Sunday, 31 May 2015

एका क्षणाची गोष्ट ....


एका क्षणाची गोष्ट .. 
हि गोष्ट वाचा आणि विचार करा .. 
        
                    एक क्षण होता .. त्या तिकडे दूर वरती आकाशामध्ये हसत बागडत खेळत होता .. सर्व क्षणांची राणी आणि आई होती 'वेळ' .. त्यातल्या त्यात हा क्षण त्या राणीचा सर्वात आवडता क्षण होता .. राणीचं एकच काम होत ते म्हणजे योग्य वेळेला त्या त्या क्षणांना पृथ्वीवर पाठवायचं ,वेगवेगळ्या लोकांच्या आयुष्यात .. पण या सर्वाला राणीचा एकच नियम होता ,कि त्या क्षणांसोबत ती राणी फक्त आनंद पाठवायची ,दुख किवा निराशा असलं काहीच नसायचं त्या क्षणांसोबत .. यामागे राणीचा एकाच उद्देश होता कि पृथ्वीवरच्या माणसांनी ते-ते क्षण आनंदात जगावेत .. 
               हा तिचा लाडका क्षण सुद्धा वाट पाहत होता .. त्याला नेहमी वाटायचं कि कधी एकदाच मला पण खाली जायला मिळतंय आणि मी पण कोणाच्यातरी आयुष्यात आनंदाचा तो एक क्षण बनतो .. तो राणीजवळ नेहमी म्हणायचा कि मला जाऊ द्या खाली आत्ताच ,पण राणी त्याला म्हणायची कि तुझी खाली जायची वेळ नाही आली अजून .. पण अखेर एके दिवशी राणी त्याला म्हणालीच कि तुझी खाली जायची वेळ आली .. 
                 तो अतिशय आनंदाने उड्या मारतच खाली आला ,एका मुलीच्या आयुष्यातला क्षण बनायला .. ती मुलगी त्या क्षणाला एका पुलावर उभी होती ,एकटीच समोर वाहणाऱ्या नदीकडे पाहत ,डोळे मिटून ती फक्त उभी होती .. तिला आनंदित करायला हा क्षण तिच्या जवळ गेला ,त्याला वाटले तीच मन त्या क्षणाच स्वागत करेल ,अगदी मनाचे दरवाजे उघडून ,आनंदाने त्या क्षणाला ती आपलस करेल .. पण तिथे त्या क्षणाची अगदीच निराशा झाली .. 
             तो क्षण तिच्या मनाच्या जवळ गेला आणि म्हणाला कि "मी क्षण आहे ,आत्ताचा क्षण ,तू ज्याला आयुष्य म्हणतेस तो दुसरा कोणी नसून तुझ्या आयुष्यात येणारे क्षण च असतात ,तसाच मी आत्ताच तुझ आयुष्य आलोय तुझा दारात ,मी आत्ताचा क्षण आलोय ".. तेव्हा त्या मुलीचं मन म्हणाल कि "मला नाही गरज कोणत्या कशाची ,मी माझ्या माझ्या दुखात आहे ,माझ्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी , त्या आठवणी यांचा मला त्रास होतोय ,माझ्या मनातून ते भूतकाळ आणि त्या कटू आठवणी जातचं नाहीत , आणि मी त्याचाच विचार करत असते दिवसरात्र  ,तर तू जा निघून "..
                तो क्षण हिरमुसून गेला अगदी ,तो अगदी जीवापासून म्हणाला "अग जे तुझ्यासोबत घडल मागे तो भूतकाळ होता ,ते जेव्हा घडत होत ; तेव्हा जे क्षण तुझ्या आयुष्यात होते ते क्षण केव्हाच निघून गेले ,मी आत्ताचा नवा क्षण आलोय तुझ्या आयुष्यात ,एक नव स्वप्न घेऊन ,एक नवी उमेद घेऊन ,एक नव जगण घेऊन ,मला आत येऊ दे ,तुझ्या मनाला आनंदाने भरू दे ,मला फक्त एकदा आपलस करून तरी पहा ,या जगण्यात किती गम्मत असते ते तुला कळेल ,मला तुझ्या मनाच्या आत येऊ तरी दे ".. 
                पण त्या मुलीने ऐकलच नाही आणि तेवढ्यात या क्षणाची वेळ संपली आणि पुढचा क्षण तिथे आला .. मग या क्षणाला पुन्हा वरती राणीकडे जाव लागल .. वरती गेल्यावर हा क्षण राणीला म्हणाला कि मला त्या मुलीच्या आयुष्यात आनंद भरायचा आहे तर मला अजून एकदा जायची संधी द्या ,तर राणी म्हणाली कि "ती वेळ ,तो क्षण तिच्या आयुष्यातून निघून गेला आहे ,आता पुन्हा कधीच तिला तो क्षण नाही मिळणार "..      

               वाचलीत ना हि गोष्ट ,गोष्ट अगदी साधीच आहे ,पण आपल अख्ख जगण सांगून जाते हि गोष्ट .. हा आत्ताचा क्षण हेच आयुष्य आहे हे न समजून घेता आपण भूत आणि भविष्य यातल्याच क्षणांमध्ये अडकून बसतो आणि आत्ताचा हा क्षण ,हे आयुष्य जगायचं राहूनच जात ,नाही का .. तर अजूनही वेळ गेलेली नाही ,येणारा प्रत्येक क्षण अगदी नवा कोरा आहे अस जगा ,जे झाल ते झालंय आणि जे होईल ते अजून व्हायचंय ,मग त्यासाठी आत्ताचा क्षण जगायचं का सोडायचा … विचार करा … 

                                                                                      - सुधीर

2 comments: