Wednesday 30 April 2014

जय हा महाराष्ट्र माझा …


आज सर्व म्हणतायेत ,जय जय महाराष्ट्र माझा
पण खरच आहे का ,जय हा महाराष्ट्र माझा …

इथे लावल्या जातात
हिंदी इंग्रजीतून पाट्या
आणि मराठीचं नाव घेताच
कपाळाला मात्र पडतात आट्या
तरीही म्हणायचं का ,जय हा महाराष्ट्र माझा …

इथे खुलेआम होते
दलित तरुणाची क्रूरहत्या
का विसरली हि माणसे
माणुसकीचा च पत्ता
तरीही म्हणायचं का ,जय हा महाराष्ट्र माझा …

शक्तिमिल मध्येच होतो
नारीशक्तीवर बलात्कार
जिजाऊ सावित्रींच्या या राज्यात
का ऐकू येतो स्त्रियांचा चित्कार
तरीही म्हणायचं का ,जय हा महाराष्ट्र माझा …

इथे उंचच उंच बांधतात
पुतळे महापुरुषांची
का शिवबा आंबेडकर उरले
फक्त हार चढवण्यासाठी
तरीही म्हणायचं का ,जय हा महाराष्ट्र माझा …

इथला भूमिपुत्र आहे जो
तो गरीब बळीराजा
पाऊस पडो वा दुष्काळ
का नशिबी त्याच्या फक्त आत्महत्या
तरीही का म्हणायचं ,जय हा महाराष्ट्र माझा …

इथे पणाला लावतात
मराठी अस्मिता स्वतःची
अन तरीही सर्व म्हणतात
माय मराठी आमुची
तरीही का म्हणायचं ,जय हा महाराष्ट्र माझा …

इथे आहे शिवबांचा वारसा
फुल्यांनी दाखवला शिक्षणाचा आरसा
चला पुन्हा महाराष्ट्र घडवूया
माय मराठीला वाढवूया
कारण मला म्हणायचय ,जय हा महाराष्ट्र माझा …

आता तरी वागूया ,आता तरी बोलूया
मराठीसाठी जगूया ,मराठीसाठी लढूया
आणि मग सर्वजण
अभिमानाने म्हणूया ,जय जय हा महाराष्ट्र माझा ….

                                                                                                                - सुधीर
                                                                                                                    9561346672
   

Monday 21 April 2014

आज आमच्या इथे पाऊस पडला ...

आज आमच्या इथे पाऊस पडला .. पण हा पाऊस मला जर वेगळाच भासला ..
उष्णतेच्या झऱ्यातून आणि गरम वाऱ्यातून वाट काढत एक काळाकुट्ट ढग आला ..
त्या काळ्याच्या आगमनाची वार्ता देण्यासाठी पांढऱ्याशुभ्र विजासुद्धा आनंदात नाचू लागल्या .. आणि आजच्या जातीभेद ,धर्मभेद आणि रंगभेदाच्या या जमान्यात निसर्गातली हि गोष्ट मला आल्हाददायी वाटून गेली .. 
त्या विजांचा नाच संपताच टिप-टिप अशा आवाजांचा खेळ सुरु झाला आणि पाहता-पाहता आकाशातून ओल्याशार थेंबांचा मारा सुरु झाला ..  
उन्हाने होरापलेल्या जमिनीला आणि समस्यांनी वैतागलेल्या मानवाला सुखाचे काही क्षण देत यावेत म्हणू ते थेंब माखो मैलांचा प्रवास करून खाली उतरले ..
त्या थेम्बानाही हे माहित असत कि ,खाली उतरताच त्याचं आयुष्य संपणार आहे .. तरीपण तहानलेल्या जीवांना शांती देण्यासाठी ,त्रासलेल्या जीवांना सुखाचे क्षण देण्यासाठी ते इवल्याश्या थेंबानी त्याचं आयुष्य खर्ची घालवले .. 
थेंबांचा हा खेळ संपतो न संपतो तोच गार वाऱ्याच्या लाटा येउन थडकू लागल्या .. जणू काही ते थेंबच त्या वाऱ्याला सांगून गेले कि माझ काम मी केलंय ,आता यापुढे तू या जगाला सुखाच्या लहरी दे .. जणू एका पिढीने दुसर्या पिढीला त्याचं जीवनकार्य पुढे चालवण्याचा संदेश दिला  .... 
आणि सरतेशेवटी राहीला तो ओल्याशार मातीतून येणारा तो गंध-सुगंध .. लाखो थेंबांच्या बालीदाना नंतर पावन झालेली ती जमीन जणू त्या थेंबांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुगंधी फुले वाहू लागली अस वाटल मला  .... 
आज आमच्या इथे पाऊस पडला.. आणि जाता जाता एवढंच सांगून गेला कि तुझ आयुष्य पण असच दुसऱ्यांच्या सुखासाठी खर्ची घाल ,मग पहा ,जिथे तुझ अस्तित्व संपेल त्या जागीसुद्धा भविष्यात सुगंधच येईल … 
मग तुमच्या इथे असा पाउस पडला का ??
                                                                                                           
                                                                                                                   - सुधीर
                                                                                                                       9561346672

Saturday 19 April 2014

मना अवकाशु ......

