काही नशीबवान लोकांना हे प्रेम आयुष्यात फार लवकर आणि सहजरीत्या मिळत तर माझ्यासारख्या काहींना हे प्रेम फक्त स्वप्नांमध्ये आणि कवितांमध्ये मिळत .. ज्यांना मिळालं आहे त्याचं खर तर नशीब म्हणायचं आणि ज्यांना अजूनही मिळालं नाही त्यांचही नशीब म्हणायचं .. कारण ज्यांना अजूनही प्रेम मिळाल नाही त्या लोकांना हे न मिळालेलं प्रेम शिकवत आयुष्यात आशावादी व्हायला ....
मी या आशावादी अशा लोकांपैकीच एक आहे .. आज ना उद्या ,इथे नाही तर तिथे ,आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर ,जे माझ असेल ते प्रेम मला भेटेल असा विश्वास या हृदयाला कायम वाटत असतो .. म्हणूनच तर माझ्यावर प्रेम करणारी 'ती' कशी असेल याची स्वप्न पाहण ,'ती' आल्यानंतर आयुष्य कस असेल याची कल्पना करणे ,हे आमच्यासारख्यांच कल्पनाविश्व होऊन बसतं ....
येणाऱ्या पावसाची प्रत्येक सर ,जाणवणारी वाऱ्याची प्रत्येक झुळूक , डोळ्यांना दिसणारं प्रत्येक सुंदर दृश्य , ऐकू येणार प्रत्येक मधुर संगीत , ओठावर अलगदरीत्या येणार प्रत्येक गाणं आणि मनाला आनंद देतानाच ओठांवर हलकंच हसू आणणारा प्रत्येक क्षण हे सर्व जणू त्या भविष्यातल्या प्रेमाच्या आशेला आणखी पल्लवित करत असतं .. संथ सुटलेल्या वाऱ्याची झुळूक लागताच एखाद्या झाडाचं पान जस हळूच इकडे-तिकडे डुलत असत ,तसंच रोजच्या या जगण्यात एक जरी निवांत क्षण मिळाला कि हे हृद्य त्या क्षणात त्या पानाप्रमाणे प्रेमाच्या स्वप्नांमध्ये डुलू लागतं ....
कुणीतरी भेटेल जिच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास टाकू ,कुणीतरी भेटेल जिच्यावर मनसोक्त प्रेम करू ,कुणीतरी येईल जी मनातल्या प्रत्येक भावना न सांगता ओळखेल ,कुणीतरी असेल जी आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपला हात हातात घेऊन म्हणेल कि 'चल पुढे ,मी आहेच कि तुझ्यासोबत ' .. कळत-नकळतपणे या सर्व आशा ,सर्व स्वप्न , ही आयुष्य हसत-खेळत जगण्याची प्रेरणा बनून जातात .. शिकवून जातात एक जगण्याची अनोखी पद्धत , भविष्याकडे डोळे लावून आनंदी आयुष्य जगण्याची पद्धत , आयुष्यात न आलेल्या व्यक्तीवर सुद्धा मनापासून प्रेम करण्याची पद्धत , नकळतपणे येणाऱ्या सर्व नकारात्मक विचारांना दूर करून मनात कायम आशेची पणती तेवत ठेवण्याची पद्धत .. आणि सर्वात महत्वाचं या जगण्यावर ,या आयुष्यावर प्रेम करण्याची पद्धत ..…
म्हणून अस म्हणन वावग ठरणार नाही ,कि आयुष्यात प्रेम मिळो वा न मिळो , प्रेम मिळेल आणि प्रेम होईल ही प्रेमाची स्वप्न उराशी घेऊन जगण ,यात एक वेगळीच मजा आहे .. ती मजा एकदा घेऊन तरी बघा .. या स्वप्नामध्ये एकदा हरवून तरी बघा ….
- सुधीर
- सुधीर
No comments:
Post a Comment