Sunday, 25 September 2016

तेव्हा आणि तिथूनच ...



                   हो ,जेव्हा कोणीतरी एकदम जवळच असं दूर जातं ,तेव्हा मनाला त्रास तर होतोच .. पण खरं तर यांच्यानंतरच इतके दिवस समोर असूनही दिसत नसलेलं असं ते सत्य आपल्याला दिसायला लागत .. सत्य स्वतःबद्दलच .. आणि तिथूनच खरी सुरुवात होते शोधाची .. शोध सुरु होतो स्वतःचा .. म्हणूनच असं म्हणता येईल की ,गवसल्यानंतर कोणीतरी हरवलं जरी तरी त्या हरवण्यातूनसुद्धा काहीतरी गवसतंच ,नाही का  ...  
जेव्हा आयुष्यातून कुणीतरी 
एकदम जवळचं हरवत ना ,
तेव्हा आणि तिथूनच 
स्वतःचा खरा शोध सुरु होतो ... 

                                                                                                                                 - सुधीर

Sunday, 18 September 2016

कधीच नाही ...


नाही .. 
मी नाही विचारलं तिला .. कारण इच्छाच झाली नाही विचारायची .. 
मी नाही विचारलं तिला तिचं पूर्ण नाव .. कारण पूर्ण नाव म्हटलं कि आडनाव सुद्धा त्यात आलंच .. आणि मला खरंच नाही जाणून घ्यायचं तीच आडनावं .. 
कारण आडनाव म्हटलं कि त्यात लपून-छपून 'जात' सुद्धा येतेच ,आणि या जातींच्या भेदभावानेच मला आत्तापर्यँत खूपदा दुखावलं आहे .. 
मी अगदी जीवापाड प्रेम केलं अशा लोकांना सुद्धा दूर केलं आहे या जातींनी  .. 
आणि म्हणूनच , यापुढेही कधीच विचारणार नाही मी तिला तीच पूर्ण नाव .. कधीच नाही ... 
               
                                                                   
                                                                                           - सुधीर  


Tuesday, 13 September 2016

सोप्प होत ...


सोप्प होत तुझं उत्तर 
बस ,माझा प्रश्नच जरा अवघड होता 
तरीपण 
बदलावं तुझं उत्तर यासाठी 
      माझा जीव का अडकला होता ...... 
           
                                                                                                                             - सुधीर


Saturday, 3 September 2016

कोणी आणि कोणीतरी ...

कोणी आणि कोणीतरी यांच्यातलं संभाषण फार मजेशीर होतं  .. 
कोणी कोणालातरी म्हणाले कि आजकाल कोणीही कोणालाच काहीही बोलायच्या किंवा सांगायच्या फंदात पडू नये .. कारण कोणाच्या कोणत्या बोलण्याचा कोण काय कसा आणि कोणता अर्थ काढेल हे कोणालाच सांगता येत नाही .. 
तेव्हा उत्तरादाखल ते कोणीतरीसुद्धा हेच म्हणाले कि कोणी कोणाच्याही बोलण्याचा काय आणि कोणता तो योग्य असा अर्थ काढेल हे कौशल्य कोणाकोणालाच जमत ,तेव्हा कोणाच्यातरी बोलण्याचा योग्य असा अर्थ काढू शकेल ,असे कोणीतरी भेटत नाही तोपर्यंत कोणीही कोणाचेही नाही असेच समजावे आणि म्हणूनच कोणीही कोणासही काहीही न बोललेले बरे ... 

                                                                                  - सुधीर


Friday, 26 August 2016

हसणं ..

कधी गालातल्या गालात 
तर कधी मोकळेपणानं 
असं तुझं ते गोड हसणं
आणि ते हसणं पाहून 
माझ्या मनाचं सारखं सारखं फसण ...


असं हे हसणं .. आणि माझं त्या हसण्यात फसण .. 
पण खरच कमाल असते ना या हसण्याची .. नातं निर्माण करायची आणि तेवढ्याच ताकदीने ते नष्ट करायची जादू या 'हसणं' नावाच्या गोष्टी मध्ये असते .. दोघांच्या हसण्याची लय जुळली कि तिथे जुळतो मैत्रीचा एक धागा दुसऱ्या धाग्याला .. आणि जेव्हा कोणाचंतरी गोड असं ते हसणं अगदी मनापासून आवडायला लागत ना तेव्हा सुरुवात होते एका नाजूक अशा प्रेमाच्या नात्याला .. तर दुसरीकडे जेव्हा कोणी कोणावर तरी हसतं तेव्हा मात्र ग्रहण लागत त्या नात्याला .. म्हणजेच काय तर कोणीतरी कोणावर हसलं म्हणून नाती तुटतात सुध्दा ,आणि कोणालातरी कोणाचतरी हसणं आवडलं म्हणून नाती जुळतात सुद्धा ..

सर्वांचं हसणं तसं पहायला गेलं तर असत वेगळं .. कुणाचं हसणं असतं एकदम गोडं ,तर कुणी एकदम मोकळेपणानं हसतं .. कोणाचं हसणं असत थोडं लाजरं ,अगदी गुपचूप .. तर कोणी हसत अगदी बिनदास्त ,सगळ्या जगाला ऐकू जावं अशा आवाजात .. कोणी कोणी हसताना अक्षरशः सर्व दात दाखवतात ,तर काहीजण फक्त समोरच्याला दातांच्या मुख दर्शनाचा लाभ देतात .. कोणी हसताना सर्व अंग गदागदा हलवून हसत तर कोणी हसताना गालावर एक छान अशी खळी पाडून शोभतं .. हसण्याच्या अशा वेगवेगळ्या तऱ्हा .. तरी एक गोष्ट मात्र नक्की .. हसणं हे नेहमी सुंदरच असत ,फक्त ते मनापासून असायला हवं .. 
                     माझ्या मते तर या जगातली कोणतीही व्यक्ती जेव्हा अगदी मनमोकळेपणानं ,अगदी मनापासून हसते ना त्या वेळेला ,त्या क्षणी ती जगातली सर्वात सुंदर व्यक्ती दिसत असते .. मग ते अजूनही दात न आलेल्या लहानशा इवल्याशा बाळाचं हसणं असो किंवा वय आणि दात दोन्ही निघून गेलेल्या जख्खडं म्हाताऱ्याचं हसणं असो .. 

