Saturday, 22 August 2015

तुझा साथ हवा आहे ....


                      अस नेहमी म्हणतात कि माणूस या जगात एकटाच येतो आणि जाताना एकटाच जातो .. कदाचित अस असेलही ,पण हे येण आणि हे जाण याच्या दरम्यान जो 'जगण ' नावाचा भाग असतो ,त्या मध्ये आपण एकटे नाही राहू शकत .. आपल्याला गरज असते एका साथीची ,साथ देणाऱ्या अशा साथीदाराची जो या जगण्याला खऱ्या अर्थाने 'जगण' बनवतो .. मग तो साथीदार ,ती साउली जी आयुष्यात आल्यावर आयुष्य कस असेल याबद्दल माझ्या मनातल थोडस .. 
                                                               

 तुझी मैत्री हवी आहे 
तुझा हात हवा आहे
    जीवनात आता प्रत्येक क्षणी 
    तुझा साथ हवा आहे …… 
  
  तुझा राग तुझा रुसवा 
माझ्यावरती असायलाच हवा
   पण त्या रागात कुठेतरी
    प्रेमाचा पाझर असायला हवा ……


तुझ हसण तुझ बडबड करण 
मला ऐकायचं आहे नेहमी 
आणि ते ऐकत असताना 
        त्या तुझ्या बोलण्यात हरवायचं नेहमी ……


तु हसताना मला तुला पहायचंय  
मात्र तू रडली कि तुला खूप खूप हसवायचं 
तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात 
तुला फक्त आणि फक्त आनंदात पहायचंय ……


तुझे शब्द हवे आहेत 
ज्यांनी मला आधार दिला 
आता तुला सर्वस्व बनवण्याचा 
मी पक्का इरादा केला .....


तुझ प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी 
द्यायची आहे मला तुझी साथ 
आता तुझी स्वप्न पूर्ण करण 
हीच माझ्यापण स्वप्नांची वाट ..... 


माझ्या या भावना समजून घ्यायला 
तुझा समंजसपणा हवा आहे 
मी आहे थोडसा वेडाखुळा
म्हणून तुझा साथ हवा आहे ..… . 
                                                                  तुझा साथ हवा आहे ......… 


                                                                                                  -सुधीर 

Wednesday, 19 August 2015

ओ रे मनवा तू तो बावरा है ....


                                  'ओ रे मनवा तू तो बावरा है' .. हे हिंदी गीत ऐकता ऐकता मनात विचार आला कि खरच रे मना ,तू किती वेडा आहेस .. तू कधी कुठ कसं धावशील हे सांगता येत नाही .. कधी या वाटेने तर कधी त्या वाटेने ,नेहमी कशाच्यातरी मागे ,कोणाच्यातरी मागे ,कधी स्वप्नाच्या मागे तर कधी सत्याच्या मागे ,तू नेहमी धावत असतोस ..
                 खरच वेड असतं हे मन .. याला जगाची दुनियादारी अजिबात समजत नाही .. हा आपला स्वतःच्याच नादात असतो .. कोणीतरी आवडलं कि तिच्याच मागे धावत बसतं ,ती समोर असो वा नसो मात्र याला काहीच फरक नाही पडत .. कोणी थोडस प्रेम दिल कि लगेच पघळतो ,आणि कोणी जरासं मनासारख नाही वागाल तर लगेच रुसून फुगून बसत .. अशा रुसलेल्या फुगलेल्या मनाला मनवायची पण गरज नसते मग ,समोरच्या व्यक्तीच्या सोबतीमध्ये हे मन झालेलं सर्व आपोआप विसरून जात ,इतक साध भोळ असत हे मन ..
                  मनापासून साथ देण हे खर तर मनाकडून शिकावं ,कोणतीही परिस्थिती असो ,कोणताही प्रसंग असो ,हा नेहमी साथ आणि साद देत असतो .. काही चुकीचं करत असेल तर 'हे चूक आहे ' अशी साद देणार हे मनच असत ,आणि काही योग्य अस करत असेन तर माझ्या चेहऱ्यावर हसू फुलवायचं काम हे मनच करत .. याला आवडणाऱ्या व्यक्तीचे शंभर नखरे सुद्धा हा हसत हसत सहन करेल पण नावडत्या व्यक्तीने एक जरी चूक केली तर हे त्याला कधीच माफ न करायच्या अविर्भावात त्याकडे पाहते ..
                खरच हे मन नसत तर जगायची मजा आलीच नसती .. कितीही वय झाल तरी आपल्या आतल ते लहानपण ,तो लहान निष्पाप मुल जिवंत ठेवायचं काम हा मनच करतो .. मन खर तर आपल्या आतलं ते खट्याळ खोडकर बाळच असत .. पहा ना ,हे याला जे आवडेल तेच करत ,आवडेल तिकडेच धावत ,आणि याला आवडत नसेल ते करायला लावलं कि मात्र लगेच बंड करून उठत ,छोट्या छोट्या आनंदात हे अगदी मनसोक्त नाचत ,आणि छोटस दुख आलं कि लगेच रडायला लागत .. अस हे लहान मन ,जेव्हा मोठेपणा दाखवायचा प्रसंग येतो तेव्हा  हे डोळस ,हुशार व्यक्तीलाही मागे टाकत ,म्हणूनच कदाचित 'मनाचा मोठेपणा' हा वाक्यप्रचार रूढ झाला असावा .. 
               अस हे वेड मन ,हे वेड आहे म्हणूनच जगायची मजा अनुभवता येते .. नाहीतर विचार करा ना ,की सगळेच कायम अख्खं आयुष्य डोळसपणे ,बुद्धीने ,समजूतदारपणे वागत असते तर किती कंटाळवाण झाल असत हे जग .... म्हणूनच 

ओ रे मनवा तू तो बावरा है ,तू ही जाने तू क्या सोचता है
क्यो दिखाये सपने तू सोते जागते ….  

                                                                                                  - सुधीर 

Tuesday, 7 July 2015

धाग्या-धाग्याच आयुष्य ...


           धाग्या-धाग्याच आयुष्य हे .. धागा म्हटलं कि त्याच दुसऱ्या धाग्यात विणण आलं आणि त्यातून पुन्हा उसवण आलं .. धाग्याची गोष्ट अशीच सुरु राहते ,त्याच आयुष्य हे पुन्हा पुन्हा उसवण आणि पुन्हा पुन्हा विणण यातच सामावलेलं असतं .. तशीच काही गोष्ट असते आपल्या आयुष्याची नाही का .. 
             जन्म घेताच हे आयुष्याचे धागे विणले जातात ते आई वडील यांच्यासोबत ,नंतर नातेवाईक भाऊ बहिण ,मित्र ,मैत्रिणी ,प्रियकर ,प्रेयसी आणि जस जस आयुष्य पुढे वाढत जात तस तस या आयुष्याच्या धाग्यात गुंतत जातात अनेक इतर धागे आणि त्यातून बनत जातात नात्यांचे बंध .. आणि नात्यांच्या बंधात गुंतता गुंतता मध्येच उसवण पण वाट्याला येत या धाग्याच्या .. काही बंध गुंतले जातात आणि काही उसवले जातात ,आणि हे आयुष्य बनत उसावण्या-गुंतण्याच खेळ .. पण हे उसवण आणि गुंतण इतक सोप्प असत तर ते आयुष्य कसलं .. 
              हे आपल मन या या उसवाण्याच्या आणि गुंतण्याच्या खेळात अडकलेल असत .. म्हणून तर समजून उमजून मांडलेला खेळ असो वा नकळतपणे मांडला गेलेला खेळ असो ,मन हे त्या खेळात गुंतत जातेच .. आणि मजेशीर गोष्ट अशी कि मनाला या खेळात गुंतण तर खूप चांगल जमत पण त्यातून बाहेर पडण मात्र अवघड जात .. म्हणून तर कोणी आपलं असं वाटणार जेव्हा दूर जात ,त्या नात्यातून आपल आयुष्य उसवलं जात तेव्हा चांगल नाही वाटत या मनाला .. आणि जेव्हा हा एकटेपणा दूर करणारे ,पुन्हा नव्या स्वप्नांची उमेद जागवणार कोणीतरी नवीन असं या आयुष्यात गुंतलं जात तेव्हा मात्र हे मन अगदी आनंदित होत .. 
            पण शेवटी हे आयुष्य असच आहे नाही का .. कधी गुंतायचं कधी उसवायचं .. गुंतलं कोणात हा धागा तर तो बंध घट्ट बांधायचा म्हणजे कधी सहजा-सहजी उसवू नये आणि जर कधी उसवलचं तर पुन्हा नव्या वाटा ,नवी दिशा ,नवे आकाश ,नवी स्पंदने शोधायसाठी सज्ज व्ह्यायचं आणि त्या नव्या स्वप्नांमध्ये पुन्हा नव्याने गुंतायचं  .. असच असतं धाग्या धाग्याच आयुष्य हे ......
धाग्या धाग्या सारख आयुष्य हे 
 गुंतता गुंतता उसवत हे अन 
उसवता उसवता गुंतत हे 
पण या गुंतण्याच्या उसवण्याच्या खेळात ,
या मनाला नेहमी फसवत हे
कधी उसवत तर कधी विणत हे 
धाग्या धाग्या सारखं आयुष्य हे .. गुंतण्या-उसवण्याचं आयुष्य हे ….. 

