Wednesday, 25 March 2015

मन आणि अपेक्षा .....

         
               
                        अपेक्षा .. आपल मन फक्त आपल्याला स्वतला वाचता येत आणि या मनात अपेक्षा फार निर्माण होतात रोजच्या जगण्यामध्ये .. फार कमाल असते या मनाच्या खेळाची आणि या अपेक्षांची .. समोरच्या व्यक्तीने माझी मनातली अपेक्षा पूर्ण करावी याचीच अपेक्षा आपण दिवसरात्र करत असतो ..  म्हणजे सांगतो 
                मित्र मैत्रीण प्रेयसी ,आई वडील ,इतकाच काय तर रस्त्यावर भेटलेला अनोळखी व्यक्ती असेल तरी त्यान माझ्यासोबत अस वागल पाहिजे अशी आपण अपेक्षा करतो ..  म्हणजे अस एकही नात नाहीये कि ज्यामध्ये आपण समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा न करता राहतो .. हसण्याची गोष्ट म्हणजे आपण तर देवाकडून सुद्धा अपेक्षा करतो कि देवा माझ्यासोबत अस केल पाहिजे ,मला ते दिल पाहिजे ..  
                 आता तुम्ही म्हणाल कि आपण समोरच्या व्यक्तीने आपल्याशी कस वागावं याची अपेक्षा ठेवण्यात गैर काय .. मी अजिबात म्हणत नाही कि यात काही गैर आहे .. उलट हा तर माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे .. पण .. समस्या तिथे सुरु होते जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा तर ठेवतो पण जर त्या व्यक्तीने ती अपेक्षा पूर्ण नाही केली तर मात्र आपण त्या व्यक्तीवर चिडतो , मनातल्या मनात त्या व्यक्तीलाच दोषी मानू लागतो , तुमच्या मनातली अपेक्षा पूर्ण न केल्याबद्दल किंवा तुमच्या मनाप्रमाणे न वागल्याबद्दल .. 
                 आता विचार करा , आत्तापर्यंत  जितक्या पण वेळेला तुम्ही कोणावरही रागावलात किंवा भांडलात , ते खरच त्याची चूक होती म्हणून कि तुमच्या मनाप्रमाण ती व्यक्ती नाही वागली म्हणून .. तुम्हाला दिसून येईल कि समोरच्याची चूक असण्याच्या घटना फार कमी ,पण तुमच्या मनासारख , तुमची अपेक्षा होती तस ती व्यक्ती वागली नाही म्हणूनच तुम्ही भांडलात ,रागावलात ,कधी कधी तर त्यांच्यापासून दूर सुद्धा निघून गेलात 
                 पण खरच या जगात कोणीपण कोणाच्याही अपेक्षेप्रमाणे ,मनाप्रमाणे वागू शकत का ?  नाही ना .. आणि याच तेवढच स्पष्ट अस उत्तर हे आहे कि तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तुमच्या मनात नेमक काय आहे हे समोरच्या व्यक्तीला जसच्या तस समजण अजिबात शक्य नाही .. कारण तुमच्या अपेक्षा या तुमच्या मनात जन्म घेतात ,आणि तुम्ही कस काय अपेक्षा ठेऊ शकता कि तुमच्या मनात निर्माण झालेली अपेक्षा समोरच्या व्यक्तीन तंतोतंत ओळखून त्यानुसार वागाव ..   
             यासाठी एक छोटस सत्य लक्षात ठेवा कि तुमच मन फक्त आणि फक्त तुम्हालाच वाचता येत , म्हणून समोरच्याला स्पष्ट शब्दात सांगा तुमच्या अपेक्षा , सांगा कि तुम्हाला अस अस वाटते आणि त्यान तसं तसं कराव अस तुम्हाला वाटत .. पण समोरच्याला न सांगता , त्याने तुमच्या मनातल अगदी तंतोतंत ओळखाव आणि त्यानुसारच वागाव अशी अपेक्षा ठेवून उगाच सारखा सारखा अपेक्षाभंग करून घेण्यात अर्थ नाहीये ..  याने फक्त माणस दुरावतात आणि नाती बिघडतात .. म्हणून संवाद वाढू द्या ,मनातल्या गोष्टी मोकळेपणाने सांगा , मग बघा अपेक्षा आपोआप कमी होतात आणि आयुष्य सुंदर होऊन जाते … 
                                     याबाबतीत इंग्लिश मध्ये एक छान वाक्य आहे .. 
Before You 'Assume' ,try this crazy method called 'Asking'  ... बरोबरच आहे ,नाही का …. 

