याचा त्रागा सुरु असतो या मनात .. कधी होणार हे मन शांत माझं ,कधी थांबणार हे विचार काहीच समजत नाही .."
तिची उद्विग्नता पाहून तो म्हणाला 
"अग थांब ,थोडं थांब ,एवढा त्रास करून नको घेऊ स्वतःला . एक काम कर ,एक क्षण मोकळा श्वास घे आता आणि मी काय सांगतो ते शांतपणे ऎक .. 
तिला समजलं कि आता तिच्या या प्रश्नच उत्तर तिला मिळणार ,म्हणून तिच्या गालावर हलकस हसू आलं आणि तिने खरच एक मोकळा श्वास घेतला आणि त्याच्याकडं पाहून म्हणाली " सांग आता .. "
तो म्हणाला 
"का अडवतेस या विचारांना ,का येणाऱ्या प्रत्येक विचारामध्ये एवढं गुंततेस तू ? "
"मी जरी तुला झऱ्यासारखा वाटत असलो तरी तू मात्र समुद्र आहेस ,एक अथांग अशा मनाचा समुद .. फक्त तुला त्याची जाणीव नाही अजून .. आतमध्ये कितीही मोठं ,कितीही भयंकर असं वादळ उठलं तरी कमालीचा शांत राहायची क्षमता असते समुद्रामध्ये .. कारण त्याला त्याच्या खोलपणाचा अंदाज असतो .. म्हणूनच तो उठणाऱ्या सर्व वादळांना तटस्थपणे सामावून घेत असतो स्वतःमध्ये .. तो त्या वादळांमध्ये गुंतून न जाता त्यांना हवं तस मुक्त खेळू देतो आणि म्हणूनच तो बाहेरून एवढा शांत स्थिर राहू शकतो .. "
     "तुझं मन सुद्धा खूप खोल आहे .अगदी त्या समुद्रासारखं .. बस मनात येणाऱ्या विचारांना अडवण्याचा प्रयत्न नकोस करू .. तू स्वतः मनात उमटणाऱ्या विचारांमध्ये न गुंतत त्यांच्याकडे तटस्थ नजरेतून पहा .. चांगला काही विचार आला तर त्याच कौतुक कर ,वाईट काही असं आल मनात तर त्याला रागाव ,त्याच्यासोबत हसायचं सुद्धा ,खेळायचं सुद्धा आणि कधी कधी रडायचं सुद्धा ,पण थोडाच वेळ .. पुन्हा बाहेर यायचं आणि व्हायचं .. त्या विचारांना तुझ्या मनामध्ये जसं खेळायचं तस इकडून-तिकडून खेळू दे .. त्यांना जस वहायचं तस वाहू दे .. अगदी मुक्त संचार करू दे त्या विचारांना .. "
     " मग बघ ,खेळून खेळून थकलेलं एखाद लहान बाळ जस थकून जाऊन शांतपणे झोपत अगदी तसंच तुझ्या मनातले विचार सुद्धा स्थिर होऊन ,शेवटी शांत होईल तुझं मन  .."  



                                                                                - सुधीर