Monday, 16 November 2015

मी आहे इथेच बाळा ...

                      
                        आजसुद्धा ती खूप रडत होती ,संध्याकाळची वेळ होती ,आणि ती तिच्या रूम मध्ये पलंगावर बसून एकटीच रडत होती .. आणि आजच नाही तर कित्येक दिवसापासून ती असच रडत होती ,रोज या वेळेला .. शेवटी न रहावून तिची आई आली तिच्या जवळ ,तिला समजवायला ,तिच्या लाडक्या लेकीला ,तिच्या लाडक्या बाहुलीला शांत करायला .. पण आई तिथे असून सुद्धा तीच रडण थांबतच नव्हत 
                            कारण तिला आई दिसतच नव्हती .. दिसत होता तो फक्त आईचा भिंतीवरचा फोटो ,ज्यावर फुलांचा हार होता .. काही दिवसांपूर्वीच एका अपघातात तिची आई देवाघरी निघून गेली होती ,तिला आणि तिच्या बाबांना एकट सोडून .. आणि त्या दिवसापासून तिच रडण सुरूच होत .. तिचं ते रडण पाहून आई तर तिथे येणारच होती, पण आईचे शब्द तिच्यापर्यंत पोहोचणार कसे .. तिला रडताना पाहून कासावीस झालेली ती आई म्हणते की बाळा नकोस ग रडू ....
मी आहे इथेच तुझ्या जवळ 
दूर नाहीये बाळा 
पूस ते ते डोळ्यातलं पाणी 
अन छानसं गोडं हसं ना बाळा …
तुझा तो पहिला स्पर्श 
अजूनही लक्षात आहे ग माझ्या 
इवलेसे हात अन इवलेसे ते पाय 
अजूनही नजरेत आहेत माझ्या … 
शाळेच्या पहिल्या दिवशी
रडणारी ती पिटुकली
अन शाळा सुटल्यावर मग
पळत येउन बिलगणारी ती चिमुकली .. 
शाळेला रोज जायला लागली तेव्हा 
अगदी सकाळी सकाळी उठायची तू 
आई हे दे अन आई ते दे म्हणत 
अख्ख घर डोक्यावर घायची तू … 
 जेवताना हे हवं ते नको
असा किती सारा हट्ट करायची
पण कधी मला आजारी पाहिलं
        की जवळ येउन लाड करायची  .. 
बाबांची खूप लाडकी आहेस तू 
पण माझाही जीव आहे ग तुझ्यात 
रडू नकोस आता अशी 
मी जिवंत आहेच न तुझ्यात .. 
रडताना पाहिलं तुला कधी 
तर जीव अगदी कासावीस व्हायचा 
गोड बोलून तुला शांत केल तरी 
एकांतात मात्र माझ्याही अश्रूंचा बांध तुटायचा … 
खेळताना खुपदा पडायची तू
पण जखम व्ह्यायची मला   
आता तुला रोज रडताना पाहून
खूप त्रास होतो ग मलाच …
तुझ ते गोड हसण पाहायसाठी
मला सात जन्मसुद्धा कमीच पडतील
नको हिरावून घेऊ ते हसण माझ्यापासून
नाहीतर माझ्या अश्रुंचे बांध सारखेच फुटतील ..
मी आहे इथेच तुझ्या जवळ
अजिबात दूर नाहीये बाळा
पूस ते डोळ्यातलं पाणी
अन छानस गोड हसं ना बाळा ..
कमजोर पडू नकोस कधी
मी आहेच तुझ्या सोबतीला
माझी मुलगी आहेस तू
हे पण दाखवून दे या जगाला ..
कितीही संकट आली तरी
मागे वळून पाहू नकोस
एकदा "आई" अशी हाक मार 
बाकी जगाची चिंता करू नकोस ... 
थांबतील माझे शब्द जरी 
भावना तुझ्यापर्यंत येतच राहतील 
नसले मी शरीराने जरी 
वेड मन माझ तुझ्याकडे येतच राहील .. 
जाते आता मी बाळा 
एकदा पाहूदे तुला मन भरून 
तुला पाहण्यासाठीच फक्त 
आलेय मी स्वर्गही सोडून ... 
मी आहे इथेच तुझ्या जवळ 
दूर नाहीये बाळा 
पूस ते ते डोळ्यातलं पाणी 
अन छानसं गोडं हसं ना बाळा … 
एकदा छानस गोड हसं ना बाळा .. 