                                                                   - सुधीर
                                                                    

Sunday, 15 March 2015

तुझ नि माझ नात …


       काही काही नाती अशी बनतात कि त्यांची गोष्ट च निराळी असते .त्याचं एकत्र हसण ,त्याचं एकत्र रडण ,त्याचं एकमेकांना समजून घेण ,एकमेकांची काळजी घेण हे सर्व निराळच असत .. अचानकपणे आयुष्यात हे नात येत आणि बघता बघता तेच नात कधी आयुष्य बनून जात हे कळतसुद्धा नाही 

हसुनी विसरावं
विसरुनी हसावं
अस तुझ माझ नात
न तू कधी विसरावं
न मी ते विसरू द्यावं  ...

मी तुला सावरावं
तू मला सावरावं
अस तुझ नि माझ नात
सावरुनी एकमेका
तुझ्या आनंदात हरवून जाव  ...

स्वप्नातली परी तू कि
परी च मला पडलेलं स्वप्न
अस तुझ नि माझ नात
ना माझ्याविना तुला
न तुझविन मला काही सुचावं ...

आयुष्यात तू आली माझ्या कि
माझ आयुष्य तुझ्यापर्यंत आलं
अस कस ग आपल हे नात
न ओळखूनसुद्धा एकमेका
वाटत आयुष्य एकत्र चं जगावं ...

अस हे एक नात ..दूर असूनही जवळ वाटणारं आणि जवळ असूनही अजून जवळ याव अस वाटणार .. अस हे एक नात .. तुझ नि माझ नात …

                                                                                                 - सुधीर
                                                                                                 


Wednesday, 5 November 2014

नकार ....

       

       
                नकार .. माझ्या आयुष्यात आला तसा तुमच्यापण आयुष्यात आला असेलच .. याच्या येउन जाण्यानंतर आयुष्यात जे वादळ उठते ना कदाचित त्यामुळेच हा शब्द नको नकोसा वाटत असावा ..
              पण खर तर आयुष्यात 'अनुभवा'नंतर जर सर्वात जास्त दुनियादारी शिकवणारा जर कुठला शब्द असेल तर तो हाच आहे .. याच्या आयुष्यात येण्यानंतर इतके बदल होतात कि माणूसच आतून-बाहेरून बदलून जातो .. काही काही जण तर इतके अमुलाग्र बदलून जातात कि नकारापुर्वीचे ते आणि नकारा नंतरचे ते ,हे दोघे अतिशय वेगवेगळे व्यक्ती भासतात .. 
             माझ्यापण आयुष्यात खूप नकार आले , काही प्रेमात आले तर काही मैत्रीत ,काही रोजच्या चालण्या-बोलण्यात आले तर काही परिस्थितीमुळे मिळाले .. काही या समाजाने दिले तर काही रक्ताचं नात असणाऱ्यांनी ,काही मित्रांनी दिले तर काही पूर्णपणे अनोळखी अशा माणसांनी .. पण खर तर मी या सर्वांच आभार मानायला हव .. कारण यांनी दिलेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या नकारांमुळेच वेळोवेळी मी सावरत गेलो आणि पुन्हा नव्याने उभा राहत गेलो .. तशी ताकद असते बर का या नकारांमध्ये ,तुम्हाला बरच काही शिकवून जाण्याची ,जी परिस्थिती तुम्ही इतर वेळेला मान्य करत नाही ती सत्य परिस्थिती मान्य करायला लावण्याची , आपले कोण आणि परके कोण यातला फरक समजावून सांगण्याची आणि जोराचा झटका बसला असला तरीपण पुन्हा एकदा नव्या जोमान कस उभ राहायचं हे शिकवण्याची अद्भुत ताकद या नकारामध्ये असते .. 
           म्हणूनच आयुष्यात आलेल्या नकाराना हसत हसत स्वीकारा कारण तुमच्यात काहीतरी बदल घडवण्यासाठीच ते नकार तुमच्या आयुष्यात येत असतात .. आणि ते तुम्हाला बदलवतात कारण पुढे जाऊन आयुष्यात येणाऱ्या होकारांसाठी ते तुम्हाला तयार करत असतात .. 
           असाच अर्थाचं 'जेम्स ली बर्क' या अमेरिकन लेखकाचं या 'नकारा' बद्दलच अतिशय छान वाक्य मला आवडत .. तो म्हणतो कि ' स्वतःचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त होण्याकरिता ,तुम्हाला मिळालेल्या नकारा इतक चांगल दुसर काहीही नसत ' .....
   