पण या हसण्याला आपण भीतीच आवरण घालून आजकाल खोटं खोटं हसत आहोत .. कोणीतरी माझ्याकडे पाहून हसेल या भीतीने आपण खरं तर मोकळेपणानं हसण्याच्या या गंमतीपासून दूर जातोय .. माहित नसलेल्या भविष्याची चिंता ,सोबतच्या लोकांचं चुकीचं वागणं ,यशापयश मिळवताना आलेली प्रतिकूल परिस्थिती या असल्या गोष्टी कुठेतरी तुमचं ते हक्काचं हसणं तुमच्यापासून हिरावून घेतायेत ,किंबहुना तुम्ही त्या हिरावून घेऊ देताय .. तेव्हा सर्व भीती सर्व चिंता सोडून फक्त मनमोकळं हसा ,अगदी मनापासून हसा .. मनापासून हसणाऱ्यांना पावलोपावली आनंद देणाऱ्या गोष्टी दिसतील ,पण जर या हसण्यालाच जर भिऊन राहिलो तर मात्र पावलोपावली फक्त चिंताच दिसेल .. पुढचा क्षण ना तुम्हाला माहित ना मला ,आणि ज्याला माहित आहे तो देव ,तो तर वरती बसून तुमच्या या वागण्याकडे पाहून स्वतःच हसत असेल ..

           तेव्हा सर्व चिंता ,सर्व काळजी सोडून द्या आणि बस मनापासून .मनमोकळं हसा .. मग पहा आयुष्य किती सुंदर दिसू लागत ते .. आणि मग तुमचंही मन समोरच्याच्या हसण्यात कसं फसू लागत ते ..
                             

                                                                                   - सुधीर 




  

Thursday, 30 June 2016

गप्पा ...

गप्पा ..
रंगलेल्या गप्पा ..
येता-जाता मारलेल्या गप्पा नाही तर मी बोलत आहे रंगात आलेल्या गप्पांबद्दल ..
या गप्पा ठरवून कधीच सुरू होत नाहीत .. 
बस कोणीतरी असं भेटत ज्यांच्यासोबत मनमोकळेपणाने बोलता येत ,आणि बस सुरू होतात त्या गप्पा 
कधी आठवणी निघतात ,कधी चेष्टा मस्करी होते .. 
कधी सुख-दुःख सुद्धा वाटली जातात तर कधी एकदम फालतू बिनकामाच्या विषयावर सुद्धा बराच वेळ रंगतात या गप्पा ..  
या गप्पा मारता मारता ,एखाद्या विषयावर बोलता-बोलता हा गप्पांचा ,हा बोलण्याचा ओघ कधी कुठे कसा जातो हे कळतसुद्धा नाही ..
गप्पा जिथून सुरू होतात तो विषय ,आणि गप्पा संपतानाचा विषय यात काडिमात्रचाही संबंध नसतो ..
बराच वेळ सुरू राहतात त्या गप्पा ,ते बोलणं .. आणि जेव्हा ते बोलणं संपतं तेव्हा मग मीच विचारात पडतो की गप्पांची सुरुवात नेमकी झाली कुठल्या विषयापासून होती ??
अशा या गप्पाटप्पा ,किंवा गप्पांच्या मैफिली म्हणा ,यांची कहानीच निराळी ...  


                                                                                                - सुधीर 

Wednesday, 1 June 2016

मोकळा श्वास ..


कोण होती ती .. 
वरती आकाशाकडे पाहत ,दोन्ही हात वरती करून डोळे झाकून ती तिथे उभी होती .. 
मावळतीचा सूर्य आकाशातून लाल जांभूस रंगाची किरणे फेकत होता आणि ती त्या रंगांना तिच्या चेहऱ्यावर सामावून घेत होती .. 
वाहणारा वारा तिच्या केसांना इकडे-तिकडे उडवत होता पण तिला त्याची काहीच चिंता नव्हती वा कशाच भान होत तिला . ती बस गुंग होती वरती आकाशाकडे पाहण्यात आणि तो क्षण जगण्यात .. 
खरंच कोण होती ती .. 
तीच नाव ,तीच अस्तित्व या जगासाठी काहीतरी वेगळ असेलसुद्धा ,पण त्या क्षणी त्या तिथे होती ती फक्त एक मोकळा असा श्वास .. 
स्वतःचं अस्तित्व विसरून त्या क्षणी ती झाली होती फक्त एक मोकळा श्वास . सर्व चिंता ,सर्व काही विसरून त्या हवेशी ,त्या वाऱ्याशी आणि उधळणाऱ्या त्या रंगांशी एकरूप झालेला असा एक मोकळा श्वास .. 
रंगांची सुरु असलेली ती उधळण पाहता-पाहता चेहऱ्यावर छान अस हसू आणणारी ती होती जणू एका स्वच्छंद मुक्तीची आस .. 
त्या क्षणी ती होती फक्त एक मोकळा श्वास ..



                                                                                                         - सुधीर