                                                                                  - सुधीर

Sunday, 31 May 2015

एका क्षणाची गोष्ट ....


एका क्षणाची गोष्ट .. 
हि गोष्ट वाचा आणि विचार करा .. 
        
                    एक क्षण होता .. त्या तिकडे दूर वरती आकाशामध्ये हसत बागडत खेळत होता .. सर्व क्षणांची राणी आणि आई होती 'वेळ' .. त्यातल्या त्यात हा क्षण त्या राणीचा सर्वात आवडता क्षण होता .. राणीचं एकच काम होत ते म्हणजे योग्य वेळेला त्या त्या क्षणांना पृथ्वीवर पाठवायचं ,वेगवेगळ्या लोकांच्या आयुष्यात .. पण या सर्वाला राणीचा एकच नियम होता ,कि त्या क्षणांसोबत ती राणी फक्त आनंद पाठवायची ,दुख किवा निराशा असलं काहीच नसायचं त्या क्षणांसोबत .. यामागे राणीचा एकाच उद्देश होता कि पृथ्वीवरच्या माणसांनी ते-ते क्षण आनंदात जगावेत .. 
               हा तिचा लाडका क्षण सुद्धा वाट पाहत होता .. त्याला नेहमी वाटायचं कि कधी एकदाच मला पण खाली जायला मिळतंय आणि मी पण कोणाच्यातरी आयुष्यात आनंदाचा तो एक क्षण बनतो .. तो राणीजवळ नेहमी म्हणायचा कि मला जाऊ द्या खाली आत्ताच ,पण राणी त्याला म्हणायची कि तुझी खाली जायची वेळ नाही आली अजून .. पण अखेर एके दिवशी राणी त्याला म्हणालीच कि तुझी खाली जायची वेळ आली .. 
                 तो अतिशय आनंदाने उड्या मारतच खाली आला ,एका मुलीच्या आयुष्यातला क्षण बनायला .. ती मुलगी त्या क्षणाला एका पुलावर उभी होती ,एकटीच समोर वाहणाऱ्या नदीकडे पाहत ,डोळे मिटून ती फक्त उभी होती .. तिला आनंदित करायला हा क्षण तिच्या जवळ गेला ,त्याला वाटले तीच मन त्या क्षणाच स्वागत करेल ,अगदी मनाचे दरवाजे उघडून ,आनंदाने त्या क्षणाला ती आपलस करेल .. पण तिथे त्या क्षणाची अगदीच निराशा झाली .. 
             तो क्षण तिच्या मनाच्या जवळ गेला आणि म्हणाला कि "मी क्षण आहे ,आत्ताचा क्षण ,तू ज्याला आयुष्य म्हणतेस तो दुसरा कोणी नसून तुझ्या आयुष्यात येणारे क्षण च असतात ,तसाच मी आत्ताच तुझ आयुष्य आलोय तुझा दारात ,मी आत्ताचा क्षण आलोय ".. तेव्हा त्या मुलीचं मन म्हणाल कि "मला नाही गरज कोणत्या कशाची ,मी माझ्या माझ्या दुखात आहे ,माझ्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी , त्या आठवणी यांचा मला त्रास होतोय ,माझ्या मनातून ते भूतकाळ आणि त्या कटू आठवणी जातचं नाहीत , आणि मी त्याचाच विचार करत असते दिवसरात्र  ,तर तू जा निघून "..
                तो क्षण हिरमुसून गेला अगदी ,तो अगदी जीवापासून म्हणाला "अग जे तुझ्यासोबत घडल मागे तो भूतकाळ होता ,ते जेव्हा घडत होत ; तेव्हा जे क्षण तुझ्या आयुष्यात होते ते क्षण केव्हाच निघून गेले ,मी आत्ताचा नवा क्षण आलोय तुझ्या आयुष्यात ,एक नव स्वप्न घेऊन ,एक नवी उमेद घेऊन ,एक नव जगण घेऊन ,मला आत येऊ दे ,तुझ्या मनाला आनंदाने भरू दे ,मला फक्त एकदा आपलस करून तरी पहा ,या जगण्यात किती गम्मत असते ते तुला कळेल ,मला तुझ्या मनाच्या आत येऊ तरी दे ".. 
                पण त्या मुलीने ऐकलच नाही आणि तेवढ्यात या क्षणाची वेळ संपली आणि पुढचा क्षण तिथे आला .. मग या क्षणाला पुन्हा वरती राणीकडे जाव लागल .. वरती गेल्यावर हा क्षण राणीला म्हणाला कि मला त्या मुलीच्या आयुष्यात आनंद भरायचा आहे तर मला अजून एकदा जायची संधी द्या ,तर राणी म्हणाली कि "ती वेळ ,तो क्षण तिच्या आयुष्यातून निघून गेला आहे ,आता पुन्हा कधीच तिला तो क्षण नाही मिळणार "..      

               वाचलीत ना हि गोष्ट ,गोष्ट अगदी साधीच आहे ,पण आपल अख्ख जगण सांगून जाते हि गोष्ट .. हा आत्ताचा क्षण हेच आयुष्य आहे हे न समजून घेता आपण भूत आणि भविष्य यातल्याच क्षणांमध्ये अडकून बसतो आणि आत्ताचा हा क्षण ,हे आयुष्य जगायचं राहूनच जात ,नाही का .. तर अजूनही वेळ गेलेली नाही ,येणारा प्रत्येक क्षण अगदी नवा कोरा आहे अस जगा ,जे झाल ते झालंय आणि जे होईल ते अजून व्हायचंय ,मग त्यासाठी आत्ताचा क्षण जगायचं का सोडायचा … विचार करा … 

                                                                                      - सुधीर

Saturday, 11 April 2015

हा क्षण ....

             
              
                  क्षण .. कमाल असते ना या क्षणांची ,कसे बघता बघता ,आणि जगता जगता ,निघून जातात हातातून हे क्षण .. आपल्याला कळतही नाही आणि तोपर्यंत तो क्षण निघून गेलेला असतो .. आणि हा क्षण जातानाही एकदम गुपचूप आणि छुप्या पावलाने जातो बर का .. आत्ता या क्षणी मी हे लिहित आहे तो क्षणसुद्धा पण हे वाक्य लिहून पूर्ण होईपर्यंत निघून गेलेला असेल ,आणि तुम्ही हे वाचाल तेव्हा तर तो भूतकाळ बनलेला असेल .. 
              आपण सगळे जगतो म्हणजे हा येणारा प्रत्येक क्षण ,काहीतरी करतो .. काम करतो ,अभ्यास करतो ,विचार करतो ,बोलतो ,हसतो ,रडतो ,झोपतो ,खातो आणि असे असंख्य कार्ये ,जी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणात आपण करत असतो ,हेच ते असंख्य क्षण म्हणजेच जीवन .. हे क्षण सगळ्यांना सारखेच तर मिळतात .. आत्ता मी हे लिहित आहे हा क्षण ,या क्षणी तुम्ही पण तुमच्या आयुष्यात काहीतरी करत असाल न ,भलेही परिस्थिती वेगळी असेल तुमची आणि माझी ,पण क्षण तर तोच आहे ना .. मग अस का होत कि काहीजणच तो क्षण पुरेपूर जगतात ,आणि बाकीचे बस त्या क्षणाला असच जाऊ देतात ,न जगता .. 
            कारण कि भरपूर लोकांना हे कळतचं नाही कि आयुष्य म्हणजे कुठली भव्य-दिव्य अशी गोष्ट नसून ,आयुष्य म्हणजे हा आत्ताचा क्षण आहे .. आयुष्य ना मागे गेलेल्या क्षणांमध्ये असते ना पुढे येणाऱ्या क्षणांमध्ये असते ,ते फक्त असते या आत्ताच्या क्षणात .. बस एवढीच छोटीसी पण अख्खं विश्व व्यापून टाकणारी संकल्पना आहे आयुष्याची ... 
              मग मला सांगा कि भूतकाळात गेलेल्या क्षणांना कवटाळून बसण्यात किंवा भविष्यात येणाऱ्या क्षणांची कल्पना करून त्याच भविष्याच्या स्वप्नात अडकून राहण्यात काय अर्थ आहे .. जो जायचा तो क्षण केव्हाच निघूनपण गेला ,आणि जो भविष्यात येणारा क्षण आहे तो केव्हा येईल ,कसा येईल किंवा येईल का नाही हे सुद्धा कोणीच सांगू शकत नाही .. मग का उगाच या भूत आणि भविष्यात अडकून राहून हातातला हा क्षण वाया जाऊ द्यायचा … 
                म्हणून आयुष्य जगायचं तर या क्षणात जगा .. हेच आयष्य आहे आणि ते सदा सर्वदा सुंदर च असतं .. आणि हे आयुष्य दुसर तिसर काही नसून ,फक्त आणि फक्त ' हा आत्ताचा क्षण ' एवढच असत .. सर्व झालेल्याच दुख आनंद आणि होणारयाच दुख आनंद सोडा ,आणि फक्त हा क्षण जगा म्हणजे आयुष्य आपोआप जगाल … 
शेवटी जाता जाता मीच इंग्लिश मध्ये लिहिलेलं एक सुंदर वाक्य सांगतो या क्षणाबद्दल  ... 
"In our life ,We lie to ourselves that we are moving forward .. Actually it is The Moment , the Time which ever truly moves forward in our life , all the time .."

                                                                                                - सुधीर
                                                                                           


Wednesday, 25 March 2015

मन आणि अपेक्षा .....

         
               