                                                                                                                                 - सुधीर
                                                                                                                                   

Sunday, 21 September 2014

आनंदाचा हा हिवाळा ...


थंड हवेची आली ती झुळूक  
आणि अंगावर  शहारा देऊन गेली 
तो हिवाळा आला नजदीक 
त्याची ही जणू चाहूल देऊन गेली … 

आज कुणीतरी मला म्हटलं कि मला हिवाळा खूप आवडतो .. त्याच क्षणी जाणवलं कि अरे हिवाळा तर आता जवळ आला .. मला मनापासून आवडणारा हिवाळा , पण का आवडतो मला हा हिवाळा ,हिवाळ्यातली ती थंड हवेची झुळूक का हवीहवीशी वाटते ते मात्र माहित नव्हत .. तेव्हा लगेच उठून खिडकीमध्ये जाऊन थांबलो ,आणि काही क्षणातच एक थंड हवेची झुळूक अंगाला स्पर्शून गेली .. आणि नकळत अंगावर एक शहारा येउन गेला ,आयुष्यात कोणाच्यातरी आगमनाची चाहूल देऊन गेला  .. 
..
हिवाळा .. हवाहवासा वाटणारा हा हिवाळा .. पावसाळ्यातले थेंब ते उन्हाळ्यातला तो कोरडेपणा ,या दोन्ही विरुद्ध टोकांच्या मध्ये येतो हा दिलासा देणारा ,मायेची उब घेऊन येणारा हिवाळा .. रस्त्यावरची गरमा-गरम भजी असू द्या किंवा रत्यावर उभ राहून गरमा-गरम भाजलेलं कणीस खाण असू द्या वा घरी आईच्या हातचा गरमा-गरम पराठा असू द्या ,या सर्वांची मजा हा हिवाळा देतो .. 
..
बाल्कनी मध्ये जाऊन हातामध्ये गरमा-गरम कॉफी घेऊन थांबलो असताना ,समोर दिसते ते मोकळे साफ निरभ्र आकाश ,ज्यात मधेच एखादा पांढरा ढग येउन माझ्याकडे पाहून निघून जातो ,जणू तो पण या हिवाळ्यातल्या थंडीने गारठून जाऊन पांढरा पडला असावा अस वाटत .. त्या मोकळ्या आकाशाकडे पाहताना मधूनच अंगाला स्पर्शून जाते एक थंड-थंड हवेची झुळूक .. आणि तिचा स्पर्श होताच अंगावर उभे राहतात शहारे ,जे त्या गरमा-गरम कॉफी ची मजा आणखीनच वाढवून जातात ... 
..
दुपारची असो वा रात्रीची असो ,हिवाळ्यातल्या झोपेची तर गोष्टच न्यारी .. थंडी वाजतेय म्हणून अजून थोडा वेळ म्हणत म्हणत खूप वेळ अंथरुणातून बाहेर न पडण्याचा यापेक्षा चांगला बहाणा तर कुठे सापडणारच नाही .. आणि अंथरुणाच्या आतल वातावरण तर विचारूच नका .. जणू बाहेरच्या हिवाळ्यामध्ये आपण आपलच एक उबदार अस जग तयार करतो अंथरुणात ,ज्यात असते थोडी गरम ,थोडी हवीहवीशी वाटणारी ऊब .. लाडक्या उशीवर डोक ठेऊन ,डोळे झाकून ,बाहेरच्या जगाची सर्व चिंता विसरून मस्तपणे झोप घ्यायला लावणारा असा हा माझा आवडता हिवाळा .. 
..
जे प्रेमात असतात त्यांच्यासाठी तर हा हिवाळा म्हणजे जणू सुखाचे दार .. गुलाबी थंडी मध्ये प्रेयसी सोबत हातात हात घालून फिरण्याचा आनंद ,हा त्यांनाच विचारावा .. आणि जर ती दूर कुठेतरी असेल तर अंगावर येणारी प्रत्येक थंड हवेची झुळूक तिची आठवण आणून ती जवळच कुठेतरी आहे असा भास आणतेच आणते .. थंडी वाजतेय म्हणून स्वेटर ची होणारी देवाण-घेवाण असो वा हाताचे दोन्ही तळवे घासून गरम झालेले ते तळवे तिच्या गालावर ठेवून तिला तात्पुरता का होईना ,उबदार प्रेमाचा असा स्पर्श जाणवून देणे ,हे सर्व माझ्या लाडक्या हिवाळ्यामुळेच तर घडते .. 
..
कडाक्याची थंडी पडलेली असताना सुद्धा ,मजा म्हणून मुद्दाम थंडगार असे कोल्ड्रिंक्स पिणे किंवा कुठे मिळाला तर रंगबेरंगी बर्फाचा गोळा खाणे ,यातली मजा मी काय सांगू तुम्हाला .. या साहसाचा आणखीन एक फायदा होतो ,तो असा कि थंडगार कोल्ड्रिंक पिउन जेव्हा नंतर सर्दी होते ,डोक थोडस दुखायला लागत तेव्हा "आई ,मला बर वाटत नाहीये ग " अस म्हणत आईच्या हातून लाड करवून घ्यायची ती नामी संधी हातून न गमावलेलीच बरी .. मग काय ,जागेवर बसून गरमा-गरम पदार्थांवर ताव मारायचा आणि काही दिवस 'लेकरू आजारी आहे' म्हणून आई करते ते सर्व लाड करून घेत राहायचं .. 
..
कदाचित म्हणूनच मला आणि तुम्हालापण हा हिवाळा इतका आवडतो ,इतका हवाहवासा वाटतो .. तेव्हा या येणाऱ्या हिवाळ्यात ,सर्व चिंता सर्व काही विसरून बस त्या थंड हवेच्या लहरींच स्वागत करा आणि मस्त साजरा करा आनंदाचा हा हिवाळा …. 

                                                                                                   - सुधीर  
                                                                                                     

Sunday, 7 September 2014

पाऊलखुणा ..



पाऊलखुणा ..
जेव्हापासून ही पावले टाकायला सुरुवात केली अगदी तेव्हापासून ते आत्तापर्यंतच्या जीवनाच्या या प्रवासात मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मला दिसतात ,कित्येक पाऊलखुणा .. या जीवनाच्या वाटेवर माझ्या पावलांच्या शेजारी दिसणाऱ्या या पाऊलखुणा .आत्तापर्यंत आयुष्यात आलेल्या ,आयुष्यात राहिलेल्या व मध्येच आयुष्यातून निघून गेलेल्या अशा अनेक पावलांच्या त्या पाऊलखुणा .यातली प्रत्येक पाऊलखुण वेगळी आहे आणि प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे .
            काही पाऊलखुणा ह्या सुरुवातीपासून ते अजूनही माझ्या पावलांच्या शेजारी दिसतात ,तर काही पाऊलखुणा या सुरुवातीला तर सोबत होत्या पण काळाच्या ओघात त्या नाहीशा झाल्या .मधूनच काही पाऊलखुणा माझ्या पावलांसोबत जोडल्या गेल्या ,पण अगदी फार कमी वेळेसाठी .काही अंतर कापताच त्यासुद्धा दिसेनाशा झाल्या .कित्येक वळणांवर अशा अनेक पाऊलखुणा सोबतीला आल्या व कित्येक वळणांवर त्या दूर निघुनपण गेल्या .काही पाऊलखुणांच्या सोबतीने भरकटलो तर काही पाऊलखुणांच्या सोबतीने सावरलो .काही पाऊलखुणा मधूनच एका ठिकाणावर साथ द्यायला आल्या आणि त्या आजही माझ्या पावलांना साथ देत आहेत व नुसती साथ नाही तर कधी कधी त्या स्वतः माझ्या चुकलेल्या पावलांना योग्य तो रस्ता पण दाखवतात .

                                       पाऊलखुणा मिटल्या जरी
                                       मिटल्या नाहीत आठवणी
                                       वाटेवरती वळणावरती
                                       भेट होईल कुठेतरी          …।

 या सर्व पाऊलखुणांकडे मागे वळून पाहताना दिसत कि ,या पाऊलखुणात ती एक पाऊलखुण नाहीये जी मला पुढे कायम सोबत देईल .आणि कायम साथ देतील असं वाटणाऱ्या पाऊलखुणा मधेच एका वळणावर अशा गायब झाल्या कि माझ्या पावलांना त्या या वाटेवर एकाकी सोडून गेल्या .
या दूर झालेल्या पाऊलखुणा विसरायचं म्हटलं तरी शक्य होत नाही .आणि खरच ,नुसत विसरायचं म्हटलं तरी शक्य असत का हो अशा पाऊलखुणांना विसरणं .शोकांतिका अशी आहे कि त्यांना न विसरता ,ही पावलं पुढच जात नाहीत .थोड्या अंतरावर जाताच हि पावलं मागे वळून पाहतात ,त्या जुन्या ओळखीच्या पाऊलखुणा कुठे दिसतात का ते पाहायला .
तेव्हा अस म्हणायला हरकत नाही कि ,आयुष्यात जुन्या पाऊलखुणांना विसरायचं असेल तर ते तेव्हाच शक्य होईल जेव्हा सोबतीला या पावलांना नव्या पावलांची साथ मिळेल .

                                     मिटल्या जरी त्या जुन्या खुणा
                                     साथ मिळेल नव्या खुणांची
                                     साथीने त्या नव्या पावलांच्या
                                     वाट सारून जाईल आयुष्याची   …।

आज हि पावले चालतायेत ,मध्येच साथ सुटलेल्या त्या जुन्या पाऊलखुणा पुढच्या वाटेवर कुठल्यातरी वळणावर कधीतरी भेटतील या इच्छेने आणि चालता चालता या वाटेवर कायमची साथ देतील अशा नव्या पावलांची एक ना एक दिवस साथ मिळेल अशा आशेने  ...… 

                                                                                                      - सुधीर 
                                                                                                     

Friday, 29 August 2014

चेहरा ..

