Sunday 1 September 2013

आस्तिक-नास्तिक

                                        आज मला लोकांमध्ये असणाऱ्या एका फार मोठ्या गैरसमजाविषयी बोलायचंय . तो म्हणजे आस्तिक आणि नास्तिक यातला फरक . आपण बहुतेकजण नाही तर सर्वच जण असच मानतो कि जो देव मानतो तो 'आस्तिक ' आणि जो देव मानत नाही तो 'नास्तिक' . माझ्या मते हि साफ चुकीची संकल्पना आहे . एक खूप सोपी संकल्पना आहे या दोन शब्दांमागची .
                                    दोन बेडूक होते जे एका विहिरीत राहत असत . त्यांच्यासाठी ती विहीर म्हणजेच संपूर्ण जग होते . त्या विहिरीबाहेर एखाद जग पण असू शकेल याची त्या दोघांनाही अजिबात कल्पना पण नव्हती . ते दोघ त्यांच्या छोट्याशा जगात मजेत राहत होते . एके वर्षी पावसाळ्यात खूप पाउस पडला ,इतका पडला कि ती विहीर अगदी काठोकाठ भरली . तळातून त्या दोघांना पाण्याचा वर अचानक खूप उजेड दिसायला लागला म्हणून उत्सुकतेपोटी ते पोहत पोहत वर आले आणि हळूच थोडस डोक वर कडून त्यांनी पाहिलं , तर सगळीकडे लख्ख प्रकाश , आजूबाजूला नुसती हिरवीगार झाड आणि थोडे चार पायांवर चालणारी प्राणी त्यांना दिसू लागले . त्यांचा पाण्यातल्या जगापेक्षा हे जग खूप नवीन होत  . त्यातला एक बेडूक म्हणाला "काय मस्त दिसतंय ना हे सर्व !चल ना बाहेर उडी मारू  आणि पाहू कस आहे हे नवीन जग ". दुसरा बेडूक त्याला वेड्यात काढत म्हणाला "मरायचं का तुला ? हे सगळ नवीन जग काहीतरी भयंकर प्रकार दिसतोय मला ,चल आपण आपल तळाशी जाऊ आणि उरलेलं आयुष्य सुखान जगू इथ ". शेवटी न राहावल्यान पहिल्या बेडकाने बाहेर उडी मारलीच .पण तो दुसरा बेडूक तळाशी निघून गेला .त्याचं वर्षी खूप मोठा दुष्काळ पडला आणि त्या विहीरातल पाणी एकदम आटत आल . त्या आतल्या बेडकाचा श्वास गुदमरायला लागला ,शेवटी हताश होऊन त्याने तिथेच प्राण सोडला , आणि तो पहिला बेडूक विहिरीच्या काठावरून हे सर्व पाहत होता पण तो पण काहीच करू शकत नव्हता .
                                  तुम्हाला वाटेल त्या बेडकांचा आणि आस्तिक-नास्तिक असण्याचा काय संबंध ? तर संबंध आहे . मी त्या विहीराबाहेर पडणाऱ्या ,नव जग शोधायला निघालेल्या आणि उजेडाला न घाबरता त्या लख्ख प्रकाशामागाच्या सत्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करणाऱ्या बेडकाला 'आस्तिक ' म्हणेन तर त्या अंधारात खितपत पडलेल्या ,पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर म्हणजेच देवाच्याच  कृपेवर राहणाऱ्या बेडकाला 'नास्तिक' म्हणेन .
                                     देव मानणारा असेल किंवा देव न मानणारा असेल , आस्तिक म्हणजे तो मनुष्य ज्याच्यासमोर नवीन काही आलं मग ते नवं ज्ञान असो किवा आयुष्यात दिसणारा नवा मार्ग असो किंवा नवं काहीही असो , तो ते खुल्या मनानं स्वीकारतो , त्याचा समोर घडणाऱ्या गोष्टींवर विश्वास आहे आणि हा विश्वास आंधळा नाही तर त्या घडणाऱ्या गोष्टीमागच्या कारणावर हि विश्वास आहे . एखाद्या लहान मुलासमोर ज्याला भूत माहित नाही त्याचासमोर तुम्ही एकदा अंधारात जाऊन आलात तर त्या मुलाच मन लगेच हे स्वीकारत कि अंधाराला घाबरायचं काही कारण नाहीये .
                                        पण नास्तिक मनुष्य त्याच्यासमोर कुणीही कितीही सत्य मांडले ,सत्याच्या कितीही बाजू मांडल्या , कितीही डोक आपटलं तरी तो ते सत्य स्वीकारत नाही कारण त्याचा मनात त्यान ठरवलेल्या गोष्टींपेक्षा वेगळी गोष्ट आली तर तो ते नाही स्वीकारू शकत . तोच माझ्या मते नास्तिक .
                                        देवाला न मानणाऱ्या माणसांचा एक मुद्दा असतो कि यांनी देवाला पाहिलं नाही किंवा त्यांना देव कधीच जाणवला नाही , तरीपण ते अस्तिकच असतात  कारण त्यांच मन कारणाशिवाय ची गोष्ट सत्य म्हणून स्वीकारायला तयार होत नाही आणि हा सत्य जाणून घायचा ध्यासच त्यांना आस्तिक बनवतो . त्यामुळ मी अस नक्की म्हणू शकेन कि प्रत्येक देव न मानणारा मनुष्य 'अस्तीक'च असतो .पण प्रत्येक देव मानणाऱ्या व्यक्तींबद्दल अस नाही म्हणता येत . जे कर्मठ धर्मांध लोक असतात ते दुसर कुणाचहि ऐकून घेत नाहीत ,त्यांना जे योग्य वाटत तेच खर आहे आणि तेच एकमेव सत्य आहे अस ते मानतात . माझा त्या परमेश्वरावर ,त्या सर्वोच्च ताकदीवर विश्वास आहे पण पूजा-अर्चा ,कर्मकांड ,यज्ञ-विधी ,ग्रह-ताऱ्यांची दशा यावर विश्वास नसला तरी मी नक्कीच आस्तिक आहे कारण माझ मन खुल  आहे ,येणाऱ्या नव्या ज्ञानासाठी ,नव्या रस्त्यांसाठी ,नव्या दिशा शोधण्यासाठी .
                                          तर तोडून टाका जुनी बंधने जी तुन्हाला पटत नाहीत ,सोडून द्या त्या वाटा ज्यावर तुम्हाला जायची इच्छा नाही ,नव्या वाटा नाव ज्ञान ,नव्या दिशा तुमची वाट पाहतायेत . खरे आस्तिक व्हा आणि सत्याचा ध्यास धरा .

No comments:

Post a Comment