                        अपेक्षा .. आपल मन फक्त आपल्याला स्वतला वाचता येत आणि या मनात अपेक्षा फार निर्माण होतात रोजच्या जगण्यामध्ये .. फार कमाल असते या मनाच्या खेळाची आणि या अपेक्षांची .. समोरच्या व्यक्तीने माझी मनातली अपेक्षा पूर्ण करावी याचीच अपेक्षा आपण दिवसरात्र करत असतो ..  म्हणजे सांगतो 
                मित्र मैत्रीण प्रेयसी ,आई वडील ,इतकाच काय तर रस्त्यावर भेटलेला अनोळखी व्यक्ती असेल तरी त्यान माझ्यासोबत अस वागल पाहिजे अशी आपण अपेक्षा करतो ..  म्हणजे अस एकही नात नाहीये कि ज्यामध्ये आपण समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा न करता राहतो .. हसण्याची गोष्ट म्हणजे आपण तर देवाकडून सुद्धा अपेक्षा करतो कि देवा माझ्यासोबत अस केल पाहिजे ,मला ते दिल पाहिजे ..  
                 आता तुम्ही म्हणाल कि आपण समोरच्या व्यक्तीने आपल्याशी कस वागावं याची अपेक्षा ठेवण्यात गैर काय .. मी अजिबात म्हणत नाही कि यात काही गैर आहे .. उलट हा तर माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे .. पण .. समस्या तिथे सुरु होते जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा तर ठेवतो पण जर त्या व्यक्तीने ती अपेक्षा पूर्ण नाही केली तर मात्र आपण त्या व्यक्तीवर चिडतो , मनातल्या मनात त्या व्यक्तीलाच दोषी मानू लागतो , तुमच्या मनातली अपेक्षा पूर्ण न केल्याबद्दल किंवा तुमच्या मनाप्रमाणे न वागल्याबद्दल .. 
                 आता विचार करा , आत्तापर्यंत  जितक्या पण वेळेला तुम्ही कोणावरही रागावलात किंवा भांडलात , ते खरच त्याची चूक होती म्हणून कि तुमच्या मनाप्रमाण ती व्यक्ती नाही वागली म्हणून .. तुम्हाला दिसून येईल कि समोरच्याची चूक असण्याच्या घटना फार कमी ,पण तुमच्या मनासारख , तुमची अपेक्षा होती तस ती व्यक्ती वागली नाही म्हणूनच तुम्ही भांडलात ,रागावलात ,कधी कधी तर त्यांच्यापासून दूर सुद्धा निघून गेलात 
                 पण खरच या जगात कोणीपण कोणाच्याही अपेक्षेप्रमाणे ,मनाप्रमाणे वागू शकत का ?  नाही ना .. आणि याच तेवढच स्पष्ट अस उत्तर हे आहे कि तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तुमच्या मनात नेमक काय आहे हे समोरच्या व्यक्तीला जसच्या तस समजण अजिबात शक्य नाही .. कारण तुमच्या अपेक्षा या तुमच्या मनात जन्म घेतात ,आणि तुम्ही कस काय अपेक्षा ठेऊ शकता कि तुमच्या मनात निर्माण झालेली अपेक्षा समोरच्या व्यक्तीन तंतोतंत ओळखून त्यानुसार वागाव ..   