आईचा आवाज तर नाही पण त्या मायेच्या भावना ,या तिच्यापर्यंत पोहोचल्या कदाचित .. हळू हळू तीच रडण थांबत गेल ,आणि काही वेळाने बाबा आले घरी आणि ती बाबांसोबत गप्पा गोष्टी मध्ये रमून गेली .. आणि बाबांनी तिला खूप हसवलं ,इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून .. तेव्हाच तिथल्या आईच्या फोटोवर तिची नजर गेली ,आणि एक हलकास हसू तिच्या चेहऱ्यावर उमटलं ...  आणि तिला हसताना पाहून कुठूनतरी तिला पाहत असलेल्या त्या आईच्या चेहऱ्यावर सुद्धा हलकस हसू उमटलं ....  



                                                                                                                          - सुधीर (9561346672)

Monday, 19 October 2015

ते रुईच फुल …



                     एक तो आणि एक ती ..
                   काही वर्षांपूर्वी एकमेकांचे मित्रमैत्रीण असणारे ते दोघे कधी कळत नकळत एकमेकांच्या प्रेमात पडले ते त्या दोघांनाही कळल नाही .. मग हळू हळू त्यांच्यातल प्रेम खुलत गेलं ,त्याच्यासाठी तर ती म्हणजे अख्ख जगच बनली होती ,त्याची लाडाची बाहुली बनली होती .. तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू राहावं हेच त्याला वाटायचं ,एखाद लहान मुल जस त्याच्या खेळण्यातल्या बाहुलीची अगदी मन लावून ,जीव लावून काळजी घेत ना तसं तो तिची काळजी घ्यायचा ..  ती ,सहसा कोणाशीही न बोलणारी ,शांत शांत राहणारी अशी ,त्याच्यासोबत बोलताना मात्र एकदम बदलून जात होती ,खूप बोलायची ,मनातल सर्व त्याला सांगायची .. त्याच्या रूपाने तिला एक खास दोस्त मिळाला होता ,एक दोस्त ,एक सखा … 
                     एके दिवशी ती तिच्या घरी होती ,संध्याकाळचे सहा वाजले होते ,ती तिच्या रूमच्या खिडकीत उभी राहून बाहेरची थंड हवा चेहऱ्यावर घेत होती ,तेवढ्यात एक 'म्हातारी' म्हणजेच रुईच फुल उडत आल ,त्या उडणाऱ्या फुलाला पाहताच तिने लगेच हात पुढे केला आणि ते रुईच फुल अलगदपणे तिच्या हातावर विसावलं .. तिने त्या फुलाकडे पाहिलं आणि एक विचार तिच्या मनात आला तसा तिचा चेहरा एकदम खुलला ,तिने डोळे झाकून त्या हलक्या अशा फुलाला एक नाजूक अशी फुंकर मारली ,आणि बघता बघता ते फुल बाहेरच्या हवेसोबत ,हवेच्या झोक्यासोबत हळू हळू उडत गेल आणि काही वेळाने ते दिसेनास झाल  ..
                     मग तिने याला भेटल्यावर सांगितलं कि तिने तिच्या प्रेमाची आठवण म्हणून एक रुईच फुल हवेसोबत पाठवलंय ,आणि आज ना उद्या याच्यापर्यंत ते फुल उडत उडत पोहोचेलच कारण तिने त्या फुलाला तिच्या प्रेमाची शप्पथ देऊन फुंकर मारली होती  .. तिच्या मनातला हा भोळेपणा पाहून तो गालातल्या गालात हसला ,आणि त्याला खूप कौतुक वाटल या पागलपण च .. शेवटी ती त्याची छोटीसी गोड अशी बाहुली होती ,त्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीच कौतुक तर वाटणारच त्याला .. म्हणून गालातल्या गालात हसत तो तिच्याकडे फक्त पाहत राहिला बराच वेळ ..   
                     आज तीन वर्षानंतर तो अशाच एका संध्या काळी त्याच्या घराच्या खिडकीजवळ येउन थांबला होता ,बाहेर थंड अशी हवा सुटली होती .. तेवढ्यात एक रुईच फुल हवेसोबत उडत येताना त्याला दिसल .. आणि तो उभा असलेल्या खिडकीच्या कठड्यावर ते फुल विसावल .. त्याने ते फुल एकदम अलगद अस हातावरती घेतलं .. ते पाहताना त्याच्या डोळ्यात एकदम पाण्याचे दोन थेंब तरळले आणि गालातल्या गालात हसू पण आलं त्याला .. एक वर्षापूर्वीच तीच लग्न दुसऱ्या कोणासोबत तरी झालं होत .. आई-वडील आणि तो ,यांच्यामध्ये तिने आई-वडिलांना निवडल आणि त्यांच्या मर्जीनुसार तिने लग्न केल .. आणि या निवडीबद्दल त्याने तिला कधीच दोष नाही दिला कारण ही निवडच तशी अवघड होती ,आणि त्याच्या बाहुलीसाठी तर किती अवघड होती हे त्याला माहित होत .. 
                 आज हा खिडकीत एकटाच उभा होता ,हातात ते फुल घेऊन .. तिच्या आठवणीने डोळ्यात पापाण्यापर्यंत आलेले ते पाण्याचे थेंब आणि ओठांवर उमटलेल ते हलकस हसण .. अस अश्रू आणि हसू यांचा अनोखा मिलाप त्याच्या चेहऱ्यावर होता .. कदाचित हेच प्रेम असत .. पण आयुष्य कोणासाठी थांबत नसत .. कितीही कटू असल तरी ते सत्य स्वीकारून पुढे जाव लागत .. त्याने एकदा त्या फुलाकडे प्रेमान पाहिलं आणि एक हलकीशी फुंकर मारून त्या फुलाला पुन्हा हवेसोबत पाठवलं .. बराच वेळ हवेमध्ये झोके खात ते फुल काही वेळाने दिसेनास झाल ,पण त्याच्या चेहऱ्यावरची ते हलकस हसू आणि डोळ्यातले ते कोरडे झालेले थेंब बराच वेळ तसच होते ..
                           कदाचित हेच आयुष्य असत .. कदाचित हेच प्रेम असत ..  