             
                 चेहरा .. या चेहऱ्यांची आणखी एक फार मोठी  गम्मत असते .जन्मल्या जन्मल्या आपण आईचा चेहरा पाहतो आणि गंमत म्हणजे नंतर ते बाळ काही महिने तरी फक्त त्याचा आईचाच चेहरा ओळखते ,आणि अनोळखी चेहरे दिसताच ते रडू लागते .म्हणजे जन्मापासूनच आपण अगदी नकळतपणे चेहऱ्यांचे ओळखीचे आणि अनोळखी असे आपल्या मनात प्रकार पाडत असतो .
            आपण रोजच्या आयुष्यात जगताना ,आजूबाजूला आपण ओळखीचे चेहरे दिसतात का ते पहायचा प्रयत्न करत असतो .मग ते शाळा ,कॉलेज असो व रस्त्यावर सिग्नलला थांबलेलो असताना असो वा कुठेतरी प्रवासाला जात असू ,आपण पाहत असतो कि कुठे एखादा ओळखीचा चेहरा दिसतोय का ते .    
            पण हे ओळखीचे चेहरे खरच ओळखीचे असतात का ? अनेकदा अस होत कि हे ओळखीचे चेहरे सुद्धा अनोळखी वाटू लागतात आणि काही काही अनोळखी चेहरे का कुणास ठाऊक पण ओळखीचे वाटू लागतात .कित्येकदा असे प्रसंग घडतात कि आपल्याला गरज असते तेव्हा आपण आपल्याला ओळखीचे वाटतात अशा चेहेऱ्याकडे आशेने पाहतो ,कारण आपल्याला विश्वास असतो कि हि माणसे मला नक्की समजून घेतील ,मला मदत करतील .परंतु होते वेगळेच , ओळखीचे हे चेहरे साथ सोडून देतात आणि अनोळखी सारखे वागतात आणि तेव्हा कुठूनतरी एखादा अनोळखी चेहरा येतो आणि तोच आपल्याला मदतीचा हात पुढे करतो .आणि त्याच अनोळखी चेहऱ्यासोबत पुढे आपले संबंध दृढ होतात आणि यातूनच मैत्री ,प्रेम निर्माण होते .
           तरीसुद्धा हे मन अनोळखी चेहऱ्यांवर सहजासहजी विश्वास ठेवायला तयार होत नाही .जेव्हा कधी ओळखीचा आणि अनोळखी चेहरा यात निवडायची वेळ येते तेव्हा आपण नक्की ओळखीच्या चेहऱ्याचीच निवड करतो .कारण आपण अनोळखी चेहऱ्यांना आपलस करायला भीत असतो .भलेही त्यांचा आणि आपला संबंध काही क्षणांपुरता असो तरीसुद्धा आपण त्या चेहर्यांकडे अविश्वासानेच पाहतो .म्हणून तर प्रवासात भेटणार प्रत्येक माणूस चोर वाटतो ,रस्त्यावर भेटणारा प्रत्येक भिकारी हा दारुडा वाटतो ,मदत मागणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला फसवीच वाटते आणि मैत्रीचा हात पुढे करणारी प्रत्येक व्यक्ती हि वाईट दृष्टीची वाटते .
         म्हणून माझ्या मते ,जगण्याची खरी मजा असते ती या अनोळखी वाटणाऱ्या चेहऱ्यांवर कधी कधी विश्वास टाकून पाहण्यात .एखाद्या अनोळखी चेहरऱ्याला आपणहून मदतीचा हात देण्यात .मग पहा ,त्या अनोळखी चेहऱ्यांचे आयुष्य ,त्यांच्या समस्या या अनोळखी न राहता तुम्हाला त्या नक्की ओळखीच्या वाटू लागतील ,आणि जाणवेल कि अरेच्चा आपल आयुष्य सुद्धा यांच्यासारखाच आहे .
      तेव्हाच खर तर प्रेमाची भावना  निर्माण होऊ शकते .प्रेम या जगाबद्दल ,प्रेम या समाजाबद्दल कारण अनोळखी चेहऱ्यांना आपलस करण्याच्या या स्वभावालाच तर प्रेम म्हणतात नाही का .. 
                                                                                         
                                                                                                            - सुधीर
                                                                                                                           

Tuesday, 15 July 2014

मोरपीस ....

         
           आज एका निवांत क्षणी माझ्या टेबलवर असणाऱ्या त्या मोरपिसाकडे लक्ष गेल .. जेव्हापासून श्रीकृष्णचरित्र वाचलंय तेव्हापासून या मोरपिसाच मला कायम कुतुहूल वाटत .. त्या मोरपीसाकडे पाहिलं कि त्याच्या त्या रंगबेरंगी रंगात हरवल्यासारख होत ,त्याचा तो बाहेरून आतमध्ये गडद होत जाणारा रंग ,कधी कधी कुतुहूल जागवतो ..
            आज त्या मोरपीसाकडे पाहताना अचानक एक विचार मनात चमकून गेला आणि एक क्षण अस वाटल कि या मोरपिसाच रहस्य हे तर नाही ना ? कृष्णाने आयुष्यभर ,अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते मोरपीस जवळ ठेवले ते कदाचित या रहस्यामुळेच तर नाही ना ?? कदाचित हा माझा अंदाज बरोबर नसेल किंवा फक्त कल्पनाविलास असेलही ,पण माझ्या 'ज्ञानाचा शोध आणि अज्ञाताची ओढ' या जीवनवाक्याला अनुसरून आयुष्याबद्दल जी उत्तर शोधायचा मी प्रयत्न करतो त्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे ..
            मोरपिसाची सर्वात आकर्षून घेणारी गोष्ट म्हणजे त्याचा रंग .. बाहेरून आत जाऊ तसा तसा अधिकाधिक गडद आणि केंद्रित होत जाणारा तो रंग .. हे मानवी मनाचं ,मानवी स्वभावाचं च तर प्रतिक आहे ,नाही का .. मानवी मन मानवी स्वभाव हा सुद्धा या मोरपीसासारखाच तर असतो ,मनाच्या जितक आत मध्ये जाल तितक अधिक काळोख ,तितकी अधिक अनिश्चितता .. म्हणून तर म्हणतात कि कोणाच्याही मनाला समजून घेण अशक्य आहे ,मग ती व्यक्ती कितीपण जवळची असो .. 
               जशी मनाची गोष्ट तशीच स्वभावाची सुद्धा ,दुरून एखाद्या व्यक्तीचा वाटणारा स्वभाव आणि तीच व्यक्ती अगदी जवळून आयुष्यात पाहायला मिळाली तेव्हा त्या व्यक्तीचा समजून येणारा खरा स्वभाव ,हा त्या मोरपिसासारखाच भासतो ,बाहेरून आत जाव तसा अधिकाधिक गडद होत जाणारा .. लग्न होऊन अगदी शेवटपर्यंत एकत्र राहणाऱ्या पती-पत्नीला सुद्धा एकमेकांच मन ,एकेमेकांचा खरा स्वभाव संपूर्ण समजलेला असतं अस काही नाही .. 
             प्रत्येकाचा स्वभाव ,प्रत्येकाचं मन सर्वसाधारणपणे सारखच भासत ,पण त्या मनाच्या केंद्रस्थानी जाव तसा काळोख वाढत जातो आणि त्या मनाच्या केंद्रात ,त्या काळोखात काय काय विचार ,काय दडलेलं असत ते कधी कधी त्या व्यक्तीला सुद्धा माहित नसत .. कृष्णचरित्र वाचताना एक गोष्ट आढळली ती म्हणजे आपल्या पूर्ण आयुष्यात कृष्ण जो काही वागला बोलला ,ते त्याच वागण बोलन अस होत जणू काही तो समोरच्या व्यक्तीच्या मनाला पूर्णपणे जाणत होता ,त्याला जणू माहित होत कि समोरच्या व्यक्तीच्या मनाचा बाहेरून आत बदलत जाणारा रंग कोणता आहे .. आणि म्हणूनच त्याच्या या कौशल्याचं प्रतिक म्हणून त्यानं हे मोरपीस कायम जवळ ,त्याच्या शिरपेचात बाळगले असावे … 
      शेवटी या मोरपिसाबद्दल खर उत्तर मिळण तर अशक्यच आहे ,तरी माझ्या परीने ,आयुष्याबद्दलच्या ज्ञानाच्या शोध घेत घेत अज्ञाताच्या ओढीने आयुष्याशी सांगड घालत मला मिळालेलं हे उत्तर ..   
        
                                                                                                                         - सुधीर