             यासाठी एक छोटस सत्य लक्षात ठेवा कि तुमच मन फक्त आणि फक्त तुम्हालाच वाचता येत , म्हणून समोरच्याला स्पष्ट शब्दात सांगा तुमच्या अपेक्षा , सांगा कि तुम्हाला अस अस वाटते आणि त्यान तसं तसं कराव अस तुम्हाला वाटत .. पण समोरच्याला न सांगता , त्याने तुमच्या मनातल अगदी तंतोतंत ओळखाव आणि त्यानुसारच वागाव अशी अपेक्षा ठेवून उगाच सारखा सारखा अपेक्षाभंग करून घेण्यात अर्थ नाहीये ..  याने फक्त माणस दुरावतात आणि नाती बिघडतात .. म्हणून संवाद वाढू द्या ,मनातल्या गोष्टी मोकळेपणाने सांगा , मग बघा अपेक्षा आपोआप कमी होतात आणि आयुष्य सुंदर होऊन जाते … 
                                     याबाबतीत इंग्लिश मध्ये एक छान वाक्य आहे .. 
Before You 'Assume' ,try this crazy method called 'Asking'  ... बरोबरच आहे ,नाही का …. 

                                                                   - सुधीर
                                                                    

Sunday, 15 March 2015

तुझ नि माझ नात …


       काही काही नाती अशी बनतात कि त्यांची गोष्ट च निराळी असते .त्याचं एकत्र हसण ,त्याचं एकत्र रडण ,त्याचं एकमेकांना समजून घेण ,एकमेकांची काळजी घेण हे सर्व निराळच असत .. अचानकपणे आयुष्यात हे नात येत आणि बघता बघता तेच नात कधी आयुष्य बनून जात हे कळतसुद्धा नाही 

हसुनी विसरावं
विसरुनी हसावं
अस तुझ माझ नात
न तू कधी विसरावं
न मी ते विसरू द्यावं  ...

मी तुला सावरावं
तू मला सावरावं
अस तुझ नि माझ नात
सावरुनी एकमेका
तुझ्या आनंदात हरवून जाव  ...

स्वप्नातली परी तू कि
परी च मला पडलेलं स्वप्न
अस तुझ नि माझ नात
ना माझ्याविना तुला
न तुझविन मला काही सुचावं ...

आयुष्यात तू आली माझ्या कि
माझ आयुष्य तुझ्यापर्यंत आलं
अस कस ग आपल हे नात
न ओळखूनसुद्धा एकमेका
वाटत आयुष्य एकत्र चं जगावं ...

अस हे एक नात ..दूर असूनही जवळ वाटणारं आणि जवळ असूनही अजून जवळ याव अस वाटणार .. अस हे एक नात .. तुझ नि माझ नात …

                                                                                                 - सुधीर