                                                                                         - सुधीर 

Monday, 5 October 2015

प्रेमाबद्दल अगदी थोडस …


                     प्रेम .. आहेत तस अडीचच अक्षर ,पण या अडीच अक्षराभोवती आत्तापर्यंत अक्षरशः लाखो कविता ,हजारो कहाण्या ,कित्येक गीत लिहिले ,वाचले गेले .. या प्रेमाबद्दल असलेले गीत आपण मन लावून ऐकतो ,सिनेमे आवडीने पाहतो ,प्रेमावर असलेल्या कविता वाचतो .. पण अस असूनपण अजूनही जेव्हा समोरच्या व्यक्तीसमोर आपलं मन ,आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करायची वेळ येते तेव्हा ना हे सर्व पाहिलेले अन वाचलेले अन लिहिलेले शब्द एका  क्षणात साथ सोडून कुठेतरी दूर निघून जातात ,आणि दुरूनच गुपचूप आपली होणारी फजिती पाहतात ...
                 ही प्रेम व्यक्त करायची भानगड आणि त्यातली गम्मत खरी आम्हा मुलांच्या बाबतीत हमखास दिसून येते .. जेव्हा एखाद्या मुलाला एखाद्या मुलीवर प्रेम व्यक्त करायचं असेल तेव्हा त्या बिचाऱ्याला वर म्हणल्याप्रमाणे शब्द तर मिळत नाहीतच ; पण समजा कसबस खूप प्रयत्न करून त्या बिचाऱ्याला काही शब्द सुचलेच तरी त्या मुलीला याने शब्दातून व्यक्त केलेलं याच्या मनातलं प्रेम कितपत समजेल अशी शंका त्याच्या मनात राहतेच आणि याच शंकेमुळ प्रेम व्यक्त कारण आणखीन अवघड होऊन बसत ..
तेव्हा तो बिचारा हेच म्हणत असेल कि ,
  तुझ्याशी मला बोलायचंय थोडं
 मनातलं काही सांगायचय थोडं
 पण तुला समजेल कि नाही
   याचंच मला पडलंय कोडं ….
                  तर असा हा व्यक्त होऊनपण अव्यक्त राहणारी प्रेमाची भावना .. अशा या प्रेमाबद्दल मी आणखी काय लिहिणार ,बस एवढच म्हणू शकेन की या अव्यक्त भावनेला माझा सलाम ….


                                                                                                            - सुधीर

Sunday, 27 September 2015

एक चारोळी ...

               
               काल एक पुस्तक विकत घेण्यासाठी दुकानात गेलो असताना ,तिथ हव ते पुस्तक तर नाही मिळाल ,म्हणून दुकानातून बाहेर पडताच बाहेर फुटपाथ वर जुनी पुस्तकं विकणाऱ्याकडे माझ लक्ष गेल .. या पुस्तकाचं काय असर आहे माझ्यावर माहित नाही ,पण पुस्तक पाहिलं की माझी पावलं त्यांकडे आपोआप ओढली जातात ..
                मी त्या ठिकाणी गेलो आणि पाउलो कोएलो या माझ्या आवडत्या लेखकाचं "Like the flowing river" हे पुस्तक मला तिथ दिसलं ,मी उत्सुकतेने ते हातात घेऊन पुस्तकांची पान चाळली तर त्यामध्ये एका कागदावर कुणीतरी लिहिलेली ही चारोळी माझ्या हाताला लागली  .. हि चारोळी मी वाचली आणि माझी उत्सुकता अजून वाढली ,म्हणून अजून एखादी लिहिलेली चारोळी आहे का हे पाहायसाठी मी पुस्तकाची पाने चाळायला लागलो ,पण दुसर काही नाही मिळालं ,फक्त मधल्या एका पानावर इंग्रजी मधलं 'S' हे अक्षर छान अस सजवल होत .. कदाचित हे त्या व्यक्तीचं नावाच्या सुरूवातीच अक्षर असावं .. मग मी ते पुस्तक विकत घेतलं आणि घरी येउन ती चारोळी वाचली .. ती चारोळी अशी आहे ..

जगता जगता वाटलं की काहीतरी वेगळ करावं
रोजची काम सोडून काहीतरी वेगळ करावं
हृदय तर  धडकत रोजचं  आज त्याला जरा नीट ऐकावं
मन तर इकडे तिकडे जातच रोज पण आज मी पण त्याच्यासोबत  जावं  .... 

                 ही चारोळी ज्या कोणी मुलान किंवा मुलीन लिहिली असेल ती/तो कुठ असेल माहित नाही ,पण रोजच्या जगण्यातून मार्ग काढत काहीतरी वेगळ करायचा तो रस्ता ,ती वेगळी वाट त्या व्यक्तीला मिळाली असेल ,असाच विचार आणि मनोमन सदिच्छा करून ,तो चारोळीचा कागद माझ्या डायरी मध्ये ठेवला आणि मी ते पुस्तक वाचायला सुरु केल .. 

                                                                                                - सुधीर

Sunday, 13 September 2015

थेंब ...


               
                 बाहेर मुसळधार पाऊस सुरु आहे .. पाऊस कसा पडतो हे लहानपणापासून इतक्यावेळा पाहूनसुद्धा आज तो कसा पडतोय हे पाहायला पाय खिडकीकडे वळलेच .. खिडकीमधून बाहेर पाहिलं ,तेव्हा सगळीकडे दिसले थेंबच थेंब ,वाऱ्याच्या झोतामध्ये इकडे तिकडे उडणारे लाखो थेंब .. खूप जोरात जमिनीवर आदळत होते ते थेंब ,खाली कोण आहे ,आपण कशावर आदळू याचा जरापण विचार न करता बस जोरात पडायचं बहुधा याच विचाराने पछाडलेले हे थेंब .. जणू इतके दिवस आकाशाने ,त्या काळ्या ढगांत त्यांना बंदिस्त करून ठेवल होत ,आणि आत्ता त्यांची सुटका झाली ..
             या मोकळेपणाने पडणाऱ्या थेंबांना पाहून एक क्षण मला त्यांच्या मोकळेपणाचा ,त्यांच्या बिन्दास्त असण्याचा हेवा वाटला .. यांना पाहताना अस वाटल कि मी पण एक थेंब व्हावं आणि अलगद या खिडकीतून बाहेर जाव ,हा वर नेईल तिकडे ,हि हवा म्हणेल तिकड उडावं ,आणि अलगदपणे एखाद्या नुकत्याच फुललेल्या फुलाच्या कळीवर किंवा एखाद्या वाऱ्याच्या झोतामध्ये नाचणाऱ्या झाडाच्या छोट्याशा पानावर जाऊन विसावं .. तेवढ्यात टेबलावरच्या पुस्तकांची पाने वाऱ्याने सळसळ आवाज करू लागली आणि मी त्या थेंबांच्या तंद्रीतून बाहेर आलो .. मी त्या पुस्तकांकडे पाहिलं ,आणि एकदा बाहेरच्या पावसाकडे पाहिलं .. मग विचार आला की कितीही मोकळ व्हावं वाटत असाल तरी आपल्याला आपल कर्म ,आपल जीवनध्येय विसरून नाही जमत .. ते इंग्रजी मध्ये म्हणतात ना The warrior of Light has to perform his duties ..  तसच काही … 

                                                                                                      -सुधीर

Wednesday, 9 September 2015

Art of Living ....



             Art of living .. म्हणजे जगण्याची कला .. नुकतच एका मित्राने हा क्लास केला .तो मलापण म्हणत होता की कर तू हा क्लास .मी विचार करेन म्हणालो .त्या क्लास मध्ये योग ,प्राणायाम आणि काही व्यक्तिमत्व सुधारणा करायच्या गोष्टी शिकवल्या जातात अस ऐकण्यात आलं .पण मग याला आर्ट ऑफ लिवींग का म्हणतात ? आणि माझ्या मनात हाही विचार येत आहे कि मुळात जगण्याची कला ही कुठल्या क्लास मध्ये शिकायची गोष्ट असते का ,माझ्या मते तर ती कला जगण्यातून आपोआप शिकत जायची असते . 

          जगण .. एक अशी कला आहे जी समजून घेण्यातच बऱ्याच जणांच आयुष्य निघुन जात ,तर बऱ्याच जणांना ते समजून घायची नसतेच .त्यांना फ़क्त रोजच रुळलेल आयुष्य कसतरी संपवायच असत ,पण बरेच असेही लोक आहेत जे या जगण्याच्या कलेला समजून घेण्याचा प्रयत्न करतात .म्हणून त्यांच्या मनात अनेक प्रश्न येतात जगण्याविषयी ,की आयुष्य अस का आहे ,आयुष्यात अस का होत ,कालपरवा सगळ छान सुरु असताना मध्येच काहीतरी समस्या का येते ,सुख हे नेहमी दुःखच्या कड़क उनानंतर येणाऱ्या थंडगार अशा सावली सारखच अगदी काही क्षणांसाठीच का येत ,त्या निळ्याशार आकाशासारख ते कायम आपल्या भोवती का राहत नहीं ,असे अनेक प्रश्न . मग ही माणसे आपापल्या परीने या प्रश्नांना शोधतात ,काही जण आयुष्याबद्दल लिहितात ,तर काही जण त्याच वाचन करतात ,काही जण रंगांमध्ये आयुष्य रंगवतात तर काहीजण संगीतामध्ये हरवून जातात ,काहीजण स्वतःला आजूबाजूच्या नात्यांमध्ये गुंतवून त्यात आयुष्य शोधतात तर काहीजण नात्यांच्या गोतावळ्यातून बाहेर पडून या समाजासाठी काहीतरी करतात ,पण हे सर्व करताना ही सर्व माणसे एक प्रकारे त्यांच्या जगण्याची कलाच शिकत असतात ,नाही का …. 

        या प्रश्नांची उत्तर ज्याला त्याला ,त्याच्या-त्याच्या कुवतीनुसार मिळत जातात ,अणि जगण पुढ जात रहत .मला मिळालेलं उत्तर म्हणजे ही जगण्याची कला म्हणजे दूसर तीसर काही नाही तर फक्त पुढे वाहत जायच ,एखाद्या नदीसारख .. उगमाच्या वेळी असणारा आयुष्याचा छोटासा प्रवाह पुढे जाउन अवाढव्य पात्र बनत ,ज्या पात्रात जागोजागी ,वळणावळणावर येउन मिळालेले असतात अनेक इतर प्रवाह ,अनेक इतर नद्या .अशा या सर्व प्रवाहांना आपल्यात सामावून घेऊन रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक वळणावर स्वतःचा मार्ग स्वत शोधत ,अनेक खाच खळगे पार करत पुढे जात राहयच . वाहत जाताना रस्त्यात किनारी असणाऱ्या चविष्ट सुखाच्या झाडाच्या पडलेल्या फळांना आपल्यात सामावून घ्यायचं पण त्या झाडाचा मोह न करता हा प्रवास पुढे चालू ठेवायचा ,कधी आनंदाचा उंच धबधबा होऊन खाली पडायचं ,तर कधी निराशेची नागमोडी वळण घेत तिथून बाहेर निघण्याचा आपला रस्ता शोधून काढायचा . 
          कधी कधी एखाद वळण असही येत जिथुन पुढ वाट शोधन अवघड होत ,तरीसुद्धा त्यातून मार्ग काढून हा जगण्याचा प्रवाह चालू ठेवायचा ,मार्गात अनेक मोठे दगड सुद्द्धा येतील ,अतिशय ओबडधोबड ,त्या दगडांना सुद्धा आपल्या शीतल ,प्रेमळ प्रवाहाच्या माऱ्याने गुळगुळीत करत पुढे जात रहायचं .कधी घनदाट जंगलातून जाव लागत ,काही काही जंगलं तर इतकी घनदाट असतात की तिथे सूर्यप्रकाश सुद्धा पोहोचत नाही ,तेव्हा तिथल्या अंधाराला न घाबरता ,आपला मार्ग न सोडता पुढे जात राहायचं .हा पूर्ण प्रवास सुरु असताना ,भेदभाव न करता जो जो प्रेमासाठी तहानलेला असा कोणी आपली ओंजळ पुढ करेल त्याला या प्रवाहातल थोडस प्रेम देऊन त्याची तहान भागवायची आणि असंच मजल दरमजल करत नेहमी ,प्रत्येक क्षणाला ,बस न थांबता पुढे जात राहायचं आणि शेवटी मृत्युरूपी सागरात विलीन व्ह्ययच .हेच असत आयुष्य अणि हेच असत जगण .
      मार्गात कितीही अडथळे आले ,कितीही अडचणी आल्या ,वाहून वाहून शरीर थकल तरी न थांबता हा आयुष्याच्या प्रवाह सतत वाहता ठेवण ,हीच आहे खरी जगण्याची कला .. जस नदीच्या वाहणाऱ्या प्रवाहाला पाहिलं कि आपल्या मनाला एक विलक्षण शांतता जाणवते ,तसाच आपणही ही जगण्याची कला अशी जोपासायची की आपल जगण पाहणाऱ्याला सुद्धा मनाला शांतता जाणवली पाहिजे .. 

