Monday 16 November 2015

मी आहे इथेच बाळा ...

                      
                        आजसुद्धा ती खूप रडत होती ,संध्याकाळची वेळ होती ,आणि ती तिच्या रूम मध्ये पलंगावर बसून एकटीच रडत होती .. आणि आजच नाही तर कित्येक दिवसापासून ती असच रडत होती ,रोज या वेळेला .. शेवटी न रहावून तिची आई आली तिच्या जवळ ,तिला समजवायला ,तिच्या लाडक्या लेकीला ,तिच्या लाडक्या बाहुलीला शांत करायला .. पण आई तिथे असून सुद्धा तीच रडण थांबतच नव्हत 
                            कारण तिला आई दिसतच नव्हती .. दिसत होता तो फक्त आईचा भिंतीवरचा फोटो ,ज्यावर फुलांचा हार होता .. काही दिवसांपूर्वीच एका अपघातात तिची आई देवाघरी निघून गेली होती ,तिला आणि तिच्या बाबांना एकट सोडून .. आणि त्या दिवसापासून तिच रडण सुरूच होत .. तिचं ते रडण पाहून आई तर तिथे येणारच होती, पण आईचे शब्द तिच्यापर्यंत पोहोचणार कसे .. तिला रडताना पाहून कासावीस झालेली ती आई म्हणते की बाळा नकोस ग रडू ....
मी आहे इथेच तुझ्या जवळ 
दूर नाहीये बाळा 
पूस ते ते डोळ्यातलं पाणी 
अन छानसं गोडं हसं ना बाळा …
तुझा तो पहिला स्पर्श 
अजूनही लक्षात आहे ग माझ्या 
इवलेसे हात अन इवलेसे ते पाय 
अजूनही नजरेत आहेत माझ्या … 
शाळेच्या पहिल्या दिवशी
रडणारी ती पिटुकली
अन शाळा सुटल्यावर मग
पळत येउन बिलगणारी ती चिमुकली .. 
शाळेला रोज जायला लागली तेव्हा 
अगदी सकाळी सकाळी उठायची तू 
आई हे दे अन आई ते दे म्हणत 
अख्ख घर डोक्यावर घायची तू … 
 जेवताना हे हवं ते नको
असा किती सारा हट्ट करायची
पण कधी मला आजारी पाहिलं
        की जवळ येउन लाड करायची  .. 
बाबांची खूप लाडकी आहेस तू 
पण माझाही जीव आहे ग तुझ्यात 
रडू नकोस आता अशी 
मी जिवंत आहेच न तुझ्यात .. 
रडताना पाहिलं तुला कधी 
तर जीव अगदी कासावीस व्हायचा 
गोड बोलून तुला शांत केल तरी 
एकांतात मात्र माझ्याही अश्रूंचा बांध तुटायचा … 
खेळताना खुपदा पडायची तू
पण जखम व्ह्यायची मला   
आता तुला रोज रडताना पाहून
खूप त्रास होतो ग मलाच …
तुझ ते गोड हसण पाहायसाठी
मला सात जन्मसुद्धा कमीच पडतील
नको हिरावून घेऊ ते हसण माझ्यापासून
नाहीतर माझ्या अश्रुंचे बांध सारखेच फुटतील ..
मी आहे इथेच तुझ्या जवळ
अजिबात दूर नाहीये बाळा
पूस ते डोळ्यातलं पाणी
अन छानस गोड हसं ना बाळा ..
कमजोर पडू नकोस कधी
मी आहेच तुझ्या सोबतीला
माझी मुलगी आहेस तू
हे पण दाखवून दे या जगाला ..
कितीही संकट आली तरी
मागे वळून पाहू नकोस
एकदा "आई" अशी हाक मार 
बाकी जगाची चिंता करू नकोस ... 
थांबतील माझे शब्द जरी 
भावना तुझ्यापर्यंत येतच राहतील 
नसले मी शरीराने जरी 
वेड मन माझ तुझ्याकडे येतच राहील .. 
जाते आता मी बाळा 
एकदा पाहूदे तुला मन भरून 
तुला पाहण्यासाठीच फक्त 
आलेय मी स्वर्गही सोडून ... 
मी आहे इथेच तुझ्या जवळ 
दूर नाहीये बाळा 
पूस ते ते डोळ्यातलं पाणी 
अन छानसं गोडं हसं ना बाळा … 
एकदा छानस गोड हसं ना बाळा .. 

आईचा आवाज तर नाही पण त्या मायेच्या भावना ,या तिच्यापर्यंत पोहोचल्या कदाचित .. हळू हळू तीच रडण थांबत गेल ,आणि काही वेळाने बाबा आले घरी आणि ती बाबांसोबत गप्पा गोष्टी मध्ये रमून गेली .. आणि बाबांनी तिला खूप हसवलं ,इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून .. तेव्हाच तिथल्या आईच्या फोटोवर तिची नजर गेली ,आणि एक हलकास हसू तिच्या चेहऱ्यावर उमटलं ...  आणि तिला हसताना पाहून कुठूनतरी तिला पाहत असलेल्या त्या आईच्या चेहऱ्यावर सुद्धा हलकस हसू उमटलं ....  



                                                                                                                          - सुधीर (9561346672)