Wednesday, 9 September 2015

Art of Living ....



             Art of living .. म्हणजे जगण्याची कला .. नुकतच एका मित्राने हा क्लास केला .तो मलापण म्हणत होता की कर तू हा क्लास .मी विचार करेन म्हणालो .त्या क्लास मध्ये योग ,प्राणायाम आणि काही व्यक्तिमत्व सुधारणा करायच्या गोष्टी शिकवल्या जातात अस ऐकण्यात आलं .पण मग याला आर्ट ऑफ लिवींग का म्हणतात ? आणि माझ्या मनात हाही विचार येत आहे कि मुळात जगण्याची कला ही कुठल्या क्लास मध्ये शिकायची गोष्ट असते का ,माझ्या मते तर ती कला जगण्यातून आपोआप शिकत जायची असते . 

          जगण .. एक अशी कला आहे जी समजून घेण्यातच बऱ्याच जणांच आयुष्य निघुन जात ,तर बऱ्याच जणांना ते समजून घायची नसतेच .त्यांना फ़क्त रोजच रुळलेल आयुष्य कसतरी संपवायच असत ,पण बरेच असेही लोक आहेत जे या जगण्याच्या कलेला समजून घेण्याचा प्रयत्न करतात .म्हणून त्यांच्या मनात अनेक प्रश्न येतात जगण्याविषयी ,की आयुष्य अस का आहे ,आयुष्यात अस का होत ,कालपरवा सगळ छान सुरु असताना मध्येच काहीतरी समस्या का येते ,सुख हे नेहमी दुःखच्या कड़क उनानंतर येणाऱ्या थंडगार अशा सावली सारखच अगदी काही क्षणांसाठीच का येत ,त्या निळ्याशार आकाशासारख ते कायम आपल्या भोवती का राहत नहीं ,असे अनेक प्रश्न . मग ही माणसे आपापल्या परीने या प्रश्नांना शोधतात ,काही जण आयुष्याबद्दल लिहितात ,तर काही जण त्याच वाचन करतात ,काही जण रंगांमध्ये आयुष्य रंगवतात तर काहीजण संगीतामध्ये हरवून जातात ,काहीजण स्वतःला आजूबाजूच्या नात्यांमध्ये गुंतवून त्यात आयुष्य शोधतात तर काहीजण नात्यांच्या गोतावळ्यातून बाहेर पडून या समाजासाठी काहीतरी करतात ,पण हे सर्व करताना ही सर्व माणसे एक प्रकारे त्यांच्या जगण्याची कलाच शिकत असतात ,नाही का …. 

        या प्रश्नांची उत्तर ज्याला त्याला ,त्याच्या-त्याच्या कुवतीनुसार मिळत जातात ,अणि जगण पुढ जात रहत .मला मिळालेलं उत्तर म्हणजे ही जगण्याची कला म्हणजे दूसर तीसर काही नाही तर फक्त पुढे वाहत जायच ,एखाद्या नदीसारख .. उगमाच्या वेळी असणारा आयुष्याचा छोटासा प्रवाह पुढे जाउन अवाढव्य पात्र बनत ,ज्या पात्रात जागोजागी ,वळणावळणावर येउन मिळालेले असतात अनेक इतर प्रवाह ,अनेक इतर नद्या .अशा या सर्व प्रवाहांना आपल्यात सामावून घेऊन रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक वळणावर स्वतःचा मार्ग स्वत शोधत ,अनेक खाच खळगे पार करत पुढे जात राहयच . वाहत जाताना रस्त्यात किनारी असणाऱ्या चविष्ट सुखाच्या झाडाच्या पडलेल्या फळांना आपल्यात सामावून घ्यायचं पण त्या झाडाचा मोह न करता हा प्रवास पुढे चालू ठेवायचा ,कधी आनंदाचा उंच धबधबा होऊन खाली पडायचं ,तर कधी निराशेची नागमोडी वळण घेत तिथून बाहेर निघण्याचा आपला रस्ता शोधून काढायचा . 
          कधी कधी एखाद वळण असही येत जिथुन पुढ वाट शोधन अवघड होत ,तरीसुद्धा त्यातून मार्ग काढून हा जगण्याचा प्रवाह चालू ठेवायचा ,मार्गात अनेक मोठे दगड सुद्द्धा येतील ,अतिशय ओबडधोबड ,त्या दगडांना सुद्धा आपल्या शीतल ,प्रेमळ प्रवाहाच्या माऱ्याने गुळगुळीत करत पुढे जात रहायचं .कधी घनदाट जंगलातून जाव लागत ,काही काही जंगलं तर इतकी घनदाट असतात की तिथे सूर्यप्रकाश सुद्धा पोहोचत नाही ,तेव्हा तिथल्या अंधाराला न घाबरता ,आपला मार्ग न सोडता पुढे जात राहायचं .हा पूर्ण प्रवास सुरु असताना ,भेदभाव न करता जो जो प्रेमासाठी तहानलेला असा कोणी आपली ओंजळ पुढ करेल त्याला या प्रवाहातल थोडस प्रेम देऊन त्याची तहान भागवायची आणि असंच मजल दरमजल करत नेहमी ,प्रत्येक क्षणाला ,बस न थांबता पुढे जात राहायचं आणि शेवटी मृत्युरूपी सागरात विलीन व्ह्ययच .हेच असत आयुष्य अणि हेच असत जगण .
      मार्गात कितीही अडथळे आले ,कितीही अडचणी आल्या ,वाहून वाहून शरीर थकल तरी न थांबता हा आयुष्याच्या प्रवाह सतत वाहता ठेवण ,हीच आहे खरी जगण्याची कला .. जस नदीच्या वाहणाऱ्या प्रवाहाला पाहिलं कि आपल्या मनाला एक विलक्षण शांतता जाणवते ,तसाच आपणही ही जगण्याची कला अशी जोपासायची की आपल जगण पाहणाऱ्याला सुद्धा मनाला शांतता जाणवली पाहिजे .. 

     ही कला आयुष्याची ,ही अशीच जगता जगता शिकायची असते ,शिकता शिकता जगायची असते … 

                                                                                                            - सुधीर 



4 comments:

  1. khup sunder...malahi kityekda ayushyachi tulana nadishich karavishi vatate.........kharech sunder...Keep it up

    ReplyDelete
  2. mast lihitos tu.... and nehami pramane ha pan lekh chan ahe.... keep going.. :)

    ReplyDelete