     ही कला आयुष्याची ,ही अशीच जगता जगता शिकायची असते ,शिकता शिकता जगायची असते … 

                                                                                                            - सुधीर 



Monday, 31 August 2015

आठवण येतेय एका मुलीची ....


                      परवा एका मुलीची ,एका मैत्रिणीची खूप आठवण येत होती ,बहुधा सध्या ती बरीच दूर ,महाराष्ट्राच्या सुद्धा बाहेर असल्याने कदाचित .. या ब्लॉग वरची पहिली कविता सुद्धा तिच्याच साठी होती ,आणि आजची हि कविता सुद्धा तिच्याच साठी आहे .. आणि जेव्हा हे शब्द सोबतीला असतील तेव्हा मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी हे दूर असलेल अंतर सुद्धा आडवे नाही येत.. म्हणून त्या माझ्या मैत्रिणीसाठी एक खास कविता ,काही ओळी माझ्या मनातल्या ,काही भावना माझ्या मनातल्या ,एक संदेश माझ्या मनातला ... 
                                 
आठवण येतेय एका मुलीची 
आयुष्यात आलेल्या 
पहिल्या वहिल्या मैत्रिणीची 
आठवण येतेय 
माझ्या दिदीची ,माझ्या बहिणीची … 

जन्म झाला तिचा तेव्हा 
हळूच चोरून बघायचो तिला 
आईच्या कुशीत निजलेल्या 
त्या बाळाची 
उगाचच का भीती वाटायची बर मला … 

आईच्या कुशीत हि कोण आली 
म्हणून कदाचित 
भीत असेन मी तिला 
तरीपण रडण ऐकू आल की 
चोरून बघत असेन मी तिला … 

एकदा धीर धरून गेलो तिचा जवळ 
आई म्हणाली जवळ  हिला 
अरे वेड्या छोटी दीदी मिळाली तुला … 

आता आठवत नाहीये की 
बाळाला त्या पाहून काय बोललो असेन 
पण छोटस ते गुबरु बाळ पाहून 
मी गालातल्या गालात हसलो नक्की असेन 

तीच होती माझी दीदी ,आणि 
जी झाली माझी पहिली-वाहिली मैत्रीण 
तिच्यामुळे शिकायला मिळालं 
काय असत भाऊ असंण ,
आणि काय असत 
कुणालातरी आपल मानून 
तिची काळजी घेण .. 

तेव्हा जी होती जवळ खूप माझ्या 
आहे आहे ती खूप दूर 
पण संपेल हा दुरावा सुद्धा 
येईल आमचा दिवससुद्धा ,
जेव्हा ती असेल ,आणि मी असेल 
आणि असेल आमची मस्ती … 

ते एकमेकांच्या खोड्या काढण ,आणि 
आई बाबांचं लाडक कोण यासाठी 
नेहमी नेहमी भांडण ,
भांडून झाल की रुसवा फुगव धरण 
अन हळू हळू पुन्हा बोलायला लागण … 

आज आठवण येतेय त्या मस्तीची ,
आठवण येतेय त्या मुलीची 
आयुष्यात आलेल्या 
पहिल्या वहिल्या मैत्रिणीची 
आठवण येतेय 
माझ्या दिदीची ,माझ्या बहिणीची … 

Missing You ....To my didi ,my sister 
From your bhaiya ... 


                                                                                                 -सुधीर
                                                                                -