             
                    ज्ञानेश्वरांच्या एका श्लोकात एक ओळ आहे  " मना अवकाशु ।" .. याचा अर्थ आपल मन आकाशाप्रमाणे मोकळ राहू द्या जेणेकरून त्यात येणारा प्रत्येक विचार ,प्रत्येक आवाज मुक्तपणे मोकळेपणे ,मनसोक्त फिरू शकेल ..
            पण आपल मन खरच कधी मोकळ असत का हो ? मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला कधी मोकळेपणाने आपल्या मनात वाऱ्यासारखं फिरू दॆतच नाही आपण ..  त्या विचाराला अडथळा आणतो तो आपल्याच काही पूर्वग्रहाचा ,आपणच घालून घेतलेल्या काही समजुतींचा .. जस डेरेदार झाडाच्या पाना-फुलातून ,फांद्यातून वारा मनसोक्त हिंडतो ,कधी इकडून तर कधी तिकडून ,अगदी निवांतपणे त्याचा संचार चालू असतो , अगदी तसाच आपल्या मनातल्या विचारांना मुक्तपणे संचार करू दिला तर … 
           जेव्हा आपल्याशी कोणी काही बोलत असत तेव्हा आपण त्याच बोलन ऐकताना सुद्धा मनात काहीतरी पूर्वग्रह ठेउनच ऐकत असतो आणि त्याच पद्धतीने आपण त्याचाशी बोलतो पण .. म्हणूनच एखाद्याच्या तळमळीने विचारलेल्या "कसा आहेस ?" या प्रश्नालासुद्धा  "ठीक आहे " यासारखी साधी उत्तरे देतो आपण .. जेव्हा कुणी आपल्याशी बोलू लागत तेव्हा आपण मनातल्या मनात विचार करू लागतो ,कि ती व्यक्ती कोण आहे ,ती आपल्याला आवडते कि नाही आवडत ,त्याने आत्तापर्यंत काय काय केले आणि तो तुमच्याशी कसा कसा वागला ,यासारख्या विचारांमध्येचं आपण त्याच बोलण ऐकत राहतो ..  अशाने त्याचा आवाज ,त्याला जे बोलायचं आहे ते ,त्याचे विचार आपल्या मनात मुक्तपणे फिरतच नाहीत ..
          अनेक घरांमध्ये हे होत ,कि आई-वडील मुलाला काहीतरी सांगत असतात समजावून आणि तो मुलगा मात्र त्याचा गेम मध्ये अथवा टीव्ही मध्ये मग्न असतो .. तेव्हा त्यांचा आवाज याच्या कानापर्यंत पोहोचत असतो ,कदाचित त्याच्या मनापर्यंत सुद्धा पोहोचत असतो पण " ह्याचं नेहमीचच आहे सांगण " असा पूर्वग्रह मनात ठेवल्याने तो आवाज मनात त्याच्या कानात मुक्तपणे फिरत नाही आणि आई-वडिलांना जे मुलाला म्हणायचय ते त्याला कधी समजतच नाही ... 
          अस तुमच्याही बाबतीत होत असेल ,जेव्हा कुणीपण तुमच्याशी बोलत तेव्हा तुम्ही तुमच मन मोकळ ठेऊन किती जणांच ऐकता ? एकदा ऐकून पहा ,त्या आवाजाला तुमच्या मनापर्यंत पोहचू द्या , कारण येणारा प्रत्येक आवाज ,त्यामागची भावना ,त्यामागचा विचार हा वेगळा असतो ,त्याला मनसोक्त तुमच्या मनात फिरू द्या .. प्रत्येक विचारांची वेगळी बाजू तुम्हाला दिसून येईल , प्रत्येक गोष्ठीची ,प्रत्येक व्यक्तीची वेगळी बाजू तुम्हाला दिसून येईल ... आणि कदाचित एक वेगळचं जग तुम्हाला दिसू लागेल ... 
         
                                                                                                                      - सुधीर
                                                                                                                       

                   

Thursday 3 April 2014

एक चंद्र आणि एक कळी .....

                 
                   कळी उमलण्याचे स्वप्न पाहत वेडा चंद्र रात्रभर जागा होता ,
                   कळी उमलणारच असा त्याचा विश्वास होता ..
                   सकाळ झाली ,काळी उमलली ,
                   पण तिला पाहायला चंद्र कुठे होता ?? …

                या ओळींचा आणि आपल्या आयुष्याचा खूप खोल संबंध आहे ,आता तुम्ही म्हणाल कि कस ? .. आपण एकतर त्या कळीसारखे असतो किंवा त्या वेड्या चंद्रासारखे .. 
           जे त्या कळीसारखे असतात त्यांच्या आयुष्यात त्यांच्यावर प्रेम करणारा ,त्यांची काळजी करणारा ,आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना साथ द्यायला तयार असेल असा एखादा तरी चंद्र त्यांच्या आयुष्यात असतो ,पण त्या चंद्राची किंमत ,अथवा त्या वेड्या चंद्राच्या प्रेमाची किंमत जशी या कळीला कळत नाही ,तसच आपल होत .. आयुष्यातल्या त्या चंद्रासारख्या माणसांना आपण गृहीत धरून चालतो ,ते आपल्या आयुष्यात आहेतच ,आणि नेहमी आपल्यासोबत राहणारच आहेत ,आपली काळजी करणारच आहेत ,आपल्यावर जीवापाड प्रेम करणारच आहेत अस आपण गृहीत धरून चालतो .. पण एक सकाळ अशी येतेच जेव्हा आयुष्याची कळी तर उमललेली असते पण ती पाहायला तो वेडा चंद्रच नसतो ..तसच काहीजण आई-वडिलांना गृहीत धरतात ,काहीजण मित्रांना गृहीत धरतात ,काहीजण प्रेमाला गृहीत धरतात तर काहीजण प्रेम करणाऱ्याला गृहीत धरून पुढे चालत राहतात आणि एका वळणावर जेव्हा ते मागे वळून पाहतात तेव्हा हे सर्वजण कुठल्यातरी मागच्याच वळणावर आपल्यापासून दूर निघून गेलेले असतात ,इतके दूर कि पाहिजे तरी आपण त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही .. अशी त्या कळीची कहाणी … 
                आता त्या चंद्राच्या नजरेतून पाहिलं तर ,तसा वेडा चंद्र आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये कुठेतरी असतोच .. काहीजण प्रेमासाठी वेडे असतात ,काहीजण पैशासाठी ,काहीजण सत्तेसाठी तर काही जण पैसा आणि सत्तेसाठी .. आणि या वेडापायी ते अनेक स्वप्न पाहतात ,आणि ती स्वप्न पूर्ण व्हायची वाट पाहतात ,पण सर्वांचीच स्वप्न पूर्ण होत नाहीत ,शेवटी सकाळ झाली कि चंद्राला जावं लागतच ,आणि ती स्वप्नरुपी कळी येते सूर्याच्या वाट्याला .. तरीपण त्या चंद्राची ती जिद्द ,ते प्रेमरूपी वेडेपण हे निराळच असत , जस आई-वडील त्यांच्या मुलांसाठी वेडे होऊन आयुष्यभर कष्ट करतात ,त्यांच्यावर प्रेम करतात आणि मोठ झाल्यावर तीच मुल त्यांना सोडून निघून जातात .. एखादा प्रियकर त्याच्या प्रेयसी वर जीवापाड प्रेम करतो पण जेव्हा आयुष्यभर साथ देण्याची वेळ येते तेव्हा तीच त्याला सोडून निघून जाते .. असे अनेक उदाहरण देत येतील या चंद्रासाठी .. 
                 कुठेतरी आपल्या सर्वांच्या मनात हा चंद्र किंवा हि कळी असतेच .. शेवटी आयुष्य जगायला मिळत त्या कळीला ,स्वप्न पूर्ण होत त्या कळीचे परंतु त्या चंद्राच्या बलिदानाचा आणि प्रेमाचा थाटच काही और असतो ,त्यातली मजाच काही और असते आणि शेवटी आपल्या लक्षात राहतो तो वेडा चंद्र आणि त्याच वेड प्रेम .. तेव्हा तुम्ही ठरवा ,तुम्हाला चंद्र व्हायचय का कळी !!….
                                                             
                                                                                                                       - सुधीर 
                                                                                                                           9561346672