Thursday, 8 December 2016

एका प्रेमाची गोष्ट ..


ती "आज तू एवढा शांत शांत का आहेस ? काही झालंय का ?"
तो "तुला एक सांगू का ?"
ती "सांग ना ,त्यात विचारायचं काय "
तो "मला आजकाल भीती वाटते खूप तुझ्यासोबत बोलायची ."
     "कारण ,जेव्हा तुझ्याशी बोलतो ना तेव्हा असं कधीच होत नाही कि माझ्या मनात काहीतरी वेगळे विचार सुरु आहेत ,आणि फक्त माझे ओठ हालत आहेत ,किंवा काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलत असतो असं सुद्धा नाही .. खरं तर तुझ्याशी बोलताना मी नसतोच बोलत ,बोलत असत ते माझं मन .. आणि हे मन इतक्या आवेगानं ,इतक्या इच्छाशक्तीनं सर्व मनातले शब्द ,सर्व भावना बाहेर पाठवत असत कि या ओठांनाही शक्य होत नाही त्यांना थांबवणं ."
    "आणि मी या आधी कोणासमोरही जेव्हा जेव्हा माझं मन असं मोकळं तेव्हा तेव्हा समोरच्या व्यक्तीने या मनाची किंमत नाही केली .. म्हणून भीती वाटते तुझ्यासमोर मन मोकळं करायची ."
त्याच हे बोलणं ऐकून ती फक्त हलकंसं गालातल्या गालात हसली .काही क्षण ते दोघेही काहीच न बोलता फक्त समोरचा तो मावळणारा सूर्य पाहत उभे राहिले .. काही वेळाने तिने त्याचा हात हातात घेतला ,आणि पुन्हा ती त्या सूर्याकडे ,त्याच्या बदलत जाणाऱ्या मावळतीच्या रंगाकडे पाहत तशीच उभी राहिली ..
त्याला जाणवलं कि तिने त्याचा हात खूप घट्ट पकडून ठेवला आहे .. तिला काय म्हणायचंय हे त्याला समजलं .. आणि याच निःशब्द शांततेत ,समोर क्षणाक्षणाला मावळत जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने एक प्रेमाची ,एका विश्वासाची गोष्ट कदाचित सुरु झाली .... 



                                                                                              - सुधीर


3 comments: