Sunday, 17 January 2016

ते पुस्तक ....

      

  

बऱ्याच दिवसांपासून काहीतरी चुकल्यासारखं वाटत होत .. 
                      माझा स्वतःला समजून घ्यायचा ,स्वतःला जाणून घ्यायचा शोध तर सुरूच आहे ,आणि या शोधामध्ये ,या प्रवासात मला साथ देत आहेत माझ्या आयुष्यात येत असलेली हि पुस्तके .. खरतर सध्या ,मनातल्या प्रश्नांची उत्तर शोधण आणि शक्य तेवढ हे आयुष्य ,हे जगण समजून घेण याच उद्देशाने मी पुस्तक वाचत असतो .. काही पुस्तक या कसोटीवर खरी उतरतात तर काही नाही उतरत .. 
          म्हणूनच हा प्रवास ,हा स्वतःला समजून घ्यायचा प्रवास ;नकळतपणे अशा पुस्तकांच्याच शोधाचा प्रवास बनत चालला आहे .. जरी 'युगंधर' ने या पुस्तक वाचनाच्या प्रवासाची सुरुवात झाली असली तरी "Johnathan Livingston Seagull" या पुस्तकाने इंग्रजी पुस्तकांचा दरवाजा उघडला माझ्यासाठी ,आणि मग मात्र अनेक पुस्तक आली आयुष्यात .. काही मराठी तर काही इंग्रजी .. मागे काही दिवसांपूर्वी वाचलेल्या पाउलो कोएलो च्या "Like the Flowing River " या पुस्तकाने तर मला अक्षरश मोहून टाकल ,पण ते पुस्तक वाचून झाल्यावर मात्र पुढंच आवडेल अस पुस्तक लवकर नाहीच आलं आयुष्यात .. बरेच दिवस गेले ,मी त्याची येण्याची वाट पाहत होतो .. वेगवेगळी पुस्तक घेतली हातात ,नेटवर शोधली आणि अनेक दुकानं पण धुंडाळली ,पण आवडेल अस पुस्तक नाही आलं माझ्यासमोर .. 
                   तेव्हा एक विचार आला मनात  ,जस योग्य वेळेला योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात येते तसच योग्य वेळेला योग्य पुस्तक आपल्या आयुष्यात येत नसेल ना  .. पण त्यासाठी या पुस्तकांचा पण शोध घ्यावा लागतो बर का ,इकडे तिकडे नजर फिरवावी लागते .. मग जाऊन कधी कोणत्या क्षणी कोणत पुस्तक समोर येईल आणि ते वाचून तुमच आयुष्य बदलून जाईल हे सांगता येत नाही .. 
                      अशा शोधात असतांनाच व.पु.काळे यांच 'आपण सारे अर्जुन 'हे पुस्तक मिळाल ,ज्याने मला स्वतःमध्ये अडकवून ठेवल .. वाचताना नकळत मी माझ्याच मनातच हरवत गेलो .. हे पुस्तक म्हणजे या प्रवासातला महत्वाचा टप्पा ठरणार यात शंका नाही .. 
        आणि हे वाचून झाल्यावर पुन्हा शोध सुरु होईल ,पुन्हा नजर इकडे तिकडे फिरेल ,शोधात त्या पुढच्या पुस्तकाच्या ..   


                                                                                          - सुधीर (9561346672)

Sunday, 10 January 2016

शोध ....



