Sunday 10 January 2016

शोध ....



शोध ..
तसा हा शब्द दिसायला फार छोटा आणि सोपा आहे ,तरी या शब्दात आपल अख्खं आयुष्य सामावलेलं असत .. 
          आपल्या आयुष्यात आपण नेहमी कशाचा ना कशाचा शोध घेतच असतो .. मग ते कळत किंवा नकळत घेत असो ,पण आपल मन हा 'शोध' घेत असतच .. काही जणांना जाणवत कि ते काय शोधत आहेत आणि ते त्या शोधाच्या मार्गावर प्रवासाला निघतात सुद्धा ,पण बरेच जण आपण काय शोधत आहोत हेच न कळल्याने ,त्या 'शोधा'च्या शोधातच पूर्ण आयुष्य घालवतात .. 
          एक व्यक्ती एकच गोष्ट शोधत असतो असही नाही बर का ,तर एकाच व्यक्तीच्या आयुष्यात अनेक शोध सुद्धा असू शकतात .. कधी सुखाचा शोध तर कधी प्रेमाचा शोध ,कधी कुणाच्या आधाराचा शोध तर कधी मायेच्या दोन शब्दांचा शोध .. कधी यशाचा शोध तर कधी त्या यशाकडे नेणाऱ्या मार्गाचा शोध .. चालता चालता थकलो तर विसाव्याचा शोध तर कधी तात्पुरत्या विसाव्यापेक्षा कायमच्या त्या आसऱ्याचा शोध .. कधी स्वतःमध्ये डोकावून स्वतःचा शोध ,तर कधी आकाशाकडे पाहत त्या परमेश्वराचा शोध .. 
        या अशा अनेक शोधांमुळे या जगण्याला काही उद्देश मिळतो ,एवढच नव्हे तर याच शोधामुळे आपल्या आयुष्यात निर्माण होतात नवनवीन नाती ,आपल्या या शोधाच्या प्रवासात येउन जुळतात नवीन माणसे .. प्रेमाच्या शोधामुळे मिळतात मित्र मैत्रिणी ,यशाच्या शोधत मिळतात गुरु आणि मित्र ,विसाव्याच्या शोधत मिळतो आपल्याला आपला परिवार ,तर आसऱ्याच्या शोधत आपल्याला गवसतात आयुष्यभर साथ देईल अशी माणस .. 
       हा शोध आत्तापर्यंत चालूच होता ,आजही चालूच आहे आणि यापुढेही चालूच राहील .. माझ्या आयुष्यातला हा शोध ...     

                                                                           - सुधीर 

4 comments: