Monday 30 June 2014

ही पंढरीची वारी .....

           

       खर पाहायचं तर मी वारकरी संप्रदायाला मानतो त्याचं कारण कुठल कर्मकांड नाहीये तर आजच्या समाजात प्रबोधन करण्याची या संप्रदायात असलेली शक्ती .. ज्ञानोबा तुकोबा असो व गोरा कुंभार व बहिणाबाई ,या संतांचे विचार नीट अभ्यासले आणि ते सर्वांपर्यंत पोहोचवले तर आपल्याला समाजात आणि व्यक्तिगत आयुष्यात भेडसावणाऱ्या सर्व समस्यांची उत्तरे मिळून जातील .. याच संप्रदायाला समजून घेण्यासाठी ,जवळून पाहण्यासाठी या वर्षी मी माझी पहिली-वहिली वारी केली .. खर तर कित्येक वर्षांपासून मी माळकरी होतो ,आता खऱ्या अर्थाने वारकरी पण झालो ..
                   जास्त दिवस शक्य नसल्याने दोन दिवसच जमलं दिंडीसोबत जायला ,पण या दोन दिवसांचा अनुभव सुद्धा अत्यंत विलक्षण होता .. वारीला जाण्याचा माझा उद्देश कुठला देव-देव करणे नसून , मला पाहायचं होता हा दरवर्षी भरणारा अनोखा सोहळा ,जगायचं होत थोड वेगळ आयुष्य ,घ्यायचा होता आयुष्यातला एक अगदी वेगळा अनुभव ..
                आम्ही दोघ मित्र गेलो वारीला आणि वारीला गेल्यानंतर पहिली गोष्ट जी मला प्रकर्षाने जाणवली ते म्हणजे किती अनोखा सोहळा आहे हा .. म्हणजे जिथ आजकाल आपल शेजारी कोण हे माहित नसलेला समाज वाढत आहे तिथ हि एकमेकांना न ओळखणारी वारकरी मंडळी थोड्या-थोडक्या नव्हे तर लाखोंच्या संख्येने एकत्र येतात .. आणि नुसती एकत्र येत नाहीत तर या १८ दिवसात ती एकमेकांना जीव लावतात ,एकमेकांची काळजी घेतात .. माझ्यासाठी हा अनुभव अगदी नवीन होता ,अस वाटल कि खरच माणसांच्या जगात आलोय मी जिथे माणुसकी ठासून ठासून भरली आहे ..
                  मला तर एका आजीबाई नी त्यांचा नातूच मानलं .. माझ नाव घ्यायला त्यांना अवघड वाटायचं तर त्यांनी माझ नाव सुदामन ठेवल .. मी निघून येताना त्या मला म्हणाल्या कि ' हा घे माझ्या मुलाचा नंबर ,आणि कधीपण कॉल कर आणि म्हण कि तुमचा नातू बोलतोय ,मी समजून घेईन तू आहेस म्हणून ' .. खरच अद्भुत आहे या वारकरी मंडळींची माया .. आम्हा दोघांची ही पहिलीच वारी असल्याने दिंडी मधल्या सर्व वारकऱ्याच लक्ष आमच्यावरच असायचं ,आम्हाला नवीन-नवीन भजन ऐकवून दाखवत ,रस्त्याने चालताना ती भजने आवर्जून म्हणायला लावत ,वारकर्यांचा तो भगवा झेंडा आमच्या हाती देऊन आम्हालाच दिंडीच्या पुढे चालायला लावत .. नि हातात टाळ घेऊन आम्हाला भजन म्हणायला लावून ते फार कौतुकाने पाहायचे ,कारण टी-शर्ट जीन्स मधल्या मुलांना अस भजन म्हणताना पाहण्याचा योग त्यांनासुद्धा क्वचितच मिळाला असेल .. दिंडीच्या विणेकरी बाबांनी माझ्या हात वीणा दिली ,मला ती वाजवता नाही आली पण त्यावर थोडेफार आवाज मात्र काढता आले .. असो ..
               आज जिथे आपले सख्खे आपल्याला आपल मानत नाहीत तिथ या दोन दिवसात या अनेक अनोळखी माणसांनी आपल मानलं आणि आपल्या माणसांसारखी माया लावली .. आणि निघून येताना सर्वजण ,अगदी सर्वजण न विसरता आवर्जून म्हणाले कि पुढल्या वर्षी तुम्ही यायचं आणि पूर्ण १८ दिवस आमच्यासोबत चालायचं .. अस वाटल कि हा त्यांचा निरोप नाहीये तर पुढच्या वर्षीसाठीचं हक्काचं बोलावणचं होत .. एवढ्या हक्काने आजपर्यंत आई-बाबा सोडून कुणीसुद्धा बोलावलं नव्हत .. आणि म्हणूनच आम्हाला तिथून निरोप घेण खरच अवघड झाल होत ..
              .. आणि खरच या वारी ला जाऊन ज्या गोष्टी शिकायला मिळतात ,ज्या गोष्टी पाहायला अनुभवायला मिळतात त्या दुसरीकडे कुठेही मिळण शक्य नाही ..
                  पुढच्या वर्षी आणि यापुढील प्रत्येक वर्षी माझा प्रयत्न नक्की असेल की जमेल तेवढे दिवस हि आनंदाची वारी करण्याचा ,हा जगावेगळा अनुभव जगुन ,अजूनही आपण माणुसकी असलेल्या माणसांच्या दुनियेत राहतो हि जाणीव जगण्याचा .. म्हणून एक वाक्य अगदी खरय ,
                                       ही पंढरीची वारी
                                       जणू आनंदाची वारी ….

                                                                                                                             - सुधीर
                                                                                                                                 9561346672

3 comments: