ती अनोळखी सफर
त्या अनोळखी वाटा …
अशीच एक काहीसी अनोळखी सफर मला करावयास मिळाली .. प्रत्येक सफर काहीतरी नवीन शिकवते अस म्हणतात ,तसच या सफरीतून मी एक गोष्ट नक्की शिकलो ,कि समोर येणाऱ्या अनोळखी वळणांना घाबरण्यापेक्षा ,त्या वळणांच्या पुढे काय आहे याची चिंता करण्यापेक्षा त्याला सामोरे गेलात तर त्या वळणाच्या पुढे तुम्हाला सापडेल अस काही सौदर्य ,असा काही अनुभव ,असे काही क्षण जे अपेक्षेपेक्षा जास्तच काहीतरी देतात आपल्याला ..
मित्रांसोबत गेलेल्या या सफरीत ,रस्त्यात अचानक अशी काही अनोळखी वळणे ,अशा काही अनोळखी वाटा येत होत्या ,तेव्हा अस वाटायचं कि या वळणावरती पुढे जायचं का नाही ,या अनोळखी वळणाच्या पुढे काय असेल ,जे असेल ते धोकादायक तर नसेल न ,या अनोळखी वाटेने पुढे गेलो तर परत येताना काही अडचण तर नाही ना येणार ,अशा एक ना अनेक प्रश्नांनी ,शंकांनी मन भरल होत .. तरी आम्ही ती अनोळखी वळण पार केली ,त्या अनोळखी वाटांवर पुढे जात राहिलो .. आणि कमालीची गोष्ट म्हणजे ,आम्हाला प्रत्येक वळणानंतर अशा काही जागा दिसल्या ,अशा काही घटना घडल्या ,अशा काही गोष्टी आम्हाला करायला मिळाल्या ,कि त्याच गोष्टी ,त्याच क्षणांनी प्रवासाच्या परतीच्या वेळेस आमच्या चेहऱ्यावर हसू आणलं ,त्याच क्षणांनी आम्हाला एक अतिशय सुंदर अस आठवणींचा साठा दिला जो आम्ही कायम सोबत ठेऊ आणि तो आठवून गालातल्या गालात हसू सुद्धा ..
आपल आयुष्य पण असच काहीस असत नाही का ,प्रत्येक येणारे अनोळखी वळण ,प्रत्येक येणारी अनोळखी व्यक्ती काहीतरी जगण्याचा अनुभव शिकवते आपल्याला .. एका अनोळखी मुलासोबत क्लास मध्ये सहज म्हणून बोललो ,आणि आज तो माझा जिवलग मित्र आहे ,एका अनोळखी मुलीला काळजीने दोन शब्द बोललो तर ती आज माझी मानलेली बहिण आहे ,अनोळखी शहरात कोणासोबत तरी बोलायची सुरुवात झाली आणि तेच पुढे कायमचे मित्र झाले आणि जे जे कोणी आयुष्यात आहेत ,ते सर्व त्या क्षणाला अनोळखीच होते .. पण त्या वेळेला ,त्या अनोळखी वाटेने गेल्याने आज हि नाती आहेत माझ्या आयुष्यात .. जर पुढे काय होईल या विचाराने त्या अनोळखी वाटेने गेलोच नसतो तर कदाचित ही आज अनमोल अशी वाटणारी सर्व नाती कदाचित नसती माझ्या आयुष्यात .. हो ,अशा अनोळखी वळणांवर कधी कधी त्रास सुद्धा झाला ,मन सुद्धा दुखावल गेल ,मात्र तो हि अनुभव आयुष्याच्या शिदोरीत कधीतरी कामाला येईलच ..
मला मान्य आहे की ,ओळखीच्या वाटांनी जाताना चांगल वाटत ,आणि अनोळखी वाटा थोड्याशा भीतीदायक वाटतात .. कारण माहित नसलेल्या गोष्टीना आपण थोडफार का होईना पण भीतच असतो .. पण तीच भीती बाजूला सारून पुढे जात राहिलो तरच आयुष्याची हि अनुभवाची शिदोरी वेगवेगळ्या क्षणांनी ,घटनांनी भरत जाते ,आणि याच शिदोरीला आपण जगण अस म्हणतो ,नाही का ..
म्हणूनच ..ती अनोळखी सफर ,त्या अनोळखी वाटा
जगण म्हणजे हेच
जगण्याच्या अथांग समुद्रावर ,अनोळखी अशा क्षणांच्या लाटा ……
-सुधीर
No comments:
Post a Comment