शोध ..
तसा हा शब्द दिसायला फार छोटा आणि सोपा आहे ,तरी या शब्दात आपल अख्खं आयुष्य सामावलेलं असत .. 
          आपल्या आयुष्यात आपण नेहमी कशाचा ना कशाचा शोध घेतच असतो .. मग ते कळत किंवा नकळत घेत असो ,पण आपल मन हा 'शोध' घेत असतच .. काही जणांना जाणवत कि ते काय शोधत आहेत आणि ते त्या शोधाच्या मार्गावर प्रवासाला निघतात सुद्धा ,पण बरेच जण आपण काय शोधत आहोत हेच न कळल्याने ,त्या 'शोधा'च्या शोधातच पूर्ण आयुष्य घालवतात .. 
          एक व्यक्ती एकच गोष्ट शोधत असतो असही नाही बर का ,तर एकाच व्यक्तीच्या आयुष्यात अनेक शोध सुद्धा असू शकतात .. कधी सुखाचा शोध तर कधी प्रेमाचा शोध ,कधी कुणाच्या आधाराचा शोध तर कधी मायेच्या दोन शब्दांचा शोध .. कधी यशाचा शोध तर कधी त्या यशाकडे नेणाऱ्या मार्गाचा शोध .. चालता चालता थकलो तर विसाव्याचा शोध तर कधी तात्पुरत्या विसाव्यापेक्षा कायमच्या त्या आसऱ्याचा शोध .. कधी स्वतःमध्ये डोकावून स्वतःचा शोध ,तर कधी आकाशाकडे पाहत त्या परमेश्वराचा शोध .. 
        या अशा अनेक शोधांमुळे या जगण्याला काही उद्देश मिळतो ,एवढच नव्हे तर याच शोधामुळे आपल्या आयुष्यात निर्माण होतात नवनवीन नाती ,आपल्या या शोधाच्या प्रवासात येउन जुळतात नवीन माणसे .. प्रेमाच्या शोधामुळे मिळतात मित्र मैत्रिणी ,यशाच्या शोधत मिळतात गुरु आणि मित्र ,विसाव्याच्या शोधत मिळतो आपल्याला आपला परिवार ,तर आसऱ्याच्या शोधत आपल्याला गवसतात आयुष्यभर साथ देईल अशी माणस .. 
       हा शोध आत्तापर्यंत चालूच होता ,आजही चालूच आहे आणि यापुढेही चालूच राहील .. माझ्या आयुष्यातला हा शोध ...     

                                                                           - सुधीर 

Sunday, 20 December 2015

ती मांजरीची पिल्ले .....


काल काहीतरी घडल .. 
अस काहीतरी पाहायला मिळाल जे खूप काही शिकवून गेल .. 
कमाल असते ना ,हे आयुष्य कस कधी काय शिकवून जाईल हे कोणालाच सांगता येत नसत .. 
काल मी असच जात असताना रस्त्यावर मला काही मांजरीची पिल्ले खेळताना दिसली ,ती पिल्ले मस्त एकमेकांसोबत खेळत होती ,अगदी स्वच्छंद होऊन बागडत होती ,कसलीच चिंता न करता फक्त आत्ताचे क्षण ,आत्ताच हे आयुष्य मस्त जगात होती .. तेवढ्यात खेळणाऱ्या त्या पिल्लापैकी एका पिल्लाने रस्ता ओलांडला ,आणि ते पाहून रस्त्याने तिथूनच चालत जाणारा एक माणूस जागीच थांबला .. मांजर आडवी गेली आहे तर आता काही तरी अपशकून होणार या भीतीने तो दोन पावलं मागे गेला आणि दुसऱ्या रस्त्याने गेला .. 
         तेव्हा खरच मला प्रश्न पडला कि ,मुक्तपणे स्वच्छंदपणे जगणारी ती पिल्ले हुशार का भविष्याच्या भीतीने पावलो-पावली रस्ता बदलणारा तो माणूस ? हातात आहेत ते क्षण मनसोक्त जगणारी ती पिल्ले आणि काहीतरी वाईट होईल या भीतीमध्ये कुठेतरी जगायचंच राहून गेलेला तो माणूस ,यांच्यात खरा जगण्याचा अर्थ नेमका कुणाला समजला हे तुम्हीच ठरवा ,मला तर ते समजलं  ….. 


                                                                                                          -सुधीर (9561346672)

Monday, 16 November 2015

मी आहे इथेच बाळा ...

                      
                        आजसुद्धा ती खूप रडत होती ,संध्याकाळची वेळ होती ,आणि ती तिच्या रूम मध्ये पलंगावर बसून एकटीच रडत होती .. आणि आजच नाही तर कित्येक दिवसापासून ती असच रडत होती ,रोज या वेळेला .. शेवटी न रहावून तिची आई आली तिच्या जवळ ,तिला समजवायला ,तिच्या लाडक्या लेकीला ,तिच्या लाडक्या बाहुलीला शांत करायला .. पण आई तिथे असून सुद्धा तीच रडण थांबतच नव्हत 
                            कारण तिला आई दिसतच नव्हती .. दिसत होता तो फक्त आईचा भिंतीवरचा फोटो ,ज्यावर फुलांचा हार होता .. काही दिवसांपूर्वीच एका अपघातात तिची आई देवाघरी निघून गेली होती ,तिला आणि तिच्या बाबांना एकट सोडून .. आणि त्या दिवसापासून तिच रडण सुरूच होत .. तिचं ते रडण पाहून आई तर तिथे येणारच होती, पण आईचे शब्द तिच्यापर्यंत पोहोचणार कसे .. तिला रडताना पाहून कासावीस झालेली ती आई म्हणते की बाळा नकोस ग रडू ....
मी आहे इथेच तुझ्या जवळ 
दूर नाहीये बाळा 
पूस ते ते डोळ्यातलं पाणी 
अन छानसं गोडं हसं ना बाळा …
तुझा तो पहिला स्पर्श 
अजूनही लक्षात आहे ग माझ्या 
इवलेसे हात अन इवलेसे ते पाय 
अजूनही नजरेत आहेत माझ्या … 
शाळेच्या पहिल्या दिवशी
रडणारी ती पिटुकली
अन शाळा सुटल्यावर मग
पळत येउन बिलगणारी ती चिमुकली .. 
शाळेला रोज जायला लागली तेव्हा 
अगदी सकाळी सकाळी उठायची तू 
आई हे दे अन आई ते दे म्हणत 
अख्ख घर डोक्यावर घायची तू … 
 जेवताना हे हवं ते नको
असा किती सारा हट्ट करायची
पण कधी मला आजारी पाहिलं
        की जवळ येउन लाड करायची  .. 
बाबांची खूप लाडकी आहेस तू 
पण माझाही जीव आहे ग तुझ्यात 
रडू नकोस आता अशी 
मी जिवंत आहेच न तुझ्यात .. 
रडताना पाहिलं तुला कधी 
तर जीव अगदी कासावीस व्हायचा 
गोड बोलून तुला शांत केल तरी 
एकांतात मात्र माझ्याही अश्रूंचा बांध तुटायचा … 
खेळताना खुपदा पडायची तू
पण जखम व्ह्यायची मला   
आता तुला रोज रडताना पाहून
खूप त्रास होतो ग मलाच …
तुझ ते गोड हसण पाहायसाठी
मला सात जन्मसुद्धा कमीच पडतील
नको हिरावून घेऊ ते हसण माझ्यापासून
नाहीतर माझ्या अश्रुंचे बांध सारखेच फुटतील ..
मी आहे इथेच तुझ्या जवळ
अजिबात दूर नाहीये बाळा
पूस ते डोळ्यातलं पाणी
अन छानस गोड हसं ना बाळा ..
कमजोर पडू नकोस कधी
मी आहेच तुझ्या सोबतीला
माझी मुलगी आहेस तू
हे पण दाखवून दे या जगाला ..
कितीही संकट आली तरी
मागे वळून पाहू नकोस
एकदा "आई" अशी हाक मार 
बाकी जगाची चिंता करू नकोस ... 
थांबतील माझे शब्द जरी 
भावना तुझ्यापर्यंत येतच राहतील 
नसले मी शरीराने जरी 
वेड मन माझ तुझ्याकडे येतच राहील .. 
जाते आता मी बाळा 
एकदा पाहूदे तुला मन भरून 
तुला पाहण्यासाठीच फक्त 
आलेय मी स्वर्गही सोडून ... 
मी आहे इथेच तुझ्या जवळ 
दूर नाहीये बाळा 
पूस ते ते डोळ्यातलं पाणी 
अन छानसं गोडं हसं ना बाळा … 
एकदा छानस गोड हसं ना बाळा .. 

आईचा आवाज तर नाही पण त्या मायेच्या भावना ,या तिच्यापर्यंत पोहोचल्या कदाचित .. हळू हळू तीच रडण थांबत गेल ,आणि काही वेळाने बाबा आले घरी आणि ती बाबांसोबत गप्पा गोष्टी मध्ये रमून गेली .. आणि बाबांनी तिला खूप हसवलं ,इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून .. तेव्हाच तिथल्या आईच्या फोटोवर तिची नजर गेली ,आणि एक हलकास हसू तिच्या चेहऱ्यावर उमटलं ...  आणि तिला हसताना पाहून कुठूनतरी तिला पाहत असलेल्या त्या आईच्या चेहऱ्यावर सुद्धा हलकस हसू उमटलं ....  



                                                                                                                          - सुधीर (9561346672)

Monday, 19 October 2015

ते रुईच फुल …



                     एक तो आणि एक ती ..
                   काही वर्षांपूर्वी एकमेकांचे मित्रमैत्रीण असणारे ते दोघे कधी कळत नकळत एकमेकांच्या प्रेमात पडले ते त्या दोघांनाही कळल नाही .. मग हळू हळू त्यांच्यातल प्रेम खुलत गेलं ,त्याच्यासाठी तर ती म्हणजे अख्ख जगच बनली होती ,त्याची लाडाची बाहुली बनली होती .. तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू राहावं हेच त्याला वाटायचं ,एखाद लहान मुल जस त्याच्या खेळण्यातल्या बाहुलीची अगदी मन लावून ,जीव लावून काळजी घेत ना तसं तो तिची काळजी घ्यायचा ..  ती ,सहसा कोणाशीही न बोलणारी ,शांत शांत राहणारी अशी ,त्याच्यासोबत बोलताना मात्र एकदम बदलून जात होती ,खूप बोलायची ,मनातल सर्व त्याला सांगायची .. त्याच्या रूपाने तिला एक खास दोस्त मिळाला होता ,एक दोस्त ,एक सखा … 
                     एके दिवशी ती तिच्या घरी होती ,संध्याकाळचे सहा वाजले होते ,ती तिच्या रूमच्या खिडकीत उभी राहून बाहेरची थंड हवा चेहऱ्यावर घेत होती ,तेवढ्यात एक 'म्हातारी' म्हणजेच रुईच फुल उडत आल ,त्या उडणाऱ्या फुलाला पाहताच तिने लगेच हात पुढे केला आणि ते रुईच फुल अलगदपणे तिच्या हातावर विसावलं .. तिने त्या फुलाकडे पाहिलं आणि एक विचार तिच्या मनात आला तसा तिचा चेहरा एकदम खुलला ,तिने डोळे झाकून त्या हलक्या अशा फुलाला एक नाजूक अशी फुंकर मारली ,आणि बघता बघता ते फुल बाहेरच्या हवेसोबत ,हवेच्या झोक्यासोबत हळू हळू उडत गेल आणि काही वेळाने ते दिसेनास झाल  ..
                     मग तिने याला भेटल्यावर सांगितलं कि तिने तिच्या प्रेमाची आठवण म्हणून एक रुईच फुल हवेसोबत पाठवलंय ,आणि आज ना उद्या याच्यापर्यंत ते फुल उडत उडत पोहोचेलच कारण तिने त्या फुलाला तिच्या प्रेमाची शप्पथ देऊन फुंकर मारली होती  .. तिच्या मनातला हा भोळेपणा पाहून तो गालातल्या गालात हसला ,आणि त्याला खूप कौतुक वाटल या पागलपण च .. शेवटी ती त्याची छोटीसी गोड अशी बाहुली होती ,त्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीच कौतुक तर वाटणारच त्याला .. म्हणून गालातल्या गालात हसत तो तिच्याकडे फक्त पाहत राहिला बराच वेळ ..   
                     आज तीन वर्षानंतर तो अशाच एका संध्या काळी त्याच्या घराच्या खिडकीजवळ येउन थांबला होता ,बाहेर थंड अशी हवा सुटली होती .. तेवढ्यात एक रुईच फुल हवेसोबत उडत येताना त्याला दिसल .. आणि तो उभा असलेल्या खिडकीच्या कठड्यावर ते फुल विसावल .. त्याने ते फुल एकदम अलगद अस हातावरती घेतलं .. ते पाहताना त्याच्या डोळ्यात एकदम पाण्याचे दोन थेंब तरळले आणि गालातल्या गालात हसू पण आलं त्याला .. एक वर्षापूर्वीच तीच लग्न दुसऱ्या कोणासोबत तरी झालं होत .. आई-वडील आणि तो ,यांच्यामध्ये तिने आई-वडिलांना निवडल आणि त्यांच्या मर्जीनुसार तिने लग्न केल .. आणि या निवडीबद्दल त्याने तिला कधीच दोष नाही दिला कारण ही निवडच तशी अवघड होती ,आणि त्याच्या बाहुलीसाठी तर किती अवघड होती हे त्याला माहित होत .. 
                 आज हा खिडकीत एकटाच उभा होता ,हातात ते फुल घेऊन .. तिच्या आठवणीने डोळ्यात पापाण्यापर्यंत आलेले ते पाण्याचे थेंब आणि ओठांवर उमटलेल ते हलकस हसण .. अस अश्रू आणि हसू यांचा अनोखा मिलाप त्याच्या चेहऱ्यावर होता .. कदाचित हेच प्रेम असत .. पण आयुष्य कोणासाठी थांबत नसत .. कितीही कटू असल तरी ते सत्य स्वीकारून पुढे जाव लागत .. त्याने एकदा त्या फुलाकडे प्रेमान पाहिलं आणि एक हलकीशी फुंकर मारून त्या फुलाला पुन्हा हवेसोबत पाठवलं .. बराच वेळ हवेमध्ये झोके खात ते फुल काही वेळाने दिसेनास झाल ,पण त्याच्या चेहऱ्यावरची ते हलकस हसू आणि डोळ्यातले ते कोरडे झालेले थेंब बराच वेळ तसच होते ..
                           कदाचित हेच आयुष्य असत .. कदाचित हेच प्रेम असत ..  


                                                                                         - सुधीर 

Monday, 5 October 2015

प्रेमाबद्दल अगदी थोडस …


                     प्रेम .. आहेत तस अडीचच अक्षर ,पण या अडीच अक्षराभोवती आत्तापर्यंत अक्षरशः लाखो कविता ,हजारो कहाण्या ,कित्येक गीत लिहिले ,वाचले गेले .. या प्रेमाबद्दल असलेले गीत आपण मन लावून ऐकतो ,सिनेमे आवडीने पाहतो ,प्रेमावर असलेल्या कविता वाचतो .. पण अस असूनपण अजूनही जेव्हा समोरच्या व्यक्तीसमोर आपलं मन ,आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करायची वेळ येते तेव्हा ना हे सर्व पाहिलेले अन वाचलेले अन लिहिलेले शब्द एका  क्षणात साथ सोडून कुठेतरी दूर निघून जातात ,आणि दुरूनच गुपचूप आपली होणारी फजिती पाहतात ...
                 ही प्रेम व्यक्त करायची भानगड आणि त्यातली गम्मत खरी आम्हा मुलांच्या बाबतीत हमखास दिसून येते .. जेव्हा एखाद्या मुलाला एखाद्या मुलीवर प्रेम व्यक्त करायचं असेल तेव्हा त्या बिचाऱ्याला वर म्हणल्याप्रमाणे शब्द तर मिळत नाहीतच ; पण समजा कसबस खूप प्रयत्न करून त्या बिचाऱ्याला काही शब्द सुचलेच तरी त्या मुलीला याने शब्दातून व्यक्त केलेलं याच्या मनातलं प्रेम कितपत समजेल अशी शंका त्याच्या मनात राहतेच आणि याच शंकेमुळ प्रेम व्यक्त कारण आणखीन अवघड होऊन बसत ..
तेव्हा तो बिचारा हेच म्हणत असेल कि ,
  तुझ्याशी मला बोलायचंय थोडं
 मनातलं काही सांगायचय थोडं
 पण तुला समजेल कि नाही
   याचंच मला पडलंय कोडं ….
                  तर असा हा व्यक्त होऊनपण अव्यक्त राहणारी प्रेमाची भावना .. अशा या प्रेमाबद्दल मी आणखी काय लिहिणार ,बस एवढच म्हणू शकेन की या अव्यक्त भावनेला माझा सलाम ….


                                                                                                            - सुधीर

Sunday, 27 September 2015

एक चारोळी ...

               
               काल एक पुस्तक विकत घेण्यासाठी दुकानात गेलो असताना ,तिथ हव ते पुस्तक तर नाही मिळाल ,म्हणून दुकानातून बाहेर पडताच बाहेर फुटपाथ वर जुनी पुस्तकं विकणाऱ्याकडे माझ लक्ष गेल .. या पुस्तकाचं काय असर आहे माझ्यावर माहित नाही ,पण पुस्तक पाहिलं की माझी पावलं त्यांकडे आपोआप ओढली जातात ..
                मी त्या ठिकाणी गेलो आणि पाउलो कोएलो या माझ्या आवडत्या लेखकाचं "Like the flowing river" हे पुस्तक मला तिथ दिसलं ,मी उत्सुकतेने ते हातात घेऊन पुस्तकांची पान चाळली तर त्यामध्ये एका कागदावर कुणीतरी लिहिलेली ही चारोळी माझ्या हाताला लागली  .. हि चारोळी मी वाचली आणि माझी उत्सुकता अजून वाढली ,म्हणून अजून एखादी लिहिलेली चारोळी आहे का हे पाहायसाठी मी पुस्तकाची पाने चाळायला लागलो ,पण दुसर काही नाही मिळालं ,फक्त मधल्या एका पानावर इंग्रजी मधलं 'S' हे अक्षर छान अस सजवल होत .. कदाचित हे त्या व्यक्तीचं नावाच्या सुरूवातीच अक्षर असावं .. मग मी ते पुस्तक विकत घेतलं आणि घरी येउन ती चारोळी वाचली .. ती चारोळी अशी आहे ..

जगता जगता वाटलं की काहीतरी वेगळ करावं
रोजची काम सोडून काहीतरी वेगळ करावं
हृदय तर  धडकत रोजचं  आज त्याला जरा नीट ऐकावं
मन तर इकडे तिकडे जातच रोज पण आज मी पण त्याच्यासोबत  जावं  .... 

                 ही चारोळी ज्या कोणी मुलान किंवा मुलीन लिहिली असेल ती/तो कुठ असेल माहित नाही ,पण रोजच्या जगण्यातून मार्ग काढत काहीतरी वेगळ करायचा तो रस्ता ,ती वेगळी वाट त्या व्यक्तीला मिळाली असेल ,असाच विचार आणि मनोमन सदिच्छा करून ,तो चारोळीचा कागद माझ्या डायरी मध्ये ठेवला आणि मी ते पुस्तक वाचायला सुरु केल .. 

                                                                                                - सुधीर